प्रसिद्ध कादंबरीकार, ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा ‘देशीवाद’ हा सिद्धान्त सुरुवातीपासूनच मराठी साहित्यात वादाचा विषय झालेला आहे. आजवर त्याच्या बाजूनं आणि विरोधात बरंच काही लिहिलं-बोललं गेलं आहे. प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘देशीवाद : समाज आणि साहित्य’ हे पुस्तक लिहून नेमाड्यांवर आणि त्यांच्या देशीवादावर टीका-टिपणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देणारं ‘देशीवादाचे दुश्मन’ हे अशोक बाबर यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतंच हर्मिस प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला प्रकाशकानं ‘नाळ’ या नावानं लिहिलेल्या प्रकाशकीयाचा हा दुसरा भाग. उद्या तिसरा व शेवटचा भाग प्रकाशित होईल.
.............................................................................................................................................
स्वातंत्र्यानंतर बहुजनांतून शिकलेल्यांच्या ज्या पिढ्या बाहेर पडल्या त्यांनी नोकऱ्या मिळवता मिळवता हळूहळू स्वत:ला इथल्या प्रस्थापित व्यवस्थेत नीटपद्धतीनं सामावून घेतलं. त्यातून वर्गबदल साधला. कधी नाही बघण्यात, ते आलं खाण्यात. मग नव्या वर्गाच्या चवीनं तथाकथित शहरी आधुनिक जीवनशैली स्वीकारणं आलंच. या जीवनशैलीत आपल्याच जातीतील मुलगी गावंढळ, माठ, अनसुटेबल वाटू लागली. ह्या बहुजन न्यूनगंडात कालपर्यंत ज्यांना आम्ही तरुण ‘मोठं’ समजत होतो, ते थोर्थोर लोक अडकलेले आहेत, हे कळायला लागलं. फुशाआंचा विचार कुठपर्यंत गेला तर फक्त ब्राह्मणांच्या आणि फार्फातर मराठ्यांच्या मुलींशी लग्न करण्यापर्यंत गेला. ब्राह्मणांच्या मुलींशी लग्न करणं म्हणजे जातिअंत, असाच जणू एक रोम्यांटिक संदेश मागच्या काही वर्षांत समाजात गेला. काही डाव्या-समाजवादी चळवळींमध्ये आणि संघटनांमध्ये तर तरुण लोक आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठीच जात असत. या सगळ्या लग्न-प्रकरणात स्वत:ही काही बहुजन कायावाचामने ‘ब्राह्मणी’ जाहले. म्हणिजे परिवर्तन कुणाचं नि कसं झालं हे यावरून कळतं. लग्न ब्राह्मण-मराठा मुलीशी केलं तरी होणाऱ्या मुलांची जात पुन्हा वडलांचीच राहते ना कसबे सर. म्हणिजे आईची जात लागते किंवा कुणाचीच जात लागत नाही, असं तर होत नाही ना. जात जातच नाही कसबे सर! मात्र या सगळ्या भानगडीत ब्राह्मणांच्या आणि मराठ्यांच्या मुलींनीच खऱ्या अर्थानं जात्यंत केला आणि फुशाआंचा विचार खऱ्या अर्थानं याच मुली जगल्या, असं कोणास वाटलं तर नवल नको.
केशवराव जेध्यांनी ‘देशाचे दुश्मन’मध्ये म्हटलंय की, “महाराष्ट्रात भाराभर पुस्तके आणि खंडोगणती लेखक नागवे सत्य लपवून जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो करण्यास तयार होतात.” दुर्दैवानं इतक्या वर्षांत ही स्थिती बदलायचं तर राहू द्या, पण आज अधिकच गंभीर जाहली आहे. दोनचार अपवाद वगळता हल्लीचे काही कथाकार, कादंबरीकार, कवी, समीक्षक हे स्वार्थासाठी जिकडे घुगऱ्या तिकडे जर हो हणत असतात. काही जण लपोनछपोन करतात. काही जण ठाम अशी कुठलीच नैतिक भूमिका न घेता सगळ्यांनाच चांगलं चांगलं म्हणून विदर्भ-मराठवाडा-खानदेश-कोकण-पश्चिम महाराष्ट्र अशा प्रदेशवार तिथल्या माणसांशी नीट संधान साधून मी कसा सर्वसमावेशी नि अजातशस्त्रू आहे, हे दाखवत सगळ्या डगरींवर हात ठेवून असतात. उगाच कोणाचा रोष ओढवून घ्यायला नको म्हणून काही जण स्पष्ट भूमिका घेणं टाळतात, आम्ही समोर आलं की देशीवादाबद्दल-नेमाडेंबद्दल गोड गोड बोलतात, पण पाठ वळली की देशीवादाच्या दुश्मनांशी हातमिळवणी करितात. शेंडा-बूड नसलेल्या अशा करिअरिस्ट घुगऱ्या लेखकांचा येड्या बाभळी-चिल्लारीगत सगळीकडेच आतोनात संचार वाढलेला आहे. किरकोळ लाभाकरता आपला लेखकीबाणा गहाण ठेवोन लेखक म्हणून जशी आपण आपल्या स्वत:चीच फसवणूक करीतो, तशीच ती वाचकांचीही करीतो, हे यांच्या लक्षात येत नाही. ‘भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ किंवा ‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता’ असा दुर्दम्य आत्मविश्वास तुकोबांनी देऊन इतकी वर्षे उलटली तरी, सन्मानं-पुरस्कारं-सांस्कृतिक हुजरेगिरी-छटोर पदं आदी फालतू गोष्टींपुढं अनेक लेखक-विचारवंतांनी नांगी टाकिल्याचे दिसते. इथे एक महत्त्वाची गोष्ट नमूद करू इच्छितो, की महाराष्ट्रातील एका मोठ्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची चालून आलेली ऑफर रा. नेमाडे यांनी नाकारिली होती. शिवाय ज्या फुले यांनी ‘संमेलनाला मी येऊ शकत नाही. तुमचा आमचा मेळ जुळत नाही,’ असं न्या. रानडे यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं, त्या फुले यांच्या भूमिकेशी जागत नेमाडे अजूनपर्यंत तरी अभामसा संमेलनाच्या व्यासपीठाची साधी पायरीही चढलेले नाहीत, तर अध्यक्षपद दूरच! फुल्यांच्या विचारांशी नेमाडे यांचं असलेलं नैतिकतेचं घट्ट नातं अबाधित राहणारच. कारण तटस्थपणे विचार पुढं घेऊन जाणं, हीच भूमिका त्यांची राहिलेली आहे. करिअरिस्ट ढोंगी लेखक-विचारवंत अशी नाही
कसबे सर, आपण ‘टीकास्वयंवर’मधील नेमाडे यांच्या विचारांवर बरीच झोड उठविली. खरं तर ‘टीकास्वयंवर’ १९९० साली प्रकाशित झालं. म्हणिजे आजरोजी त्याला पंचवीस वगैरे वर्षे उलटली. मग इतकी वर्षे आपण शांत का राहिलात? की तुम्ही ‘टीकास्वयंवर’ वाचलेच नव्हते? ‘टीकास्वयंवर’मधील लेखन आपणाला आज जर इतकं विवादास्पद वाटत असेल तर मग आपण त्या ग्रंथाची आणि त्यातील विचारांची ‘समीक्षा’ करायला पंचवीस वर्षे का घेतली? त्याच वेळी का त्याचे ‘कठोर परीक्षण’ केले नाही? की पुढे चालोण नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळणारच नाही असं आपल्याला खात्रीनं वाटलं असणार म्हणूनच आपण जाणीवपूर्वक त्याकडे डोळझाक केली काय? असे त्रासदायक प्रश्न उरतातच. ज्ञानपीठामुळे हरवलेलं मानसिक स्वास्थ्य इतकं बिघडत गेलं, की अवध्या तीन महिन्यांत घाईघाईनं नेमाडेंविषयीचे ग्रंथ वा पुस्तके जमा करोन वाचोन (???) फडशा पाडत आपण हा रटाळ नि:सत्त्व ग्रंथ खरडून निसर्गाचंही आतोनात नुकसान केलं. एक रिम कागद बनवायला किती झाडं तोडली जातात, याचा आपण जरा अभ्यास करावा. म्हणिजे लिहिणाऱ्यांवर किती जबाबदारी पडते हे कळते. वैचारिक-संशोधनपर ग्रंथलेखनाची अशी अचाट कामगिरी तीन महिन्यात कोणी केल्याचं अजून तरी आमच्या ऐकिवात नाही. फास्टट्रॅक कोर्टातही खटल्याचा निकाल इतक्या जल्दी लागत नाही!
आणखी एक मुद्दा जो आपण अधोरेखित केला, तो म्हणिजे नेमाडे गेली कैक वर्षे ज्या हिंदू या संकल्पनेचा अभ्यास करतायत, ती त्यांची हिंदू ही संकल्पना रास्वसंघाच्या जवळ जाणारी आहे हा. खरंतर वाचून खो खो हसू आलं. कारण आपण नेमाडे यांच्या हिंदू या संकल्पनेबाबतच्या मतांचा, त्यांच्या भूमिकेचा नीट अभ्यास केलेला नाही. किंबहुना ज्ञानपीठ मिळेपर्यंत आपण नेमाडे यांचं लेखन (तसेच राजन गवस, श्याम मनोहर वगैरे अशा अनेक लेखकांचं लेखन आपण वाचलंच नसावं, हे आपल्या लेखनावरून स्पष्टपणे दिसतं.) गांभीर्यानं वाचलंच नव्हतं, असा दाट संशय आम्हांस येत आहे. हिंदूच्या शोधात हे त्यांचं एक भाषण झालं. बाकी इतरही गोष्टी जरा नीट काळजीपूर्वक वाचावयास हव्या होत्या. किंवा प.वा.मध्ये गतवर्षी छापून आलेली आणि सुधाकर यादव यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतही नीट काळजीपूर्वक वाचली असती तर बरं झालं असतं. एवढंच नव्हे तर केवळ नेमाडे यांनी ३५०-४० वर्षे खपून मोठ्या कष्टानं ‘हिंदू’साठी केलेला आराखडा जरी आपण डोळ्यांखालून घातिला असता तरी आपला बराच अभ्यास झाला असता. पण समजूनच घ्यायचं नसल्यास आणि नेमाडे यांना जाणूनबुजून धोपटावयाचें असल्यास त्यांस कोण काय करणार?
दुसरी हास्यास्पद गोष्ट म्हणिजे आपल्या मते ‘नेमाडे मुलाखती द्यायला माहीर आहेत.’ यावरून आम्ही ताडिले की आपणाकडे मुलाखती घ्यावयांस कोणी म्हणोण कोणी फिरकत नाही. कसें फिरकणार? सांगावया जोगे काही होआवे की! ते नसेल तर कोण म्हणोण स्वत:च्या डोक्याची मंडई करोन घेणार? आणि घेतलीच कोणी मुलाखत तर आपण काय बोलतो हेही कधी कधी बोलण्याच्या ओघात आपण विसरोन जाता. मध्यंतरी आपण साम टीव्हीला (१४ एप्रिल २०१६) दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं होतं की, “हा देश ब्राह्मण आणि क्षत्रियांनी बूडवून टाकला...विकून टाकला...” यावरून आम्ही ताडीले की, आपले ‘अनेक विषयांचे ज्ञान फारच उथळ आणि सदोष आहे’ (हे वाक्य आपलंच आहे, पृ. ९४, यात आमची भर केवळ च इतकीच). खरंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध हाच मुळात क्षत्रिय होता, याचा विसर आपल्याला पडावा म्हणिजे हा आपल्या बुद्धीचा ऱ्हास (बुद्धाचा ऱ्हाट नव्हे!)च आहे. शिवार चक्रधर-ज्ञानेश्वर-एकनाथ-बहिणाबाई सिऊरकर-फुले दाम्पत्याला शाळेला आपला वाडा देणारे भिडे-(आजही हा भिडेवाडा उभा आहे. आम्ही आपल्यासारिखे थापेबाज (हा आपलाच शब्द) नसल्यानं आपण हा भिडेवाडा पुण्यात रेवोन प्रत्यक्ष पाहू शकता) न्यायमूर्ती रानडे-राजारामशास्त्री भागवत-गोखले-साने गुरुजी-विनोबा भावे-‘मनुस्मृती’चे दहन करणारे सहस्रबुद्धे (बाबासाहेबांचे अनेक सहकारी ब्राह्मण होते)-कॉ. डांगे मग या सगळ्यांचं काय करायचं? आपल्या या ‘बेताल-बाष्कळ-बेफिकिर-विसंगत’ (ही विशेषणंही आपलीच) वृत्तीचे आपण कठोर आत्मपरीक्षण करावे. सध्या आपण ज्या सदाशिव पेठी मसापचे ‘अध्यक्ष’ आहात, ती काय बहुजनांनी स्थापन केलेली किंवा फुले-मार्क्स-आंबेडकरी विचारांची संस्था नव्हे. ‘दलित-आदिवासी-ग्रामीण’ (दआग्रा) संमेलनाचे आपण त्याच्या जन्मापासोन संबंधित आहात, असे आपण म्हणता. या ‘दआग्रा’च्या उपक्रमात आपल्याबरोबर शरद पाटील, बाबूराव बागूल, दया पवार, आनंद यादव, रंगनाथ पठारे, नागनाथ कोत्तापल्ले या मंडळींच्या नावांचाही उल्लेख आपण केलात. आम्हा तरुणांच्या मनात एक सवाल उभा राहतो, तो हा की, दआग्रा ते सदाशिव पेठेतील मसापचे अध्यक्ष हा आपला प्रवास फुले-मार्क्स-आंबेडकर यांच्या कोणत्या सिद्धान्ताने झाला? हद्द म्हणिजे मूळ मार्क्स-आंबेडकरी विचार सोडून आता मसाप आणि मिलिंद जोशींची तारीफ करण्याची आपल्यावर वेळ यावी, हे म्हणजे आपल्या बुद्धीचं अध:पतनच होय! आपणच आपल्या खर्ड्यात पान १४३ वर ‘विद्वानांचा ऱ्हास होतोय का?’ या विचारलेल्या प्रश्नाचं आपण आपल्याच कृतीतून दिलेलं उत्तर आहे. अभामसा संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी आपणही गुडघ्याला बाशिंग बांधोन आहात. म्हणे ‘मला ह्या निवडणुकी वगैरे आवडत नाहीत, बिनविरोध करणार असाल तर ठीक’ ही आपली मनीची मनीषा काय सांगते? राज्यशास्त्राचा हाडाचा प्राध्यापक-अभ्यासक-विचारवंत खुद्द बाबासाहेबांनीच दिलेल्या घटनेचा आणि लोकशाहीचा विचार न करीता म्हणतो, की मला निवडणुका आवडत नाहीत. ही सगळी सांस्कृतिक हुजरेगिरी कशासाठी, तर फुटकळ प्रस्थापित संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी. आपण इतुके ‘ब्रीदहीन आणि अनैतिक’ (ही विशेषणंही आपलीच.) कसे जाहलात सर?
आपण नावं घेतलेल्यांपैकी ‘दआग्रा’तील नागनाथ कोत्तापल्ले यांनीही चिपळोणच्या परशुरामनगरीत भरलेल्या अभाम साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद फुल्यांच्या कोणत्या विचाराधारे स्वीकारीले? डॉ. कोत्तापल्ले सर हे आमचे आवडते शिक्षक आहेत. ‘जातपात’ न बघणारे कोत्तापल्ले सर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत. लागेल ती मदत विद्यार्थ्यांना करत. अगदी विद्यापीठाच्या विरोधात जावोन सरांनी विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टी केल्याचे आम्हास ठाऊक आहे. खेड्यापाड्यांतून आलेल्या पोरांच्या समस्या सहृदयतेनं समजून घेत. याचा प्रत्यय आम्ही स्वत: कैकवेळा घेतलेला आहे. शिवाय आम्हा पोरांना जोतीराव फुले यांच्या विचारांचा परिचय करून देण्याचं कामही कोत्तापल्ले सरांनीच केलेलं आहे. कोणताही अडचणीचा प्रश्न विचारा, सरांनी कधी राग धर्ला नाही. उलट शांतपणे समजोन घेणार. असं सगळं असता, त्यांनी फुलेविचारांना बाजूला सारोन प्रस्थापित संमेलनाचं अध्यक्ष होणं आणि नेमाडेंवर सतत टीका करणं हे आम्हास मुळीच पटलेलं नाही. यामुळे आम्हासारिख्या अनेक तरुणांची वैचारिक दिशाभूल जाहली, हे नुकसान एका तीन दिवसांच्या अध्यक्षपदाने भरोन निघणारे नाही. “तुम्ही विद्यार्थ्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारिले पाह्यजेत, ज्येष्ठांची न पटणारी मतं खोडून काढिली पाह्यजेत” असं कोत्तापल्ले सरांनी वर्गात शिकवताना म्हटलेलं आजही आमच्या डोक्यात जशास तसं आहे. त्यांनी दिलेल्या या शिकवणीला अनुसरूनच आम्ही सरांना वर सवाल टाकिला आहे. जोतीरावांनी दिलेलं प्रस्थापित व्यवस्थाबदलाचं ध्येय उराशी असताना बहुजनांतले जानेमाने मान्य‘वर’ प्रस्थापित व्यवस्थेनेच तयार केलेल्या व्यासपीठावर (सांस्कृतिक सापळ्यात) करिअरिस्ट मुंडावळ्या बांधोन ‘तिच्या’च (व्यवस्थेच्या) गळ्यात हार घालत प्रस्थापती होत असतील, तर कसला व्यवस्था बदल अन् कसली विचारधारा. शिवाय अशाप्रकारे प्रस्थापित व्यासपीठावर बसून मानपान-प्रसिद्धी मिळवून पुन्हा वरतून जातिअंताची भाषा करायची. हे म्हणजे बोकड जाते जिवानिशी अन् खाणारा म्हणतो वातड, असं झालं. यातून खरे फुलेवादी कोण, हे आता स्पष्ट झालं आहे. बहुजनांतील अशा मंडळींना आणि त्यांच्या खल्लड उद्योगांना आम्ही तरुणांनी लिंबूटिंबू समजोन जमेस धरणे केव्हाच बंद केले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणिजे, अशा लिंबूटिंबू प्रस्थापती लेखक लोकांची दिवसागणिक भर पडोन ही यादी फुगतच आहे.
याच दआग्रातील आणि तुकोबांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या आनंद यादवांनाही संमेलनाच्या अध्यक्षपदाचे डोहाळे लागोन हातातोंडाशी आलेला घास हिरावून झोंबीच वाट्याला आली. आज यादव सर हयात नाहीत त्यामुळे त्यांजविषयी आम्ही फार बोलणार नाही. पण ‘मुळात यादव सुमार दर्जाचे लेखक आहेत’ असं आपण म्हणालात (१५२) खरं; पण ज्या वयात आनंद यादव काळे की गोरे हेही आम्हा पोरांना माहीत नव्हतं, त्या दहावी-बारावीच्या वयात आम्ही ‘झोंबी’ झपाटून वाचलेली होती. आनंदा जकातेच्या जागी त्यावेळी स्वत:ला ठेवून पाहिलेलं होतं. पुढे बीएला ‘गोतावळा’नंही असंच अस्वस्थ करून सोडलं. समरसता आणि कलावाद्यांच्या कायावाचामने जवळ जाण्यानं आम्ही एमेला आल्यावर यादवांचं बोट सोडून दिलं. असं असलं तरी शालेय-महाविद्यालयीन वयात आम्हाला साने गुर्जींची पुस्तकं, कोसला, झोंबी, अंगारमाती, बनगरवाडी, माणसं, धग अशा अनेक पुस्तकांनी झपाटून टाकलेलं होतं. हे तर हे, त्या काळात आम्ही बाबा कदम, सुहास शिरवळकर यांचीही पुस्तकं खूप मनापासून वाचली. किंबहुना वाचनाची गोडी या मंडळींनी लावली. त्या वयात आणि अगदी एमेला येईपर्यंत आम्हाला रावसाहेब कसबे, हरिश्चंद्र थोरात, कोत्तापल्ले ही नावंही साधी माहीत नव्हती. लेखक म्हणून तर दूरच! लेखक म्हणून यादवांची ‘झोंबी’ आणि ‘गोतावळा’ ही दोन पुस्तकं सांगण्यासारखी तरी आहेत; आपलं सांगण्यासारखं काय आहे, कसबे सर? तेव्हा लेखक म्हणून यादवांना सुमार म्हणताना स्वत:कडे आणि स्वत:च्या लेखनाकडे तटस्थपणे पाहावं, परिस्थिती फार वेगळी नाही. देशीवादाच्या दुश्मनांमध्ये असे अनेक लेखक आहेत ज्यांच्या नावावर स्वत:चं असं दमदार एकही पुस्तक वा साहित्यकृती नाही, की जी नावाजलेली-माईलस्टोन आहे, जी प्रत्येक पिढीकडून वाचली जाते, जीनं वाचकांना झपाटून टाकलेलं आहे, जीनं मराठी साहित्यात महत्त्वाची नवी काही भर टाकिली आहे. याउलट आज याच मंडळींना ‘मी त्यावेळी इतकं चांगलं लिहिलं, पण माझ्या अमुकतमुक कादंबरीची, पुस्तकाची दखल कोणी घेतली नाही’ अशी खंत स्वत:च बोलून दाखवावी लागते, यात यांच्या लेखनाचा दर्जा स्पष्ट होतो. अशा सुमार लोकांनी नेमाडे आणि देशीवाद्यांची मापं काढण्याऐवजी एक तरी चांगलं दर्जेदार पुस्तक लिहून दाखवावं. यादवांच्या समरसतेच्या व्यासपीठावर गेल्याच्या गोष्टीचा जितका बाऊ आणि राजकारण केलं गेलं तितकं इतरांच्या जाण्याचं केलं गेलं नाही. समरसता मंच वा अभाविपच्या व्यासपीठावर केवळ यादवच गेले असं नाही, तर बहुजनांतील आणि त्यातही फुशाआंचं उठताबसता पुरोगामी तुणतुणं वाजवणाऱ्यांपैकी अनेक जण गेल्याची यादी आमचेकडे आहे. (पण ही यादी आता न देता आम्ही पुढील सवालांसाठी राखून ठेवितो). म्हणजे या बहुजन सवतीमत्सराच्या हांडग्या राजकारणात यादवांचा बळी मात्र गेला. याचा अर्थ आम्ही यादवांना क्लीनचिट दिली, असा घेवो नये. या खेळातील कोण कोण ‘बहुजनांतील ब्राह्मण’ गुपचुप पद्धतीनं स्वत:ची कातडी वाचवोन अंधारातून मनुवाद्यांशी हातमिळवून आहेत, हेही आम्हाला ठाऊक आहे.
गावाकडं जसं म्हातारपणी लोक म्हणतात की “एक तितकं चारधाम झालं म्हंजी वर जायला बिनघोर झालो” तसं बहुजनांतल्या लेखकांचं झालंय, की “एक तितकं संमेलनाचं अध्यक्ष झालं की लेखक म्हणोन मोक्ष मळाला.” भानगड म्हणजे हा मोक्ष पुन्हा ब्राह्मणी संमेलनाच्या अध्यक्षपदानेच मिळतो. कारण अनौपचारिक गप्पांत ब्राह्मणांवर तोंडसुख घेणाऱ्यांना स्वत:च्या बहुजनवादी विचारांच्या एकाही अब्राह्मणी संमेलनाची किंवा साहित्य संस्थेची गेल्या साठ-सत्तर वर्षांत सातत्यपूर्वक दर्जेदार परंपरा उभी करता आलेली नाही. ‘दआग्रा’चा उपक्रम मध्येच खंडित झाला. कारण चार दिशेला चार तोंडं आणि एकविचार नसणं, प्रत्येकालाच श्रेय हवं असणं, वेळ बघून मोक्याच्या जागा पटकावण्याची लागलेली हावरट सवय, विचारांशी शंभर टक्के ‘कमिटमेंट’ नसणं, मतलब समोर ठेवोन वागणं, एकमेकांचा सवतीमत्सर करणं, अशी अनेक कारणं देता येतील. तात्पर्य, नेमाडेंनी आजवर असल्या बेरकी आणि दुटप्पी गोष्टी कधी केल्या नाहीत. म्हणोन नेमाडे हेच आम्हाला खऱ्या अर्थानं फुले-आंबेडकरांचे वैचारिक सहोदर आणि वारस वाटतात. आपल्यासारिखे (फुले-शाहू??) आंबेडकरी विचारांशी ‘बेइमानी’ (हाही आपणच नेमाडेंना वापरलेला शब्द, पृ. २६) करणारे लोक सहोदर आणि वारस असूच शकत नाहीत
वास्तविक ‘माझी मुलाखत घ्या’ असं नेमाडे यांनी कोणास म्हटलेलं आमच्या ऐकिवात नाही. मराठी साहित्यात इतक्या संख्येनं ज्या एका लेखकाच्या मुलाखती घेतल्या गेल्या त्या एकमेव नेमाडे यांच्याच. इतर लेखकांच्या का मोठ्याप्रमाणात घेतल्या गेल्या नाहीत याचंही उत्तर वरिलप्रमाणेच. समाज आपल्याकडे काय म्हणून पाहतो किंवा समाजातून आपल्याला किती रिकग्नायझेशन मिळतं, हेही महत्त्वाचं असतं ना कसबे सर. इतर लेखकांच्या इतक्या संख्येनं मुलाखती घेतल्या न जाणं याचा अर्थ समाजातून त्यांच्याबद्दलंचं रिकग्नायझेशन जोरकस नसणं, हाच होतो. नेमाडे हे आधी माणूस म्हणून खूप समृद्ध आहेत. आत एक बाहेर दुसरं असं त्यांचं वागणं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शंभरपट वाचून जी एक दृष्टी माणसाला येते ती नेहमी व्यापकतेकडे झेपावणारीच असते, संकुचिततेकडे नव्हे, कसबे सर. या शंभर पट अभ्यास-मनन-चिंतनातून सांगण्यासारखं खूप काही मनाच्या अडगळीत साठत जातं. ह्या अडगळीच्या उत्खननातून सातत्यानं काही ना काही नेहमीच भरीव विचारद्रव्य निघत असतं. वास्तविक वृत्तपत्र-नियतकालिके यांवर नेमाडे यांनी कडाडून टीका केलेली असोनही, नेमाडे या लेखकाच्या मुलाखती घेऊन त्यांचं आपल्यापरीनं उत्खनन करावं असं अनेकांना वाटलं-वाटतं, यात सर्व काही आलं. मुलाखतींतून नेमाडे यांचं जे उत्खनन झालं त्यातून मराठी भाषा-संस्कृतीला नेहमीच काही ना काही ऊर्जा देणारं विचारद्रव्य मिळत गेलं. ते आपल्याप्रमाणे केवळ स्वत:चं आत्मकथन सांगत बसलेले नाहीत. याला जर आपल्यासारिखी अभ्यासक मंडळी प्रसिद्धीचा हव्यास समजत असतील तर पुढं काही बोलावयासच नको. या वयातही नेमाडे कुणा एकावर पाचगळ टीका करण्यात वेळ न घालवता, देशभर जुन्या महत्त्वाच्या ग्रंथांच्या शोधात फिरतात. देशविदेशातील लोकांशी सातत्यानं संवाद ठेवतात, तिथल्या भाषा-संस्कृती-प्रश्नांबद्दल जाणून घेतात. मान मोडून वाचन-अभ्यास करतात ही गोष्ट कुठल्याही तरुणांस उभारी नि ऊर्जा देणारीच आहे. अभ्यास-संशोधन सोडून इथंतिथं गल्लीबोळातील व्यासपीठांवरल्या खुर्च्या ऊबवत बसले नाहीत, की पेप्रांत-मासिकांत साप्ताहिक-मासिक रतिब घालत बसले नाहीत. एकेकाळी विद्यार्थी, तरुण लोक भाबडेपणानं किंवा नाइलाजानं काय खरं-काय खोटं याची शहानिशा न करता कोणाही सोम्यागोम्याच्या मागे पळत असत. आता तो काळ सरलेला आहे. आता पोरं लर हुश्शार झालीत कसबे सर!
............................................................................................................................................
‘देशीवादाचे दुश्मन’ या रा. रा. अशोक बाबर यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4443
............................................................................................................................................
लेखक सुशील धसकटे तरुण कादंबरीकार आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.
hermesprakashan@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Fri , 20 July 2018
<<मात्र या सगळ्या भानगडीत ब्राह्मणांच्या आणि मराठ्यांच्या मुलींनीच खऱ्या अर्थानं जात्यंत केला आणि फुशाआंचा विचार खऱ्या अर्थानं याच मुली जगल्या>> त्यांच्या पुरता असेल... त्यांच्या मुला मुलींनी पुंन्हा बापाची जातच चालवली ना कि जात्यांत हा वैयक्तिक पातळीवर आणि तोही सार्वजनिक रित्या ( म्हणजेच चावाडीवर सांगण्यासाठी ) दाखवण्यासाठी असतो?