अजूनकाही
पाव शतकापूर्वीचा कालखंड आठवून पाहा. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत नावाजलेल्या चित्रपटाकडे कसे पाहिले जात होते? तो चित्रपट दुर्बोध असणार, अशी एक प्रतिक्रिया असायची. सामाजिक समस्येला हात घालणारा आणि रडवणारा किंवा त्रास देणारा असणार, अशी दुसरी प्रतिक्रिया असायची. अभिजनांमधील अभिजनांनी निवडक अभिजनांसाठी तयार केलेला चित्रपट अशी एक मूक प्रतिक्रिया असायची. त्यामुळे असे चित्रपट चित्रपटगृहांतून एक तर प्रदर्शित व्हायचे नाहीत आणि झाले तरी कधी आले, कधी गेले हे कळायचे नाही. आणि एवढ्यातूनही एखाद्या चित्रपटाबद्दल जनसामान्यांमध्ये थोडे जास्तीचे कुतूहल निर्माण झालेच, तर तो दूरदर्शनवर शनिवारी/रविवारी किंवा अन्य काही निमित्ताने दाखवला जाईल तेव्हा पाहता येईल, असा विचार व्यक्त व्हायचा. त्यामुळे कलात्मक सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा असे वर्गीकरण सर्रास केले जायचे.
एखादा कलात्मक सिनेमा तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला किंवा एखादा व्यावसायिक सिनेमा आशयसंपन्न निघाला तर, त्या वर्गीकरणाबाबत उलटसुलट चर्चा झडायच्या. आणि ते वर्गीकरणच मुळात कसे चुकीचे आहे, अशा मध्यममार्गी/समन्वयवादी विचाराला माना डोलावल्या जायच्या. त्याचबरोबर, सिनेमा हा मनोरंजनासाठी असतो असे मानणारा एक प्रवाह होता; तर सिनेमाने प्रेक्षकाला अंतर्मुख केले पाहिजे/समाजाचे प्रबोधन केले पाहिजे असे मानणारा दुसरा प्रवाह होता. या दोन्ही प्रवाहांच्या नावाड्यांमध्येही अधूनमधून चर्चा झडायच्या. अर्थातच, दुसऱ्या प्रवाहाच्या प्रवाशांना अधिक मान मिळायचा. पण मागील दोन दशकांत हे चित्र बऱ्यापैकी बदलत गेले. हे दोन प्रवाह एकत्र येऊन एखाद्या सिनेमाला दाद देताहेत असे चित्र सवयीचे होऊ लागले. मात्र हे भाग्य (?) अलीकडच्या काळातील एका महत्त्वाच्या मराठी सिनेमाच्या वाट्याला आले नाही. त्या सिनेमाचे नाव आहे ‘लेथ जोशी.’
लेखन व दिग्दर्शन मंगेश जोशी यांचे असून, त्यांनीच सोनाली जोशी यांच्यासह या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दोन वर्षांपूर्वी हा चित्रपट पूर्ण झाला, देशातील आणि विदेशांतील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये वाखाणला गेला, अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाला. ‘द हिंदू’ व ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रांतील चित्रपट परीक्षकांच्या पसंतीची पावतीही त्याला मिळाली. पण प्रदर्शनासाठी सिनेमाघरे काही त्याला मिळत नव्हती. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो कालच्या १३ जुलैला प्रदर्शित झाला आणि आठवडाभरातच लुप्त झाला. त्या काळात ज्यांनी पाहिला त्यांनी पूर्ण समाधानाचे गुण त्याला दिले. ज्यांनी त्याविषयी ऐकले होते, पण पहायची संधी मिळाली नाही, त्यांनी हळहळ व्यक्त केली.
आता हा चित्रपट सिनेमागृहात पुन्हा लागण्याची शक्यता जवळपास नाही, दूरचित्रवाहिनीवर दाखवला गेला तरी त्यावेळी किती लोकांना माहीत होईल याबाबत शंकाच आहे. पुढे कधी तरी यु-ट्यूबवर आला तर विखुरलेल्या प्रेक्षकांना तो पाहता येईल. पण या चित्रपटाचे महत्त्व असे आहे की, (तशी वाट न पाहता) तो छोट्या-मोठ्या समूहांमध्ये जाणीवपूर्वक दाखवायला हवा, शक्य असेल तर त्यावर चर्चाही घडवायला हव्यात. शाळा व महाविद्यालये तर यासाठी योग्य ठिकाणे आहेतच. पण सामाजिक कार्य करणाऱ्या लहानथोरांच्या संस्था-संघटना यांनी पुढाकार घेऊन हा चित्रपट आपापल्या समूहांमध्ये दाखवायला हवा. अर्थातच, निर्माते-दिग्दर्शक यांना त्याचा पुरेसा मोबदला देऊन!
‘लेथ जोशी’ हा चित्रपट पावणेदोन तासांचा आहे, तो पाहताना मध्यंतर घेण्याची आवश्यकता वाटत नाही. त्याच्यात गाणी नाहीत. तो वेगवान नाही आणि संथ तर मुळीच नाही. तो प्रेक्षकांना ताण देत नाही, अस्वस्थ करीत नाही; अंतर्मुख व्हायला मात्र भाग पाडतो. तो भावनांना आवाहन करत नाही, विचार करायला प्रवृत्त करतो. तो ठोस असा काही नवीन संदेश देत नाही, पण आपणा सर्वांना परिचित असलेले साधेच सत्य प्रभावीपणे प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यात पूर्णत: यशस्वी होतो.
हा चित्रपट चार व्यक्तिरेखांच्या भोवतीच फिरतो, त्या व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. लेथ जोशी मध्यवर्ती आहेत, त्यांची पत्नी, मुलगा आणि आई हे तिघे त्यांच्या सभोवती आहेत.
विजय जोशी हे लेथमशीनवर काम करणारे कुशल कारागीर असतात. पंचवीस-तीस वर्षे लेथ मशीनवर ज्या कौशल्याने ते काम करत आलेत, त्या कामावर त्यांचे ज्या प्रकारचे प्रेम आहे आणि आपले काम ज्या इमानेइतबारे ते करत राहतात, यामुळे त्यांना ‘लेथ जोशी’ असे संबोधले जाणे साहजिक ठरते. पण काळ बदलत जातो तसे लेथ मशीनवर केल्या जाणाऱ्या कामासाठी (लोखंडाच्या लहान वस्तू, यंत्रांचे सुटे भाग इत्यादी) अन्य पर्याय उपलब्ध होऊ लागतात; कमी वेळात, कमी खर्चात व कमी श्रमात जास्त उत्पादन देऊ शकणारे! परिणामी मोठ्या जागा अडवणारी, अतिशय अवजड असणारी, अधिक वेळ घेणारी आणि कुशल कारागिराची मागणी करणारी लेथ मशीन्स कालबाह्य होऊ लागतात. अर्थातच, अशा मशीन्सवर काम करणाऱ्या कुशल
कारागिरांचे काय? ज्यांनी अन्य पर्याय शोधले, नव्या तंत्राशी-यंत्राशी व यंत्रणेशी स्वत:ला जुळवून घेतले त्यांचे गाडे लवकरच रूळावर आले. ज्यांना ते जमले नाही त्यांच्या वाट्याला अवघडलेपण, कुचंबणा किंबहुना अवहेलना व मागासलेपणाचा शिक्का हे सर्वच कमी-अधिक प्रमाणात आले.
लेथ जोशी हे यातील दुसऱ्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व आहे, पण नव्या यंत्र-तंत्राशी त्यांना जुळवून घेता आले नाही, हे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. त्यांनी तसा प्रयत्नच केला नाही, त्यांना तशी इच्छाच झाली नाही. याचे मुख्य कारण, त्यांचे आधीच्या कामावर अतिरिक्त प्रेम आणि जे नव्याने येऊ घातले आहे त्याविषयी उदासीनता. अन्यथा, अशा कुशल कारागिराला काही नवी कौशल्ये आत्मसात करता येणे फारसे अवघड नसते. तर अशा कोंडीत अडकलेले लेथ जोशी. इथे लेथ मशीन हे प्रतीक म्हणून पाहता येईल. भक्कम, टिकाऊ, दणकटपणाचे आणि अवजडपणा व जडत्वाचेही!
लेथ जोशींची पत्नी केटरिंगचा व्यवसाय करते. खरे तर आधी ती घरगुती पदार्थ शेजारी वा जवळपासच्या लोकांसाठी करून देते. पण उत्तम दर्जा आणि तत्पर सेवा (सर्व्हिस) या साध्याच तत्त्वांमुळे तिने केलेल्या पदार्थांची मागणी वाढत जाते. परंतु तिथेही अधिक प्रगती करायची असेल तर नवनव्या पदार्थांची मागणी आणि अधिक सुव्यवस्थित पद्धतीने सेवा यांना महत्त्व प्राप्त होते. परिणामी स्वत:ला येतात तेच पदार्थ, करता येतात तेवढ्याच प्रमाणात आणि घरगुती पद्धतीची सेवा, असा एक पर्याय. तर नवनवे पदार्थ शिकणे, नव्या ठिकाणी (वाढदिवस, पार्टी इत्यादी) तिथल्या मापदंडानुसार सेवा पुरवणे हा दुसरा पर्याय.
अर्थातच, पहिल्या पर्यायातून वाढीला, विकासाला मर्यादा येतात. तर दुसऱ्या पर्यायातून प्रगतीला खूप मोठा वाव मिळत राहतो. लेथ जोशी यांची पत्नी दुसरा पर्याय सहजतेने स्वीकारते. मराठमोळे घरगुती पदार्थ बनवण्यापासून चायनीज पदार्थ पुरवण्यापर्यंतचे बदल ती विनासायास करताना दिसते. कारण स्वयंपाक बनवणे, खाद्यपदार्थ तयार करणे यात तिची कुशलता आहे, त्या कामावर तिचे प्रेम आहे आणि ते काम नेक/ चोख पद्धतीने पार पाडणे यात तिला आनंदही आहे. परिणामी, इच्छा असेल तर मराठमोळे ते चायनीज हा बदल करताना तिला तसे अवघड जाणार नव्हतेच. कारण प्रत्येक खाद्यपदार्थ बनवण्याचे तंत्र व प्रक्रिया जरी वेगवेगळी असली तरी त्या सर्वांच्या मागे असलेले सूत्रतत्त्व-नियम यांच्यात बरीच समानता असते. (कोणत्याही एका विद्याशाखेचा अभ्यास मूलभूत सूत्र-तत्त्व समजून केलेला असेल तर दुसऱ्या एखाद्या विद्याशाखेत त्याच पद्धतीने अभ्यास करून प्रावीण्य मिळवणे तुलनेने सोपे जाते.) म्हणूनच लेथ जोशी यांच्या पत्नीला नवे बदल सहजतेने आत्मसात करता आले.
या चित्रपटातील तिसरे पात्र म्हणजे लेथ जोशींचा मुलगा. हा आजच्या काळातील तरुणाईचा प्रतिनिधी. ‘ब्राईट’ म्हणावा असा नाही आणि ‘डल’ तर मुळीच नाही. कम्प्युटर क्षेत्रातील छोटे-मोठे कोर्स करून तो दुरुस्ती सेवा पुरवू इच्छितो. तो अपयशी ठरत नाही, पण फार मोठे यश मिळवू शकेल असेही नाही. नव्याने होत असलेल्या वेगवान बदलांची त्याला जाणीव आहे. टिकाऊपणाचा आग्रह आणि टिकावूतून टाकावू हे मूल्य आता कालबाह्य झाले आहे, ‘यूज अॅन्ड थ्रो’चा जमाना आला आहे, हे त्याला पटलेले आहे. पण तरीही होत असलेल्या वेगवान बदलांमध्ये आपण तरी किती प्रमाणात व किती काळ तरून जाऊ याविषयी तो नि:शंक नाही. थोडीशी अस्वस्थता आणि थोडीशी अनिश्चितता अशा भोवऱ्यात तो आहे, पण त्यातून तो वाट काढणार असे साधारणत: चित्रपटातून दिसते. एका अर्थाने, सैरभैर न झालेल्या पण चाचपडत वाटचाल करणाऱ्या आजच्या युवा पिढीचा तो प्रतिनिधी आहे.
लेथ जोशींची वृद्ध आई हे या चित्रपटातील चौथे पात्र आहे. ती पूर्णत: अंध झालेली आहे, तिची गात्रे थकलेली आहेत. पण तिचे मन मात्र थकलेले नाही, जगण्याची इच्छा संपलेली नाही, असेल त्यात आनंद घेण्याची तिची ऊर्मी संपुष्टात आलेली नाही, आणि त्यासाठी संघर्षरत राहण्याचा उत्साह बऱ्यापैकी टिकून आहे. ही व्यक्तिरेखा आपल्या अंगणातला आनंद पुरेपूर उपभोगणारी आहे. मागच्या पिढीतील अनेकांनी आपले घर आणि संसार अतिशय कमी संसाधनात उभारला, चालवला आणि पुढच्या पिढीसोबत राहूनच आपल्या आयुष्याची अखेर समाधानाने केली. त्या पिढीची सशक्त प्रतिनिधी म्हणजे लेथ जोशींची आई!
याव्यतिरिक्त आणखी दोन व्यक्तिरेखा लेथ जोशी चित्रपटात ओझरत्या येऊन जातात. त्यातील एक म्हणजे लेथ जोशींचा मित्र शिंदे, जो त्यांच्याच हाताखाली शिकला, पण मालकाने लेथ मशीन्स बंद करून नवी यंत्रणा उभारली तेव्हा त्याने स्वत:ला त्या यंत्रणेशी जुळवून घेतले. दुसरी व्यक्तिरेखा म्हणजे लेथ जोशी काम करत होते, त्या कारखान्याचा सहृदयी मालक. कारभाराची सूत्रं पुढच्या पिढीच्या (चिरंजीवाच्या) हाती सोपवणारा, नव्या तांत्रिक बदलांमुळे लेथ मशीन्स बंद कराव्या लागण्याची अपरिहार्यता समजू शकणारा आणि त्याच वेळी कलाकार म्हणता येईल अशा लेथ जोशी यांच्यासारख्या कामगारांचे काय करणार, अशी चिंता बाळगणारा. शिंदे आणि मालक या दोनही व्यक्तिरेखा लेथ जोशी यांच्याविषयी पूर्ण सहानुभूती बाळगणाऱ्या, त्यांना मदत करण्याची इच्छा असणाऱ्या; पण तरीही लेथ जोशी ज्या कोंडीत अडकलेत त्यातून बाहेर काढू न शकणाऱ्या.
या सिनेमातील लेथ जोशी, त्यांची पत्नी, मुलगा, आई या चार व्यक्तिरेखा अनुक्रमे चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, ओम भूतकर, सेवा चौहान यांनी इतक्या सहजसुलभ पद्धतीने केल्या आहेत, की त्यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यासाठी किंवा त्यातील त्रुटी दाखवण्यासाठी सिनेमा समीक्षकांचीच गरज आहे. आणि पटकथा लेखन, संवाद, चित्रीकरण व संकलन यामध्ये कुठेही ‘लुप होल्स’ दाखवावेत असे काही नाही. त्यामुळे एक सर्वांगसुंदर चित्रपट पाहिल्याचे समाधान प्रेक्षागृहातून बाहेर पडताना मिळते, त्यावर (विपर्यास करायचा नसेल तर) टीकात्मक म्हणावे असे काही बोलता-लिहिता येईल असे काही वाटत नाही आणि त्यावर भरभरून बोलत राहून ‘तो किती भारी सिनेमा आहे’ असे सांगण्याची इच्छाही होत नाही. आवर्जून बघावा असा हा सिनेमा आहे, इतकीच प्रतिक्रिया तेवढी पुढे येते.
तर, चार व्यक्तिरेखांच्या माध्यमातून ‘लेथ जोशी’ हा सिनेमा नव्या काळाला व त्यात होत असलेल्या बदलांना सामोरे जाणारे चार प्रतिसाद दाखवतो. इथे सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी घडलेली आहे की, दिग्दर्शक या सिनेमातून थेट भाष्य किंवा विधान असे काही करत नाही. त्यामुळे कलाकृती म्हणून तो सर्व प्रकारच्या, प्रवृत्तीच्या प्रेक्षकांना भावणारा झाला आहे. पन्नास वर्षांपूर्वी ‘नया दौर’ हा हिंदी चित्रपट आला होता, दिलीपकुमार व वैजयंतीमाला यांच्या अभिनयामुळे तो गाजला होता. तो एक सर्वांगसुंदर चित्रपट होता, पण त्यात ‘टांगा व मोटारगाडी’ यांच्यातील द्वंद्व दाखवून यंत्र आणि कामगार, भांडवलदार व श्रमजीवी यांच्यातील संघर्षही दाखवला होता. त्यातून केले गेलेले ‘स्टेटमेंट’ सुलभीकरण करणारे, बाळबोध वळणाचे व म्हणून न पटणारे होते. तशी चूक होण्याची शक्यता ‘लेथ जोशी’च्या थीममध्ये होती, ती चूक केली नाही यासाठी दिग्दर्शकाला धन्यवाद.
(‘साधना’ साप्ताहिकच्या ४ ऑगस्ट २०१८च्या अंकातून साभार)
.............................................................................................................................................
लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.
vinod.shirsath@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment