डॉ. आंबेडकरांचं आद्य चरित्र तुमची वाट पाहतंय! ​
सदर - चैत्यभू'मी'तला 'मी'!
कीर्तिकुमार शिंदे​
  • तानाजी खरावतेकर, ‘डॉक्टर आंबेडकर​’चं मुखपृष्ठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • Fri , 02 December 2016
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar चैत्यभूमी Chaitya Bhoomi ६ डिसेंबर 6 December तानाजी खरावतेकर Tanaji Kharavtekar

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच सहा डिसेंबरला तुम्ही चैत्यभूमीवर किंवा खास शिवाजी पार्कवर भरलेल्या पुस्तक जत्रेत जाणार असाल तर एक पुस्तक तुमची वाट पाहत असेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यावं लागणार नाही. ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊण्डेशन व मुंबई-कराची फ्रेण्डशीप फोरमच्या वतीने हे पुस्तक तुम्हाला चक्क मोफत मिळणार आहे. या पुस्तकाचं नाव आहे, ‘डॉक्टर आंबेडकर​’. या पुस्तकाचे लेखक आहेत तानाजी खरावतेकर. तब्बल ७२ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं आद्य प्रकाशित चरित्र आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या जिवंतपणी, १८९१ ते १९५६ यांदरम्यानच्या ६५ वर्षांच्या कालखंडात पदोपदी अपमान, अवहेलना सहन करावी लागली. पण त्यांच्या निधनानंतर सर्वांत आधी महार-बौद्ध समाज, मग इतर दलित समाज, त्यानंतर इतर मागासवर्गीय समाज जसजसे खडबडून जागे होऊ लागले, तसतसे बाबासाहेबांनी बजावलेल्या कामगिरीचे नवनवे आयाम पुढे येऊ लागले. सामाजिक-राजकीय-आर्थिक-धार्मिक पातळीवर बाबासाहेबांनी दिलेल्या ऐतिहासिक-वैचारिक योगदानाचं पुनर्मूल्यांकन होऊ लागलं. ‘​भारतीय संविधानाचे शिल्पकार’ ते ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ म्हणून मान्यता मिळेपर्यंतचा त्यांचा प्रवास या टप्प्याटप्प्याने झालेल्या पुनर्मूल्यांकनामुळेच शक्य झाला.

बाबासाहेबांचं महत्त्व विविध समाजघटकांना पटत गेलं, तसतसं त्यांच्याबाबतच्या संशोधनालाही आत्यंतिक महत्त्व प्राप्त झालं. बाबासाहेबांच्या नावाने दादर येथील इंदू मिलमध्ये अतिभव्य स्मारक उभारणं, त्यांचे जन्मस्थान महू किंवा बालपण ज्या गावी गेलं ते आंबडवे असो किंवा अगदी लंडनमध्ये त्यांचे वास्तव्य असलेली वास्तू असो, बाबासाहेबांशी संबंधित प्रत्येक ​वास्तूला आता एखाद्या तीर्थक्षेत्राचं- पवित्र वास्तूचे स्वरूप प्राप्त झालं आहे. भविष्यात या वास्तूंमध्ये आणखी भर पडतच राहणार आहे. दुसरीकडे, बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्यावर लिहिण्यात आलेली पुस्तकं, इतकंच नव्हे तर त्यांची सर्व भाषणं, त्यांचा संपूर्ण पत्रव्यवहार आता इतका महत्त्वाचा मानला जात आहे की, त्यांच्या समग्र अभ्यासाशिवाय आधुनिक भारताचं, येथील राजकीय-सामाजिक व्यवस्थेचं आकलन परिपूर्ण होऊच शकत नाही. 

सर्वसामान्यपणे, विशेषत​:​ मराठी वाचकांपुरतं बोलायचं झालं तर सर्वाधिक वाचकांना बाबासाहेबांचं चरित्र उपलब्ध झालं ते धनंजय कीर यांच्या ​'​डॉ. आंबेडकर - लाईफ अॅंड मिशन​'​ या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद प्रकाशित झाल्यानंतर. मूळ इंग्रजी पु्स्तक १९५४ साली म्हणजे बाबासाहेबांच्या हयातीत प्रकाशित झालं होतं आणि बाबासाहेबांनी ते वाचलं होतं. कीर उत्तम दर्जाचे चरित्रकार होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आदींचीही चरित्रं लिहिलेली आहेत. (या सर्व महापुरुषांची चरित्रं लिहून कीर यांनी मराठी वाचकांवर अनंत उपकार केलेले आहेत.) 

बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी चांगदेव खैरमोडे यांनीही त्यांचं जीवनकार्य अत्यंत विस्तृतपणे तब्बल १३ खंडांमध्ये लिहिलं आहे. त्याचा पहिला खंड १९५२मध्ये प्रकाशित झाला. बाबासाहेबांशी संबंधित अनेक लहान-मोठ्या घटना, प्रसंग, त्याबाबतची कागदपत्रं खैरमोडेंच्या या खंडांमध्ये वाचायला मिळतात. धनंजय कीर सोडले तर बाबासाहेबांच्या प्रत्येक चरित्रकाराला खैरमोडे यांच्या लिखित खंडांचा आधार घ्यावा लागला आहे. नंतरच्या काळात बाबासाहेबांवर अनेक पुस्तकं, चरित्रं लिहिली गेली. त्या प्रत्येकाने काही नवीन मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न केला. नलिनी पंडित, बी. सी. कांबळे, द. न. गोखले, नरेंद्र जाधव यांच्यासारख्या अनेकांनी आपापल्या परीने​, आपापल्या दृष्टिकोनांसह​ बाबासाहेबांचा चरित्रपट लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

​ ​असं असताना तानाजी खरावतेकर यांनी १९४३ साली लिहिलेल्या आणि १९४६ साली प्रकाशित झालेल्या '​डॉ. आंबेडकर​'​ या लहानशा पुस्तकाचं महत्त्व काय, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. बाबासाहेबांशी संबंधित अनेक पुस्तकं, चरित्रं वाचलेल्या वाचकाला हे पुस्तक नवीन काही माहिती किंवा दृष्टिकोन देतं का, या पुस्तकाचं स्वत​:​चं म्हणून काही ऐतिहासिक महत्त्व आहे का, हे जाणून घेणं म्हणूनच महत्त्वाचं आहे. 

​कीर किंवा खैरमोडे या दोघांच्याही आधी खरावतेकर यांनी लिहिलेलं ​'डॉ. आंबेडकर​'​ हे चरित्र प्रकाशित झालं. म्हणून ते निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं किंवा आद्य चरित्र आहे. ​(पण तरीही या पुस्तकाला बाबासाहेबांच्या चरित्राचा 'तो' दर्जा मिळणं थोडं कठीणच वाटतं. याचं प्रमुख कारण म्हणजे ते जवळपास बाळबोध शैलीत लिहिलेलं आहे.) ​ 

या पुस्तकाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे, त्याचे लेखक हे पुस्तक लिहिताना कराचीत राहत होते आणि या पुस्तकाची छपाई व प्रकाशनही तिथंच झालं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात कराचीत मोठ्या संख्येनं हिंदू, त्यातही मराठी लोक राहत होते. बाबासाहेबांच्या चळवळीचं तिथं केंद्रही होतं. याचाच अर्थ, कराचीत त्या काळी मराठी दलित समाजही मोठ्या प्रमाणात होता. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४० मध्ये लिहिलेलं ‘पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया’ हे पुस्तक किंवा भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील सध्याचे राजनैतिक-लष्करी संबंध या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचं हे ​'​कराची कनेक्शन​'​ थोडंसं वेगळं, नवीन वाट​तं आणि काही प्रमाणात का होईना ​तेच या पुस्तकाचं बलस्थान आहे.

बाबासाहेबांविषयीची अत्यंत प्राथमिक माहिती देणं, शिक्षण घेण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, वाचनावर असलेलं त्यांचं प्रेम, त्यांनी मिळवलेल्या पदव्या, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांचा स्वभाव, त्यांची दैनंदिन जीवनशैली अशा प्रकारची माहिती या पुस्तकात खरावतेकर यांनी दिली आहे. शालेय​ किंवा कुमारवयीन​ मुलांसाठी हे पुस्तक लिहिण्यात आल्याचं सतत जाणवत राहतं. स्वत​:​ लेखक खरावतेकर यांनी आपल्या मनोगतात म्हटलं आहे की, ​"माझ्या अस्पृश्य ज्ञातिबंधू-भगिनींनी हे पुस्तक आपल्या मुलाबाळांच्या हाती द्यावं व समाजोत्कर्षाची स्फूर्ति त्यांच्या हृदयांत उत्पन्न करावी, हे पुस्तक लिहिण्याचा माझा हाच एक हेतू आहे.​"​

​बाबासाहेबांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या २३ वर्षीय लेखकाने आपल्यापेक्षा वयान लहान समाजबांधवांना बाबासाहेबांविषयीची माहिती मिळावी, त्यांच्या चरित्रातील गोष्टी-घटनांमधून शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी, ​यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे. असं असतानाही काही रोचक माहिती या पुस्तकाच्या निमित्ताने पुढे आलीय. उदाहरणार्थ, 'महाडच्या सत्याग्रहासाठी जी माणसं महाडमध्ये येऊन राहिली होती, त्यांना तहान लागेल म्हणून स्पृश्य लोकांकडून चाळीस रुपयांचं पानी विकत घेतलं होतं.'  श्रीपाद बाबाजी ठाकूर, रा. विश्वनाथ नारायन मंडलिक, न्या. काशिनाथ तेलंग,​ मुकुंदराव जयकर, जवाहरलाल नेहरू यांच्याकडे खूप मोठा ग्रंथसंग्रह होता. या सर्वांनी ''आपला ग्रंथसंग्रह केला तो त्यांनी आपल्या श्रीमंतीच्या जोरावर केलेला आहे, हे अुघड आहे. परंतु शिष्यवृत्तीत बचत करून प्रचंड ग्रंथसंग्रह केला असे हिंदुस्थानात किती विद्वान आहेत?'', असा सवाल खरावतेकरांनी उपस्थित केलाय. त्याचं उत्तरही त्यांनी दिलं आहे.

खरावतेकरांचा हेतू स्पष्ट असल्यामुळे त्यांनी शक्य होईल तिथे बाबासाहेबांची उदाहरणं देत विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबाबतची गोडी, वाचनप्रेम, यशस्वी होण्यासाठी जिद्द बाळगण्याची वृत्ती, निर्व्यसनीपणा आदी मूल्यांचे संस्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकाचा हा प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे. खरावतेकरांनी या पुस्तकाचं लेखन वयाच्या २३ ते २६ वर्षांदरम्यान केलेलं आहे. मात्र ​मूळ पुस्तकात तारखांच्या काही चुका आहेत. त्या चुकांसंदर्भातील तळटिपा ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने प्रकाशित केलेल्या नव्या आवृत्तीत दिल्या आहेत. 

बाबासाहेबांच्या हयातीतच काहीजण त्यांच्यावर टीका करू लागले होते. बाबासाहेब गर्विष्ठ, दुराग्रही, एकलकोंडे, मितभाषी आहेत, या शब्दांद्वारे त्यांच्या स्वभावावर केली जाणा​री​ टीकाही खराव​ते​करांनी खोडून काढली आहे. एका चाहत्याने-भक्ताने त्याच्या नायकाचं-देवाचं चरित्र लिहिल्यामुळे हे अपेक्षितच आहे. पण महत्त्वाची गोष्ट हे पुस्तक वाचल्यानंतर ध्यानात येतं. ती म्हणजे- खरावतेकरांनी लिहिलेलं​ हे पुस्तक फक्त कुमारवयीन मुलांसाठीचं चरित्र ठरलं नाही. 

बाबासाहेबांच्या जीवन-कार्याबाबत जे जे मुद्दे विरोधात जाऊ शकतात किंवा ज्या ज्या मुद्द्यांवर टीका केली गेली, त्या त्या मुद्द्यांचा परामर्श खरावतेकरांनी या पहिल्याच चरित्रात घेऊन ठेवला आहे. गांधीजींसोबत झालेल्या ​पुणे​ कराराविषयीसुद्धा खरावतेकरांनी मांडलेली भूमिकाच बाबासाहेबांच्या पुढील काळातील चरित्रकारांनी स्वीकारली. अर्थातच, पु​णे कराराला विरोध करण्याची. पुस्तकरूपाने ही सर्व मांडणी खरावतेकरांनीच पहिल्यांदा केली. म्ह​णूनच त्यांनी लिहिलेलं हे चरित्र फक्त तत्कालिन दलित मुलांसाठी प्रेर​णादायी ठरलं नाही, तर त्याचा प्रभाव बाबासाहेबांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकावर पडला (असावा). 

​एका अर्थाने, पुढच्या काळातील बाबासाहेबांच्या जीवनकार्याच्या अभ्यासकांसाठीसुद्धा हे पुस्तक एक महत्त्वाचं 'पाठ्यपुस्तक' ठरलं. आगामी काळात या पुस्तकावर अभ्यासक आ​णखी प्रकाश टाकतील, अशी अपेक्षा आहे. हे पुस्तक २०१० साली पुनर्प्रकाशित करणा​रे प्रा. रमाकांत यादव, त्यांचे सहकारी रमेश हरळकर आणि आता पुन्हा एकदा ते नव्या रूपात प्रकाशित करणा​रे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे सुधींद्र कुलक​र्णी व त्यांचे सर्व सहकारी यांचे ​​मन:पूर्वक आभार.

​हे पुस्तक सहा डिसेंबरला शिवाजी पार्कवरील ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊण्डेशनच्या स्टॉलवर मोफत उपलब्ध असेल.

 

लेखक नवता बुक वर्ल्डचे संचालक आहेत.

shinde.kirtikumar@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......