अजूनकाही
येत्या काळात राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. सत्ताकांक्षी राजकीय समूहातील सत्तास्पर्धा एवढाच अर्थ या घडामोडींना असतो. आधीचे सरकार जाऊन नवे सरकार सत्तेवर येणार, एवढ्या मोजक्या शब्दांत त्याचे वर्णन करता येते. या राजकीय प्रक्रियेतील परिवर्तनामुळे आपल्या आयुष्यात तसूभरही फरक पडणार नसतो, हे सत्य आता जनतेला ज्ञात झालेले आहे. अर्धशतकाहून अधिक काळचा अनुभव गाठीशी असलेल्या भारतीयांना आणखी भ्रमित करण्यात काय हशील आहे?
यातला चर्चेचा मुद्दा हा की, त्यानिमित्त सर्व राजकीय घटकांकडून 'सेक्युलॅरिझम' या संकल्पनेची वाताहात करण्याची स्पर्धा पाहावयास मिळणार आहे. या दोन्ही राज्यांतील धार्मिक श्रद्धास्थळांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत, ही यातली समाधानाची बाब आहे.
धर्म आणि राज्यसंस्था परस्परांपासून भिन्न असतात. या दोन्हींचा परस्परांशी कसलाच संबंध नसतो. किंबहुना या दोहोंनी परस्परांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करू नये, या हेतूने ही संकल्पना रूढ करण्यात आलेली आहे. जगाच्या इतिहासातील विविध टप्प्यांतले बारकावे तपासल्यास ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असल्याचे जाणवते. राजकीय घटक ज्यांना मतदार संबोधतात, ती जनता आणि एक व्यापक जनसमुदाय या अर्थाने खरोखरीच सेक्युलर असतो. त्याला शांततापूर्वक सहअस्तित्व कोणी मुद्दाम शिकवण्याची गरज भासत नाही. तो आपापल्या श्रद्धांची आपापल्यापुरती जोपासना करून समाधानाने जगत असतो.
राजस्थान, मध्य प्रदेशही याला अपवाद नाही. पण आता या दोन्ही राज्यांत निवडणुका होणार असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांकडून जो ‘टेंपल रन’चा खेळ चालवला जाईल. त्याने हा समूह विचलीत होऊ शकतो. तटस्थ जनसमुदायास धर्माच्या, जातीभावनेच्या प्रवाहात वाहवत जाण्यास प्रवृत्त केल्याशिवाय कुठल्याच राजकीय पक्षास निवडणूक जिंकता येत नाही, हेच भारतीय लोकशाहीचे नागडे सत्य आहे का? या दोन्ही राज्यांतील समस्या, त्यांच्या निवारणासाठी विविध पक्षांनी केलेले संकल्प, त्या-त्या राज्यातल्या मतदारांच्या आशा-अपेक्षांचे प्रतिबिंब असलेले जाहीरनामे अधिक प्रकाशझोतात येण्याऐवजी भलत्याच गोष्टी समोर येतात.
एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रचारमोहिमेचा शुभारंभ कोणत्या मंदिरातून करणार, तर दुसऱ्या पक्षाचा प्रमुख प्रचारमोहिमेचा नारळ कुठल्या देवतेच्या साक्षीने वाढवणार याचा साद्यंत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गत सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी राजकीय पक्षांनी प्रचारफेऱ्यांदरम्यान सर्व धार्मिकस्थळे आपापसांत अगदी सामंजस्याने वाटून घेतली आहेत.
राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीत आता आधुनिकता व सफाईदारपणा आला आहे. प्रचारमोहिमांचे स्वरूप पालटले आहे. पण निवडणुकांना आणि मतदात्याला सामोरे जाण्यापूर्वी त्यांच्या समस्या काय आहेत? व त्यांची सोडवणूक कशी करायची? याच्या प्रामाणिक प्रतिपादनासाठी ही आधुनिक तंत्रज्ञानामुळे आलेली चमकदार सादरीकरणाची अक्कल हुशारी आणि व्यवस्थापन कौशल्य वापरले असते तर किमान सत्ताधारी व सत्ताकांक्षी पक्षाच्या अर्धचाणक्यांच्या तावडीतून धार्मिक श्रद्धास्थाने बचावली असती. राजकीय पक्षांकडून त्यांचा सत्ताप्राप्तीचा कंडू शमवण्यासाठी सेक्युलॅरिझम या उदात्त संकल्पनेशी वर्षानुवर्षांपासून होणारी छेडछाड थांबावी, या हेतूने तरी सर्वधर्मीय मतदारांनी या राजकीय घटकांना आवर घालायला हवा.
किमान या राजकीय पक्षांनी येत्या काळात स्वत:हून त्यांची अध्यात्माची ओढ किती खरी, किती खोटी? याचा कबुलीजबाब द्यायला हवा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या प्राचिन काळापासून चालत आलेल्या जीवनशैलीतील चार पुरुषार्थ जगण्याचा प्रयत्न इथल्या मातीतला प्रत्येक जण करतोच आहे, त्याला अन्य धर्म ज्ञात नाही पण केवळ सत्तेच्या माध्यमातून अर्थप्राप्तीसाठी काही घटक त्याला त्याच्या मूळ धर्मापासून का परावृत्त करतात? हा प्रश्न सर्वांनाच पडतो आहे, नसेल तर तो अवश्य पडायला हवा.
अवघ्या विश्वकल्याणाचे पसायदान आणि संत कबिराचे दोघे गुणगुणत मानवधर्म जगणाऱ्या सर्वधर्मीय जनसामान्यांच्या मनातल्या अस्मिता जागवण्याचे पाप का केल्या जात आहे? या शेकोटीवर स्वत:च्या पोळ्या भाजण्याचे प्रताप थांबवायला हवेत. कारण एरवी केवळ प्रामाणिक श्रद्धावानांकडूनच पायधूळ झाडल्या जाणाऱ्या व भग्नावस्थेत असलेल्या मंदिरांची अचानक होणारी रंगरंगोटी त्याला अस्वस्थ्य करत असणार!
‘जाहिद शराब पिने दे मस्जिद में बैठकर, या वो जगह बता जहाँ खुदा नही है’ या अवघ्या दोन ओळींत भूतलावरच्या प्रत्येकाचा धर्म व नीतिमत्ता सांगणाऱ्या मिर्झा गालिब यांचा मतितार्थ आपल्या राजकीय प्रक्रियेतील भागीदारांना कधीच समजणार नाही का? या दोन्ही राज्यांतल्या प्रचारमोहिमांमुळे गल्लोगल्लीचे वातावरण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे होईल. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील व जनतेची महिनाभर करमणूकही होईल. पण रखरखीत वाळवंटात व दररोजच्या भाऊगर्दीत एकाकी अवस्थेतील आमच्या मंदिर-मस्जिदींना प्रतीक्षा असेल पुन्हा ‘अच्छे दिन’ येण्याची, पुन्हा नव्या निवडणुकीची!
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Mon , 06 August 2018
✔