हलके हलके जोजवा डे-केअरचा पाळणा!
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • नवी मुंबईतील घटनेतील दृश्य!
  • Thu , 01 December 2016
  • Day Care Child Safety Child Abuse Working Women पाळणाघर बाल-अत्याचार करियर स्त्री

नवी मुंबईतील पाळणाघरातल्या निंदनीय प्रकारानंतर त्यावर उलट सुलट चर्चा होऊन काळाच्या ओघात त्याचा धुराळा खाली बसेलही, पण भविष्यकाळ मात्र आपल्याला माफ करणार नाही,  हेही तितकेच खरे.

रोज एक ना दोन अशा बातम्या येऊन  थडकतात की, भीतीने कापरे भरते आणि जगात कोणावरच विश्वास ठेवू नये,  असेही वाटून जाते. 'ही दृश्ये तुम्हाला विचलीत करू शकतात' अशी वॉर्निंग देऊन न्यूज  चॅनलवाल्यांनी दाखवलेले पाळणाघरातले सीसीटीव्ही फूटेज सुन्न करणारे होते. आपल्या समाजात आजही लहान मुले हा एक खूप मोठ्या प्रमाणात उपेक्षित राहिलेला आणि शोषण होणारा घटक आहे.  मग ती मुले गरिबांची असोत, श्रीमंतांची, सुशिक्षितांची की अशिक्षितांची. खरे तर उद्याचा समाज ज्या खांद्यांवर उभा राहणार आहे आणि ज्या मनांवर त्याची सुदृढता अवलंबून असणार आहे,  अशा महत्त्वाच्या घटकासाठी आपण नेमके काय करतो, हे जरा स्वतःच्या गालावर थपडा मारून, टक्क उघड्या डोळ्यांनी आणि लख्ख मेंदूने तपासून पाहिले पाहिजे.

मुळात पाळणाघरांची गरज आहे का, हा आता प्रश्न उरलेलाच नाही. कारण विभक्त कुटुंब पद्धती, अर्थार्जन आणि करिअरसाठी बाहेर पडणारी स्त्री, कधी ज्येष्ठांनी स्वतःहून नाकारलेली नातवंडांची जबाबदारी,  कधी सासू सासर्यांगपेक्षा पाळणाघर बरे म्हणून सूनबाईंनी निवडलेला चॉईस, तर कधी ज्येष्ठांना स्वतःचा अवकाश उपलब्ध व्हावा म्हणून सामंजस्याने निवडलेला डे-केअरचा पर्याय.  कारण काहीही असो,  पण पाळणाघरांना पर्याय नाही,  असेच काहीसे आज प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे पालकांनी आणि विशेषतः मुलांच्या आयांनी आपले मूल पाळणाघरात जाते म्हणून गिल्ट वाटून घेण्याचे अजिबातच कारण नाही.  एकदा आपण निर्मळ आणि आनंदी मनाने या परिस्थितीचा स्वीकार केला तर पुढचा मार्ग अधिक सुकर होईल,  हे लक्षात घ्यायला हवे. मुख्यतः मुलांची पूर्णवेळ शाळा सुरू होईपर्यंत म्हणजे मूल सहा वर्षांचे होऊन पहिलीत जाईपर्यंत मुलांच्या आईला स्वतंत्रपणे, पूर्णवेळ काम करायचे असेल तर तिला पाळणाघराचा आधार घ्यावाच लागतो. आईचे शेपूट असणाऱ्या मुलांना सोशल करण्यासाठीचा मार्ग म्हणूनही अनेकजण पाळणाघराचा पर्याय निवडतात. त्यामुळे आजकाल शाळांइतकेच पाळणाघरांचे महत्त्व वाढले आहे.

अगदी नव्वदच्या दशकापर्यंत टिकून असलेल्या घरगुती पाळणाघरांची जागा गेल्या काही वर्षात सो कॉल्ड डे-केअर्सने घेतली आहे. त्यामुळे पाळणाघरातल्या मावशींचे रूपांतर मिस किंवा आंटीमध्ये आणि दहा बाय दहाच्या खोलीचे रूपांतर ऐसपैस रो-हाऊस किंवा बंगल्यामध्ये कधी झाले, ते आपल्यालाही कळले नाही.  गल्लोगल्ली बोकाळलेल्या इंटरनॅशनल प्ले-स्कूल आणि नर्सरीचा जोडधंदा असलेल्या डे-केअर्सनी खरोखरच उच्छाद मांडला आहे.  ऐसपैस रो-हाऊस किंवा बंगल्यामध्ये चार-पाच रंगीबेरंगी कार्टून काढायची, एखाद्या हायफंडू नावाची पाटी बाहेर लटकवायची, चौकशीसाठी आलेल्या पालकांना वर्षभरातल्या इव्हेंटसची माहिती द्यायची आणि पालकांनीही घाईघाईत या सगळ्याला मान डोलवून आपल्या बीझी शेड्यूलमध्ये बुडून जायचे. यावर कडी म्हणजे आमचे प्रोफेशनल डे-केअर आहे,  असे म्हणत पाहिजे तशी  फी आकारायची. पण या बहुतांश डे-केअरचा प्रोफेशनॅलिझम हा फक्त आणि फक्त व्यवहारापुरताच मर्यादित आहे, हे तुम्हीसुद्धा तुमच्या घराजवळच्या एक-दोन गल्ल्यांमध्ये चक्कर मारून आलात की,  सहजच तुमच्याही लक्षात येईल. 

आपले मूल दिवसातले सहा ते आठ  (किंवा काहींच्या बाबतीत त्याहीपेक्षा जास्त) तास ज्या ठिकाणी राहणार आहे, त्याची काळजीपूर्वक निवड करायला हवी हे काही मुद्दामहून सांगण्याची गरज आहे असे नव्हे. गरज आहे ती पाळणाघरांचे निकष, तिथल्या स्टाफचे निकष, तिथले वातावरण,  मुलांच्या मानसिक, शारीरिक,  भावनिक आणि बौद्धिक अशा चारही क्षमता सुदृढ करण्यासाठी तिथे केले जाणारे प्रयत्न या सगळ्याबद्दल साधकबाधक चर्चा करून त्यावर ठोस उपाय करण्याची. पण तसे होताना दिसत नाही.  कारण पुन्हा तेच की आपण मुलांना गृहीत धरतो, म्हणजेच त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. इथे वापरलेल्या 'आपण' या शब्दात पालक, पाळणाघराच्या मालक, चालक इथपासून ते मुलांची शी-शू स्वच्छ करणार्याष मावशींपर्यंतचे सर्व घटक, एकूणच समाज आणि मुख्य म्हणजे शासन अशा सगळ्यांचा  समावेश आहे. 

मुलांच्या वयाच्या भिन्न टप्प्यानुसार त्यांचे अनुभव,  भावविश्व,  विचार आणि वर्तन या सगळ्यात बदल होत असतात.  हे बदल समजून घ्यायला हवेत. त्यामुळेच पाळणाघर सुरू करण्यासाठी नियमावली तयार करून त्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे,  तशीच पाळणाघरात नोकरी करणार्याठ मावशींचे प्रशिक्षण घेणे, बालमानसशास्त्राचे काही धडे त्यांच्याकडून गिरवून घेणं, किमान पक्षी त्यांना या विषयाची जाणीव करून देणे, हे निश्चिसतच करता येईल. वरचेवर त्यांच्यासाठी रिफ्रेश कोर्स घेता येऊ शकतील.

हे सगळे व्हायचे असेल तर त्यात सरकारला हस्तक्षेप करायला लागेल. आता सरकार नावाची व्यवस्था शिरल्यावर काय होते, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण त्याशिवाय पाळणाघरांना शिस्तही लागणार नाही. हे दुष्टचक्र भेदायचे असेल तर सजगपणे हा प्रश्न हाताळावा लागेल. नाहीतर मग काही दिवस अहमहमिकेने आपण यावर चर्चा करत राहू आणि नंतर पुन्हा पुढची घटना घडेपर्यंत सर्व काही पहिल्यासारखेच चालू राहील. पाळणाघरांमधील आचारसंहिता आणि मार्गदर्शक तत्त्वे यांना संस्थात्मक स्वरूप देण्याची गरज आहे. त्यासाठी त्यावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेची आवश्यकता आहे. शिवसेना-मनसे स्टाईल किंवा तृप्ती देसाई स्टाईल, अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवले जाऊ शकत नाहीत, हेही लक्षात घेण्याची गरज आहे.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......