अजूनकाही
हल्ली मराठी चित्रपटांना नवनवे धुमारे फुटत आहेत. उत्तम कथा, चांगल्या संकल्पना घेऊन असंख्य चित्रपट निर्माण होत आहेत. आणि चांगल्या कथांना तसेच चांगल्या संकल्पनांना प्रेक्षकही मनापासून दाद देत आहेत. मात्र चांगली संकल्पना असूनही जर पडद्यावरची तिची मांडणी अविश्वसनीय आणि सरधोपट पद्धतीनं केली तर त्या संकल्पनेची वाट लागते. कारण प्रेक्षकांना काही तरी नवीन पाहायला मिळेल अशी आशा असते. प्रेक्षक त्यासाठी आसुसलेले असतात. ‘३१ दिवस’ या नवीन मराठी चित्रपटाबाबत असंच काहीसं म्हणावं लागेल.
या चित्रपटात पाहायला मिळते ती दिग्दर्शक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या मकरंद नावाच्या एका तरुणाच्या जिद्दीची संघर्ष कथा. मकरंद तरुण आहे. छोट्या छोट्या नाटकांचं दिग्दर्शन करत असतानाच मोठ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचं स्वप्न तो बाळगून असतो. या नाटकाच्या निमित्तानं त्याला मुग्धा भेटते. मग अर्थातच प्रेम, विवाह, मूल असा प्रवास करत त्यांचा संसार सुरू होतो. दरम्यान नाटकाच्या निमित्तानं एका अंध शाळेच्या प्राचार्य असलेल्या मीराची अन त्याची ओळख होते. मीराचं त्याच्यावर ‘मूक प्रेम’ असतं, परंतु त्याच्याआधीच मॅक (मकरंदचं लाडाचं नाव) आणि मुग्धा यांचा विवाह झालेला असतो. (प्रेमाचा हा त्रिकोण मात्र चित्रपटाच्या शेवटी कमी आला आहे.)
एका हिंदी चित्रपटाचे लेखन केल्यानंतर मॅक मेघराज नावाच्या बड्या निर्मात्याला भेटतो. मेघराजला त्याच्या चित्रपटाची कथा आवडते आणि तो मॅकलाच त्याचं दिग्दशन करण्यास सांगतो. दिग्दर्शक होण्याचं मॅकचं स्वप्न अखेर पूर्ण होतं खरं, मात्र चित्रीकरणादरम्यान एका मोठा अपघात होतो आणि त्यामुळे मॅकची दृष्टी जाते. त्यामुळे चित्रपट रखडतो आणि मॅकचं दिग्दर्शक होण्याचं स्वप्न अर्धवटच राहतं. शिवाय सुरुवातीला आपण अंध झालो आहोत. हे सत्य स्वीकारण्याची त्याची तयारी नसते. अंध मॅकला ‘डोळस’ होण्यासाठी कोण प्रयत्न करतो आणि त्याचं स्वप्न अखेर पूर्ण होतं की नाही, त्यासाठी ‘३१ दिवस’ पाहायला हवा.
चित्रपटाच्या पहिल्या भागात कथेचं सादरीकरण इतक्या सरधोपट पद्धतीनं केलं आहे की, कथेच्या मूळ विषयाला हात कधी घातला जातो याची वाट पाहण्यातच वेळ जातो. त्यामुळे प्रारंभी चित्रपटाला ‘३१ दिवस’ नाव का दिलं याचं गौडबंगाल कळत नाही. पूर्वार्धात सुरू झालेली कौटुंबिक कथा हवी तशी पकड घेत नाही. आई-वडील-बहीण तसंच प्रेयसी (आणि नंतर बायको) यांचं प्रेम दाखवणारे कौटुंबिक कथेतील तेच ते फिल्मी प्रसंग पाहायला मिळतात (त्यामध्ये बहिणीच्या लग्नानिमित्त ‘आयटम साँग’च्या नावाखाली घुसडलेलं गाणंही). भावनात्मक दृश्यांना प्राधान्य दिल्यामुळे सुरुवातीला कथेत फारसं नावीन्य वाटत नाही.
मध्यंतरानंतर मात्र कथा-विषयाला गती देण्यास दिग्दर्शकाला यश मिळालं आहे. अंध मॅकचा संघर्ष चांगला चित्रित करण्यात आला आहे. पण त्यामध्येही काही अविश्वसनीय गोष्टी गृहीत धराव्या लागतात. तीस दिवस तयारीचे आणि एक दिवस चित्रीकरण करून चित्रपट पूर्ण करण्याचं आव्हान स्वीकारलेल्या अंध मॅकला स्टंटमॅनचं काम पसंत न पडल्यामुळे स्वतःच ‘स्टंटगिरी’ करणं, तसंच पाण्याखाली जाऊन स्वतः कॅमेऱ्यानं चित्रण करणं आदी कामंही करावी लागतात. (चित्रपटातला चित्रपट ‘थ्रिलींग’ असल्यामुळे थोडी तरी करमणूक होते.) शेवटचं आगीचं दृश्यही अंध मॅकच्या साहसाचं कळस गाठणारं आहे.
तांत्रिकदृष्ट्या चित्रपट चांगला चकचकीत झाला आहे. ‘बाहुबली’ चित्रपटातील धबधब्याखालील ‘प्रेमगीत’ विलोभनीय झालं आहे. कलाकारांच्या अभिनयांनी हा चित्रपट तरून नेला आहे असं म्हणावं लागेल. नायकाच्या भूमिकेतील शशांक केतकरनं सुरुवातीचा मॅक आणि नंतर अंध झालेला मॅक चांगला रंगवला आहे. आपल्या पदार्पणातच मयुरी देशमुखनं मुग्धाच्या भूमिकेत आश्वासक काम केलं आहे, तर रीना अगरवालनं अंध तरुणीची भूमिका चांगली निभावली आहे. निर्माते मेघराज यांच्या भूमिकेतील राजू खेर यांचा पडद्यावरील वावरही सुखावह वाटतो. विवेक लागू (मकरंदचे वडील) आणि लता थत्ते (आई) आणि मकरंदच्या इतर सहकाऱ्यांची कामंही चांगली आहेत.
मधुर भांडारकरांच्या तालमीत तयार झालेले दिग्दर्शक आशिष भेलकर यांचा मराठीतील हा पहिला प्रयत्न तसा चांगला असला तरी संघर्षपूर्ण कथेच्या मानानं ‘३१ दिवस’ भावनात्मक दृश्यात अधिक अडकून पडला आहे. त्यामुळे चांगली संकल्पना असूनही सरधोपट मांडणीमुळे तो प्रभावहीन ठरला आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment