अजूनकाही
दलितांचे प्रतिनिधी म्हणून रामदास आठवले सत्तेत आहेत, पण ते कायम चार ओळींची कविता करण्यातच समाधान मानतात. त्यांची कामगिरी निराशाजनक आहे. त्याविषयीचा हा लेख.
.............................................................................................................................................
परवाच लोकसभेत अविश्वासदर्शक ठराव फेटाळला गेला. मोदी सरकारकडे बहुमत होतं. त्यामुळे त्यांना तशी चिंता नव्हतीच. पण विविध खासदारांनी मोदी सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले. तरी मोदींचं भाषण निराशजनक होतं. त्या दिवशी विविध खासदार विविध विषयांवर बोलले. मला त्यात सर्वांत प्रभाशाली वाटलं, ते हैद्राबादचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांचं भाषण. विविध समस्यांना वाचा फोडणारं असं त्यांचं मुद्देसूद्द भाषण होतं. आणि सगळ्यात दुःखदायक भाषण होतं, ते म्हणजे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री म्हणून तुमचं भाषण. तुम्ही ज्या वेळेस भाषणात सांगितलं की, ‘मेरी पार्टी बाबासाहब कि पार्टी है’, तेव्हा ते ऐकून तर मला हसायला आलं आणि लाजही वाटली. संविधान निर्मिती करणाऱ्या बाबासाहेबांचं नाव घेणारा माणूस इतकं ‘गचाळ’ कसं बोलू शकतो लोकसभेत? आपण जर बाबासाहेबांचा वारसा सांगत आहात, तर काहीतरी भरीव, ठाशीव बोललं पाहिजे.
तुम्ही दलितांचे/शोषितांचे प्रतिनिधी म्हणून भाजपसोबत सत्तेत आहात. देशभरात शोषितांवर इतका अन्याय होत असताना तुमच्यासारखा प्रतिनिधी जर पांचट कविताच करत असेल आणि वातावरणाचा सगळा नूर बदलून टाकत असेल तर अर्थ काय? एक हास्य वा शीघ्रकवी म्हणून तुम्ही नक्कीच चांगले आहात, पण कायम लोकसभेत शीघ्र कविता करणं योग्य नाही. शोषितांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही पूर्ण निराशा केलेली आहे. तुमच्या कामगिरीचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे
२०१४पासून दलित, मुस्लिम, महिला भीतीच्या वातावरणात जगत आहे. पुण्यात मोहसीन खानची विनाकारण धार्मिक द्वेषातून हत्या झाली. रोहित वेमुला, कोरेगाव भीमामध्ये दलितांवर हल्ला, कठुआ बलात्कार, ते अगदी काल राजस्थानात झालेली मुस्लिम युवकाची हत्या. तुम्ही खासदार म्हणून यावर काहीच आवाज उठवला नाही, लोकसभेत बोलायला जास्त मिळत नसेल तर पत्रकार परिषद घेऊन बोलायला हवं होतं. तुमच्या मंत्रालयानं गृहविभागाला सतत पत्रं लिहिली पाहिजेत. जाब विचारला पाहिजे, पण तसं काही होताना दिसत नाहीये. उलट अशा घटनांची संख्या वाढत आहे.
आठवलेसाहेब तुमची राजकीय अपरिहार्यता समजू शकतो, पण तुम्ही आपलं ‘मूळ’ विसरता कामा नये असं वाटतं. (‘काला’ या चित्रपटात रजनीकांतचा एक डायलॉग आहे – ‘अपनी जडोका जानना जरुरी है’.)
आता दुसऱ्या मुद्याकडे वळू. तो म्हणजे रोजगार, शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण इत्यादी क्षेत्रांत शोषितांची सुरू असलेली होरपळ (खरं म्हणजे या सर्व क्षेत्रांत सर्वांचीच होरपळ सुरू आहे!).
रोजगारबद्दल बोलायचं झाल्यास सरकारी नोकरी मिळणं कठीण झालं आहे आणि ज्या ज्या जागा निघत आहेत, त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या आहेत. त्यासोबत आरक्षणाचा बट्ट्याबोळ सुरूच आहे. उदा : नुकतीच निघालेली प्रशासकीय अधिकाऱ्यांची थेट भरतीची नोटीस. आणि खाजगीबद्दल तर बोलायला नकोच.
आठवलेसाहेब, तुमच्या टीम सांगून ‘लेबर डेटा’ बघायला सांगा. तुम्हाला बेरोजगारी किती वाढलीय, ते समजेल.
