अजूनकाही
क्रिकेट-कबड्डीच्या सध्याच्या कोलाहलात फार कुणाच्या ध्यानीमनी आणि वाचनात बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीचा विषय येण्याची शक्यता तशी कमीच. न्यूयॉर्कमध्ये बुधवारी रात्री संपलेल्या या लढतीमध्ये विद्यमान जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने रशियाचा आव्हानवीर सर्गेई कार्याकिनला टायब्रेकरमध्ये हरवले आणि जगज्जेतेपद राखले. एरवी अशा लढतींमध्ये आम्हाला विश्वनाथन आनंदचे नाव ऐकण्याची सवय झालेली होती. विश्वनाथन आनंद खेळत नाही, अशी स्थिती यंदा ९-१० वर्षांमध्ये प्रथमच उद्भवली होती. आनंद पाच वेळा बुद्धिबळातला जगज्जेता बनला होता. २००२मध्ये त्याने पहिल्यांदा हा मान पटकवला. त्या अजिंक्यपदाचे महत्त्व काहीसे कमी झाले, कारण रशियाच्या गॅरी कास्पारॉव्हसारख्या दिग्गज बुद्भिबळपटूंनी अधिकृत संघटनेशी (फिडे) काडीमोड घेऊन वेगळी चूल मांडलेली होती. गॅरी त्यावेळचा वादातीत सर्वश्रेष्ठ बुद्धिबळपटू होता. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत आनंदच्या त्या जगज्जेतेपदाची झळाळी नक्कीच कमी झाली, हे आनंदही मान्य करायचा. मात्र आनंदची नंतरची चारही जगज्जेतेपदे निर्विवाद आणि आनंदला पृथ्वीतलावरील सर्वोत्तम बुद्धिबळपटू ठरवणारीच होती. २००७, २००८, २०१० आणि २०१२मध्ये आनंद जगज्जेता ठरत गेला. आणखीही काही बाबी लक्षात घ्याव्या लागतील. सहसा बुद्धिबळ अजिंक्यपद हे एखाद्या प्रदीर्घ लढतीमधून ठरवले जाते. उदा. विद्यमान जगज्जेता विरुद्ध आव्हानवीर. पूर्वी अशा लढती २४ डावांच्या असायच्या, हल्ली त्या १२ डावांच्या असतात. आजवरच्या बहुतेक सर्व लढतींमध्ये हाच फॉरमॅट वापरला गेला. आनंदने २००८ (वि. व्लादिमीर क्रॅमनिक - रशिया), २०१० (वि. व्हेसेलिन टोपालोव्ह - बल्गेरिया), २०१२ (वि. बोरिस गेलफँड - इस्रायल) या वर्षी मिळवलेली अजिंक्यपदे पारंपरिक फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २००७मध्ये मेक्सिको सिटी येथे बुद्धिबळ जगज्जेता ठरवण्यासाठी आठ निमंत्रित आणि दिग्गज बुद्धिबळपटूंची एक स्पर्धाच खेळवली गेली. टूर्नामेंट फॉरमॅट वापरून जगज्जेता ठरवण्याची ही पद्धत पूर्वी काही वेळा वापरली गेली होती. २००२मध्ये आनंदने अजिंक्यपद मिळवले, ते बाद पद्धतीची (नॉक-आउट) स्पर्धा जिंकून. टूर्नामेंट आणि नॉक-आउट या दोन्ही प्रकारांमध्ये विद्यमान जगज्जेत्याला थेट आव्हानवीराशी खेळण्याचा मान (प्रिव्हिलेज) मिळत नाही आणि त्यामुळेच कास्पारॉव्हसह अनेक दिग्गज बुद्धिबळपटूंची अपारंपरिक फॉरमॅटविषयी नाराजी होती. आनंदची याबाबत स्वत:ची मते होती. पण तरीही वेळोवेळी ती बाजूला सारून आनंद प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळलाही आणि जिंकलाही!
गॅरी कास्पारॉव्ह २००४मध्ये निवृत्त झाला. त्याला प्रथमच एखाद्या जगज्जेतेपदाच्या लढतीत पराभव चाखायला लावणारा रशियाचा व्लादिमीर क्रॅमनिक आणि व्हेसेलिन टोपालोव्ह यांच्यातील द्वंद्वाचा काही काळ बोलबाला राहिला. पण २००७नंतर खऱ्या अर्थाने आनंदनेच बुद्धिबळ जगतावर अधिराज्य केले. या ‘आनंद-युगा’ची समाप्ती ज्या युवा बुद्धिबळपटूने २०१३मध्ये घडवून आणली, तो होता मॅग्नस कार्लसन! २०१३च्या नोव्हेंबर महिन्यात चेन्नईला झालेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीत कार्लसनने आनंदला ६.५-३.५ अशी धक्कादायक एकतर्फी मात दिली. कार्लसन त्यावेळी अवघा २३ वर्षांचा होता. मग पुढच्याच वर्षी पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यात हेच दोघे परस्परांशी जगज्जेतेपदाच्या लढतीत भिडले. रशियातील सोची शहरात झालेल्या त्या लढतीत कार्लसन जगज्जेता होता आणि आनंद आव्हानवीर! या लढतीत आनंदने खूपच चांगला प्रतिकार केला. तरीही ही लढत कार्लसनने ६.५-४.५ अशी जिंकली. आनंद युगाचा तो खऱ्या अर्थाने अस्त होता. या जगज्जेतेपदानंतर कार्लसनने एलो रेटिंगमध्ये २८८२ इतकी प्रचंड मजल मारली. सध्याही त्याचे रेटिंग २८५६ आहे. या दोन्ही शिखरांवर आजवर एकाही बुद्धिबळपटूला जाता आलेले नाही, एवढी एक बाब कार्लसनची महानता अधोरेखित करण्यास पुरेशी ठरते.
मॅग्नस कार्लसन विरुद्ध सर्गेई कार्याकिन लढतीचे महत्त्व आणखीही एका बाबतीत होते. या निमित्ताने प्रथमच जगज्जेतेपदाची लढत दोघा कम्प्युटर जनरेशनच्या बुद्धिबळपटूंमध्ये रंगली. प्रोफेशनल बुद्धिबळ खेळणारे सगळे जण हल्ली चाली, डावपेच, थिअरी, एंडगेम अशा विविध अंगांमध्ये पारंगत होण्यासाठी डेटाबेस आणि वेगवेगळ्या शक्तिशाली सॉफ्टवेअरची आवश्यकता भासते आणि जगभरातली (भारतासकट) बुद्धिबळपटूंची नवीन पिढी बुद्धिबळातील चालींबाबत ‘टेक्निकली अपडेटेड’ असते. म्हणजे कम्प्युटरचा वापर करून त्यांना निरनिराळ्या थिअरीजची माहिती असते. त्या बाबतीत जुनी पिढी (उदा. आनंद, क्रॅमनिक) काहीशी मागे पडते. पण आनंदपर्यंतच्या सगळ्या बुद्धिबळपटूंचा भर हा थिअरीची घोकंपट्टी करून नंतर तिचे स्मरण करण्यापेक्षा बुद्धिबळातील डावपेच मुळापासून समजून घेण्यावर राही. आनंद किंवा कास्पारॉव्ह या आधीच्या पिढीनेही कम्प्युटरशी सहजपणे हातमिळवणी करून नवीन काळाशी जुळवून घेतलेच. तरीही बुद्धिबळाच्या पटावर कार्लसनसारखा नवीन पिढीतील बुद्धिबळपटू विचार करतो, त्या पद्धतीने आनंदसारखे आधीच्या पिढीचे भिडू विचार करत नाहीत. अंतर्ज्ञान (इंट्युशन) विरुद्ध संगणन (कॅल्क्युलेशन) असे हे द्वंद्व आहे. इंट्युशनवर आधारित बुद्धिबळात अजूनही या खेळातील दर्दींना एक प्रकारचा रोमँटिसिझम दिसतो. उलट सॉफ्टवेअरच्या अतिवापरामुळे नव्या पिढीचे रेटिंग वाढू लागले असले, तरी त्याची गोडी कमी होऊ लागली आहे, ही बाब मान्य करावी लागेल.
कार्लसन नॉर्वेचा, कार्याकिन रशियाचा. त्यावरून काहींनी या सामन्याची तुलना १९७२मधील सुप्रसिद्ध बॉबी फिशर विरुद्ध बोरिस स्पास्की (थोडक्यात प्रगतीशील, लोकशाहीवादी पाश्चिमात्य व्यवस्था विरुद्ध जुनाट, दडपशाहीप्रचुर कम्युनिस्ट व्यवस्था) यांच्या लढतीशी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यात फारसे तथ्य नाही. एक मात्र खरे की, कार्लसनच्या रूपात बॉबी फिशरनंतर प्रथमच पश्चिम गोलार्धातील जगज्जेता लाभल्याची चर्चा आणि कौतुक अमेरिकादी देशांमध्ये नक्कीच झाले. हीच भावना आनंदविषयीदेखील होती, पण आनंदला तरीही पौर्वात्यच ठरवले गेले. खरे तर त्याची कारकीर्द प्रथम स्पेन आणि नंतर जर्मनीमध्ये प्रदीर्घ वास्तव्य केल्यानंतर खऱ्या अर्थाने झळाळली हे फार कोणाच्या लक्षात येत नाही. वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूयॉर्क टाइम्ससारख्या वृत्तपत्रांनी कार्लसनच्या प्रदीर्घ मुलाखती प्रसिद्ध केल्या आहेत. मार्क झकरबर्ग, बिल गेट्ससारख्यांनी त्याच्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्याबरोबर बुद्धिबळ खेळण्याची हौसही भागवून घेतली. युरोप, अमेरिकेतील टेक्नॉलॉजी कंपन्या ब्रँड प्रमोशन, मेळावे, वेगवेगळ्या इव्हेंट्ससाठी कार्लसनला बोलावत असतात.
बुद्धिबळ जगज्जेतेपदाची अमेरिकेत झालेली यापूर्वीची लढत वर्ल्ड सेंटरमध्ये १९९५मध्ये आनंद आणि कास्पारॉव्ह यांच्यात झाली होती. यंदाही न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लढतीविषयी प्रचंड उत्सुकता आणि उत्साह दिसून आला. बुद्धिबळाच्या मार्केटिंगच्या दृष्टीने हे चांगले लक्षण आहे. यावर्षी अझरबैजानमध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये अमेरिकेच्या पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्यांचे सध्या तीन बुद्धिबळपटू जगात पहिल्या दहामध्ये आहेत. रशियापाठोपाठ अमेरिका, चीन, भारत या बुद्धिबळातील नवसत्ता म्हणून उदयाला येऊ लागल्या आहेत. अमेरिकेतील सध्याचे अव्वल तिन्ही बुद्धिबळपटू इम्पोर्टेड आहेत. हिकारू नाकामुरा जपानचा, फॅबियो करुआना इटलीचा आणि वेस्ली सो हा फिलिपिन्सचा! या तिघांसह रशियाचा कार्याकिन कार्लसनच्या साम्राज्याला टक्कर देत आहे. आनंदविरुद्धच्या दोन लढतींपेक्षाही कार्याकिनविरुद्धच्या लढतीत कार्लसनची दमछाक झाली होती. सुरुवातीच्या १२ डावांमध्ये ६-६ अशी बरोबरी झाल्यामुळे टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. त्यात कार्लसनने बाजी मारली. चाळीशी ओलांडलेल्या आनंदचा १२ डावांच्या प्रदीर्घ लढतीमध्ये पुरता कस लागायचा. कार्लसन-आनंद या दोन्ही लढतींमध्ये कार्लसनची सळसळती ऊर्जा हाच निर्णायक घटक ठरला होता. तशी सूट पंचविशीतल्या कार्याकिनकडून कार्लसनला मिळणे शक्यच नव्हते. कार्लसनची शैली काहीशी अनाकर्षक आहे. ओपनिंगमध्ये तो फारशी कल्पकता दाखवत नाही. पण चिवटपणा हा त्याचा स्थायीभाव. समान परिस्थितीतही बारीक-सारीक वरचष्म्यासाठी प्रयत्न सतत करत राहणे हे कार्लसनचे वैशिष्ट्य. फिशर, कास्पारॉव्ह किंवा आनंदसारखा त्याचा खेळ प्रवाही नाही. पण थिअरीची जबरदस्त जाण, नीडर वृत्ती, अक्षय ऊर्जा आणि जिंकण्याची अखंड ईर्ष्या या गुणचतुष्ट्यावर कार्लसन तिसऱ्यांदा जगज्जेता बनला आहे. फिटनेसवर तो विलक्षण मेहनत घेतो. एखाद्या मोठ्या स्पर्धेदरम्यान विश्रांतीच्या दिवशी बुद्धिबळपटूंमध्ये लुटुपुटीचे फुटबॉल सामने होतात, त्या सामन्यांमध्ये कार्लसन पुरेशा गांभीर्याने उतरतो आणि फुटबॉलमधील कसबही दाखवतो. पराभव त्याला अजिबात आवडत नाहीत. ते खुल्या दिलाने स्वीकारण्याची परिपक्वता त्याच्यामध्ये अद्याप आलेली नाही. त्यातून स्कोरशीट चुरगळणे, पेन आपटणे किंवा लढतीनंतरच्या अनिवार्य पत्रकार परिषदेला हजेरीच न लावणे असे प्रकार घडतात.
फिशर किंवा कास्पारॉव्ह त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना जवळपास अजेय होते. कार्लसन तसा नाही. अनेकदा हरतो. पण प्रचंड प्रमाणात जिंकतही राहतो. नॉर्वेमध्ये तो आयकॉन आहे. फारसा लोकाभिमुख किंवा क्राउड-फ्रेंडली नाही. पण तो फिशरसारखा तऱ्हेवाईक किंवा कास्पारॉव्हसारखा आतबट्ट्याचा नाही. चेन्नईत नोव्हेंबर २०१३मध्ये जगज्जेतेपदाची लढत जाहीर झाली, त्यावेळी सुरुवातीला कार्लसनने टिपिकल युरोपियन नखरे करून पाहिले. मात्र लढतीसाठी चेन्नईत आल्यानंतर कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत. इतकेच नव्हे, तर आयोजनातील नीटनेटकेपणाचे, भारतातील बुद्धिबळाविषयीच्या उत्साहाचे, आनंदसारखा त्यांचा आयकॉन पराभूत झाल्यानंतरही भारतीयांनी खुल्या दिलाने केलेल्या कौतुकाचे कार्लसनला विलक्षण अप्रूप वाटले. आनंदला त्याने मागे एकदा टोपालोव्हविरुद्धच्या लढतीसाठी मदत केली होती. दोघांमधील संबंधही सुरुवातीला खूप सौहार्दाचे (माँटी पायथन कार्टून सिरीज हा एक समान दुवा) होते. पुढे एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनल्यानंतर ते तितके राहिले नाहीत. मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल विलक्षण आदर वाटतो. भारतीय राजाची सत्ता संपवून हा नॉर्वेजियन व्हायकिंग आता बुद्धिबळातील सम्राट बनला आहे. पण या सत्ताबदलाविषयी भारतीयांना विषाद वाटत नाही, हे कार्लसनचे यशच मानले पाहिजे!
लेखक मुक्त पत्रकार आहेत.
sidkhan@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment