‘बाजीगर’ राहुल गांधींच्या ‘मिठी’ची ‘मगरमिठी’!
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मिठी’!
  • Mon , 23 July 2018
  • संपादकीय Editorial अक्षरनामा Aksharnama राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप काँग्रेस

शुक्रवार. २० जुलै. काही महिन्यांपूर्वी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या तेलुगु देसम या पक्षानं भाजपशी फारकत घेऊन मोदी सरकार विरोधात लोकसभेत या दि‌वशी अविश्वास ठराव मांडला. त्याला इतर विरोधी पक्षांनी साथ दिल्यानं आणि लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी तो प्रस्ताव दाखल करून घेतल्यानं तो लोकसभेत चर्चेला मांडला गेला. त्यावर तब्बल १२ तास चर्चा झाली. अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक मतं भाजपला मिळून हा प्रस्ताव फेटाळला गेला.

या ठरावापूर्वी या प्रस्तावाला लोकसभा सभापती सुमित्रा महाजन भाजपच्याच असून त्यांनी मान्यता कशी दिली, यावर प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा रंगली होती. काहींनी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला की, हे मोदींचंच धक्कातंत्र असणार. विरोधी पक्षांना आणि देशाला असे अकल्पित धक्के देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. प्रत्यक्षात अविश्वास ठराव मांडला गेल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी बाजी मारली. त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं. आणि आपलं भाषण संपल्यावर पंतप्रधान मोदी यांना थेट ‘मिठी’ मारली. या अनपेक्षित धक्क्यानं मोदी, लोकसभेच्या सभापती, भाजपचे खासदार आणि काँग्रेसच्या खासदारांसह सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पण राहुल गांधींनी आपल्या आसनावर येऊन बसल्यावर ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाहून डोळा मारला.

आणि वर्तमानपत्रं, आनलाईन मीडिया, सोशल मीडिया आणि टीव्ही वाहिन्यांना विषय मिळाला. सर्वत्र राहुल गांधींच्या मिठीची चर्चा सुरू झाली. ‘एक थप्पड की गूँज’च्या चालीवर ‘एक मिठी की गूँज’ सर्वत्र चर्चेचा विषय झाली!

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही राहुल गांधी यांनी ‘मिठी’ मारली, तेव्हाही या अनपेक्षित धक्क्याला सामोरं जाता आलं नाही. आणि नंतर त्यांनी दीड तास भाषण केलं. त्यात सगळा वेळ काँग्रेसला नेहमीप्रमाणे शिव्या घालण्यात खर्च केला. राहुल गांधी किंवा इतर विरोधी खासदारांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला, केलेल्या एकाही आरोपाला उत्तर दिलं नाही. पंतप्रधानांच्या भाषणानंतर थेट मतदान होतं. निकाल जाहीर होतो. तसा तो झाला. त्यात अपेक्षेप्रमाणे भाजपच्या बाजूनं सर्वाधिक मतं पडली. त्या गदारोळात पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणं, त्यांना धारेवर धरणं होऊ शकलं नाही. तसंही अविश्वास ठरावावर आधी विरोधी पक्षाचे नेते बोलतात, सरतेशेवटी पंतप्रधान बोलतात, अशी परंपरा आहे. त्यामुळे पंतप्रधान जे बोलतील, ते लोकसभेसह देशाला ऐकून घ्यावं लागतं. त्याचा पुरेपूर फायदा घेत आणि राहुल गांधींच्या ‘मिठी’ धक्क्याला नाकारत मोदींनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर आरोप केले. पण त्यात फारसा काही दम नव्हता.

यावरून नुकतीच घडलेली एक घटना आठवली.

नुकत्यात पार पडलेल्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अंतिम सामना क्रोएशिया आणि फ्रान्स यांच्यात झाला. त्यात क्रोएशियाचा पराभव करत फ्रान्सनं वर्ल्डकप पटकावला. तेव्हा हरलेल्या क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षा Kolinda Grabar-Kitarovic यांनी जिंकलेल्या फ्रान्सच्या संघाच्या कर्णधाराला दिलदारपणे मिठी मारली! एका बाईची एका पुरुषाला मिठी आणि तीही हरलेल्या देशाच्या प्रमुखानं जिंकलेल्या देशाच्या संघाच्या कर्णधाराला मारलेली. त्याची चर्चा झाली. पण क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षा Kolinda Grabar-Kitarovic या ‘बाजीगर’ ठरल्या.

हाच प्रकार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेल्या ‘मिठी’नंही केला. राहुल गांधी हरूनही ‘बाजीगर’ ठरले. अर्थात त्यावर सभापती सुमिता महाजन यांनी आक्षेप घेतला. लोकसभेत पंतप्रधानांना जाऊन अशी ‘मिठी’ मारणं संकेतांना धरून नाही. राहुल गांधी यांनी असं करायला नको होतं वगैरे वगैरे उपदेश त्यांनी केला. लगोलग भाजपची ट्रोल आर्मी राहुल गांधींवर तुटून पडली. एरवी राहुल गांधींविषयी फारशी आत्मीयता नसलेल्या देशभरातल्या पुरोगाम्यांनी त्यांचं कौतुक केलं. एरवी त्यांच्याविषयी ‘तळ्यात-मळ्यात भावना’ असलेल्यांनाही हा प्रकार आवडला. त्यांनीही राहुल गांधींची प्रशंसा केली. राहुल गांधींविषयी पूर्णपणे नकारात्मक भावना असणाऱ्या आणि सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या बुद्धिजीवींचा राहुल गांधींविषयीचा राग थोडाफार शमायला मदत झाली.

काहींनी टीव्ही वाहिन्यांनी राहुल गांधींच्या ‘मिठी’चीच चर्चा केल्यामुळे त्यांना दोष दिला. आणि सोशल मीडियावर राहुल गांधींचं कौतुकही केलं. पंतप्रधानांवर आरोप करून त्यांना ‘मिठी’ मारणं आणि वर ‘तुम्ही माझा द्वेष करत असलात, मला ‘पप्पू’ म्हणत असलात तरी मी तुमच्यावर प्रेमच करतो’ असं म्हणणं हे भारी पडलं. त्यामुळे मोदींसह भाजप गांगरून गेले. त्यातून मोदींना त्यांचं भाषण संपेपर्यंत सावरता आलं नाही.

देशभर शनिवारपासून या ‘मिठी’ प्रकरणावर ‘मिठासपूर्ण’ आणि ‘मिठासरहित’ चर्चा सुरूच आहे. देशभरातल्या बहुतेक वर्तमानपत्रांनी आज याच विषयांवर आपल्या अग्रलेखातून सकारात्मक-नकारात्मक भाष्यही केलं आहे. पण घडायची ती घटना घडून गेलेली आहे. भाजपच्या ट्रोल आर्मीनं जी कामगिरी पार पाडायची आहे, तीही पार पाडली आहे. नेहमीप्रमाणे राहुल गांधींची पात्रता, वकुब, अपरिपक्वता यांविषयी बोललं जात आहे. आणि त्याच वेळेला त्यांच्या समंजसपणाच्या दिशेनं होत असलेल्या प्रवासाविषयीही सकारात्मक बोललं जात आहेच.

उर्दू गीतकार, कवी निदा फ़ाजली यांचं एक सुंदर गीत आहे. त्याचे शब्द आहेत – ‘दुश्मनी लाख सही, ख़त्म न कीजिए रिश्ता, दिल मिले या न मिले हाथ मिलाते रहिये’. पण राहुल गांधींनी हात न मिळवता थेट मिठीच मारली! मात्र प्रत्यक्षात ती मोदींसह भाजपचे खासदार, मंत्री आणि भाजप ट्रोल आर्मी यांना ‘मगरमिठी’च वाटली. त्यातून स्वत:ची सोडवणूक करून घेण्याचा मोदींनी दीड तास प्रयत्न केला. भाजप ट्रोल आर्मीनं तर १२-१५ तास प्रयत्न केला. पण राहुल गांधींच्या ‘मिठी’ची ‘गूँज’ काही कमी झाली नाही!

एक साधी कृती लक्षणीय काम करू शकते, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

राहुल गांधी म्हणाले ते बहुधा खरं असावं. अशी मिठी प्रेमाविषयी मारता येत नाही. आता प्रेमातही राजकारण असतंच म्हणा! जगातली कुठली तरी गोष्ट राजकारणाशिवाय असते का? प्रेमातल्या प्रत्येक कृतीला ‘रिटर्न गिफ्ट’ची अभिलाषा असतेच. त्यामुळे निव्वळ राजकारणात जेव्हा प्रेमाचा शिरकाव होतो, तेव्हा त्यातही निर्व्याज, नि:स्वार्थी आणि निर्भेळ असं काही असतं असं मानायचं काही कारण नाही. त्यातही काहीतरी आडाखे असणारच. पण त्यात प्रेमही असतंच.

..आणि प्रेमावर तर जग चालतं!

कविवर्य कुसुमाग्रज यांची ‘प्रेम कुणावर करावं?’ या नावाची एक सुंदर कविता आहे. त्यात शेवटी ते म्हणतात -

“प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं

कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं,

ज्याला तारायचं,

त्याच्यावर तर करावंच,

पण ज्याला मारायचं,

त्याच्यावरही करावं,

 

प्रेम कुणावरही करावं

प्रेम योगावर करावं,

भोगावर करावं,

आणि त्याहूनही अधिक,

त्यागावर करावं

 

प्रेम

चारी पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं,

आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं,

प्रेम कुणावरही करावं

कारण

प्रेम आहे

माणसाच्या संस्कॄतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा

एकमेव!”

असं प्रेम उत्कट, विलोभनीय आणि लोभस असतं. ते जीवघेणंही असतं. अशा प्रेमातून स्वत:ची सुटका करून घेणं सोपं नसतंच. कितीही प्रयत्न केला तरी त्यातून सहजासहजी आपल्याला स्वत:ची सुटका करून घेता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि भाजपची ट्रोल आर्मी यांचंही नेमकं तसंच झालंय. त्यांना राहुल गांधींच्या ‘मिठी’तून स्वत:ची सुटका करून घेता आलेली नाही. फर्डे, पट्टीचे आणि हमखास संमोहित भाषण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर बोलताना आत्मविश्वास गमावल्यासारखी अवस्था झाली ती यामुळेच. त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे काँग्रेसला झोडपून काढलं. राहुल गांधींना आपण फारसं महत्त्व देत नाही हे दाखवून दिलं. पण तरीही त्यांच्या भाषणावरही राहुल गांधींच्याच ‘मिठी’ची ‘मगरमिठी’ कायम राहिली.

काय आहे या ‘मिठी’ची जादू? ‘चारोळी’कार चंद्रशेखर गोखले म्हणतात –

‘मिठी या शब्दात

किती मिठास आहे

नुसता उच्चारला तरी

कृतीचा आभास आहे’

राहुल गांधींनी तर थेट कृतीच केली! म्हणजे त्याचा परिणाम तर डबल व्हायला हवा. तसा तो झाला. त्यामागेही कारण आहे. कवी दिलीप चित्र म्हणतात –

‘कृतीनंतरचा विचार

आणि विचाराआधीची कृती

या दरम्यान असते

मी दिलेली आहुती’

आता इतकं सगळं ‘रामायण’ विचार आणि कृती दरम्यान घडत असेल तर राहुल गांधींच्या ‘मिठी’नं देशात जे ‘महाभारत’ घडलंय, ते साहजिकच म्हणावं लागेल.

बाकी राहुल गांधी या ‘मिठी’ प्रकरणानं हिरो झाले. ‘बाजीगर’ ठरले. असं होणार याची त्यांना त्यांच्या सल्लागारांनी कल्पना दिली असेल. किंवा त्या सल्लागारांनी हे एवढं ‘महाभारत’ घडेल याची हे ‘रामायण’ रचताना कल्पना केलेली नसेल. त्यांनी एक चूष म्हणून ही कृती राहुल गांधींना करायला सांगितली असेल. किंवा राहुल गांधींनीच उत्स्फूर्तपणे स्वत:च्याच मनानंच ही कृती केली असेल. काही का असेना, त्याचा परिणाम चांगलाच झाला म्हणायचा शेवटी! कारण देशात जो सांप्रदायिक, जातीय, धार्मिक द्वेष पसरवला जातोय, सतत अल्पसंख्याक समूहाला टार्गेट करून त्यांच्याविषयी द्वेषभावना निर्माण केली जातेय, त्यामुळे येणाऱ्या उद्वेगाचा कसा सामना करायचा हा प्रश्न देशभरातल्या बुद्धिजीवींना, बुद्धिवादींना पडला होता. त्यांना थोडाफार तरी दिलासा देण्याचं काम राहुल गांधींच्या ‘मिठी’नं घडवून आणलं हेही नसे थोडेथोडके!

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 24 July 2018

काहीही हं अमेय कुलकर्णी! अहो, पप्पू हा इसम माझ्या दृष्टीने आजिबात दखलपात्र नाही. पण इव्शय निघालाच आहे तर इतरत्र लिहिलेले दोन प्रतिसाद नमूद करतो : १. https://www.misalpav.com/comment/1004913#comment-1004913 २. https://www.misalpav.com/comment/1004974#comment-1004974 तूर्तास इतकंच पुरेसं आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


vishal pawar

Mon , 23 July 2018


Amey Kulkarni

Mon , 23 July 2018

आणि आता लवकरच यातनं सोडवणूक करून घेण्यासाठी मोदी आय टी सेल आर्मीचे शिलेदार गामा पैलवान इथे प्रयत्न करतील..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......