आरोग्य क्षेत्रातही तीच अवस्था सुरू आहे. (मागे ओडिशामध्ये दाना मांझी या व्यक्तीला त्याच्या मृत पत्नीला खांद्यावरून घेऊन जाऊ लागलं होतं) केरळमध्ये केवळ तांदूळ चोरीमुळे भुकेल्या आदिवासीचा बळी घेतला गेला.
शिक्षण क्षेत्राची तर अवस्था आणखीच भयानक आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. टाटा इन्स्टिट्यूटच्या मुलांनी इतके दिवस आंदोलन केलं, पण तुम्ही काहीच पाऊल उचललेलं दिसत नाही. नुसती फेसबुकवर सहज चक्कर मारली तरी कितीतरी विद्यार्थी फी भरण्यासाठी आवाहन करत आहे, हे दिसेल. अगदी कालपरवा कोलकात्याच्या सत्यजित रे फिल्म इन्स्टिट्यूटमधल्या दलित विद्याथ्यानं आवाहन केलं होतं. भाजपची विचारधारा नक्की व पक्की आहे. त्यांना शिक्षण, आरोग्य क्षेत्रात जास्त क्रांती नकोय, पण आठवलेसाहेब तुम्ही तर शोषित समाजातून आला आहात. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही धडाडीनं काम केलं पाहिजे.
आठवलेसाहेब, आपला पक्ष मुंबईमध्ये सर्वत्र पोचला आहे. इथल्या झोपडपट्टीवर निळा झेंडा असला की, झोपडं कोणी येऊन तोडणार नाही आणि माणसाला किमान छप्पर तरी मिळेल (अशी आशा इथं झोपडपट्टीत येऊन राहणाऱ्या प्रत्येक माणसाला असतो आणि झोपडीवर निळा झेंडा लावणारा प्रत्येक माणूस हा दलित नाही. निळ्या झेंडाचा राहण्यासाठी त्याला आधार असतो). पण ‘सिटी डेव्हलपमेंट’च्या गोंडस नावाखाली झोपड्या तोडायचं काम सुरू आहे. त्यांना शहराच्या बाहेर टाकलं जात आहे. तुम्हाला याची सर्व माहिती असेलच. त्यात तुम्ही काहीतरी काम करू शकता. भर पावसाळ्यात झोपड्या तोडल्या जात आहेत. लोकांचे संसार उघड्यावर भिजत आहेत. असे बरेच मुद्दे आहेत, ज्यावर तुम्ही बोललं पाहिजे. कारण तुम्ही ज्यांचं नाव घेता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायम शोषितांसाठी उभे राहिले होते. जातशोषण असो, कामगार शोषण, शेतकऱ्यांचं शोषण असो. महिलांचे शोषण असो किंवा मग र. धों. कर्व्यांसाठी खटला लढणं असूदे!
लोकसभेतील तुमच्या कवितांनी समस्त शोषित वर्गाची इज्जत धुळीस मिळत आहे. तुम्हाला कवितेतूनच बोलायचं आहे, तर बोला, पण लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत. त्यांच्या समस्या कशा सुटतील हे बघितलं पाहिजे. सोशल मीडियावर लोक तुमची खिल्ली उडवत आहेत. तुम्हाला ‘पँथर’ म्हणून ओळखलं जातं. ‘दाढीवाला’ म्हणून तुमचा गावागावात दरारा होता\आहे, पण आता ती लढाई राहिली नाही. ‘शस्त्र’ बदलण्याची वेळ आली आहे.
तुम्हाला एक सल्ला आहे की, तुमची वैयक्तिक टीम बदला किंवा समाजकल्याण मंत्री फेलोशीप सुरू करा. जी तुम्हाला कायम विविध विषयांवर काम करून देईल. बहुतांश मंत्री तेच करत आहेत. त्यांची स्वतःची टीम असते. तुम्ही मंत्री आहात म्हणून कायम व्यस्त असता. त्यामुळे ही सगळी टीम तुमचं बाकीचं काम करेल. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंनी तेच केलंय.
इतक सगळं लिहिलं ते गद्यात, आता शेवटी एक पद्य’ तुमच्याच शैलीत.
मत करो दलित-मुस्लिमोपर अट्याक, नही तो मैं मेरी पॉवर से कर दूंगा खळखट्याक
मत तोडो बारिश में गरीबोंकी ‘झोपडी’, डेव्हलपमेंटवालो तुमको है कि नै ‘खोपडी’?
लोगोको रहने दो ‘खुशाल’, नही तो मोदी सरकार को करूंगा ‘बेहाल’
मैं आदमी नही हूं ‘आम’, मेरे नाम में हैं ‘राम’, और करूंगा सबके लिये मैं काम!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Mon , 23 July 2018