अजूनकाही
१. निश्चलनीकरणामुळे जारी केलेली टोलमाफी दोन डिसेंबरच्या मध्यरात्रीला संपुष्टात आल्यावर रोख रकमेच्या तुटवड्यामुळे होणारे गोंधळ टाळण्यासाठी वाहनचालकांना पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतची कुपन्स दिली जाणार.
आधी टोल हाच एक अपारदर्शक, बेहिशोबी, राजकीय पक्षांना मलिदा चारणारा कोट्यवधी रुपयांचा रोखीतला घोटाळा असताना त्यात कुपनांच्या रूपाने नवे बेहिशोबी, बेकायदा चलन निर्माण करून सरकार काय साध्य करणार आहे? ज्याला पुन्हा टोलनाक्यावर यायचे नाही, त्याच्या गळ्यात अन्यत्र निरुपयोगी कुपनं मारण्यात काय हशील? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी आणि शेतकऱ्यालाही कॅशलेस बनवण्याचा विडा उचललेलं सरकार टोलनाके कॅशलेस का बनवू इच्छित नाही?
……………………………..
२. महाराष्ट्रात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले असले तरी नगराध्यक्षपद मिळालेल्या निम्म्यांपेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये भाजपला बहुमत मिळालेले नाही. परिणामी शहरात विकासकामे राबवताना नगराध्यक्ष विरुद्ध नगरसेवक अशी वादावादी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन भाजप सरकार नगराध्यक्षांना जादा अधिकार देणार.
असे जादा अधिकार सरसकट सगळ्या नगराध्यक्षांना देण्याऐवजी फक्त भाजपच्याच नगराध्यक्षांना ते दिले तर? एवीतेवी सरकारला लोकांमधून निवडून आलेल्या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना चापच लावायचा आहे ना, मग दुरुस्तीच तशी करून टाकायची! नाहीतरी, संसदीय लोकशाही गुंडाळून राज्य सरकारने आपल्या कठपुतळ्यांमार्फत थेट नगरांचा कारभार हाकण्याची ही फेडरल योजना आहे. जिथे पंतप्रधानच थेट निवडून आलेले 'नगराध्यक्ष' असल्यासारखे वागतात, तिथे वेगळी अपेक्षा काय करणार?
……………………………..
३. नागरोटा हल्ला प्रकरणी संरक्षण मंत्र्यांनी संसदेत निवेदन करण्याची मागणी करणारी काँग्रेस ही देशाची सुरक्षा आणि जवानांवर राजकारण करते, हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. : वेंकय्या नायडू
तुम्ही दहशतवादी हल्ल्यांमधून काही शिकू नका. हल्ला झाला की लष्कराच्या त्रुटी काढायच्या आणि लष्कराने यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला की, तो मात्र आपल्या स्वयंसेवकांनीच केल्यासारखं राजकीय श्रेय ओरपायचं, हे राजकारण नाही का? तुम्हाला गैरसोयीचे ठरणारे प्रश्न विचारणं हेच विरोधी पक्ष म्हणून त्यांचं कामच आहे अण्णा!
……………………………..
४. मुंबईला माफियामुक्त करण्यासाठी भाजप आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढेल : खासदार किरीट सोमय्या
मुंबईत माफियांचं राज्य आहे का? सत्ताधारी तर तुम्हीच आहात शिवसेनेबरोबर? शिवसेनाच माफिया आहे का? मग तिच्याबरोबर सत्तेत सहभाग कशाला घ्यायचा? त्यांना केंद्रात सरकारमध्ये कशाला घ्यायचं? बाळासाहेबांच्या शालीला लोंबकळून लोंबकळून आपण महाराष्ट्रभर पोहोचलो, याचा विसर पडला वाट्टे!
……………………………..
५. देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे. राष्ट्रगीत सुरू असताना चित्रपटाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर चित्रपटगृहातील प्रत्येकाने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेच पाहिजे : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.
व्हीलचेअरला खिळलेल्या रुग्णांनी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहायचा की नाही? टोरंटवरून सिनेमे डाउनलोड करून घरी किंवा मोबाइलवर ते पाहणाऱ्या फुकट्यांनी राष्ट्रगीत पण डाउनलोड करायचं का? शेखर कपूर म्हणतो त्याप्रमाणे आधी संसदेत राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती करायला पाहिजे… तिथे सिनेमाला लाजवेल एवढा ड्रामा चालतो सदासर्वकाळ.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment