अजूनकाही
‘गुड कॅरेक्टर्स मेक ग्रेट स्टोरीज’ अशा अर्थाचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. काही चित्रपट पाहिल्यावर हे वाक्य अधिक खरं वाटू लागतं. ‘कारवाँ’नंतरही याचीच प्रचिती येते. यातील पात्रं चित्रपट संपल्यानंतरही मनात रेंगाळत राहतात. कारण ती सदोष असली तरी ती सच्ची आहेत.
राज पुरोहित (आकाश खुराना) या सुरुवातीलाच ओघवता परिचय झालेल्या पात्राचा प्रवासादरम्यान बस अपघातात मृत्यू होतो. त्यांचा मुलगा अविनाशला (दुल्कर सलमान, मल्याळी अभिनेता) ट्रॅव्हल कंपनीकडून फोन येऊन ही बातमी कळवली जाते. तसंच त्यांचा मृतदेह बँगलोरमध्ये त्याच्याकडे पाठवल्याचंही सांगितलं जातं. विमानतळावरून आणायची असलेली शवपेटी शौकत (इरफान खान) या मित्राच्या ‘कारवाँ’मधून आणायचं ठरतं. मात्र ती घेतल्यावर अंत्यविधीदरम्यान त्यात एका स्त्रीचा मृतदेह आढळतो आणि एका भन्नाट प्रवासाची सुरुवात होते.
अविनाशच्या वडिलांचा मृतदेह चुकून ताहिराकडे (अमाला अक्किनेणी) आणि तिच्या आईचा मृतदेह याच्याकडे आलेला असतो. शांत स्वभावाचा अविनाश बंगलोरहून कोचीला जायचं ठरवतो. मात्र रस्त्यात ताहिराची मुलगी तान्यालाही (मिथिला पालकर) कोएम्बतूरहून आणण्याचं काम अविनाश त्याच्या अंगावर ओढून घेतो. ज्यामुळे आधीच काही प्रमाणात ब्लॅक कॉमेडीकडे वळणारा हा चित्रपट आणखी मजेशीर बनत जातो.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे चांगली पात्रं चांगल्या कथानकाचा पाया बांधण्यास महत्त्वाची ठरू शकतात. ज्यामुळे प्लॉटहोल्स असलेली कथानकंही संस्मरणीय ठरू शकतात. इरफानचेच ‘करीब करीब सिंगल’ आणि ‘ब्लॅकमेल’ हे चित्रपट याची उत्तम उदाहरणं आहेत. अविनाश हा आयटी क्षेत्रात काम करणारा तरुण मुळात छायाचित्रकाराच्या कलात्मक पिंडाचा असतो. मात्र स्वतःच्या छायाचित्रांचं एक अयशस्वी प्रदर्शन भरवून झाल्यावर, वडिलांच्या एक प्रकारच्या दबावाखाली येऊन आयटी क्षेत्रात नोकरी पत्करून स्थिरस्थावर झालेला असतो. तरीही त्याला त्याची आवड खुणावत असतेच. आधीच अंतर्मुख असलेला अविनाश या नकोशा नोकरीच्या निमित्तानं अधिक अबोल झालेला असतो.
तर तान्याही ओपन माइंडेड आजीप्रमाणेच दिलखुलास जगणारी, बहिर्मुख व्यक्ती असते. वयाचा फारसा फरक नसूनही अविनाश आणि तान्यामध्ये वैचारिक दृष्टीनं बरंच अंतर असतं. दोघंही काही वेळा चूक तर काहीवेळा बरोबर असतात. शौकतही दिलखुलास, जगाची पर्वा न करणारा मनमौजी व्यक्ती. अर्थात त्याचीही स्वतःची बॅकस्टोरी आहेच. तरीही त्याचं केवळ अस्तित्वच आल्हाददायक आणि उत्साही असतं.
बिजॉय नाम्बियारची मूळ कथा लेखक-दिग्दर्शक आकर्ष खुरानानं रूपांतरीत केली आहे. ‘बापजन्म’ आणि इतर ठिकाणी अभिनेता तर इथे चांगली मांडणी करणारा दिग्दर्शक अशा बऱ्याच रूपात तो चांगलं काम करताना दिसून येतो. अर्थात त्याची सदोष पटकथा हुसैन दलालच्या ‘स्पॉट ऑन’ आणि खुसखुशीत संवादांमुळे उणीवांकडे दुर्लक्ष करावी अशी झाली आहे.
‘मय्यत पे रोमान्स मत कर’ अशा अर्थाचा संवाद म्हणणारा शौकत पुढे जाऊन ‘लोगों को हक जमाना आता हैं, रिश्ता नहीं’ बोलतो; तर रुमी (क्रिती खरबंदा) जेव्हा ‘जब तक एक बेटे को रियलाइज होता हैं उसका बाप सही था, उसका एक बेटा उसे गलत समझने लगता हैं’ तेव्हा एरवी विनोदी असलेल्या वातावरणाला हलकेच भावनिक कोमलतेचा स्पर्श होतो.
मनोज वाजपेयी किंवा राजकुमार राव अलीकडे त्यांच्या परफॉर्मन्समधून निराश करत असताना इरफान कायम वेगळी आणि दमदार कामं करून उजवा ठरत आहे. शिवाय त्याला आणि त्या अनुषंगानं त्याच्या चित्रपटांना मौखिक प्रसिद्धीचाही लाभ मिळतो आहेच. दुल्कर सलमानही या हिंदी पदार्पणात चमकून जातो. मिथिला नेहमीप्रमाणे चांगली साथ देतेच. याखेरीज निपुण धर्माधिकारी, सारंग साठ्ये, अशा बऱ्याच मराठी लोकांची फौज अधूनमधून लहान-मोठ्या दृश्यांतून प्रभाव पाडते.
अविनाश अरुण दक्षिण भारताला ज्या रितीनं चित्रित करतो, त्याला अवाक होण्याहून वेगळा काही प्रतिसाद देणं अवघड आहे. अशाच रोड ट्रिपवजा थीम असलेला, दक्षिण भारतात महत्त्वाचा भाग चित्रित झालेल्या ‘शेफ’मध्ये याची उणीव होती. त्यामुळे योग्यपणे हाताळल्या गेलेल्या गोष्टींमध्ये छायाचित्रणाचाही समावेश होतो.
बऱ्याच संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली विविध गाणीही कथेच्या ओघात येऊन मनात रेंगाळत राहतात. ‘छोटा सा फसाना’ आणि ‘हार्टक्वेक’ ही दोन तर टॉप आहेत. ‘हार्टक्वेक’ त्याच्या बहुभाषिक शब्दांमुळे ‘कॉफी आणि बरंच काही’मधील ‘रंग हे नवे नवे’ची आठवण करून देतं. त्यानिमित्तानं बऱ्याच दिवसांनी लक्षात राहिल असा साऊंडट्रॅक हिंदी चित्रपटात दिसतो.
‘पिकू’, ‘करीब करीब सिंगल’ आणि आता ‘कारवाँ’ अशा तीन रोड ट्रिप थीम असलेल्या चित्रपटांमध्ये समांतर वाटणाऱ्या भूमिका करूनही संस्मरणीय राहणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. ते इरफानच करू जाणे!
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment