अजूनकाही
पत्रकार संजय आवटे यांचं ‘We The Change - आम्ही भारताचे लोक’ हे नवं पुस्तकं उद्या पुण्यात मा. खा. शरद पवार आणि कवी यशवंत मनोहर यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
प्रिय आरव आणि चार्वी,
तुम्हाला एक गंमत सांगतो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यासाठी मी एकदा गेलो होतो. फडणवीस हे प्रश्नांची उत्तरे नेमकेपणाने देणारे अभ्यासू नेते आहेत. त्यांनी मुलाखतीतील प्रश्नांची उत्तरंही उत्तम दिली. औपचारिक प्रश्नोत्तरं झाल्यानंतर मी कॅमेरामनला थांबायला सांगितलं. मग थोड्या इकडच्या-तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. फडणवीसांशी संवाद होऊ शकतो, हे त्यांचं आणखी एक बलस्थान.
मध्येच मी त्यांना विचारलं, सारं खरं. सरकार बदललं. सत्तांतर झालं. पण, तो बदल शासनव्यवहारात, रोजच्या जगण्यात जाणवत नाही. सरकार ‘दिसत’ नाही. त्यावर ते हसले आणि म्हणाले, “अहो, या मागच्या लोकांनी गेल्या पंधरा वर्षांत एवढे खड्डे खणून ठेवलेत की, आम्हाला काही करताच येत नाही.”
त्यांचं उत्तर चूकच असेल, असं मी म्हणणार नाही. शिवाय, मुख्यमंत्र्यांसाठी हे उत्तर राजकीय सोयीचं असेलही, कारण लोक सोयीनं इतिहास वापरत असतात! पण मी मात्र विचारात पडलो. थोडा मागं गेलो. थोडा जास्तीच मागं गेलो.
मला वाटलं, पं जवाहरलाल नेहरूंनी या देशाची सूत्रं घेतली, तेव्हा तर काय अवस्था असेल? किती वर्षांचे खड्डे असतील! इतिहासात वाचलेला तो काळ आठवा. ज्या स्थितीत नेहरूंकडं या देशाची सूत्रं आली, ती स्थिती आठवून पाहा. स्वातंत्र्याचीच फाळणी झालेली. दंगलींचा आगडोंब उसळलेला. त्या नौआखालीमध्ये तुमचा- माझा बाप महात्मा गांधी दंगली शमवण्यासाठी एकाकी चालत होता. स्वातंत्र्याचा जल्लोष आणि राजप्रासादांचा थाट नाकारून हा महात्मा अनवाणी वाट तुडवत होता. पाकिस्ताननं लादलेल्या युद्धानं तर देश होरपळला. आधीच देश महाकाय, खाणारी तोंडं प्रचंड. पण, बेरोजगारी, निरक्षरता, विषमता, साथीचे रोग, दुर्गमता यामुळं आव्हानं आणखी खडतर. संस्थानांचा प्रश्न सुटता सुटत नव्हता. जो कागदावर सुटल्यासारखा वाटत होता, तोही प्रत्यक्षात डोकं वर काढत होता. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी देश स्वतंत्र झाला खरा, पण सामाजिक-आर्थिक स्वातंत्र्य होतं कुठं? या चर्चाविश्वातही नसलेला असा फार मोठा वर्ग होता. विठूमाऊलीच्या मंदिरात अद्याप चोखामेळ्यालाच प्रवेश नव्हता. असे अडचणींचे डोंगर उभे होते. आणि तरीही, नेहरू ‘नियतीशी करार’ करत होते! १९५० मध्ये नेहरू ‘नियोजन आयोग’ स्थापन करत होते, तेव्हाचं चित्र काय होतं? दरडोई उत्पन्न होतं ७२ पैसे. आयुर्मान २७ वर्षं. साक्षरता १७ टक्के. एक टक्का गावांमध्ये वीज होती फक्त. अशा वेळी नेहरू पहिली पंचवार्षिक योजना आखत होते! म्हणजे, मतदार यादी तयार करणं हेच आव्हान होतं. तरीही, प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे, असा आग्रह. बरं तेव्हा कुठे लोकांकडे आधार कार्ड नि पॅन, पासपोर्ट वगैरे? अक्षरशः अशी स्थिती होती की, समजा चार्वीचं नाव आहे मतदार यादीत. आणि, तिचा भाऊपण २१ वर्षांचा आहे. पण, त्याचे फार काही तपशील नसतील उपलब्ध, तर मतदारयादीत ‘चार्वीचा भाऊ’ अशीच त्याची नोंद असे. अशा महत्प्रयासानं मतदारयाद्या झाल्या तयार. तुम्ही ‘न्यूटन’ बघितला ना? आज ही स्थिती असेल, तर तेव्हाची मतदान प्रक्रिया किती कठीण असेल!
हा देश कसा आकाराला आला असेल, याची कल्पनाही करू लागलो तरी मी थक्क होतो. भारतासोबत उभे राहिलेले देश कोसळले, हुकूमशाहीच्या वाटेनं गेले. लष्करी कवायतीत अदृश्य झाले. पण, भारत मात्र झेपावला.
भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी जन्माला आले. पाकिस्तान आपला ‘बर्थ डे’ १४ ऑगस्ट १९४७ सांगत असला तरीही! जन्म एकाच दिवशी. तोवरचा सारा इतिहास सारखा. भूगोल शेअर केलेला. संस्कृती एवढी सारखी की, हडप्पा आणि मोहेंजोदडो पाहायला आपल्याला जावं लागतं ते पाकिस्तानात. खरं तर, स्वातंत्र्यचळवळीचासुद्धा तोच वारसा. तरीही, भारताचा ‘भारत’ झाला आणि पाकिस्तानचा मात्र ‘पाकिस्तान’ झाला! आपल्याच जुळ्या भावंडाचं असं का झालं असेल?
पाकिस्तान आपल्यापासून वेगळा झाला. ‘एक धर्म- एक देश’, असं त्यांना म्हणायचं होतं. मुस्लिमांचा वेगळा देश, म्हणून पाकिस्तान वेगळा झाला. पण मग असं असेल तर एकच धर्म असूनही पाकिस्तान पुन्हा का दुभंगला? भाषेच्या आणि संस्कृतीच्या मुद्द्यावरून, बांग्लादेश पाकिस्तानातून का वेगळा झाला? आणि, सगळे धर्म, सगळ्या जाती, सगळ्या भाषा सामावून घेणारा भारत कसा काय असा एकात्म राहिला? बरं, पाकिस्तान हा मुस्लिमांचा, असं कोणी कितीही म्हटलं तरी वास्तव हे आहे की, पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मुस्लिम तर माझ्या भारतात राहतात. जात, धर्म, वंश, भाषा यापेक्षा मोठा आधार देशाला असू शकतो, हे भारतानंच तर सिद्ध केलं.
‘Military Inc’ या आपल्या पुस्तकात प्रख्यात पाकिस्तानी लेखिका डॉ. आयेशा सिद्दिका म्हणतात त्याप्रमाणे-
“पाकिस्तानात इतर घटकांपेक्षा सैन्यदलांना अधिक महत्त्व मिळाले. त्याला ‘भारतापासून असणारा धोका’ हे मुख्य कारण होते. त्या धारणेच्या ताबडतोब झालेल्या परिणामांतून लष्कराला प्राधान्याचे स्थान मिळाले. त्यामुळेच पाकिस्तानचे रूपांतर सैन्यदलांचे वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रात झाले. या पहिल्या युद्धानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध आणखी अडीच युद्धे केली. ‘काश्मीर’ हेच त्या युद्धांचे कारण होते. पाकिस्तानसाठी भारत सदैव धोकादायक आहे, अशी जी धारणा तयार झाली, त्या धारणेचाच एक भाग म्हणजे काश्मीर प्रश्न. त्यामुळे सैन्यदले प्रभावी झाली आणि पाकिस्तानातील नवा सरंजामी वर्ग म्हणून ती उदयास आली.”
डॉ. आयेशा पुढे म्हणतात, “फाळणीनंतर काहीच दिवसांत भारताने मात्र कायदेशीररीत्या सरंजामशाही मोडीत काढली. एका कुटुंबाकडे मर्यादेपेक्षा जास्त जमीन असणार नाही, असा कायदा केला. सरंजामशाहीचे प्रतीक असणारी जमीनदारी पंडित नेहरूंच्या समाजवादी धोरणांमध्ये बसणे कधीच शक्य नव्हते. दुसरीकडे पाकिस्तानी नेतृत्वाकडे मात्र सामाजिक- राजकीय असे ध्येय नव्हते. भारताचे प्राधान्यक्रम वेगळे होते. म्हणूनच तर हा देश आज लोकशाहीच्या सामर्थ्यासह माहितीच्या महामार्गावर उभा आहे. जी भूमिका या देशाने आपले अधिष्ठान म्हणून स्वीकारली, त्याच दिशेने जगाला जावे लागणार आहे!”
पाकिस्तानचा ‘पाकिस्तान’ झाला, याची कारणे स्पष्ट आहेत.
एक तर, धर्माच्या पायावर त्यांनी आपला राष्ट्रवाद विकसित केला.
त्यामुळे अर्थातच इस्लामी मूलतत्त्ववादी आणि धर्मांध गट बलशाली झाले. त्यांच्यालेखी पाकिस्तान म्हणजे इस्लाम आणि भारत म्हणजे हिंदू! हा संघर्ष धार्मिक आहे. भारत हा क्रमांक एकचा शत्रू मानत, भारतापासून धोका, एवढ्याच आधारावर आपले धोरण पाकिस्तानने विकसित केले. धोका आहे, म्हणजे तारणहार आले. मग लष्कराला लोकनियुक्त सरकारपेक्षा अधिक महत्त्व येऊ लागले. आणि, युद्धखोरीवर लष्कराची प्रतिमा तयार होऊ लागली. किंबहुना, देशाची प्रतिमाही.
स्वयंप्रज्ञ धोरण नसेल आणि लष्कराच्या हाती सूत्रं असतील, तर असा देश सार्वभौमत्वही गमावतो. मग तो अमेरिकेचा लष्करी तळ होतो.
‘अल्ला, आर्मी आणि अमेरिका’ हेच पाकिस्तान चालवतात, असं म्हटलं गेलं, ते त्यातून. शीतयुद्धानंतर बदललेल्या संदर्भांमुळे आता अमेरिकेचा पाकिस्तानातील रस संपला आहे. पण, एकदा आधाराची सवय लागली की, मग तो आधार कधी अमेरिकेकडे, तर कधी चीनकडे मागितला जातो. पण त्यातून ‘फेल्ड स्टेट’ असणं अधिकच अधोरेखित होत जातं.
पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसैन हक्कानी यांचं ‘Reimagining Pakistan : Transforming a Dysfunctional Nuclear State’ नावाचं नवं पुस्तक आलं आहे. धर्माच्या पायावर पाकिस्तान उभा राहिला, हीच त्या देशाच्या अधःपतनाची सुरुवात होती, असे हक्कानी म्हणतात. एवढं करून, आजही त्या देशातल्या धर्मांधांना पाकिस्तान पुरेसा धार्मिक नाही, असं वाटत असतं. धर्मराष्ट्र या संकल्पनेला व्याख्या नसते. आकार नसतो. धर्मवेडेपणाला मर्यादा नसते. १९७१ ला बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला, तिथला राष्ट्रवाद भाषेवर आधारलेला होता. बांगलादेशात धर्मांधांची मनमानी कमी असल्यानं तो नवा देश तुलनेनं पुढे गेला, पण पाकिस्तान मात्र धर्मांधांच्या जाळ्यात रुततच गेला. रिचर्ड लेइबसारख्या अमेरिकी पत्रकाराला वाटतं की, ‘पाकिस्तानी लोक गोड, प्रेमळ आहेत. युरोप-अमेरिकेतल्या माणसांपेक्षा अधिक उबदार आणि आतिथ्यशील आहेत. पण, त्यांच्या नेत्यांनी केलेल्या चुकांची किंमत ते मोजत आहेत. पाकिस्तानच्या २१ कोटी लोकसंख्येपैकी ९५ टक्के लोकांनी फाळणी पाहिलेली नाही. पण, ज्या पायावर हा देश उभा राहिला, त्याची किंमत आज त्यांना चुकवावी लागते आहे.’ हक्कानींना पाकिस्तानची ही कल्पना बदलावी, या देशाचीच फेरमांडणी व्हावी, असं वाटतं. आपल्या मुलांना आणि पाकिस्तानातील मुला-मुलींना हे पुस्तक अर्पण करताना हक्कानी म्हणतात, ‘या मुलांसाठी तरी पाकिस्तानच्या कल्पनेची फेरमांडणी व्हायला हवी!’ भारत ज्या मूल्यांवर उभा राहिला, त्याच पायावर पाकिस्तानला पुन्हा उभा करणं, शक्य होईल का, असंच स्वप्न जणू हक्कानी पाहतात!
लक्षात घ्यायचं ते एवढंच.
धर्माच्या पायावर आक्रमक राष्ट्रवाद उभा राहिला की, हे असं होत जातं. मग धर्म कोणता आहे, हा प्रश्न गैरलागू आहे.
धर्मांध शक्ती देशाची संस्कृती ठरवू लागल्या की, अनर्थ अटळ असतो. मग, त्याचा पहिला फटका बसतो तो स्त्रियांना.
मीच एका कवितेत म्हटलंय त्याप्रमाणं-
कोणतंही तालिबान
पहिला हल्ला करतं बुद्धावर
मग बाईला बुरख्यात बांधून
निघतं पुढच्या युद्धावर!
शत्रूराष्ट्र हा तुमच्या चर्चाविश्वाचा केंद्रबिंदू ठरू लागला की, ‘जा पाकिस्तानला’ कसं सुरू होतं, हे आपण बघत आहोत. जरा काही विरोध केला की, ‘जा पाकिस्तानला!’
म्हणजे, एकतर आमच्यासोबत राहा. आणि, आम्हाला विरोध कराल तर तुम्ही आमचे शत्रू. थेट पाकिस्तानीच.
त्यातही ‘पाकिस्तान’ असं म्हणत ‘हिंदू विरुद्ध मुस्लिम’ असं ध्रुवीकरण करण्याचा हा डाव असतो.
शत्रूराष्ट्र बेचिराख करणं वगैरे गमजा होऊ लागल्या आणि लष्करी कारवायांचं किंवा लष्कराचं वारेमाप कौतुक सुरू झाले की ओळखावं...
“दया, कुछ तो गडबड है!”
प्रखर देशभक्ती, प्रखर राष्ट्रवाद अशी प्रखरतेची भाषा सुरू झाली की, सावध व्हावं. आपल्या देशावर आपलं प्रेम आहेच. असतंच. म्हणून तर हा देश उभा राहिला. तो इतरांनी नाही, तुम्ही आणि मी उभा केलाय. पण, काहीजणांना हा ‘हिंदूंचा पाकिस्तान’ करायचाय!
धर्मांधतेवर देश उभा करण्याचे पाकिस्तानचे मॉडेल पूर्णपणे फसले. आज तो देश अराजकाच्या गर्तेत आहे. आणि, तरीही आपल्याकडच्या काही वेड्यांना तसलंच मॉडेल हवं आहे.
तुम्हाला ती कविता माहितीय?
फहमिदा रियाज या प्रख्यात पाकिस्तानी कवयित्री आहेत. त्यांची ही कविता...
तुम बिल्कुल हम जैसे निकले,
अब तक कहाँ छिपे थे भाई
वो मूरखता, वो घामड़पन,
जिसमें हमने सदी गंवाई
आखिर पहुँची द्वार तुम्हारे,
अरे बधाई, बहुत बधाई।
प्रेत धर्म का नाच रहा है,
कायम हिंदू राज करोगे ?
सारे उल्टे काज करोगे !
अपना चमन ताराज़ करोगे !
तुम भी बैठे करोगे सोचा,
पूरी है वैसी तैयारी
कौन है हिंदू, कौन नहीं है,
तुम भी करोगे फ़तवे जारी
होगा कठिन वहाँ भी जीना,
दाँतों आ जाएगा पसीना
जैसी तैसी कटा करेगी,
वहाँ भी सब की साँस घुटेगी
माथे पर सिंदूर की रेखा,
कुछ भी नहीं पड़ोस से सीखा!
क्या हमने दुर्दशा बनाई,
कुछ भी तुमको नजर न आयी?
आपण, आपल्या अगदी शेजारच्या पाकिस्तानच्या या अनुभवापासून खरंच काही शिकणार आहोत का? वर्तमान सोडून रामाचा जन्म, पुराणकाळातला इंटरनेटचा जन्म; कुठे खावं- काय खावं असे फतवे, धर्म- जातींवरून रोजचे वणवे हेच आपण सुरू करणार आहोत का? जन्मानंतर लगेच पाकिस्तान जेव्हा रोज मानगुटीवर बसलेला होता, दंगली घडवत होता, युद्ध लादत होता, तेव्हा पाकिस्तानला चोख उत्तर देत असतानाही, भारतानं पाकिस्तानला आपल्या निर्णयप्रक्रियेचा केंद्रबिंदू कधीच नाही केलं. पाकिस्तानचा निर्णायक पराभव १९७१ मध्ये करून भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले, पण तरीही पाकिस्तान हा काही भारताचा केंद्रबिंदू नव्हता. भारताचा केंद्रबिंदू एकच होता- खुद्द भारत. भारतातील करोडो जनता. त्यांचा आनंद. त्यांच्या आकांक्षा. आणि, त्यासाठी अवघ्या जगाशी नातं जोडण्याचा प्रयत्न.
हल्ली मात्र हा पाकिस्तान का पुन्हा पुन्हा उपटतोय?
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
triratna com
Thu , 09 August 2018
खूप छान लेख.
vishal pawar
Tue , 07 August 2018
✔
Sanjoo B
Fri , 03 August 2018
कुडमुड्या पत्रकारांची रेचचेल आजकाल वाढली आहे, मग ते नागपूरच्या तालावर नाचणारे मांजरं असो किंवा बारामतीच्या तालावर नाचणारी गांढूळे. हा येडा याच्या लेखात नेहरूंचे गुणगान गात आहे, पण तो एक गोष्ट विसरतो की काश्मिर प्रश्न युनोकडे नेऊन चिघळवण्यास नेहरूंच जबाबदार आहेत (नोबेल पिस प्राईस पाहिजे होते, चाचांना मिरवण्यासाठी ) हे इतिहासाचे थोडेफार वाचन केले तरी कळेल. तसेच १९६२ ला हिंदी चिनी भाई भाई हा या विद्वान नेहरूंचाच नारा होता. पुढे या चिनी भाईंनी आपली काय अवस्था केली हे सगळ्यांनाच माहित आहे. पण माल मिळाल्यावर पत्रकार वगैरे मंडळी कशाकडेही दुर्लक्ष करतात. आणि नेहरूच्या चुकांही झाकण्याचे प्रयत्न केले जातात. तसेच लेखक जमिनदारी, सरंजामशाहीवर टिका करतो, आणि पुस्तकाच्या उद्घाटनाला पवारांना बोलावतो. पवार कुटुंबियांकडे किति(शे )एकर शेती आहे हे तपासले आहे का ? हि सरंजामशाही नाही का ?