अजूनकाही
एडगर अॅलन पो (१८०९ - १८४९) हा अमेरिकन कथाकार गूढकथांचा जनक मानला जातो. त्याच्या निवडक गूढकथांचा संग्रह ‘काळी मांजर’ या नावानं नुकताच डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाला आहे. ‘मॉर्ग रस्त्यावरचे खून’ ही एडगरची रहस्यकथा जगातली पहिली रहस्यकथा मानली जाते. या कथेचा सर आर्थर कॉनन डॉयलचा सुप्रसिद्ध नायक शेरलॉक होम्स आणि अगाथा ख्रिस्तीचा नायक हर्क्युल पायरो यांच्यावर मोठा प्रभाव असल्याचं मानलं जातं. एडगर अॅलन पोच्या साहित्याचा प्रभाव केवळ अमेरिकी साहित्यावरच नाही, तर जगभरातल्या साहित्यावर पडला!
या पुस्तकाचा मराठी अनुवाद रमा हर्डीकर-सखदेव यांनी केला आहे. त्यांच्याशी या पुस्तकाच्या निमित्तानं मारलेल्या गप्पा.
.............................................................................................................................................
प्रश्न- एडगर अलन पो यांच्या लेखनशैली बद्दल काय सांगाल?
उत्तर - पो यांच्या कथा ‘गॉथिक’ या साहित्यप्रकारातल्या मानल्या जातात. म्हणजेच त्यात भय, गूढ, रहस्य असे विषय हाताळले जातात. आज आपल्याला ज्या प्रकारची कथा माहीत आहे, त्यापेक्षा त्यांच्या कथांचा घाट खूपच वेगळा आहे. पो यांनी विविध विषयांच्या कथा लिहिल्या तरी त्यात हा गूढ घटक कुठेतरी असतोच. बऱ्याच कथांची सुरुवात त्यांनी एखादं प्रसिद्ध ‘वचन’ लिहून केली आहे. तसंच सुरुवातीला लेखकाचं त्या त्या विषयावरचं चिंतन प्रस्तावानेसारखं येतं आणि मग प्रत्यक्ष कथेला सुरुवात होते. ‘मॉर्ग रस्त्यावरचे खून’ या कथेत याच प्रकारे सुरुवातीला पो यांचं ‘मानवी मनाचं विश्लेषण आणि खरा विश्लेषक कोण, त्याची वैशिष्ट्य याबद्दलचं दीर्घ चिंतन आलेलं आहे. आज आपण ज्या गुप्तहेरकथा वाचतो त्यात असं दीर्घ चिंतन आढळून येत नाही. पण पो हा या कथाप्रकारचा जनक मानला गेला आहे. त्यानं पहिल्यांदा अशा प्रकारचं लिखाण केल्यानं ते आजच्या त्या जॉनरच्या कथांपेक्षा खूप वेगळं वाटतं. याच कथेतल्या चिंतनाचा काही भाग असा आहे -
‘‘...मेंदूची विश्लेषण करण्याची क्षमता आणि भरपूर चातुर्य यांमध्ये गल्लत करता कामा नये. उत्तम विश्लेषक हा नेहमीच हुशार असतो, पण एखादा हुशार माणूसही विश्लेषण करण्याच्या बाबतीत पूर्णपणे अक्षम असू शकतो. एखाद्या गोष्टीचा रचनात्मक पद्धतीने विचार करण्यातूनच बरेचदा हुशारी दाखवली जाते. कवटीच्या आकारावरून मेंदूचा अभ्यास करणार्या फ्रेनॉलॉजिस्टांनी (माझ्या मते चुकून) त्या क्षमतेसाठी एक वेगळा अवयव असतो असं म्हटलेलं आहे. त्यांच्या मते ती एक आदिम क्षमता आहे. पण ज्यांची बुद्धिमत्ता एरवी मूर्खपणाच्या पातळीवर असते, त्यांच्यामध्येसुद्धा ही रचनात्मक विचार करण्याची क्षमता बरेचदा दिसून येते. आणि या गोष्टीने अनेक लेखक आणि विचारवंतांना आकर्षित केलेलं आहे. पण चातुर्य आणि विश्लेषणशक्ती यात फार मोठा फरक आहे. म्हणजे कल्पनाविलास आणि कल्पनाशक्ती यात जितका फरक आहे त्याहूनही कितीतरी जास्त. तरी त्यांत एक प्रकारचं साम्य आहेच. म्हणजे खरं सांगायचं तर बुद्धिमान मनुष्य नेहमी कल्पनाविलासात रमलेले असतात, पण ज्याच्याकडे खरी कल्पनाशक्ती असते, तो मात्र नेहमीच खरा विश्लेषक असतो.
आत्ता मी जी काही विधानं केली आणि जी मतं मांडली, त्याच्याशी ही पुढची गोष्ट संबंधित आहे हे वाचकांच्या लक्षात येईल.’’
आज आपल्याला जे इंग्लिश वाचायची सवय असते त्यापेक्षा पो यांच्या काळातली भाषा वेगळी, काहीशी जड आहे. वाक्य मोठमोठी आहेत आणि वाक्यरचनाही वेगळ्या प्रकारच्या आहेत. काही वेळा त्यातून थेट अर्थ व्यक्त होत नाही तर तो समजून घ्यावा लागतो.
प्रश्न- मराठी वाचकांना एडगरचं नेमकं काय महत्त्व सांगता येईल? किंवा एकूण मराठी साहित्याचा विचार करता एडगरच्या कथा कुठे वेगळ्या आणि त्यातून मराठी वाचकांना आणि साहित्याला काय मिळेल?
उत्तर - मराठी साहित्यात पोप्रमाणे रहस्य किंवा भयकथा फारशा दिसून येत नाहीत. मोजक्याच मराठी लेखकांनी हे प्रकार हाताळल्याचं दिसतं. त्यातही पाश्चात्य साहित्यात जशा गूढकथा, गुप्तहेरकथा या लोकप्रिय आहेत आणि महत्त्वाचा जॉनर आहेत, त्याप्रमाणे मराठीत त्यांना तसं स्थान दिलेलं तितकं दिसत नाही. केवळ मनोरंजन करणारं लिखाण असेल तर ते कुठेतरी दुय्यम मानलं जातं. पण पो यांचं जागतिक साहित्यातलं स्थान पाहता हे कथाप्रकार अजिबातच दुय्यम नाहीत, हे आपल्याला समजून येतं. मनोरंजनही करणाऱ्या पोच्या भयकथा केवळ गूढ उकलणाऱ्या नसून त्या माणसाच्या मनातल्या काळ्या, अंधाऱ्या भागांवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून त्यांनी या मानवी वृत्तींचं विश्लेषण केलेलं आहे. पो यांना कायमच मृत्यू या संकल्पनेविषयी आकर्षण वाटत आलेलं असल्याने त्यांनी मृत्यू आणि त्याचं भय याभोवती अनेक कथा गुंफल्या आहेत. उदा. या संग्रहातल्या ‘जिवंतपणीच दफन’ आणि ‘काळी मांजर’ या कथा. काळी मांजर या शीर्षककथेतला अंगावर काटा आणणारा काही भाग पहा -
“ते मांजर मला शारीरिक इजा पोहोचवेल अशी काही ही भीती नव्हती. पण मला नक्की काय वाटत होतं, हे मी तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाहीये. आज या तुरुंगातही मला सांगायला शरम वाटतेय, पण त्या मांजरामुळे माझ्या मनात जी प्रचंड भीती उत्पन्न झाली होती, त्यात त्याच्याविषयीच्या भुताटकीच्या कल्पनेने कितीतरी भर घातली होती. त्या मांजराच्या छातीवर एक पांढरा धब्बा होता हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय आणि तो धब्बा हाच फक्त त्या दोन बोक्यांमधला फरक होता. तर माझ्या पत्नीने माझं लक्ष वारंवार त्या पांढर्या धब्ब्याकडे वेधलं होतं. तुम्हाला आठवत असेल, की या पांढर्या धब्ब्याला काही विशिष्ट आकार नव्हता. पण हळूहळू, म्हणजे पटकन लक्षातही येणार नाही इतक्या हळूहळू त्याचा आकार बदलत चालला होता. सुरुवातीला तर माझ्या तार्किक बुद्धीने, हा एक भास असणार असाच विचार केला, पण तसं नव्हतं. त्या धब्ब्याचा आकार बदलून त्याला एक विशिष्ट आकृती प्राप्त झाली आणि ती कोणती ते तुम्हाला सांगतानाही माझ्या अंगावर सरसरून काटा येतो आहे. त्या धब्ब्याच्या आकारामुळेच माझा त्या बोक्याविषयीचा तिटकारा अधिकाधिक वाढत गेला आणि जर माझी हिंमत झाली असती तर मी त्याला खतमच करून टाकलं असतं. कारण त्याच्या छातीवरचा तो भयंकर आकार होता फासाच्या दोरीचा! बापरे, भयानक गुन्हे, भीती आणि साक्षात मृत्यूचं प्रतीक!’’
भयकथांव्यातिरिक्त त्यांच्या साहित्यातून उपहास, गडद विनोद हेही वाचायला मिळतात. या संग्रहातल्या ‘सैतानाशी पैज म्हणून कधीही आपलं डोकं पणाला लावू नका’ आणि ‘बेडक्या’ या उपहासात्मक शैलीतल्यासारख्या कथा मी तरी मराठीत वाचलेल्या नाही.
या संग्रहातल्या नऊ कथा या वेगवेगळ्या विषयांच्या, शैलीच्या आणि प्रकारातल्या आहेत. काळी मांजरसारखी भयकथा वाचताना आपल्या अंगावर सरसरून काटा उभा राहील, तर मॉर्गरस्त्यावरचे खून किंवा सोनेरी किडा या दीर्घकथा आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. बेडक्या ही विनोदी शैलीतली सूडकथा आपल्याला एक पूर्णच वेगळा अनुभव देईल हे नक्की. एकूणातच मराठी वाचकांना वेगळ्या प्रकारच्या कथा या पुस्तकात वाचायला मिळतील.
.............................................................................................................................................
'काळी मांजर - एडगर अॅलन पोच्या निवडक गूढकथा' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा
.............................................................................................................................................
प्रश्न - या पुस्तकाची अनुवाद प्रक्रिया नेमकी कशी होती? कथांची निवड कशी केली? विशिष्ट कथा निवडण्यामागचं कारण?
उत्तर - एडगर अॅलन पो वाचकांना भयकथा, गूढकथा यांकरता अधिक माहीत आहेत. त्यांच्या कथांचं पुस्तक करायचं ठरलं आणि कथा निवडीकरता पुन्हा एकदा त्यांच्या कथा मी वाचू लागले. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात पो यांनी लिहिलेल्या कथा भाषेच्या दृष्टीनं आपल्याला आज नक्कीच वेगळ्या वाटतात. त्यांच्या काही सुप्रसिद्ध भय-गूढकथा मी अनुवादासाठी निवडल्या. मात्र त्यांच्या इतरही कथा प्रकारांची ओळख व्हावी या उद्देशानं फक्त गूढकथाच न निवडता प्रेमकथा, गुप्तहेरकथा, भयकथा त्याचबरोबर उपहासात्मक विनोदी शैलीत लिहिलेल्या दोन कथाही या संग्रहासाठी निवडल्या. या संग्रहात ‘एलिओनोरा’, ‘लंबगोलाकार व्यक्तिचित्रं’ यांसारख्या गूढ घटक असलेल्या प्रेमकथा आहेत, तसंच ‘बेडक्या’सारखी उपहासात्मक शैलीतली कथाही आहे. त्यामुळे या संग्रहातून वाचकाला पो यांनी लिहिलेले विविध कथा प्रकार वाचता येतील असं वाटलं. कथा निवडल्यानंतर अनुवाद करण्यापूर्वी त्या पुन्हा पुन्हा वाचल्या. कारण त्या काळातली भाषा, लिखाणाची शैली, मोठमोठी पल्लेदार वाक्यं, इतर लेखकांचे, तत्त्वज्ञांचे संदर्भ हे मराठीत आणणं माझ्यापुढचं आव्हान होतं. काही प्रमाणात वाक्यं लहान आणि थोडी सुलभ करावी लागली.
कथा वाचून त्या आवडल्या आणि मराठीत यायला हव्या असं वाटलं म्हणून त्या त्या निवडत गेले. पण प्रत्यक्ष अनुवाद करायला बसल्यावर लक्षात आलं की, काही कथा मराठीत प्रभावीपणे अनुवादित करणं फारच अवघड आहे. उदाहरणार्थ ‘सैतानाशी पैज म्हणून कधीही आपलं डोकं पणाला लावू नका’ ही कथा. इंग्रजीत अशा प्रकारच्या उपहासात्मक विनोदी कथा वाचल्या होत्या, पण मराठीत हा जॉनर कमी दिसतो. त्यातलीच ही काही वाक्यं पाहू.
‘इकडे डॅमिट निश्चल पडला होता. मला वाटलं की त्याचा स्वाभिमान दुखावला गेला असेल आणि त्याला माझ्या मदतीची गरज असेल. मी घाईने त्याच्याजवळ गेलो, तर मला दिसलं की त्याला गंभीर म्हणता येईल अशी दुखापत झाली होती. खरं सांगायचं, तर त्याचं डोकं धडावेगळं झालं होतं आणि मी आजूबाजूला बरंच शोधूनही मला ते कुठे सापडलं नाही.’ असा ‘सटल’ विनोद आणि उपहास मराठीतही तसाच्या तसा आणणं हे आव्हान होतं.
याउलट ‘एलिओनोरा’सारख्या इतर काही कथांमधला वर्णनात्मक भाग अनुवादित करणं तुलनेनं सोपं होतं. मात्र ते करतानाही मूळ शैलीप्रमाणे अलंकृत भाषा वापरावी लागली. उदाहरणार्थ, ‘या हिरवळींच्या मधेमधे, मुक्त स्वप्नांप्रमाणे उगवलेले अनेक वृक्ष होते. हे वृक्ष सरळसोट वाढलेले नव्हते, तर दरीच्या मध्यभागी दुपारच्या वेळी जे ऊन पडायचं त्याच्या दिशेने नजाकतीने लवून उभे असल्यासारखे कमरेत वाकलेले होते. या वृक्षांची खोडं गडद तपकिरी आणि चंदेरी अशा दोन विरुद्ध रंगांच्या ठिपक्यांनी नटलेली होती. ही खोडं अगदी गुळगुळीत होती, पण एलिओनोराचे गाल मात्र त्याहूनही कैक पटींनी मुलायम होते. त्यांच्या शेंड्यांना असलेली मोठमोठी, हिरवीगार पानं मंद वार्याबरोबर लहरत असायची. ही पानं वगळता, त्या झाडांची वेडीवाकडी खोडं म्हणजे सूर्यदेवतेला वंदन करणार्या सीरियातल्या राक्षसी सर्पांसारखी भासायची....’
अनुवाद करताना मी दोन-तीन खर्डे करते. त्या वेळी अनुवादावर अर्थाच्या दृष्टीनं आणि मग भाषिक दृष्टीनं काम करते. पहिल्यांदा आशयाच्या दृष्टीनं अनुवाद करायचा. प्रत्येक वाक्यं अचूक अनुवादित झालं आहे ना याची खात्री झाली की, मग भाषेवर काम करायचं. मराठीच्या दृष्टीनं वाक्यांमध्ये काही बदल करायचे असल्यास ते करायचे किंवा अधिक चपखल शब्द सुचल्यास तसे बदल करून अनुवाद पूर्ण करायचा. या पुस्तकाची अनुवाद प्रक्रियाही अशीच होती.
प्रश्न - एडगरच्या कथांचं आजच्या काळाच्या किंवा साहित्याच्या संदर्भात वेगळेपण वा वैशिष्ट्य काय आहे असं तुम्हाला वाटतं?
उत्तर - पो यांनी आयुष्यात अनेक चढउतार पहिले, मानसिक ताणतणाव सहन केले आणि यातून त्यांचं साहित्य – कथा आणि कविता - आकाराला आलं. अमेरिकेतल्या स्वच्छंदतावादी फळीतले ते एक महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांच्या साहित्याचा प्रभाव केवळ अमेरिकी साहित्यावरच नाही तर जगभरातल्या साहित्यावर पडला.
पो हे कथा या साहित्यप्रकारचे प्रणेते मानले जातात. त्यांनीच पहिल्यांदा गुप्तहेरकथा लिहिली असं म्हटलं जातं. तिचं नाव, ‘मॉर्ग रस्त्यावरचे खून’ (मर्डर्स ऑन द र्यू मॉर्ग). तीही या संग्रहात समाविष्ट केली आहे. आज विज्ञानकथा हा जो कथाप्रकार आहे त्याचा उदय होण्यामध्ये पो यांच्या साहित्याचं मोठं योगदान मानलं जातं. म्हणूनच त्या कथांना आजही आढळ स्थान मिळालेलं आहे.
या कथा जरी जुन्या काळातल्या असल्या, त्यातली भाषा आज वापरात असलेल्या भाषेपेक्षा वेगळी असली तरी त्यात मानवी प्रवृत्तीविषयी जे भाष्य आहे, मानवी स्वभावाच्या गडद छटांचं जे विश्लेषण आहे, ते कालातीत म्हणता येईल असं आहे. कारण मनुष्यस्वभाव आजही तोच आहे. त्यामुळेच आजही या कथा आपल्याला खिळवून ठेवतात.
प्रश्न - एडगरचं आणखी कुठलं साहित्य मराठीत अजून यायला हवं असं वाटतं?
उत्तर - या संग्रहात पो यांच्या गाजलेल्या कथांपैकी नऊ कथा आहेत. त्याव्यतिरिक्त ‘द फॉल ऑफ द हाउस ऑफ अशर’, ‘द परलॉइंड लेटर’, ‘द बलून होक्स’ अशा इतर कथांचाही अनुवाद करायला हवा असं वाटतं. सायन्स फिक्शन हा साहित्य प्रकार सुरु होण्यातही पो यांचा वाटा मानला जातो. त्या काळात नवीन असलेल्या ‘हॉट एअर बलून’ या तंत्राद्यानावर त्यांनी ‘द बलून होक्स’ ही कथा लिहिली. या संग्रहात समाविष्ट केलेल्या मॉर्ग रस्त्यावरचे खून या कथेतला ‘द्युपां’ नावाचा गुप्तहेर नायक घेऊन पो यांनी एकून तीन कथा लिहिल्या. त्यातल्या इतर दोन म्हणजे ‘द परलॉइंड लेटर’ आणि ‘द मिस्टरी ऑफ मारी रॉजे’. या कथाही मराठीत यायला हव्यात. याशिवाय पो यांनी कविता, एक नाटक आणि एक कादंबरीसुद्धा लिहिली आहे.
.............................................................................................................................................
'काळी मांजर - एडगर अॅलन पोच्या निवडक गूढकथा' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment