अजूनकाही
मोजके एक-दोन मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि दर तासाच्या बातम्या वगळता आमच्या घरात टीव्हीवर सतत क्रीडाविषयक कार्यक्रम सुरू असतात. क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस असा कोणताही खेळ आम्हाला चालतो. तसं तर, आम्ही काही फुटबॉलचे कट्टर चाहते नाही, पण नुकत्याच संपलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रशिया, फ्रान्स आणि क्रोएशिया या तीन देशांचे प्रमुख ज्या उमदेपणानं वागले आणि त्यातून जो एक वर्तन व्यवहार अनुभवायला मिळाला, तो डोळ्यांचं पारणं फेडणारा होता, यात शंकाच नाही. रशियाचे ब्लादिमिर पुतिन, फ्रान्सचे इमॅन्युएल मॅकरॉन आणि क्रोएशियाच्या (श्रीमती) कोलिंदा ग्राबार कितारोविच हे तीन राष्ट्राध्यक्ष चक्क पदाचा शिष्टाचार, कथित आब बाजूला ठेवून खेळाचा निखळ आनंद घेतात, खेळाडूंना प्रोत्साहन देताना बेभान होतात, सामना संपल्यावर भर पावसात उभे राहून खेळाडूंचं कौतुक करतात, त्यांना आलिंगन देतात आणि सुसंस्कृतपणाचं दर्शन घडवतात... हे सारं टीव्हीवर बघत असताना आपल्या देशातल्या खुज्या राजकीय वातावरणाची आणि त्यात वावरणाऱ्या बहुसंख्य किरट्या वृत्तीच्या नेत्यांची होणारी आठवण क्लेशदायक होती.
या तीनही राष्ट्रप्रमुखात सर्वाधिक लक्षवेधी ठरल्या त्या क्रोएशियाच्या कोलिंदा ग्राबार कितारोविच. नुसत्याच लक्षवेधी नाही तर त्या अंतिम सामन्याच्या आणि नंतरच्या पारितोषक वितरण समारंभावर त्यांच्या सौंदर्य आणि वर्तनानं कौतुकाचं गारुडच झालं जणू.
कोलिंदा यांच्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आणि नेमक्या त्याच वेळी, शिकागोहून श्रीधर दामले यांनी त्यांच्याबद्दल पाठवलेली माहिती वाचल्यावर लक्षात आलं; राजकीय नेता कसा असावा, या आजवर आपल्या बनलेल्या कथित धारणांना छेद देणारं कोलिंदा यांचं प्रोफाईल आहे. क्रोएशिया देश केवढा तर आपली मुंबईची लोकसंख्या कोएशियापेक्षा तिप्पट मोठी आहे. लोकसंख्या जेमतेम ५२ लाख आणि वार्षिक महसुली उत्पन्न ५५ अब्ज डॉलर्स! मिखाईल गोर्बाचेव्ह रशियाचे प्रमुख झाल्यावर ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरिस्त्रोइका’चं वारं वाहू लागलं. रशियातून फुटून युगोस्लाव्हिया या देशाची निर्मिती झाली. नंतर युगोस्लाव्हियाचंही विभाजन होऊन जे एकूण आठ छोटे देश अस्तित्वात आले. त्यातील क्रोएशिया हा एक.
इतक्या छोट्या देशातून फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणारा संघ आकाराला आला आणि त्या संघातील खेळाडू तसंच अध्यक्षांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं. देशाचा आकार आणि नैपुण्य याचा काहीच संबंध कसा नसतो याचं हे आणखी एक उदाहरण आहे.
कोलिंदा ग्राबार कितारोविच यांचा जन्म २९ एप्रिल १९६८ चा. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या कोलिंदा यांनी इंग्लिश आणि स्पॅनिश साहित्यात पदवी संपादन केल्यावर आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यावर याच विषयात त्या आता ‘डॉक्टरेट’साठी संशोधन करत आहेत. त्या फुलब्राईट अभ्यासवृत्तीच्या मानकरी आहेत. क्रोएशियन, स्पॅनिश, डॅनिश, इंग्रजी या भाषा त्यांना अस्खलित लिहिता व बोलता येतात. फ्रेंच आणि रशियन याही भाषा त्यांना अवगत आहेत. फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्या पुतिन आणि इमॅन्युएल यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलत होत्या, असं प्रकाशित झालेल्या बातम्यात म्हटलंय! (मला असे बहुभाषक, आपले माजी पंतप्रधान नरसिंहराव आठवले.) आपल्या विद्यमान आणि काँग्रेसच्या भावी, अशा दोन्ही पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल हे दोन्ही राजकीय पक्ष कायम शंका घेत असण्याच्या आणि त्यावरून निंदानालस्तीची राळ उडवली जाण्याच्या पार्श्वभूमीवर कोलिंदा यांची ही शैक्षणिक कारकीर्द फारच कौतुकास्पद वाटली तर त्यात नवल ते काय!
‘सौंदर्यवती’ हीच काही कोलिंदा यांची एकमेव ओळख नव्हे. त्या क्रोएशियाच्या लष्करात कमांडो होत्या आणि निपुण नेमबाज म्हणून त्यांची तेव्हा ख्याती होती. संयुक्त राष्ट्रसंघातील क्रोएशियाच्या राजदूत म्हणून कोलिंदा यांनी २००७ ते २०११ या काळात प्रभावी कामगिरी बजावलेली आहे. त्या संयुक्त राष्ट्र संघातील पहिल्या महिला सहायक सचिव आहेत. या पदावर असताना त्यांनी अफगाणिस्तानाला असंख्य वेळा भेट दिलेली आहे. २०१५मध्ये वयाच्या ४६व्या वर्षी त्या क्रोएशियाच्या अध्यक्ष झाल्या, तेव्हा देशाची आर्थिक स्थिती किमानही चांगली नव्हती. मात्र स्वहिताचा स्पर्शही न होऊ देता स्वत: आघाडीवर राहून, निरंतर कार्यरत राहून आणि पूर्ण निष्ठेनं त्यांनी क्रोएशियाला प्रगती पथावर नेलेलं आहे.
एक अत्यंत सुसंस्कृत, संवेदनशील सुज्ञ (आपल्याला असे ‘संवेदनशील सुज्ञ’ नेते बहुसंखेनं कधी लाभतील?) नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. ‘नो नॉनसेन्स वुमन’ अशी त्यांची आंतराष्ट्रीय राजकारणात प्रतिमा आहे. जॉर्ज बुश (ज्यू.) आणि बराक ओबामा या नेत्यांनीही कर्तृत्वाची मुक्त कंठानं प्रशंसा करत कोलिंदा यांच्या विद्वत्ता, सुसंस्कृतपणावर शिक्कामोर्तब केलेलं आहे.
खरं तर कोलिंदा ग्राबार कितारोविच या विश्वविजेत्या फुटबॉल संघाच्या नव्हे, तर उपविजेत्या संघाच्या देशाच्या आहेत, पण क्रोएशियाच्या संघाचा टी-शर्ट घालून आलेल्या कोलिंदा यांनी कोणताही आपपरभाव न बाळगता दोन्ही संघातील खेळाडूंना आधी प्रोत्साहन दिलं आणि सामना संपल्यावर दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूला आलिंगन देत जी दाद दिली, त्यामुळे त्या वातावरणात एक चैतन्यच पसरलं. स्टेडियमवरच्या आणि टीव्हीवर हा सोहळा पाहणाऱ्या जगभरातील प्रत्येकाचं हृदय कोलिंदा यांनी जिकून घेतलं. महत्त्वाचं म्हणजे मास्कोपर्यंतचा प्रवास त्यांनी साध्या श्रेणीत केला आणि त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे या विमान प्रवासाचा खर्च त्यांनी देशाच्या तिजोरीतून नव्हे तर स्वत:च्या खिशातून (का पर्समधून? पण, त्यांच्या हातात पर्स दिसली नाही!) केला.
आपल्या देशातले राजकीय नेते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊ ‘तू तू , मैं मैं’ करणं सोडून असे सुसंस्कृत कधी होतील, असा प्रश्न मग आपल्या देशातलं अलिकडच्या दोन-अडीच दशकातलं वातावरण पाहता पडला. हे आपले बहुसंख्य प्रतिनिधी ‘असे’ आहेत म्हणजे आपला समाज बहुसंख्येनं सुसंस्कृत नाही का असाही प्रश्न मग मनात आला. सध्या राजकीय आणि सामाजिक पातळीवर सगळं वातावरण एकारलं, कर्कश्श आणि ‘लोडेड’ राजकीय झालेलं आहे. विवेकानं न वागता, तर्कशुद्ध न राहता आणि हाती आलेल्या माहितीची खातरजमा करून न घेता बेताल/चूक/आक्रस्ताळेपणानं व्यक्त होतं राहावं ही राजकीय, सामाजिक, साहित्य व कला क्षेत्रातील आणि मीडियातील बहुसंख्यांची आता राष्ट्रीय सवय तसंच ओळखही झालेली आहे. बहुसंख्य लोक त्यांना पाहिजे तसं आणि पाहिजे त्या वाचाळ (क्वचित अर्वाच्यही!) भाषेत व्यक्त होत असतात. प्रत्येक बाबीकडे राजकीय हेतू ठेवून, जात-धर्माचा विचार करून निर्णय घेण्याच्या स्थितीत आपण आलेलो असताना , ‘फेकू’ आणि ‘पप्पू’ ही आपली ओळख सुसंस्कृतपणाचा सर्वोच्च निकष ठरलेली असताना. ही काय समंजसपणा, संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणाची लक्षणं आहेत काय, असा प्रश्न उभा ठाकणं स्वभाविकच नाही का? अशा वातावरणात आपल्याला कोलिंदा ग्राबार कितारोविच यांच्यासारखे लोकप्रतिनिधी मिळावेत अशी अपेक्षा बाळगता येईल का?
असे विचार मनात घोळत असताना, नाशिकला जनस्थान सन्मान स्वीकारताना प्रतिभावंत नाटककार आणि माझे अत्यंत आवडते लेखक महेश एलकुंचवार यांनी सुसंस्कृतपणाच्या संदर्भात सांगितलेला एक प्रसंग आठवला. तो असा- फिनलंड या देशात सिबेलियस नावाचे एक मोठे संगीत रचनाकार (म्युझिक कंपोझर) होऊन गेले. फिनलंडमध्ये एकदा एक अमेरिकन प्रवासी आला. तो एका टॅक्सीत बसला आणि चालकाला म्हणाला, ‘मला सिबेलियसला भेटायचंय. मी चाहता आहे त्यांचा. तुम्हाला माहितीये का त्यांचं घर? घेऊन जाणार का मला तिथं?’
टॅक्सीचालकानं विचारलं, ‘मला माहिती आहे, ते कुठे राहतात ते. पण तुमची त्यांच्याशी भेटीची वेळ ठरलेली आहे का आधी?’
तो प्रवासी म्हणाला, ‘नाही. पण म्हटलं, आलोच आहे तर भेटून घ्यावं’.
त्या चालकानं पुढे नेलेली टॅक्सी थांबवली आणि तो म्हणाला, ‘मी नेणार नाही तुम्हाला त्यांच्याकडे. कोणीच नेणार नाही तुम्हाला त्यांच्याकडे. त्यांच्या एकाग्रसाधनेत असा व्यत्यय आणण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. आम्ही कोणी त्यांना त्रास देत नाही. इतकंच काय, त्यांच्या घरापासून १ कि. मी. अंतरावरून रेल्वेलाईन जात होती. त्या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेच्या आवाजाचा त्रास होत असेल, म्हणून सरकारनं ती रेल्वेलाईन तेथून १० कि. मी. लांब नेलीये.’
इतका सुसंस्कृतपणा, समंजसपणा, कलावंतांच्या प्रति अशी संवेदनशीलता आहे आपल्या समाजात? वास्तव तसं नाही हे लक्षात आल्यावर, मग सुसंस्कृतपणाच्या बाबतीत ‘त्यांच्या’त आणि आपल्यात केवढं मोठ्ठ अंतर आहे हे जाणवलं आणि आपण आपल्या लोकप्रतिनिधींकडून नाहक अपेक्षा बाळगतो आहोत, हेही लक्षात आलं.
एक समाज म्हणून आधी आपल्याला जात-पात-धर्म-राजकीय विचार आड न आणता आपण बहुसंख्यांत ‘त्यांच्या’सारखा सुसंस्कृतपणा आणि समंजसपणा वैपुल्यानं निर्माण करावा लागेल, मग त्यापाठोपाठ संवेदनशीलता चालत येईल. तरच आपल्यातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी सर्वार्थानं सुसंस्कृत, समंजस आणि संवेदनशील असतील... म्हणूनच ते तसे वागतीलही.
तुम्हाला काय वाटतं?
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Shashank
Wed , 01 August 2018
aapla Desh kevdha tyancha Desh kevdha..no place for comparison..tumhi je mandlat te agadi tantotant kharay..pan Bharat Desh itka Vishal ahe Ani anek dharma, jaati tyat ahet ki aapli tyanchi barobari hovu shakat nahi...baki aaplya politicians dhanya ahet