अजूनकाही
व्यंगचित्रांचे अभ्यासक मधुकर धर्मापुरीकर यांचं ‘आलटून पालटून’ हे पुस्तकं नुकतंच पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला कलासमीक्षक प्रा. दीपक घारे यांनी लिहिलेली प्रस्तावना.
.............................................................................................................................................
व्यंगचित्रे ही मुधकर धर्मापुरीकर यांच्या जगण्याचा भाग झालेली आहेत. कुटुंबीय, ऑफिसमधले सहकारी यांच्याबरोबर रोजच्या जीवनातील सुखदु:खे अनुभवताना धर्मापुरीकरांना एखादं व्यंगचित्र आठवतं आणि परीसस्पर्श व्हावा तसं त्या अनुभवाचं रूपांतर आस्वाद्य अशा ललित लेखात होतं. अशा ललित लेखांचा हा संग्रह आहे.
धर्मापुरीकर कथालेखक आहेत आणि चित्रांचे आस्वादकही आहेत. वसंत सरवटे यांच्यासारख्या व्यंगचित्रकाराच्या सहवासात राहून आणि भारतीय आणि परकीय व्यंगचित्रांच्या सततच्या परिशीलनातून धर्मापुरीकरांची एक दृष्टी तयार झालेली आहे. ती व्यंगचित्रांमधला आशय शोधत असतानाच व्यंगचित्रामधली तांत्रिक कौशल्यं, चित्रकलेच्या रेषा किंवा अवकाश यासारख्या मूलभूत घटकांचा वापर याबद्दलही मार्मिक भाष्य करते. व्यंगचित्रांसारख्या कलाकृतींचा आशय जितका महत्त्वाचा, तितकाच ज्या वातावरणात त्या फुलतात तो परिसर महत्त्वाचा असतो. एकच चित्र, पण वाचक\प्रेक्षकांचा स्तर बदलला, की कशा अनपेक्षित रीतीनं आणि आश्चर्यकारक अशा विविध रूपांनी ते त्यांना भावतं, याची धर्मापुरीकर यांनी नोंदवलेली निरीक्षणं तितकीच महत्त्वाची आहेत.
धर्मापुरीकरांनी आशयाची विविधता आणि नित्यनूतनता, कालसापेक्षता, आशय समृद्ध करणारे सांस्कृतिक तपशील, आशय समजून घेताना होणारी मनाची उलघाल आणि तरल अवस्था, क्वचित होणारी फजिती सारं काही प्रामाणिकपणे आणि उत्साहानं मांडलं आहे. त्यांच्या अनुभवात त्यांनी वाचकालाही सामील करून घेतलेलं आहे. कौटुंबिक जीवनातल्या प्रसंगांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या उदाहरणांपैकी त्यांनी मुलाच्या लग्नपत्रिकेचा सांगितलेला प्रसंग महत्त्वाचा आहे. ‘चित्राची फिरकी’ या लेखात तो आलेला आहे. धर्मापुरीकर यांनी पत्रिकेसाठी वापरलेलं व्यंगचित्र, गोल जिन्यामुळे गतिमान झालेला त्यातल्या प्रेमिकांचा आवेग विलक्षण आहेच; पण धर्मापुरीकर जेव्हा या चित्राला व्यक्तिगत अनुभवाशी जोडतात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या क्रिया-प्रतिक्रियांची नोंद करतात; नव्हे, चित्रातल्या गतिमानतेला नवी ऊर्जा देतात, तेव्हा त्या चित्राची खुमारी अधिक वाढते!
व्यंगचित्राचा अर्थ हा एक चकवा आहे. संदर्भ बदलतात. पण या लपाछपीत उत्कट साक्षात्काराचे जे क्षण गवसतात, ते महत्त्वाचं. त्या त्या क्षणापुरते ते खरेच असतात. सायकलस्वार आणि विमानाची सावली हे व्यंगचित्रातले तपशील जीवन-व्यवहाराच्या रहस्यापर्यंत धर्मापुरीकरांना घेऊन जातात. ‘मनाला झालेला आनंद, हाच त्या व्यंगचित्राचा अर्थ’ असं त्याचं सार्थ वर्णन धर्मापुरीकरांनी केलेलं आहे. एखाद्या कवितेचा असा आनंद घेणं आपल्या परिचयाचं आहे. पण व्यंगचित्राच्या माध्यमातून असा बौद्धिक आणि भावनिक आनंद समग्रपणे घेता येतो, याचा प्रत्यय धर्मापुरीकरांनीच आपल्या लेखनातून दिला.
व्यंगचित्रकार मोझर आणि जे. कृष्णमूर्ती यांच्याबद्दल बोलताना धर्मापुरीकर सांगतात, ‘व्यंगचित्रसुद्धा गमतीतून उभं राहतं आणि शहाणपणाची जाणीव करून देतं.’ शहाणपण म्हणजे ‘Wisdom’ असाच अर्थ इथे अभिप्रेत आहे. ‘विनोद हा सत्याचा ‘Shortcut’ असतो.’ पण या ‘Shortcut’मध्ये रेषांच्या बाह्य आकारांमध्ये दडलेले विविधार्थ शोधण्याची संवेदनशीलता असावी लागते. अकबर इलाहाबादी यांच्या शेरोशायरीबद्दल लिहिताना धर्मापुरीकरांनी व्यंगप्रकृतीबद्दल लिहिलं आहे, ‘व्यंगप्रकृतीचा फायदा असा, की सामाजिक\राजकीय\धार्मिक वातावरणात ज्या ज्या अनिष्ट वृत्ती जोपासल्या जातात, त्याची यथेच्छ टिंगल करता येते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा फायदा असा, की मानवी जीवनव्यवहाराबद्दल गाढ असा जिव्हाळा त्या कविहृदयात वाढत जातो. आणि त्यामुळे त्या कवीच्या-लेखकाच्या रचना प्रत्ययकारी तर वाटतातच, त्याचबरोबर त्या शैलीमुळे खुमासदार होतात.’ इथं धर्मापुरीकरांनी जिव्हाळ्याचा उल्लेख केला आहे, तो महत्त्वाचा आहे. मानवी जीवनाबद्दल व्यापक सहानुभाव असल्याखेरीज व्यंगदर्शन – मग ते चित्रातील असो, वा साहित्यातील – प्रत्ययकारी होऊ शकत नाही. सामाजिक\राजकीय\धार्मिक अपप्रवृत्तींबद्दल आवाज उठवण्याचं काम हिटलरसारख्या हुकूमशहांच्या अथवा कम्युनिस्ट राजवटीमधल्या पीडित जनतेनं व्यंगचित्राच्या माध्यमातून केलेलं आहे. आत्मपरीक्षणाबद्दल उदासीन असलेल्या आजच्या आत्मकेंद्रित समाजामध्ये मात्र लेखक आणि व्यंगचित्रकारांना परखड भाष्य करणं, हे त्यांच्यासाठी अधिकाधिक धोकादायक होत चाललेलं आहे.
धर्मापुरीकरांनी व्यंगचित्रांमधला आशय सांगितला आहे, तसंच तो सांगण्याच्या पद्धतीविषयी, चित्रांमधल्या दृश्यघटकांबद्दलही लिहिलं आहे. त्यामुळे व्यंगचित्रांकडे कसं बघावं, त्याच्या अंतरंगात कसं शिरावं याबद्दल वाचकांची दृष्टीदेखील तयार होते. रेषा, आकार, काळ आणि अवकाश, चित्रातला हाफ टोन याबद्दलही ते बोलतात आणि हे रेखाटनातले बारकावे तपशील न राहता प्रतीकात्मक अर्थामध्ये त्याचं कसं रूपांतर होतं, हेही सहजतेनं उमगतं. मनात सुचलेलं कागदावर चित्ररूपानं उतरवणं ही एक सर्जक प्रक्रिया असते. त्यामध्ये व्यंगचित्रकाराची रेखाचित्रांच्या रूपात केलेल्या नोंदींची वही-स्केचबुक महत्त्वाची भूमिका बजावते. ‘हसण्याचा आकार’ या लेखात धर्मापुरीकरांनी वसंत सरवटे यांच्या अशा स्केच बुकची ओळख करून दिलेली आहे. या संग्रहातला हा एक महत्त्वाचा लेख आहे.
चित्रकाराच्या स्केचबुकमध्ये समोरील वस्तूच्या दृश्यात्मक नोंदी असतात, तर व्यंगचित्रकार त्याला उपयुक्त वाटणारे तपशील पूरक माहितीसह नोंदवून ठेवीत असतो, त्यामुळे चित्रकाराच्या वहीपेक्षा ती अधिक भरगच्च असते. अभिजात चित्रकलेत स्केचबुक – अभ्यासचित्र (Study) – परिपूर्ण रेखाचित्र (Cartoon) – अंतिम चित्र (Painting) असा प्रवास असतो. व्यंगचित्रकाराच्या नोंदवहीत थोड्याशा असंबद्ध वाटणाऱ्या विस्कळीत अशा अनेक नोंदी आणि स्केचेस असतात. कच्चा माल असावा तशा. आपण ते व्यंगचित्र पाहतो, तेव्हा या नोंदवहीतले घटक नेमकेपणाने आणि परिणामकारक पद्धतीनं सुबद्ध रचनेच्या माध्यमातून आपल्यापुढे येतात. धर्मापुरीकर म्हणतात, त्याप्रमाणे ‘व्यंगचित्रकाराची रेखाटन नोंदवही ही त्याच्या अस्वस्थतेला आकार देणाऱ्या प्रवासाची हकिकत असते.’
आकार अवकाशाबद्दल धर्मापुरीकरांनी काही चांगली निरीक्षणं नोंदवली आहेत. ‘व्यंगचित्राच्या आकाराचे अन् त्या चित्रातल्या विनोदाचे ‘प्रपोर्शन’ बरोबर आहे का, कसे, हे पाहणे महत्त्वाचे,’ असं धर्मापुरीकर सांगतात. विविध आकारांमधल्या नात्यानुसार चित्रघटकांमधील प्रमाणबद्धता ठरत असते. आकारांचं विरूपीकरण चित्रकलेत असतं, तसंच व्यंगचित्रातही. तेव्हा मानवी चेहऱ्याचा मूळ आकार आणि त्याचं विरूपीकरण, म्हणजेच प्रपोर्शन किती प्रमाणात वाकवावं, हे व्यंगचित्रकाराच्या शैलीनुसार ठरतं. या आकारावरच्या लेखात धर्मापुरीकरांनी सेम्पे या व्यंगचित्रकाराची दोन चित्रं दिेलेली आहेत. तिसरं चित्र आहे, ते वसंत सरवटेंचं. या तीनही चित्रांमध्ये एखाद्या निसर्गचित्रासारखा मोठा अवकाश आहे. त्यात अनेक सूचक तपशील असल्यामुळे या चित्रांचा आकार मोठा असणं क्रमप्राप्त ठरतं. चित्राला चौकट असावी, का नसावी, चौकट टाकली, तर अवकाश बंदिस्त होतो, चौकट नसेल तर मुक्त अवकाशामुळे चित्र वेगळं भासतं, पण कधी कधी चौकटीचा उपयोग स्वप्न आणि वास्तव यांच्यातला दुभाजक म्हणूनही होऊ शकतो.
उदा. वसंत सरवटेंचं कविमनाचा ‘तो’ आणि गृहिणी असलेल्या ‘ती’चं व्यंगचित्र. आकाराचा उपयोग दुहेरी आहे. डोळ्यांना दिसणारा सजग पातळीवरचा आकार व्यवहारातील वस्तूंना (माणसं, झाडं, इमारती) दृश्यरूप देत असतो; तर चित्रातला अबोध पातळीवरचा आकार अंतर्गत मनोव्यापाराची जाणीव करून देत असतो. उदाहरणार्थ, सेम्पेच्या व्यंगचित्रातली लहान मुलांच्या शाळेतली भिंत, शाळेचं आवार आणि रस्ता यांच्यामधली सीमारेषा बनते. पण या बाह्य आकारामध्ये दडलेला आकार आहे तो बालकांच्या मुक्त जगाचा आणि पालकांच्या सुरक्षित जगाचा. हा अंतर्गत अवकाश आहे.
धर्मापुरीकर यांनी सेम्पेच्या आणखी एका चित्रातल्या हाफ टोनबद्दल लिहिलं आहे. ‘चित्रातला हाफ टोन आणि चित्राचा हाफ टोन… रचना आणि आशयाचा मिलाफ असतो.’ काळ्या पांढऱ्या रंगछटांचा आभास हाफ टोनच्या वापरामुळे निर्माण होतो. मुद्रणकलेतली ही एक तांत्रिक बाब. पण चर्चच्या गूढरम्य भासणाऱ्या आणि छायाप्रकाशाच्या अदभुत आणि वास्तवाच्या सीमेवर घडणाऱ्या उंदीर-मांजराच्या पाठलागाचं चित्रण एक वेगळाच आशय सांगतं. हाफटोनमुळे ही किमया साध्य होते.
कलाकृतीमध्ये काळ हादेखील एक महत्त्वाचा घटक असतो. काळ हा व्यंगचित्रामध्ये सूचित केलेला असतो. दिवस-रात्र अशा ढोबळ पद्धतीनं, माणसाचा विकास अथवा अधोगती या क्रमानं, युद्ध अथवा ध्वनिप्रदूषणाच्या परिणामांद्वारे अशा अनेक पद्धतीनं काळ चित्रांमधून येतो. पण काळाचं आणखी एक परिमाण असतं. चित्राचा संवाद जेव्हा एखाद्या रसिकाशी होतो, तेव्हा एक वेगळीच प्रक्रिया सुरू होते. रसिकाच्या अभिरूचीनुसार आशयाचे संदर्भही बदलतात. तुरुंगातील कैद्यांच्या व्यंगचित्रांवरच्या प्रतिक्रिया आपल्याला अशाच आस्वादाच्या गोड कल्पनांमधून जागं करतात. कधी कधी चित्र पाहणारे आपण तेच असतो. पण आधी अनोळखी असलेलं व्यंगचित्रातलं वास्तव कालांतरानं आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग होतं, तेव्हा जुनी पाहिलेली चित्रं आपल्याला नव्यानं कळतात. संवाद-आस्वादाचा हा प्रवास त्याच्या विविध छटादेखील धर्मापुरीकरांनी टिपल्या आहेत.
व्यंगचित्रासारख्या कलाकृतींच्या आस्वादामध्ये येणारे कृतार्थतेचे अनेक तरल आणि निसटते क्षण धर्मापुरीकर यांनी ललितबंधांच्या रूपाने नेमके पकडले आहेत. वाचणाऱ्यांच्या दृश्यजाणिवा त्यामुळे नक्कीच अधिक समृद्ध होतील.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4451/Altun-Paltun
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment