प्रसिद्ध कादंबरीकार, ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा ‘देशीवाद’ हा सिद्धान्त सुरुवातीपासूनच मराठी साहित्यात वादाचा विषय झालेला आहे. आजवर त्याच्या बाजूनं आणि विरोधात बरंच काही लिहिलं-बोललं गेलं आहे. प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘देशीवाद : समाज आणि साहित्य’ हे पुस्तक लिहून नेमाड्यांवर आणि त्यांच्या देशीवादावर टीका-टिपणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देणारं ‘देशीवादाचे दुश्मन’ हे अशोक बाबर यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतंच हर्मिस प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला प्रकाशकानं ‘नाळ’ या नावानं लिहिलेल्या प्रकाशकीयाचा हा तिसरा व शेवटचा भाग...
.............................................................................................................................................
नेमाडे यांजबद्दल अनेकांना पोटशूळ उठण्याची जी काही प्रकरणे एका मागोमाग बाहेर येताहेत, त्यामागे एक गोष्ट आहे ती म्हणिजे ‘ज्ञानपीठ’ सन्मान आणि त्यांचं घरबसल्या होणारं कौतुक! ‘आम्ही एवढं लिहिलं तरी आम्हाला कोणीच विचारे ना’ ही वैयक्तिक दु:खाची टोचणीही आहे. हे एक निमित्त झालं. पण खरं कारण म्हणजे भालचंद्र नेमाडे कृषिकेंद्रित मध्यवर्ती संस्कृती संकल्पना लावून धरत निर्भिडपणे ती पुढे रेटत आहेत. त्याला गावस्तरापासून ते देश आणि जागतिकस्तरापर्यंत दिवसागणिक जोरकस पाठिंबा मिळत आहे. या मध्यवर्ती संकल्पनेमुळे आपलं महत्त्व कमी होतंय वा आपणांस कोणी विचारतच नाही, असं ज्यांना वाटतंय ते ते अगतिकपणे ‘रिअॅक्ट’ होणार, ही खूणगाठ आम्ही केव्हाच मनास बांधिली आहे.
नेमाडे यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पुरस्कार स्वीकारला. आपल्यासकट अनेक लेखक-पत्रकार वगैरे अनेकांनी प्रचंड आगपाखड केली. परंतु आपणांस माहीत नसेल म्हणोण एक गोष्ट सांगतो, हा पुरस्कार स्वीकारण्या अगोदर नेमाडे यांनी दोन वेळा तो नम्रपणे नाकारिलेला होता. शेवटी तिसऱ्या वेळी पुरस्कार समितीतल्या मान्यवरांच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी तो स्वीकारिला. दोनदा नाकारूनही तिसऱ्यांदा निवड समितीला पुन्हा नेमाडे यांचंच नाव समोर दिसावं, यात सर्वकाही आलं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांबद्दल नेमाडे यांनी जे लिहिलं ते व्यक्तिद्वेषमूलक असतं तर त्यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार त्यांचीच निंदानालस्ती करणाऱ्या लेखकास निवड समितीनं का द्यावा? पण आपले जसे कुसुमाग्रजांशी चांगले नाते होते, असं आपण म्हणालात, (हे माझे चांगले मित्र, त्यांच्याशी माझे जवळचे संबंध, ह्यांना मी चांगलं ओळखतो, आमची खूप दाट मैत्री होती वगैरे वगैरे असं लेखनात वा भाषणात सांगायची आपल्याला सवयच आहे, असं दिसतं) तसेच ते नेमाडेंचेही आहेच की. न पटणाऱ्या गोष्टींबद्दल लिहिणं-बोलणं होणार नसेल तर मग निकोप वातावरण कसं राहणार? खरंतर नेमाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानं त्या पुरस्कारालाही एक महत्त्व वा उंची मिळेल, असं निवड समितीलाही वाटलं नसेल कशावरून? नेमाडे यांच्यासारख्या लेखकाकडे पुरस्कार चालून जातात कसबे सर. त्यासाठी त्यांना फिल्डिंग-लॉबिंग-सेटिंग वगैरे करायची गरज नसते. आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्याबद्दल काही बोलू नये. नाही तर उथळपणातून भलतेच प्रमाद होतात. यावरून आम्हा तरुणांस एक शिक्षापण मिळाली की विचारात दम-कसदारपणा असेल, व्यापक परिघ असेल, विचारांप्रती सच्ची निष्ठा असेल तर मानसन्मानं झक्कत चालून येतात. त्याहीपेक्षा वाचकांनी डोक्यावर घेणं, या सन्मानाशी तर कशाचीच बरोबरी होत नाही. कारण वाचकांचा सन्मान मॅनेज करता येत नाही. नेमाडे याबाबतीत भाग्यवान ठरले!
आपल्या लेखाचा मुख्य विषय नेमाडे आहे, पण पुन्हा आपला तोल जाऊन रा. राजन गवस यांचा उल्लेख आपण केलाच. म्हणजे नेमाड्यांच्या बाबतीतलं आणि त्यांच्याशी संबंधितही काहीच सोडायचं नाही, असा बहुधा आपण पणच केला की काय कळत नाही. म्हणजे ‘देशीवाद-सिंधुसंस्कृती-जातिसंस्था यामुळे नेमाडे यांना मनोग्रस्त’ ठरवता ठरवता तुम्ही मात्र आपुसक नेमाडेग्रस्त झालात! इथं गवस यांच्या उल्लेखाचं प्रयोजनच काय? आता कसबे यांच्यावर लेख लिहायचा म्हणून मग मीही ओढूनताणून तुमच्या जवळच्या लोकांची नावं घ्यावीत काय? माझ्यासारख्या तरुणाला अशा पद्धतीनं दुसऱ्यांना ओढूणताणून टारगेट करणं मुळीच पटत नाही, कसबे सर. आता गवस यांनी कुणाबरोबर राहायचं, त्यांनी कशात अडकायचं, स्वत:तली सुप्त सर्जनशीलता प्रकट करण्यासाठी कसलं कसलं भिमुख हावं, वगैरे असे सल्ले आपण कशासाठी द्यावेत? गवसांनी काय करावं आणि काय करू नये हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न झाला. म्हणजे दुसऱ्यांनी काय करावं, काय लिहावं हेही आता कसबे सर आपणच ठरवणार का? ही वेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक दहशतवादाची- फॅसिस्ट प्रवृत्तीची रुजुवात तर नाही ना? गावरान म्हणवल्या जाणाऱ्या याच कृषिसंस्कृतीत जन्म घेऊन, लहानाचे मोठे होऊन व्यक्तिगत फायद्यासाठी कृषिसंस्कृतीवरच उलटी करणारेही काही कमी नाहीत. अशा महाभागांना कृषिसंस्कृती कळली असं म्हणता येत नाही. म्हणजे कृषिसंस्कृतीशी संबंधित सगळ्यांनीच आपली मुळं तोडून इंग्रजीचा परकी गोरा भ्रतार बोकांडी बसवावा, असं आपणांस सुचवायचं असेल तर काळ्यांच्या प्रश्नांचं काय? आपल्या कसबी आंग्लाळलेल्या नजरेनं काळ्यांचे प्रश्न सुटतील? तुम्हीही ‘कळत’ नकळत उजवी उजवीकडंच चालताय, रेव्हरंड कसबे सर. आपण अल्फ्रेरड अॅडलरबद्दल (पृ. ४१०-४१२) लिहिलंय. त्या अॅडलर यांनी सांगितलेल्या ‘नेपोलियन गंडा’ची आणि दोषैकदृष्टीची सर्व लक्षणे आता आम्हाला आपल्यातच स्पष्ट दिसत आहेत.
गवस यांजबद्दल आपण ‘...गवस यांच्यासारखा समर्थ सर्जनशील लेखक मात्र देशीवादाच्या भोवऱ्यात इतका अडकला की जो जीवनसंघर्षातील प्रत्यक्ष विषयाऐवजी गावरान मराठी भाषेतील आणि कृषिसंस्कृतीतील शब्द, म्हणी यातच पुरता अडकला.’ हे जे विधान केलं आहे यातून आपल्या मनातली कृषिसंस्कृती, इथल्या भाषा, इथलं लोकजीवन, परंपरा आदींविषयीची तिरस्करणीय दृष्टी स्पष्टच दिसते. असं असेल तर आपल्यासारख्यांचा ‘आंग्लविचार’ इथं का नीट रुजू शकला नाही, हे कळतं. शिवाय आपण गवस यांचं समग्रलेखनही नीट वाचलेलं नाही हेही स्पष्ट होतं. ते वाचलेलं असतं तर ‘जीवनसंघर्षातील विषयांबद्दल’चं आपलं अज्ञानही दूर झालं असतं. लेखक जे जगतो-पाहतो-ऐकतो-अनुभवतो त्याचं प्रतिबिंब त्याच्या लेखनात उमटणं स्वाभाविक असतं. गवस यांचं लेखकीय पर्यावरण आपण पाहिलं तर ते खेडं, ग्रामीण भाग असं आहे. मग त्यांनी जे पाहिलंच नाही, अनुभवलंच नाही असं काही तरी रोम्यांटिक शहरी लिहिणं कितपत योग्य?
कसबे सर, आपण शहरात येऊन स्थिरस्थावर झाल्यानं आणि ब्रिटिश-वासाहती विचारानं पुनीत झाल्यानं आपल्याकडे लिहिण्यासारखं काही शिल्लक उरलं नसेल म्हणून स्वत:ला आवडेल असं दुसऱ्यांनी लिहावं, असे फुकटचे सल्ले देऊ नयेत. म्हणिजे आता गवस यांच्यासारख्या स्वकष्टाने महाराष्ट्रभर स्वत:चा वाचकवर्ग घडवणाऱ्या दमदार लेखकानं कसबे यांनाच विचारून लेखन करावं की काय? आपण राज्यशास्त्राचे प्राध्यापक असल्यानं वाङ्मयातलंही आपणांस जादा कळतं, हा आपला भ्रम प्रथम दूर करावा, हेच ठीक.
आपल्या मते नेमाडे यांना काहीच कळत नाही, तर मग आपल्यासारख्या विचक्षण ‘विचारवंतानं’ अशा काहीच न कळणाऱ्या माणसासाठी इतकी पानं आणि इतका वेळ खर्ची घालोण ग्रंथ का ल्याहावा? आपली एक तक्रार अशी, की नेमाडे कुठल्याच टीकेला किंवा समकालीन समीक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत ही. जिथं स्वत: नेमाडे म्हणतात की ‘मी शंभर पट वाचून एक पट लिहितो’, तिथं नेमाडे यांनी ‘एक पट वाचून शंभर पट भरताड लिहिणाऱ्यांना आणि वाट्टेल तसं बडबडणाऱ्यांना’ का उत्तरं द्यावीत? स्वत:चा मूल्यवान वेळ त्यांनी अशा रोज उठून बोंबलणाऱ्यांच्या नादी लागून का वाया घालवावा? ‘कोसला’पासून नेमाडे येणाऱ्या प्रत्येक पिढीकडून वाचले जातात. आता समकालीनांचा मुद्दा उपस्थित केला तर काल जे साहित्यातले ‘हिरो’ म्हणून डोक्यावर घेतले जात, ते लेखक आता कुठे आहेत? नेमाडे कालही वाचले गेले, आजही वाचले जातायत आणि उद्याही वाचले जातील.
आपल्या कुठल्या पुस्तकावर वाचकांच्या इतक्या उड्या पडतात, कसबे सर?
वाचक मूर्ख नसतात आणि हेही तेच ठरवतात की कुठला लेखक येणाऱ्या काळात जिवंत ठेवायचा ते. महावीर - बुद्ध- चक्रधर- ज्ञानेश्वर- नामदेव- कबीर - तुकाराम - फुले- साने गुरुजी - आंबेडकर आदी इथल्या मातीतल्रा मानवतेचा समग्र आविष्कार मांडणाऱ्या पूर्वजांना या देशातल्या खेडोपाडीच्या सच्च्या वाचकांनी आणि सर्वसामान्य लोकांनीच जिवंत ठेवले ना! आपल्यासारख्या ब्रिटिशइंग्रजी धार्जिण्या लोकांनी तर मुळीच नव्हे. आपल्याकडून ती अपेक्षाही नाही.
नेमाडे यांच्याबद्दलच्या अनेकांच्या पोटदुखीचं एक ज्वलंत कारण म्हणजे नेमाडे यांचं स्वकर्तृत्व आणि स्वकष्ट यामुळे साहित्य अकादमीत असलेलं स्थान. ‘आपल्याला साहित्य अकादमी नेमाडे यांच्यामुळंच मिळाला नाही किंवा साहित्य अकादमीत नेमाडे आपलं काहीच चालू देत नाहीत’ अशी चर्चा दबल्या आवाजांनी कोंडाळ्या कोंडाळ्यांनी होत असते. जणू कुणाला पुरस्कार द्यायचा, हे नेमाडेच एकमेव ठरवतात काय? पुरस्कार वाटपाशिवाय दुसरी कामं त्यांना नाहीत का? की आपल्याला मिळाला नाही म्हणून ही व्यक्तिगत बोच आहे? नेमाडे यांना विरोध असण्यामागे बहुतेकांच्या मनात हीच बाब सलत असते.
स्वत: नेमाडे यांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की, ‘मी कुठल्याही गटतटाच्या-कंपुशाहीच्या विरोधात आहे. मी स्वत: तरी या गोष्टीचा नेहमीच विरोध करत आलोय.’ कसबे सर, आपण नेमाडे यांच्यावर गटबाजीचा- नेमाडपंथ तयार केल्याचा आरोप केला. पण हे विसरता की नेमाडे यांच्यावर कंपुशाहीचा आरोप करता करता आपण स्वत: नेमाडेविरोधी टोळीचे प्रमुख झालात. नेमाडे यांचा विचार बहुतेकांना पटतो- विशेषत: तरुणलोकांना तो अपिल होतो. कारण कालपर्यंत ज्या गोष्टी कधी मांडल्या जात नव्हत्या वा ज्या गोष्टी मांडताना आमचे तथाकथित लेखक-विचारवंत आपल्या स्वार्थी हितसंबंधामुळे खरे मुद्दे मांडायला भीत होते, ते मुद्दे नेमाडे यांनी निर्भिडपणे मांडले. ग्रामीण भागातील तरुणांना नेमाडे यांनी उच्चवर्णिय सांस्कृतिक दहशतवादाच्या, सोवळ्या भाषेच्या, पाश्चात्य वाङ्मयीन संकल्पनांच्या, शहरी संस्कृतीच्या संकुचित न्यूनगंडातून बाहेर आणले. सातत्याने नवीन विचार दिला. आपल्या संस्कृतीकडे, लोकभाषांकडे, समृद्ध परंपरांकडे, संतवाङ्मयाकडे, देशीयतेकडे पाहण्याची एक नवी मूल्यवान दृष्टी दिली, जाण आणि भान दलं. हे पाहता अनेक तरुण त्यांच्या विचारांकडे आकृष्ट न झाले तर नवलच!
गंमत म्हणजे ज्या पुणे विद्यापीठात आम्ही शिकलो. आज दहाबारा वर्षे आम्ही विद्यापीठ नि तिथली व्यवस्था जवळून पाहत आहोत. ते पाहता सुरुवातीच्या काळात ज्यांच्या प्रेमात आम्ही तरुण होतो, ते स्वत:ला फुशाआंवादी म्हणवणारे जानेमाने लोक आपण काल काय बोललो-काल काय केलं-काय काय लिहिलं हे लवकरच विसरले आणि काळाचा बदलता ट्रेंड पाहून पटापट मोक्याच्या जागा बळकावून बसले. झालं, यांजसाठी का अट्टहास होता? ही नवी बहुजन परिवर्तनवादी आधुनिक प्रक्रिया आम्ही तरुणांनी याची देही याची डोळा आणि फार कमी वयात अनुभवली. कसबे सर, आपल्यासकट अनेकांचं सोवळं पुरोगामित्व तरुणांना खूप चांगलं कळलं आहे. ढोंग, स्वार्थ, मतलब यांचं आयुष्य नेहमीच तात्कालिक आणि अंशकालीनच असतं. दीर्घकाळ नोहें!
याच वेळी दुसरीकडे नेमाडे, शरद् पाटील, विलास सोनवणे ही माणसं मुजोर व्यवस्थेला भीक न घालता आपल्या परीनं रोकठोक एकटाकी खिंड लढवत आहेत, हेही आम्ही तरुण पाहत होतोच. अनुभवांती आणि समग्र नेमाडे-समग्र शरद् पाटील-सोनवणे पंचवीस वेळा वाचून पारखल्यानंतर डोळसपणे नेमाडे-पाटील-सोनवणे स्कूल जॉईन केली. इथं दस्तुरखुद्द नेमाडे वा पाटील वा सोनवणे किंवा त्यांच्या आपण म्हणता त्या तथाकथित नेमाडपंथातला वा शपांच्या पंथातला वा सोनवणे पंथातला कोणी प्रतिनिधी आमचेकडे त्यांच्या पंथाच्या रिक्रूटमेंटसाठी आला नव्हता काही. तोपर्यंत नेमाडे-पाटील यांना मी जवळून पाहिलंही नव्हतं. न पाहता न भेटता केवळ विचारांद्वारे एखाद्या माणसाशी अनुबंध जुळू शकतो ना, कसबे सर!
नाही तर बुद्धाला-शिवरायांना-फुल्यांना-शाहूंना तरी तुम्ही आम्ही कुठं प्रत्यक्ष पाहिलं होतं? पण या महापुरुषांच्या विचारांकडे आकृष्ट झालोच ना आपण सर्व! खेड्यापाड्यांतले असंख्य तरुण नेमाडे यांच्या सोबत आहेत आणि पुढेही राहतील, ते यामुळेच, की अजून तरी कुठल्याही किरकोळ व्यक्तिगत लाभासाठी, सदाशिव पेठी मान्यतेसाठी नेमाडे यांनी आपली नैतिकता गहाण टाकून स्वत:चा स्वार्थ साधला नाही. तसंच हे. अशा पूर्ण विचारांती स्वीकारलेल्या गोष्टीला गटतट-कंपुशाही कसं म्हणता येईल? उद्या आपणही मला नेमाडपंथी म्हणाल, तर मग म्हणाच खुश्शाल! ही तर केवढी अभिमानाची गोष्ट जाहली!!
कसबे सर आपण तीन वर्षे शेती करून तीत तोटा झाल्याचं आणि नंतर ती सोडून दिल्याचं लिहिलं आहे. शिवाय पेरणी सोडून बाकीची सर्व शेतीकामे तुम्ही करू शकता असंही लिहिलं आहे. वास्तविक पेरणी ही कृषिसंस्कृतीतील अतिशय महत्त्वाची सर्जनशील-पुनर्निर्माण करणारी गोष्ट आहे आणि तिच आपणांस येत नाही, हे वाचोन आपणांस शेतीतलं ज्ञान किती घनघोर आहे हे कळतं. १९९० नंतर नव्या मुक्त आर्थिक धोरणामुळे, जागतिकीकरणामुळे नोकरदार- व्यावसायिकांच्या खिशात अतिरिक्त पैसा खेळू लागला. या अतिरिक्त पैशांतूनच गुंतवणुकीचे वेगवेगळे म्हणजे - जमिनी, फ्लॅट घेणं, फार्महाऊस करणं, चारचाक्या घेणं वगैरे वगैरे चंगळवादी मार्ग पुढे आले. आता हे फॅड शिक्षक-प्राध्यापकांतही चांगलेच भिनले आहे. म्हणजे ‘आपणही जरा गंमत म्हणून शेती करून बघू या, तेवढंच विकेंडला सहकुटुंब निसर्गभोजन करता येईल’, या रोम्यांटिक विचाराने अनेक जणांनी जमिनी घेऊन फार्महाऊस केले. अशी मजा म्हणून शेती करणं आणि गरज-उदरनिर्वाहासाठी म्हणून शेती करणं यात खूप फरक असतो ना कसबे सर. तीनच वर्षे शेती करून आपल्याला शेतीचं अर्थशास्त्रही कळलं. उद्या आपल्यासारख्या ‘हाडाच्या शेतकऱ्याची’ निवड शासनाच्या शेतीविकास धोरणाच्या संदर्भातल्या समितीवर निश्चित होईल, असा विश्वास वाटल्यावाचून राहत नाही. पण शेती म्हणजे काही रिअल इस्टेटचा धंदा नाही, की शेअर मार्केट नाही, की दहा रुपये गुंतवल्यास पन्नास मिळतील. शिवाय टुरूक टुरूक तीन वर्षे शेती करून परवडत नाही म्हणून ती सोडून देणं, ही चंगळ आपल्यासारख्या पगारदार-पीएफ-मेडिकल इन्शुरन्स वगैरे फायदे उपटणाऱ्या नोकरदारांनाच परवडू शकते. रोजमर्रा उन्हातान्हात-चिखलात पाय रुतवणाऱ्या पोटार्थी शेतकऱ्यांना नाही.
फुशाआंचा विचार सांगणाऱ्यांतले काही लोक छुप्या पद्धतीनं शेतकरी जातींविषयीचा द्वेषमूलक विचार पेरताना दिसतात. अॅकॅडेमिक पातळीवरून तर ही मोहीम जोरात चालू आहे. कालपर्यंत हेच फुशाआं विचारांचे भोई ब्राह्मणांचा द्वेष करत, आता ते ब्राह्मणांचा द्वेष करू नका - मराठ्यांचा करा, असंच जणू सांगताहेत. अशा घृणास्पद पातळीवर फुशाआंचा विचार नेऊन ठेवला. याची काही तरी खंत होआवी की! मराठ्यांचा द्वेष करा म्हणजे कुणाचा? कारण महाराष्ट्रात राहणारे (आपल्यासकट) ते सर्व मराठेच होत, शिवाय डॉ. आंबेडकर म्हणतात तसे मराठे-महार भाऊ भाऊ, असं थोडंफार वगैरे वाचून आम्हांस कळले. कुठल्याही जातीचा द्वेष-मत्सर करणं हा फुले-आंबेडकरी सम्यक् विचार असू शकत नाही. हा तर विचारांचा गैरवापर झाला. दऱ्या सांधण्याऐवजी त्या वाढतील कशा, हेच आता केलं जात आहे. महात्मा चक्रधर, न्या. रानडे, चिं.वि. जोशी, साने गुरुजी आणि महात्मा बुद्ध, चोखामेळा, फुले, आंबेडकर वगैरेंबद्दल वेळोवेळी नितांत आदरभाव जपणारा नेमाड्यांसारखा माणूस ब्राह्मण वा दलितविरोधी कसा काय असू शकतो?
एकीकडे दलित चळवळीतील काही मंडळींनी कालपर्यंत टोकाचा ब्राह्मणद्वेष केला. आता त्यातलेच काही लोक बघता बघता ‘प्रस्थापित’ जाहले; त्यात आणि नेमाडे ज्या संयत विचारीपद्धतीनं अभ्यासाधारे इथल्या शोषणव्यवस्थेचं क्रिटिक करतात, त्यात आपणाला काहीच फरक वाटत नाही? नेमाडेविरोधी जहरी बोलून आपण तरी वेगळं काय मंथन करताय? दोन्हीतल्या द्वेषाची क्वॉलिटी सारखीच! फुले-शाहू-आंबेडकर या विचारपरंपरेतील शरद पाटील, बाबा आढाव, आ.ह. साळुंखे, भारत पाटणकर आणि अगदी कॉम्रेड गोविंद पानसरे आदी मंडळींचीही आता सोशल मीडियावरून ‘जात काढली’ जात आहे. या मंडळींनी मांडलेल्या काही विचारांशी आपले वैचारिक मतभेद असू शकतील किंवा त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी आपण सहमत असलेच पाहिजे, असंही नाही. मात्र हे मतभेद सभ्य व अभ्यासपूर्ण भाषेत मांडून त्यांचा प्रतिवाद करता येऊ शकतो, हे माहीत नसलेले काही जात्यंध लोक जेव्हा या मंडळींची ‘जात’ काढतात, तेव्हा आपला हा समाज कोणत्या दिशेने वाटचाल करतोय हे लक्षात येते.
एखाद्या लेखक-विचारवंत-अभ्यासकाच्या विचारांचा प्रतिवाद करता येत नसेल, तेव्हा त्याची जात काढण्याचा पडू लागलेला पायंडा घातक आहे. कुणाचा तरी द्वेष करून समता स्थापित करता येत नाही, हे सत्य आपल्याला गेल्या साठ-सत्तर वर्षांतील आपण केलेल्या विविध चळवळींतून, विद्यापीठीय चर्चासत्रांतून, अभ्यासवर्ग आदींमधून अनुभवास आलेलंच आहे. फार टोकाला जाण्यातून साध्य काहीच होत नाही, असं आम्हांस आमची वारकरी परंपरा सांगते. पातळी सोडून, कशाचाही कशाला ओढून ताणून पदर जोडून एखाद्यावर इतकं घसरणं योग्य नाही. आपण जो तथाकथित समतेचा (समरसतेचा?) टेंभा मिरवत आहात त्यात मानवतेची मशाल हाती घेतलेले संत चोखामेळा आणि त्यांचं कुटुंब आजवर कुठं होतं? मार्क्स-आंबेडकरांचं जसं नाव घेता तसं जोतीराव फुले आणि त्यांचे गुरू लहुजी वस्तादांचंही नाव घेत जावं, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचंही नाव घेत जावं अधूनमधून. चोखामेळा, लहुजी वस्ताद, अण्णा भाऊ हे मानवतेचे भोक्ते अजूनही तुमच्या तथाकथित सम्यक् समतेच्या रिंगणाबाहेर का उभे? कसल्या समतेच्या गोष्टी सांगता बुवा तुम्ही मोठे लोक? सगळं गोलमटोळ. कसबे सर, आपला हा सगळा उपद्व्याप म्हणजे हिस्टेरियाचाच एक प्रकार आहे. परपीडन, आत्मपीडन, न्यूनगंड, अहंगंड, इतरांना तुच्छ मानणारी वृत्ती, या सर्व प्रवृत्ती आपल्या या कसबी खर्ड्यात पानोपानी दाबून भरलेल्या दिसतात.
कसबे सर, आपल्या कसबी खर्ड्यामुळे आपल्यासकट नेमाडेविरोधी बोंब ठोकणाऱ्या आणि स्वत:चं डोकं नीट न वापरणाऱ्या पिलावळीलाही सुसाट जोम चढलाय. ढवळणं ही चांगलीच गोष्ट. पण प्रत्यक्ष कुठेच नसून सर्वत्राला व्यापून राहिलेले नेमाडे हेच एकमेव अशी घुसळण लेखकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आणि पुढेही कैक वर्षे करू शकतात, करत राहतील. जळीस्थळीकाष्ठीपाषाणी नेमाडेच, अशी अनेकांची स्थिती झालीय. अशी घुसळण एक रावसाहेब कसबे, एक हरिश्चंद्र थोरात, एक नागनाथ कोत्तापल्ले, एक विनय हर्डीकर वगैरे अन्य कोणीही करू शकत नाही. कारण कसबे सर, आपल्या ‘कुठल्याही दोनच पुस्तकांची नावं सांगा’ असं विचारायला महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळा-कॉलेजात गेलं तर तरुणलोक उलट विचारतील ‘कोण हे रावसाहेब कसबे?’ किंवा केवळ प्रतापराव पवार यांच्या ‘सकाळ’ या वृत्तपत्रामुळे महाराष्ट्रभर प्रसिद्धीस ‘पाववलेले’ वैश्विक संपादक उत्तमराव कांबळे यांच्याही ‘कुठल्याही दोन पुस्तकांची नावं सांगा’ असं विचारलं तर आपल्यापेक्षा परिस्थिती फार निराळी राहणार नाही. थोड्या अधिक फरकानं आपापल्या ‘वैश्विक’ गटात ‘ख्यातकीर्त’ असलेल्या बहुतांश मराठी लेखकांची हीच अवस्था आहे.
उत्तमराव कांबळेंसारख्या शेंडा-बूड नसलेल्या लेखकांची पुस्तकं आम्हाला फुकट दिली तरी आम्ही ती घेत नाही. कारण असली बेचव कन्टेन्टलेस पुस्तकं वाचून ‘वाट’ भरकटण्याचीच जादा शक्यता असते. त्यात वेळ घालवण्यापेक्षा वाचण्यासारखी इतरही खूप चांगली पुस्तकं मराठीत आहेत. म्हणोनच कसबे सर, आपण काय किंवा हरिश्चंद्र थोरात, विनय हर्डीकर, उत्तम कांबळे वगैरे लेखकांपेक्षाही मला बाबा कदम नेहमीच थोर लेखक वाटत आलेले आहेत. बाबांनी स्वत:च्या लेखनाच्या बळावर महाराष्ट्रभर स्वत:चा एक मोठा वाचकवर्ग निर्माण केला. आजही आपण खेडोपाडीच्या ग्रंथालयात गेलो तर बाबा कदम हा सर्वांत जास्त वाचला जाणारा लेखक आहे, हे कळते. भलेही बाबांनी रंजनपर लिहिलेलं असेल. आपल्यासारख्यांपेक्षा बाबा थोर वाटतात, कारण एकेकाळी मला लेखक काय असतो हे कळण्याआधीच मी आधी बाबा कदम वाचला. नंतर साने गुरुजी भेटले. त्यामुळे वाचनाची गोडी निर्माण झाली. म्हणून इथपर्यंत येऊ शकलो. बाबा कदम आणि साने गुरुजी यांचे हे ऋण मान्य करावेच लागेल. जर त्या वरात आपल्यासारख्यांचं लेखन वाचण्यात आलं असतं तर कदाचित मी आयुष्यात कधीच पुस्तक हातात धरलं नसतं. लेखन आणि विचारनिष्ठा शुद्ध नसल्याचंच हे द्योतक. हे कटु असलं तरी सत्यवास्तव मात्र शंभरातील नव्व्याण्णव टक्के खरंच खरं! मुळात ‘व्यापक’ व्यापकच असतं, ‘संकुचित’ संकुचितच!
अशा अनेक भानगडी. अनेक गोष्टी. पण विस्तारभयास्तव आणि आम्हांस आपल्यासारखी कुणा एकावर पांजरपोळ टीका करून स्वत:ची भाकर भाजावयाची नसल्यानं फुका वेळ घालवून रटाळ ग्रंथ वगैरे खरडायचा नसल्यानं आणि उगाच उकांडा चिवडत बसण्यापेक्षा शंभरपट वाचन जास्त महत्त्वाचं असल्यानं आवरतं घेतो.
कसबे सर आपण आपल्या ग्रंथाच्या मनोगतात “...ती माझी भूमिका आहे. ती चांगली-वाईट, पटणारी-न पटणारी असू शकते. ती कोणी सप्रमाण खोडून काढली आणि तिला पर्याय म्हणून नवी मांडली तर मला खूप आनंद होईल. तरुणाईकडून तीच अपेक्षा आहे.” अशी अपेक्षा व्यक्त केल्यामुळे आम्हास खूप आनंद जाहला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत नेहमीच प्रश्न वगैरे विचारून वैचारिक ‘डिबेट’ केला पाहिजे, असं आपण वर्गात शिकवलं असणारच. एक बहि:शाल विद्यार्थी आणि तरुण म्हणोन आम्हांस आपल्याशी ‘डिबेट’ करावासा वाटला, यात सर्वकाही आलं. नाही तर आजवर नेमाडेंवर इतके लोक घसरले, आम्ही उगाच कोणाही मर्कटाच्या, उपटसुंभाच्या वगैरे नादी लागलो नाही. हेही पुन्हा खरंच. तेव्हा काही कमी-जादा झालं असेल तर आपण ज्येष्ठत्वाच्या नात्यानं आणि उदार मनानं मला माफ कराल, अशी अपेक्षा बाळगतो.
जाता जाता एक गोष्ट निखळ मनाने मान्य करितो, की आपल्या मनोगताच्या शेवटी आपण लिहिलंय की, “नव्या दर्शनाचा पाया बौद्ध दर्शनात सापडू शकतो... कार्ल मार्क्स यांनी निसर्गाला माणसाचे निरीन्द्रिय शरीर मानून त्याच्या सर्व उत्पादक स्रोताचा त्याला कोणतीही इजा न करता माणूस त्याचा आवश्यक तेवढा उपभोग घेऊ शकतो... बुद्धांनी सम्यक् आजीवनाचा मध्यमार्ग प्रतिपादला... आज ना उद्या मानव जातीला तिच्या मुख्य गरजा भागवल्या जातील असेच उत्पादन करावे लागेल. त्यात उत्पादन व्यवस्था आणि उत्पादन संबंध मानवकेंद्री करावे लागतील... हे दर्शनच उद्याच्या प्रबोधनाचा पाया ठरावा...” वास्तविक आपले असे ‘जल-जंगल-जमीन-निसर्ग-मानवकेंद्री’ अस्सल देशी विचार वाचोन तर आमची आपल्यावर प्रीतीच जडली आहे. नेमाडेही हेच सांगतायत, कसबे सर. आमचा देशीवादी कम्युनिस्ट गुरू कॉम्रेड विलास सोनवणेही प्रामाणिकपणे वारंवार हेच सांगत असतो. काही का असेना, पण आपला आणि नेमाडे-सोनवणे यांचा एक तरी विचार जुळला. आपल्या या ग्रंथातूनही काही ठिकाणी मध्ये मध्ये आपले असे अस्सल देशी विचार उसळोन येतात, तेव्हा तेव्हा कसबे सर आपल्याविषयी प्रीती उत्पन्न होते आणि अशा विचारांपासोन आपण दूर गेलात की अप्रीती! ह्या प्रीती-अप्रीतीच्या मुळाशी देशी (प्रीती)-देशीविरोधी (अप्रीती) विचार आहेत.
आज खेडोपाडीची शेतजमीन भांडवलदारांच्या ताब्यात जात आहे, पाण्याचा प्रश्न जटील होत आहे, पर्यावरण-निसर्गाचे प्रश्न धोक्याच्या पातळीवर गेलेत, माणुसकीचे हक्क संपवून माणसाचं वस्तुकरण झालंय, तरुणपोरांचे हाल तर कुत्रंही हुंगत नाहीय, मुळं छाटून आपल्याच देशात आपल्याला उपरं केलं जात आहे, भांडवली गोष्टींच्या नादाला लावून आणि धार्मिक गुंगीचं सरबत देऊन गांडीबुडाखालचं सगळं काढून घेतलं जातंय, ज्या देशात शिवाजीमहाराजांनी आम लोकांना सोबत घेऊन जुलूमशाहीविरुद्ध लढारा केल्या; ज्या देशात महावीर-बसवेश्वर-फुले-आंबेडकरांनी मानवीहक्क आणि समतेसाठी लढे उभारले; जो देश गांधी नावाच्या फकिरानं सत्याग्रह करून हलवून सोडला, त्याच देशात आभासी जग निर्मून आमच्या हातात ‘कँडल्स’ देऊन सोशल मीडियावर निषेध करण्यापलीकडं काही उरत नाही. कायद्याचे रक्षणकर्ते हिटलरच्या भूमिकेत आहेत. कोणाचीच खात्री देता येत नाहीय, सगळं अस्थिर झालंय. प्रत्येक माणूस विचित्र भर आणि अशांती मनात घेऊन वावरतोय- ज्याचा स्फोट कधीही घडू शकतो आदी, असे आजचे वास्तव प्रश्न आमच्या पिढीपुढे उभे आहेत. यातून कोणत्याही जातीची सुटका नाही.
क्षणभर नेमाडे यांना बाजूला ठेवलं, तरी या अंगावर येणाऱ्या भयंकर प्रश्नांचं काय करायचं सर? म्हणोनच कसबे सर, या देशातल्या आम्हाला देशीवादी झाल्याशिवाय पर्याय नाही. कारण प्रश्न आपले आणि आपल्याच देशातले आहेत. त्यामुळे आमचा आपलेवर कसलाही रागलोभ वा व्यक्तिगत दावा वगैरे अजिबात नाही. विरोधासाठी विरोध तर मुळीच नाही. कारण ही विचारांची लढाई आहे, व्यक्तिगत नव्हे, याची आम्हास जाण आहे. इथूनपुढे आपण देशीविचार केंद्रस्थानी ठेवोन व सवतीमत्सर न धरिता अशीच देशी मांडणी करावी, आम्ही आपले सोबत आनंदानं येतो. नेमाडे, कसबे, सोनवणे यांजसारिखी देशीविचारांची खंदे ज्येष्ठ मंडळी जर आमच्यासारिख्या तरुणांच्या पाठीशी असतील तर आम्ही इथल्या मनुवादी-भांडवलदारी-मिरासदारी व्यवस्थेच्या पाठीत भीमगदा घालोन आमचे पूर्वज बुद्ध यांचे सम्यक् मार्गानं नेटानं वाटचाल करू, इतक्या दुर्दम्य आशावादाची उमेद एक कुळवाड्याचे पोर म्हणोन आमचेत चेतवू शकते, हे बाकी आम्ही दिलातलं लिहितो.
कसबे सर, जाता जाता एक तरुण म्हणून आम्ही आपणांस मुफ्त का सल्ला वगैरे देऊ इच्छितो, तो असा :
सर, काळ हाच सर्व गोष्टींवरील जालीम इलाज असतो. त्यामुळं काळच ठरवेल की नेमाडे भंपक आहेत, की विचारसमृद्ध आहेत, की फॅसिस्ट आहेत, की विचारवंतीष्ट आहेत, की खरे फुलेवादीष्ट आहेत, की कोण सच्चा कोण झुठा? तोवर कसबे सर, आपण शंभर पट वाचून समाजमनाचा ठाव घेईल असं आणि महत्त्वाचं म्हणजे द्वेषबुद्धी न धरिता आणि बहुजन सवतीमत्सर न करिता सर्वसमावेशक असं एक पट वगैरे लिहिण्याचा यत्न करावा, बाकी हेच आपल्या तब्बेतीसाठी आणि समाजासाठी आणि तरुणांसाठीही उत्तम गुणकारी देशी दवा!
पुनश्च त्रिवार जोहार!
(समाप्त)
............................................................................................................................................
‘देशीवादाचे दुश्मन’ या रा. रा. अशोक बाबर यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4443
............................................................................................................................................
लेखक सुशील धसकटे तरुण कादंबरीकार आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.
hermesprakashan@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment