‘डिप्टी कलक्टरी’ ही विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम दहा कथांपैकी एक आहे!
ग्रंथनामा - झलक
मधुकर धर्मापुरीकर
  • ‘डिप्टी कलक्टरी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 27 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक डिप्टी कलक्टरी Deputy Collectory अमरकान्त Amarkant

‘डिप्टी कलक्टरी’ ही हिंदी साहित्यातले ज्येष्ठ लेखक अमरकान्त यांची कथा विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम दहा कथांपैकी एक आहे. हीम मूळ हिंदी कथा, या कथेचा मराठी अनुवाद, अनुवाद करतानाचा लेखकाचा अनुभव, त्या अनुभवाचा हिंदी अनुवाद आणि कथेच्या निमित्तानं मूळ लेखकाशी झालेला पत्रव्यवहार, अशा स्वरूपाचं ‘‘डिप्टी कलक्टरी : अनुवाद तथा अनुभव’ हे मधुकर धर्मापुरीकर यांचं अनोखं पुस्तकं नुकतंच शब्दालय प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेलं हे मनोगत...

.............................................................................................................................................

‘हिंदी कहानी में दूसरा प्रेमचंद नहीं हुआ जा सकता. इसी तरहा दूसरा अमरकान्त भी नहीं. अमरकान्त दरअसल ऐसे पहले कहानीकार है, जिन्होंने कहानी के वृत्तांत को रेखाचित्रात्मक अंदाज में ढालने का कौशल साधा.’

- राजेन्द्र कुमार

(वर्तमान साहित्य- शताब्दी कथा विशेषांक : जाने.-फरवरी २०००)

‘कहानी’ या हिंदी मासिकात, कथा स्पर्धेत पुरस्कार मिळालेली ‘डिप्टी कलक्टरी’ ही कथा १९५५ मध्ये प्रसिद्ध झाली. हिंदी साहित्यातले ज्येष्ठ लेखक अमरकान्त यांची ही कथा विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम दहा कथांपैकी एक आहे. ‘हिंदी कहानी, कहानीचा विकास-बदल,’ या विषयाची जेव्हा चर्चा होते, तेव्हा ‘उसने कहा था’ (चंद्रधर शर्मा ‘गुलेरी’), ‘कफन’ (प्रेमचंद), ‘चीफ की दावत’ (भीष्म साहनी), ‘तिसरी कसम’ (रेणू), ‘परींदे’ (निर्मल वर्मा) अशा कथांसोबत आवर्जून उल्लेख होत असतो, तो अमरकान्त यांच्या ‘डिप्टी कलक्टरी’ या कथेचा. या कथांपैकी ‘चीफ की दावत’ आणि ‘डिप्टी कलक्टरी’ या कथांचे अनुवाद करण्याचे भाग्य मला लाभले.

वीस पृष्ठांची ही दीर्घकथा. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातला मोठा मुलगा नोकरीच्या प्रयत्नात असतो. डेप्यूटी कलेक्टरच्या परीक्षेचा दिवस-रात्र अभ्यास करीत असतो. आणि आपला तरुण मुलगा मोठ्या पदावर जाणार, अशी स्वप्नं पाहणारे त्याचे वडील, या दोघांची ही कथा. रात्रंदिवस त्याच धुंदीत असताना, आर्थिक विवंचना, आशा-निराशा, रागा-लोभासोबतच मुलाबद्दल दाखविता न येणाऱ्या अतीव करुणेच्या भावनेत वावरणारा, आता थकत चाललेला त्याचा पिता; अशा वातावरणात घडत जाणारी ही कथा आहे.

‘स्वातंत्र्योत्तर हिंदी कहानियां’ या कथासंग्रहाचे संपादक कमलेश्वर यांनी आपल्या प्रस्तावनेत या संदर्भात उल्लेख केला आहे, तो असा : “नयी कहानी या स्वातंत्र्योत्तर कहानी की जो गहरी पहचान पांच दशकों में व्याप्त और पिछली सदी की समाप्ती तक मौजूद है, और निश्चय ही जो २१वी शताब्दी में भी रहेगी- उसका श्रेय हिंदी कथाजगत के उन कालजयी रचनाकारों को जाता है, जिन में प्रमुख है- भीष्म साहनी, निर्मल वर्मा, कमलेश्वर, फणीश्वरनाथ रेणू, मोहन राकेश, अमरकान्त आदि कथाकार.” आणि ‘डिप्टी कलक्टरी’ कथेसंदर्भात कमलेश्वर यांनी म्हटलं आहे, “अमरकान्तने ‘डिप्टी कलक्टरी’ में निम्न मध्यमवर्ग की नियती और महत्त्वाकांक्षा को यथार्थवादी स्वर दिया है.’

अमरकान्त यांच्या या ‘डिप्टी कलक्टरी’ कथेचा अनुवाद मी सतरा वर्षांपूर्वी केला. या निमित्ताने उत्कट असे अनुभव आले. अमरकान्त यांच्याशी पत्रव्यवहार झाला. आज एवढ्या वर्षांनंतरही, ही कथा, हा पत्रव्यवहार तितकाच मोलाचा वाटतो, म्हणून या संग्रहाचा प्रयत्न केला आहे.

तथापि, आज साहित्यात बदललेलं कथेचं स्वरूप, झपाट्यानं बदलत जाणारं हे दैनंदिन पाहता या कथेला आजच्या दिवसांत जागा मिळेल का, हा प्रश्न पडला. पाच-सहा मुलं असलेलं निम्न मध्यमवर्गीय कुटुंब, जुने-बाद झालेले दिवस, भाबडा, स्वप्न पाहणारा बाप हे सगळं आज अडगळीचं झालं आहे की काय, असं वाटावं असा हा काळ. शिवाय, उपमा-प्रतिमा, उत्कटता-भावुकताविरहित मांडल्या जाणाऱ्या आजच्या कथेच्या संदर्भात ‘डिप्टी कलक्टरी’चं प्रयोजनच काय या विचाराने काही दिवस अस्वस्थही झालो. कथेच्या शेवटी, परीक्षेत असफल झालेला मुलगा-बबुआ हा बाजेवर निपचित पडून असतो. डोळे झाकलेले, हालचाल नाही; अशा स्थितीत न सांगता येणाऱ्या शंकाकुशंकांचा कुठेही उल्लेख न करता कथाकाराने बापाच्या हालचालींचं जे वर्णन केलं- मुलाला कळणार नाही अशी काळजी घेऊन तो आपल्या मुलाच्या नाकाजवळ वाकतो, हा प्रसंग वाचताना आपली जी तगमग होते, त्या सर्व अनुभवांचा वृत्तांत आज खरंच महत्त्वाचा वाटेल का...

‘डिप्टी कलक्टरी’ ही कथा, कथेतले ते तसे दिवस, कथेतल्या पिता-पुत्र सबंधांचं ते स्वरूप आज...आजच्या दिवसांत किती प्रस्तुत आहे याचा विचार करताना जाणवत राहिले, ते शकलदीपबाबू-कथेतला पिता. एका तरुण मुलाचा, मोठ्या नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या मुलाचा बाप. वाटू लागलं, त्याच आर्थिक परिस्थितीतलं-आजच्या काळातलं कुटुंब घेतलं, आजचा बाप हिशोबात घेतला, तर ही कथा आज कोणत्या संदर्भात प्रस्तुत वाटेल... त्या काळातल्या त्या पिता-पुत्राच्या भावना, पिता-पुत्रातले नातेसंबंध आज तसेच पाहायला मिळतील का?

दोनही बाबतीत आज बदल झालेले आहेत. आज हे असं घडलं, तर त्याचा शेवट असाच राहील का, या प्रश्नाला चटकन हो म्हणता येणार नाही. आजचे नातेसंबंध, स्वभाव बदललेले आहेत, हे या कथेच्या संदर्भात तीव्रतेनं जाणवत राहतं.

आणि आजची कथा. आजची बदललेली कथा वाचताना अधूनमधून असं वाटत राहतं, की आपण कुठेतरी कमी पडत आहोत, मागे राहिलो आहोत. आजची कथा वाचताना, ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं, तसं माझं होत असतं. कथा अंगावर येते आहे, अशी ही भावना. ‘कथादेश’ या दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या मासिकात वर्ष २००५ ते २००७ या कालावधीत समीक्षक जयप्रकाश यांचं, ‘कहानी की उपस्थिती’ या नावानं एक सदर प्रसिद्ध झालं. कथा या साहित्य प्रकारावर अभ्यासपूर्ण आणि तितकीच जिव्हाळ्यानं केलेली चर्चा हे या सदराचं वैशिष्ट्य. सदराच्या एका लेखाची सुरुवातच जयप्रकाश यांनी एवढी सुरेख केली, की वाचणारा आपोआपच त्या चर्चेत सहभागी होऊन जातो :

“इन दिनों, रोजमर्रा के जिंदगी में हो या कला-साहित्य की दुनिया में, वर्तमान और उसकी वास्तविकता की रोशनी ऐसी तीखी हो चली है, की मन थोडा मद्धिम रोशनी में जाने को तरसता है... जीवन में बुद्धिचातुर्य बढा है और साहित्य में भावुकता कम हुई है. आज की ज्यादातर कहानियां तात्कालिकता के दलदल में इतनी घंसी हुई है, की एक दुर्लभ मानवीय क्षण तक पहुंचने के लिए संवेदना के विस्तीर्ण आकाश में उडने की ताकत खो बैठी है.”

जयप्रकाश यांचं हे सांगणं आजच्या मराठी कथांसाठीही लागू आहे असं मला वाटतं. आणि जयप्रकाश यांच्या या विधानातूनच मला ‘डिप्टी कलक्टरी’चं मोल नव्यानं जाणवलं. वाटलं, ही कथा आणि या कथेवरची चर्चा, कथेचा अनुभव वाचकांसमोर मांडावा.

आजचे दिवस हे व्यस्ततेचे-त्रस्ततेचे झालेले आहेत. शिवाय, आज मध्यमवर्गीय म्हणावी, अशी आर्थिक स्थितीही राहिली नाही. समृद्धीचा वाढलेला स्तर आणि मर्यादित कुटुंब यामुळे अपुरेपणाची जाणीव-जी आधी सतत असायची, ती राहिली नाही. आर्थिक विवंचना, हतबलता, अपुरेपणाची भावना; आणि हे सगळं स्वीकारून दिवस काढण्याची वृत्ती बाजूला राहिली; त्या ऐवजी, चढाई करून-मोठी जोखीम स्वीकारून, परिस्थिती बदलून टाकायची आज मानसिकता दिसते.

शिक्षण क्षेत्राचा विस्तार, नोकऱ्यांचे अफाट विश्व आणि तंत्रज्ञानाची ‘बेसुमार प्रगती’ यात हरवलेला आजचा मुलगा आणि त्या क्षेत्राशी अनभिज्ञ असलेला बाप; अशा बापाचं मन आज मुलासाठी कशा भावनेचं असतं... पितृत्वाची ती अपार भावना, अपार करुणा-जी नैसर्गिक असते, मूलभूत असते; तिचं स्वरूप आज बदललेलं आहे, की निवळलेलं आहे...

महत्त्वाचं म्हणजे, त्या तशा दिवसांत तरुण मुलाची, बापाबद्दल रुसलेली-परंतु बद्ध असलेली भावना; या दिवसांत, या वातावरणात कशी झालेली आहे... असं वाटतं, आज दोघंही आपापल्या वाटेनं जात आहेत. सम-अंतर सोडून आता दोघांमधला कोन अंशाअंशानं वाढत असताना, पिता-पुत्र नातसबंधांतला तो कमीत कमी अंशाचा कोन सारखा लक्ष वेधून घेतो; त्याचं मोल जाणवत राहतं, ते ‘डिप्टी कलक्टरी’ मुळे.

आणि हिंदी-मराठी भाषेतून मांडलेली ही भावना त्याचमुळे जतन करावीशी वाटली, सांभाळून ठेवावी वाटली, त्यामुळे केलेला हा प्रयत्न. माणूस कितीही सुधारलेला असला, तरी त्याच्या हृदयाची स्पंदनं ऐकायची, तर त्याच्या छातीला कान लावावे लागतात. अनेक कारणांमुळे आज ही स्पंदनं ऐकली जात नाहीत, ऐकायला कठीण होत आहेत.

कथेचंही तसंच असतं. ‘भावुकता के पक्ष में’ या कथेबद्दलच्या समीक्षा लेखात जयप्रकाश यांनी म्हटलं आहे – “‘कथा रचना में अगर यथार्थ का कम, और उसे गढने के कौशल का ज्यादा प्रयोग हो तो गढंत की चमक भले ही पाठक को अभिभूत कर दे, जीवन की धडकन सुनने के लिए उसे कहानी के सिने फर कान लगाना ही पडता है।’

‘डिप्टी कलक्टरी’कथेतली पिता-पुत्र नात्यातली ही संवेदना अनुभवताना शकलदीपबाबूंची स्पंदनं आज साठ वर्षांनंतरही आपल्याला जाणवतील.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4500/Deputy-Collectori

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Jayant Raleraskar

Tue , 31 July 2018

हे खरे आहे की प्रत्यक्ष आयुष्याचे ताणे-बाणे दुय्यम होत कथा सजवण्याचे प्रयत्न अधिक आहेत. याला अपवाद नक्कीच आहेत, पण एकंदरीत कलाबूत वापरण्याकडे कल अधिक दिसतो. जयप्रकाश यांचे म्हणणे मराठीला तंतोतंत लागू पडते असे ठामपणे म्हणण्या इतपत माझे वाचन नाही. पण त्यात तथ्य असावे. मुळात नात्यांचे अनेक पदर हे अस्तंगत होत आहेत असेही अनेकवेळा वाटते. त्यामुळे कदाचित ही दुखरी नस विसरली तर बरी ...असे तर आपल्याला वाटत नाही...?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......