राजसाहेब, आर्थिक निकषांवर आरक्षण ही भ्रामक गोष्ट आहे हो!
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • मनसे प्रमुख राज ठाकरे
  • Wed , 01 August 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar राज ठाकरे Raj Thackeray शरद पवार Sharad Pawar मराठा समाज Maratha Community मराठा आरक्षण Maratha Aarakshan मराठा क्रांती मोर्चा Maratha Kranti Morcha

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात ‘आर्थिक निकषावर आरक्षण द्या’, अशी भूमिका घेऊन ‘मराठा आरक्षणा’ला फाटा फोडला आहे. मराठा समाजाला सामाजिक मागासवर्गात घालून आरक्षण द्यावं, अशी सर्व पक्षांची एकी झाली असताना राज यांची विपरीत भूमिका पुढे आली आहे. राज हे उत्तम व प्रभावी वक्ते आहेत. ते त्यांना सांगायचा मुद्दा चमकदार, चटपटीत पद्धतीनं सांगतात. पण ‘आरक्षण’ या मुद्यावर त्यांचं राजकीय शहाणपण तुटपुंजं असल्याचं दिसतं. कारण आर्थिक निकषांवर आरक्षण कुणालाही देता येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयानं अनेकदा स्पष्ट केलंय. सर्व राजकीय पक्षांना ते कळलंय. मग राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला हे का कळू नये?

आरक्षणाचा प्रश्न आला की, देशातील तथाकथित विचारवंत, माध्यमांतले लोक, ओपिनियन मेकर्स पुन्हा पुन्हा बुद्धिभेद करत आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे रेटतात. हा मुद्दा पुढे रेटून या लोकांना आरक्षणाला विरोध करायचा असतो. सामान्य माणसांच्या, तरुणांच्या डोक्यात आरक्षणाविषयी असंतोष निर्माण करायचा असतो. आरक्षण रद्द झालं पाहिजे, ही त्यांची मूळ भूमिका असते. ही भूमिका आटोकाट प्रयत्न करून पुढे रेटण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार आघाडीवर असतो. राज ठाकरे या परिवाराची भाषा बोलत आहेत. त्यांचं पुण्यातलं भाषण हे त्याचं प्रतिबिंब होतं.

मंडल आयोग लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या, तेव्हाही संघ परिवारानं सामाजिक, शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षण देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. संघ परिवारातली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर मंडल आयोगाच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरली होती. विद्यार्थ्यांना संघटीत करून तेव्हा हिंसक आंदोलनं घडवून आणण्यात आली होती. तेव्हाही आर्थिक निकषावर सर्व गरिबांना आरक्षण द्या, हीच मागणी होती. पण त्या आडून एकूण आरक्षणालाच या लोकांना विरोध करायचा होता.

मंडल आयोग लागू केल्यानंतर दंगे उसळले. ते थांबवण्यासाठी तेव्हाचे पंतप्रधान पी. नरसिंहराव यांनी २५ सप्टेंबर १९९१ रोजी देशातील सवर्णांमधील गरिबांना १० टक्के आरक्षण दिलं. आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची तरतूद संविधानात नाही. म्हणून नरसिंहरावांचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधीशांच्या खंडपीठानं १६ नोव्हेंबर १९९२ रोजी हा निर्णय घटनाबाह्य ठरवला. इंद्र साहनी विरुद्ध भारत सरकार असा हा खटला होता. त्याला ‘मंडल आयोगाचा खटला’ असंही म्हणतात. सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल हा नंतर कायदा होतो. त्याला ‘केस लॉ’ असंही म्हटलं जातं. हा ‘केस लॉ’ रद्द करायचा तर पुन्हा नव्यानं घटना दुरुस्ती करावी लागते. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे घटना दुरुस्तीची भाषा बोलत आहेत.

आता यातली खरी अडचण माजी न्या. पी. बी. सावंत यांनी सांगून ठेवली आहे. न्या. सावंत हे इंद्र साहनी केसमधल्या सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये एक न्यायमूर्ती होते. त्यांचं म्हणणं असं की, विद्यमान आरक्षण हे जात, जमात व गट केंद्रित आहे. व्यक्ती यापैकी एका विशिष्ट गटाची आहे. तिच्यावर आजपर्यंत अन्याय झालाय, आजही होत आहे म्हणून तिला आरक्षण दिलेलं आहे. स्वतंत्र व्यक्ती म्हणून दिलेलं नाही. त्या गटाची सदस्य म्हणून दिलेलं आहे.

आर्थिक निकषावर दिलेलं आरक्षण हे व्यक्तिकेंद्रित होतं. तिथं समतेच्या तत्त्वाचा भंग होतो. त्यामुळे घटना दुरुस्ती केली तरी आर्थिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही, असंही न्या. सावंत यांचं मत आहे. हे मत त्यांनी वारंवार मांडलं आहे. तरी राज ठाकरे हे आर्थिक निकषाचं पालुपद वारंवार का लावतात? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही आयुष्यभर हीच भूमिका घेतली होती. बाळासाहेबांनी तर मंडल आयोगाला आणि इतर साऱ्या आरक्षणाला कायम विरोध केला होता. त्यामुळेच सध्या उद्धव ठाकरे यांचीही मराठा आरक्षणाबद्दल स्पष्ट, ठाम काही भूमिका दिसत नाही. आरक्षणामुळे जाती जाग्या होतात. जातीवाद वाढतो, असं बाळासाहेब सांगत. पण हेच बाळासाहेब सवर्ण जातींकडून इतर दुबळ्या जातींवर होणाऱ्या अन्यायाबद्दल फार बोलत नसत.

आपल्या समाजव्यवस्थेत मनुनं आरक्षण ठरवून दिलेलं आहे. २८०० वर्षं ते आरक्षण पाळलं जातंय. मनुनं या विचित्र प्रकारच्या आरक्षणात जातीव्यवस्था तयार करून व्यवसाय, कामाचं वाटप केलं. या वाटपात कोणत्या जातीनं काय व्यवसाय करायचे हे ठरवून दिलंय. या कामाच्या, व्यवसायाच्या वाटपातून कोण श्रीमंत होणार, कोण गरीब राहणार हे ठरवून दिलंय. आजही देशातले सगळे हलके, कष्टाचे आणि निकृष्ट व्यवसाय, धंदे हे महिला, दलित, आदिवासी आणि इतर मागास वर्गाचे लोकच (ओबीसी) करतात. या मनूच्या विकृत आरक्षणाला बाळासाहेब, शिवसेना कधी विरोध करत नसत. तीच परंपरा राज ठाकरे पुढे चालवत आहेत.

आजही देशातील संपत्ती, साधनं म्हणजे जमीन, पाणी, ऊर्जा यांची मालकी सवर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) जातींकडे आहे. ‘मनुस्मृती’नं त्यांना ती बहाल केलीय. त्या ‘मनुस्मृती’चा आणि मनूचा गौरव मनोहर उर्फ संभाजी भिडे म्हणूनच करताना दिसतात. हे मनूचं गौरवीकरण, सवर्णांची संपत्तीवरची मक्तेदारी राज ठाकरे यांना खटकत नाही. मात्र मराठा समाज आरक्षण मागतो, हे त्यांना पटत नाही. आजही सर्व शंकराचार्य, सारी धर्मसत्ता एका विशिष्ठ वर्णाच्या हातात आहे, याची चीड राज ठाकरेंना येत नाही. शंकराचार्य, मंदिरातले पुजारी आर्थिक निकषांवर निवडावेत असं राज ठाकरेंना वाटत नाही. मात्र आरक्षण आर्थिक निकषांवर द्यावं, अशी भाषणबाजी ते करतात, हे अर्तक्य नाही काय? संविधानानं आरक्षण दिलं नसतं तर आज राजसत्ता, प्रशासन सत्ता, न्यायसत्ता इथं महिला, एससी, एसटी, ओबीसींना आज जे स्थान मिळालेलं दिसतं, ते तरी मिळालं असतं काय? राज ठाकरे यांच्या आणि आर्थिक निकषांचं दळण दळणाऱ्यांच्या हे लक्षात येत नसेल काय? की त्यांना जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करून आरक्षण संपलं पाहिजे, यासाठी हे प्रयत्न जारी ठेवायचे आहेत?

 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/3994/Janwadi-Sahityik-Anna-Bhau-Sathe

.............................................................................................................................................

संविधानानं फक्त एससी, एसटी आणि ओबीसी वर्गालाच आरक्षण देण्याची तरतूद केलीय. आर्थिक निकषांवर आरक्षणाची तरतूद टाळली. आर्थिक गरिबांना विकासाची संधी मिळावी म्हणून ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम घ्यावा, असं संविधानानं सुचवलं. म्हणून केंद्र, राज्य सरकारांनी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी स्वस्त धान्य, रेशन, आरोग्य, शिक्षण, शेतीमध्ये विविध योजना सुरू केल्या. त्यातून आर्थिक उन्नती साधण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलं.

आरक्षण आणि गरिबी निर्मूलन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आरक्षणाचा हेतू सामाजिक, शैक्षणिक मागासांना शिक्षण, नोकरीत विशेष संधी देऊन प्रतिनिधित्व देणं हा आहे. आरक्षण मिळण्यातून आर्थिक उन्नती होते जरूर, पण सामाजिक विषमता नष्ट करणं हा मूळ हेतू आहे. पण हे लक्षात न घेता आरक्षण विरोधक आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे, अशी दिशाभूल करताना दिसतात. राज्यकर्तेही या दिशाभूलीचे बळी ठरतात.

याची अलीकडची दोन उदाहरणं हरियाणा आणि तेलंगणा या राज्यांच्या राज्यकर्त्यांच्या कृतीतून दिसली. हरियाणामध्ये जाट समाजाचं आंदोलन पेटलं, तेव्हा तिथं जाटांना १० टक्के आणि हरियाणातल्या गरिबांना १० टक्के आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं गेलं. हे आरक्षण तिथल्या उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवलं. त्याला स्थगिती दिली. तेलंगणात तिथल्या राज्य सरकारनं मुस्लीम समाजाला १२ टक्के आरक्षण आर्थिक निकषांवर दिलं होतं. तो निर्णयही तिथल्या उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवून ते आरक्षण स्थगित केलं. 

मुद्दा असा की, देशभर ज्या ज्या राज्यांत आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं गेलं, ते ते न्यायालयानं घटनाबाह्य ठरवलेलं आहे. मुळात आर्थिक आरक्षण देणं याचा अर्थ देशातले जवळपास चार कोटी आयकर भरणारे लोकं वगळता १२५ कोटी भारतीयांना आरक्षण देणं होय. असं आरक्षण दिलं तर ते राबवायचं कसं, खऱ्या गरिबांना ते मिळणार कसं, याबद्दलही अनेक प्रश्न पुढे येतात. पैसा, श्रीमंती, गरिबी ही कधीही बदलणारी अवस्था असते. आर्थिक आरक्षण मिळालं तरी ते मिळवण्यासाठी लागणारा कमी उत्पन्नाचा दाखला ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे, त्यांनाच लवकर मिळतो, हे आपल्याकडचं कटू सत्य आहे.

हे सगळं बघता आर्थिक निकषांवर आरक्षण ही भ्रामक गोष्ट आहे. तसं आरक्षण मराठा समाजाला मिळू शकत नाही. म्हणूनच सर्व पक्ष मराठा समाजाला तामिळनाडू फॉर्म्युल्याचा आधार घेऊन सामाजिक मागास म्हणून आरक्षण मिळावं, अशा निष्कर्षाप्रत आले आहेत. त्यादृष्टीनं सकारात्मक पावलं पडत असताना राज ठाकरे आणि इतरांनी आर्थिक आरक्षणाची मागणी करणं म्हणजे एकप्रकारे दिशाभूल करण्यासारखंच आहे!             

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

vishal pawar

Sat , 11 August 2018


Sanjoo B

Fri , 03 August 2018

कमेंटस् शिर्षकाखाली ७ आकडा दिसत आहे, पण कमेंटस् सेक्शनमध्ये फक्त एकच कमेंट वाचतां येत आहे, हि काय भानगड आहे ?


Nikkhiel paropate

Wed , 01 August 2018

अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर या लेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे..!! कांदळकर सरांचे आभार


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......