पुरुषी अहंकाराची खणखण
सदर - लक्ष्मणरेषेवरून
डॉ. कुंदा प्रमिला निळकंठ
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Thu , 01 December 2016
  • भिन्नलिंगी Transgender मर्दानगी Masculinity पुरुषार्थ पितृसत्ता Patriarchy

आपल्या संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेल्या ‘मर्दानगी’च्या संकल्पना आणि साध्या सरळ माणसांना त्यात अडकवणारे घातक सापळे, तसंच त्यावर पोसलेलं देशाचं राजकारण यावर ही मालिका लिहीत असताना अपरिहार्यपणे स्त्री विरुद्ध पुरुष या द्वैताच्या पलीकडे जाऊनच पाहावं लागतं. मागच्या लेखात भिन्नलिंगी तसेच उभयान्वयी (Transgender) स्त्री-पुरुषांना हिणवण्यासाठी मर्दपणाच्या विखारी गोष्टी (Toxic Masculinity) कशा सतत बिंबवल्या जातात याविषयी आपण पाहिलं. अगदी तशाच प्रकारे ‘राष्ट्रवाद’, ‘वंशश्रेष्ठत्व’, ‘धर्मश्रेष्ठत्व’ मनावर बिंबवण्यासाठी, कुटुंबांतील छोट्या माणसापासून ते थेट राष्ट्रीय स्तरावर मर्दानगीच्या संकल्पनांचा पुरस्कार कसा केला जातो आणि सत्तासंबंधाचं फॅसिस्ट राजकारण कसं खेळलं जातं हेही पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे.  

राष्ट्रवाद आणि देशभक्ती ही सर्वोच्च पायरी आहे असं गृहीत धरलं तर त्याच्या खालोखाल उतरंडीमध्ये अनेक पायऱ्या आहेत. राष्ट्राभिमानाखालोखाल, स्थानिक संस्कृती, त्याखाली धर्म-जात-वंश-कुलश्रेष्ठत्व आणि ‘खानदान की इज्जत’ इत्यादी अस्मितांचं राजकारण केलं जातं.  ते मुख्यत: पुरुषी अहंकाराला व मर्दानगी दाखवण्याच्या सुप्त इच्छेला ललकारत असतं. पुरुषी वर्चस्व कायम राखून कुरघोडी करण्यासाठी अल्पसंख्याक आणि स्त्रियांवर निर्बंध लादले जातात, अनेक अत्याचार केले जातात. देश-धर्म-राज्य-जात-वंश-कुटुंब श्रेष्ठत्व जपण्यासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी अस्मितांना पेटवलं जातं.

तसं पाहिलं तर आज ‘मर्दानगी’ (Masculinity) हा विषय अत्यंत कळीचा राजकीय प्रश्न बनलेला आहे. आजचा राजकीय अवकाश मर्दानगीच्या परिभाषेनं आणि त्याच्या अभिव्यक्तीनंही अधिकाधिक व्यापत चाललेला दिसून येतो. आपल्याला सतत सांगितलं जात आहे की, ‘गेल्या दीडशे वर्षांत भारतात जे काही राजकारण आणि समाजकारण झालं ते सारं ‘नामर्द लोकांचं’ राजकारण होतं. त्याने देशाचं खूप मोठं नुकसान झाळं आहे. त्यामुळे आपल्या देशाला आता ‘५६ इंची छातीच्या’ मर्दांच्या राजकारणाची तातडीची गरज आहे’ वगैरे. असा छपन्न इंची छातीचा मर्द आज देशाच्या प्रमुख पदावर विराजमान झालेला असून तो आता जगच पादाक्रांत करायला निघाल्याचा आभास निर्माण केला जात आहे. ही विचारसरणी रुजवण्यासाठी काही प्रतिमांचं उदात्तीकरणदेखील सुरू आहे. उदाहरणार्थ, सगळी पृथ्वी नि:क्षत्रीय करणारा ‘परशुराम’, गांधींचा ‘वध’ करणारा (हत्या नव्हे) ‘नथुराम’ आणि सुलतानाचा बिमोड करणारा ‘लोहपुरुष’ यांच्या ‘पौरुषत्वाच्या’ आणि ‘मर्दानगीच्या’ प्रतिमांचं, कथापुराणांचं पुनरुज्जीवन मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं आहे. त्याचबरोबर लक्ष्मी-सरस्वती आणि दुर्गा याचं ‘देवी माता’ स्वरूप स्त्रियांच्या मनावर बिंबवण्याचं काम चालू आहे.

सर्व स्त्रियांच्या लैंगिकतेवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी संस्कृतीरक्षकांच्या झुंडींच्या झुंडी पोरीबाळींना पबमधून किंवा बागेतून खेचून आणून मारहाण करत आहेत. ‘लव्ह जिहाद’चा बागुलबुवा उभा करणं असो की, ‘ऑनर किलिंग’ हे सारे संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली स्त्रियांच्या लैंगिकतेवर संपूर्ण वर्चस्व आणि नियंत्रण मिळवण्याचेच मार्ग आहेत. यामागील मूळ उद्देश आंतरजातीय-धर्मीय विवाहांना विरोध हा असून त्याचाही `मर्दानगी'च्या सत्तासंबंधांशी खूप जवळचा संबंध आहे हे लक्षात घ्यायला हवं. समलिंगी व तृतीयलिंगी लैंगिकता (LGBT) बाळगणाऱ्या व्यक्तीना, संस्कृतीरक्षकांची एक फळी हे ‘पाश्चात्यांचं खूळ’ असल्याचं सांगत सार्वजनिक जीवनातून बहिष्कृत करण्याचा प्रयत्न करते आहे, हेदेखील मर्दानगीची ‘फॅसिस्ट’ कल्पना प्रस्थापित करण्याचा भाग आहे.

अगदी साधं उदाहरण घेऊ. अलीकडे गेल्या दहा वर्षांपासून शहरात गुढीपाडव्याला मोठमोठ्या विजय-यात्रा काढल्या जातात. त्यात नऊवारी साडी, नथ आणि डोक्याला भगवा फेटा बांधून स्त्रिया मोटारबाईकवर स्वार होऊन या मिरवणुकीत पुरुषांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून सामील होतात. त्यावेळी ‘स्त्री’ असण्यापेक्षा पुरुषासारखे पराक्रमी, ‘मर्दानी’ मूल्य महत्त्वाचं ठरतं. पण हेच चित्र दिवाळी दसऱ्याला स्थानिक सांस्कृतिक जत्रा काढल्या जातात तेव्हा बदलतं. त्यावेळी मात्र याच मर्दानी  स्त्रिया पुरुषांना ओवाळणाऱ्या दुय्यम स्थानावरच्या सवाष्ण पतिव्रता असतात. अशा जत्रांमध्ये ‘मॅकडोनाल्डायझेशन’ (Macdonaldisation) संस्कृतीला विरोध करायचा म्हणून मालवणी महोत्सव, कोळी महोत्सव, आगरी महोत्सव किंवा बंगाली खाद्य संस्कृतीचा तडका दिला जातो आणि स्थानिक अस्मितांचं पुनरुज्जीवन केलं जातं. डोक्याला भगवा फेटा बांधून मर्दासारखं आपल्या स्त्रियांना मोटारबाईकवर बसवणारे पुरुष, पबमध्ये जाऊन पुरुषांसोबत दारू पिणाऱ्या तरुण मुलींना मात्र खेचून बाहेर आणतात. त्या पुरुषांना ‘व्हॅलेंटाईन डे’ला मात्र स्त्रियांनी पुरुषांसोबत फिरलेलं आवडत नाही या विरोधाभासाचा काय अर्थ होतो?   

हा सारा पितृसत्ताक वर्चस्व आणि सत्तासंबंधांचा खेळ आहे, फॅसिस्ट राजकारण आहे. अनेकदा आपण सत्ता म्हणजे राज्यसत्ता किंवा सार्वभौम देशाची सत्ता या अर्थानं बघतो. पण या सत्तेचा अवकाश बदलला किंवा जागा बदलली तरी त्यातील पितृप्रधान व्यवस्थेची काही लक्षणं सारखीच असतात. तो अवकाश कधी धर्मसत्तेचा असतो, लष्कराचा असतो, राजकारणाचा असतो, जात पंचायतीचा असू शकतो, स्थानिक किंवा राष्ट्रीय राजकारणाचा असतो, पक्षांतर्गत असू शकतो किंवा कुटुंबातील असू शकतो. एखाद्या पुरुषाकडे सत्ता व वर्चस्व कायम टिकवण्यासाठी काय काय गुणधर्म असावे लागतात?

१) वर्चस्व गाजवण्याची वृत्ती असायला हवी

२) धोका किंवा जोखीम पत्करण्याची वृत्ती हवी

३) झटकन निर्णय घेण्याची क्षमता हवी

४) ज्या समुहाचे तो नेतृत्व करतो त्यांच्यावर सोशल कंट्रोल किंवा सामाजिक निर्बंधांचे अवडंबर माजवून समूहावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.

५) प्रतिस्पर्धी गटावर त्या पुरुषाला कुरघोडी करून सत्ता गाजवता आली पाहिजे

६) समूहाच्या राजकारणाचं अजेंडा सेटिंग करता आलं पाहिजे.

७) आपल्या समूहाचे व्यवहार-विनिमय, रीतीभाती सांगून, दबाव आणून आपल्या गटातील स्त्रिया- मुले यांनी कसं वागावं, बोलावं, खावं इत्यादी वागणुकीचे साचे ठरवता आले पाहिजेत.

८) कुटुंबांतर्गत उतरंडीची व्यवस्था उच्चनीचता तशीच चालू ठेवता आली पाहिजे.

९) आपण व आपली संस्कृती महान आहे हे सदस्यांच्या मनावर बिंबवता आलं पाहिजे 

१०) स्थानिक अस्मितांच्या आगीला पेटतं ठेवण्यासाठी सतत तेल ओतता आलं पाहिजे.  

मर्दानगीच्या वर्चस्वाच्या कल्पना फक्त पुरुषच राबवतात असं नव्हे, हजारो वर्षांच्या संस्कारामुळे  स्त्रियांनाही पुरुषांनी सतत पुरुषार्थ गाजवावा असं वाटतं. राजकारणात आलेल्या स्त्रियांच्या संकल्पनादेखील याच पितृसत्ताक व्यवस्थेला कायम टिकवणाऱ्याच असतात. गुलामांना गुलामीची जाणीव नसल्याने ते आपल्या पायातल्या बेड्यांचे हिरीरीने समर्थन करतात. इतकंच काय पण स्वत:कडे कमीपणा घेऊन पुरुष वर्चस्वाला खतपाणी घालतात.

यावरून मला एक गोष्ट आठवते. काही वर्षांपूर्वी  मुंबईतल्या काही स्त्री नगरसेविकांनी सत्ताधारी आयुक्तांना बांगड्या भेट देण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्या स्त्रियांना असं वाटत होतं की, अशा बांगड्याच्या खणखणाटानं त्या आयुक्तांचा पुरुषी अहंकार दुखावला जाईल. आपण ‘मर्द’ नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे आयुक्त कामाला लागतील आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करतील आणि पुरुषार्थ गाजवतील.

पुरुषातील ‘मर्द’पणाला अगदी अशाच स्वरूपाचं आवाहन अमिताभ बच्चन यांनी एका लहानग्या मुलाच्या सहाय्याने शौचालयाच्या जाहिरातीत केलेलं दिसतं. कुटुंबाच्या रक्षणाचं काम हे मुख्यत: मर्दाचं आहे आणि उघड्यावर शौचाला जाण्याने कुटुंबाचं आरोग्य तुम्ही धोक्यात आणता, ते चूक आहे. तुम्ही जर ‘खरेखुरे’ मर्द असाल तर जागे व्हा आणि शौचालय बांधून कुटुंबाचं रक्षण करा. इत्यादी इत्यादी.

अमिताभ बच्चन यांच्या या सरकारी जाहिरातीचं उदाहरण देऊन एका लेखिकेने वृत्तपत्रातील आपल्या लेखात एका स्त्रीवादी कार्यकर्तीचे उदधृत टाकलं आहे, ‘लिंगभेद कमी करण्यासाठी आपण थेट पितृसत्ताक पद्धतीलाच का नाही आव्हान देत? पुरुष, पौरुषत्व आणि स्त्री, स्त्रीत्वाच्या तोडक्या- मोडक्या व्याख्येतच का खेळत बसतो? जाहिरातीत अशा प्रकारची ‘मर्द’पणाची व्याख्या केल्यामुळे समस्त पुरुषवर्गाला पुन्हा एकदा रक्षणकर्त्याच्या भूमिकेत बसवण्यात आलं आहे. घरातील सदस्यांसाठी शौचालय बांधून दिलं की आपण मर्द आहोत, हे सिद्ध करण्याचा किती लाजिरवाणा प्रयत्न आहे हा.'

'थेट पितृसत्तेलाच आव्हान का  देत नाही' असं म्हणताना किती क्रांतिकारक असल्यासारखं वाटतं नाही? मलाही तसंच वाटायचं इतकी वर्ष!

या क्रांतिकारक स्त्रीवाद्यांना माझा अगदी साधा प्रश्न आहे, पितृसत्तेला उलथवून टाकण्याचं आव्हान देणार कसं? एनजीओच्या माध्यमातून स्त्रियांसाठी फॅमिली कौन्सिलींग सेंटर्स चालवून? वेश्यांच्या मुलासाठी पाळणाघरं किंवा अंगणवाड्या चालवून? की वर्षानुवर्षं संविधानातील समतेच्या तरतुदी वापरून? एसेमेसवरून ट्रिपल तलाख मिळालेल्या कुटुंबवत्सल मुस्लीम गृहिणीची कोर्टात केस लढून?

अशा अनेक केसेस जिंकलोयत की आपण. पण त्यामुळे पितृप्रधान व्यवस्थेला धक्का पोहोचला?  बाकीचं सगळं सोडा हो, किमान ज्या स्त्रीसाठी आपण लढलो तिच्या जगात 'पुरुष वरचढ असणारच' वा  'बाईनं नमतं घेणं हे अगदी नॉर्मलच आहे' अशा तिच्या व्यवस्थेबद्दलच्या संकल्पना बदलल्या का?

२०१३ला बलात्कार विरोधी सुधारीत कायदा आल्यानंतर कौमार्यभंग न झालेल्या (व्हर्जिन) कोवळ्या मुलीशी संभोग केल्यावर पुरुषाची ताकद वाढते, या 'सांस्कृतिक' अंधश्रद्धेला धक्का पोहोचला का?

 जिथे ही पितृसत्ता अतिशय रूद्र स्वरूपात दिसते, अशा तळागाळातल्या शोषीत जातीतल्या एखाद्या पिडीत स्त्रीला ही व्यवस्था तोडण्यासाठी  किंवा किमान थोडासा  धक्का देण्यासाठी कोणता 'मूर्त' स्वरूपातला मार्ग सांगणार? स्त्रीवादी विचारांची भाषा त्या बाईपर्यंत पोहोचलीय का?

तसा तो शोध घेतला तर लक्षात येईल की, त्या बाईच्या मनापर्यंत तेच पोहोचलेलं असतं, जे तिच्या सांस्कृतिक चौकटीतल्या दृष्टिकोनाशी खूप जोडलेलं असतं. मूर्तरूपात तिला पुरुष जसा दिसतो, बाप-नवरा-मुलगा-सासरा-दिर-मित्र-भाऊ या रूपात तो जसा अनुभवाला येतो, त्या रूपात ती पितृसत्ता स्वत: अनुभवत असते.

त्यामुळे पितृसत्ता ही अमूर्त संकल्पना मूर्तरूपात जशी अनुभवाला येते, तशी स्त्री त्याविरोधात बंड करते. हे मूर्तरूप म्हणजे ‘मर्द’ असणं आणि रोजच्या व्यवहारात मर्दानगीच्या अभिव्यक्तीचा अनुभव येणं आणि त्याच्यातून आलेल्या भेदभावाची व विषमतेच्या व्यवहाराची चीड येणं. हे त्याचं वास्तव व्यवहारातलं रूप आहे.

प्रत्येक बाई तिच्या कुटुंबातील मर्यादित ताकदीनुसार व्यवस्थेविरुद्ध बंड करतच असते. आज ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये आणि छोट्या समूहात वावरताना अनेक बायका हे करतातच. व्यवहारात अनुभवाला येणाऱ्या मर्दानगीच्या वागणुकीविरुद्धचा त्यांचा लढा हा अंतिमत: पुरूषसत्ताक व्यवस्थेविरुद्धच असतो. त्या लढ्याचं मूर्त रूप म्हणजे व्यवहारातल्या 'मर्द' असण्याच्या साध्या संकल्पनांना धक्का देत जाणं, ज्याचा विचारच सामान्य पुरुषाने कधीच केला नव्हता, त्याचा विचार करायला लावणं. ही परिवर्तनाची पहिली पायरी असते. १००तले दोन पुरुष जरी बदलले तरी ते इतर ५० जणांना बदलू शकतात. तेव्हाच स्त्रियांच्या पितृसत्ताविरोधी लढ्याला यश मिळेल.

मे २०१५ मध्ये मुंबई पुण्यातल्या काही संघटनांनी मिळून एक मर्दानगीविरोधी 'पुरुषभान' परिषद घेतली होती. त्याचा हाच उद्देश होता. त्यातून रोजच्या व्यवहारात दिसणाऱ्या मर्दानगीच्या आविष्काराविषयी विचार करायला लावण्याचं काम हाती घेतलं गेलं. अर्थात सरळ घाव घालून क्रांती होत असती तर गेल्या ७५ वर्षांत झालेल्या स्त्रीवादी चळवळीने पितृसत्ता उलथवून टाकली असतीच, नाही का? पण वास्तवात आजही हाजीअली दर्ग्याच्या मज़ारपर्यंत पोहोचायला आपल्याला तुकड्या तुकड्यात लढावं लागतं आहे. मग स्त्रियांना देवा-धर्माच्या विळख्यातून बाहेर काढणं हे दूरच राहिलं. हे उदाहरणच खूप बोलकं आहे.

दुसरं असंही माझ्या लक्षात आलंय की, हा वाद 'अमूर्त' पातळीवर विचार करणाऱ्या बुद्धिवादी तात्त्विक वैचारिक परंपरेची सवय असलेल्या उच्चभ्रू ब्राम्हणी स्त्रीवादी विरुद्ध मूर्त स्वरूपातील अनुभवाच्या आधारे  विचार करणाऱ्या कष्टकरी जातीतील स्त्रियांमध्ये असलेल्या सांस्कृतिक दरीमुळे आहे. त्यामुळेच तो स्त्रीवाद्यांच्या आकलना पलीकडचा आहे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांच्या अमूर्त पातळीवरील अद्वैत तत्त्वज्ञानापेक्षा सगुण रूपातला ‘विठ्ठल’ कष्टकरी समाजातील तुकारामांना जवळचा वाटतो. ‘मनुवादी विचारांना जाळून टाका’ असं अमूर्त वैचारिक पातळीवर म्हणतानाच बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष खड्डा खणून मनुस्मृती प्रतीकात्मकरीत्या जाळून दाखवावी लागली. कारण त्यांचं म्हणणं होतं की, ‘माझ्या समाजाला ‘अमूर्त’ विचार समजण्यास उशीर लागतो, म्हणून ही कृती मला करावी लागते आहे.’ 

अमूर्त तात्त्विक विचारांच्या आकलनातील ही संस्कृती भिन्नता संत कवियत्रींमध्येही दिसते. वेदाभ्यासाचं वातावरण घरात असल्यामुळे ज्ञानेश्वरांच्या भगिनी संत मुक्ताबाई उघड्यावर आंघोळ करत  असताना त्यांच्याकडे पाठ फिरवून उभं राहणाऱ्या चांगदेवाला वेदांमधले अनेक दाखले देऊन “मनात पाप नाही त्याला कसली भिती?” असं सणसणीत उत्तर देऊन सुनावतात. त्यांच्याकडची निर्भयता दलित समाजात जन्मलेल्या सोयराबाई यांच्याकडे नसली तरी आपल्या अनुभवाच्या आधारे मात्र त्या बोलू शकतात.

आपल्या आप्तेष्ठांचे कान पिरगाळणाऱ्या शेतकरी कन्या बहिणाबाई आणि अस्पृश्यतेबद्दल चीड व्यक्त करणाऱ्या चोखामेळ्याची बहीण सोयराबाई यांच्यामध्ये आणि वेदपंडिता संत मुक्ताबाई यांच्यात अभिव्यक्तीचा फरक दिसतो. हा फरक जातीय भेदभावाच्या सांस्कृतिक परंपरेतला आहे.  जे धारिष्ट्य चोखामेळासुद्धा दाखवू शकला नाही ते जळजळीत वास्तव व्यावहारिक अनुभवाच्या आधारानेच या स्त्रियाच दाखवू शकतात. कारण त्यांची लढाई समतेसाठी पितृप्रधानतेविरुद्ध असली तरी त्यांना त्यावरचं भाष्य अनुभवाआधारेच करावं लागतं. म्हणूनच सोयराबाई म्हणतात,

देहीचा विटाळ, देहीच जन्मला,

सोवळा तो जाहला कवण धर्म?

तेव्हा बांगड्यांच्या खणखणाटानं हादरलेल्या पुरुषांनी स्वतःच स्वतःशी, स्वतःच्या अहंकाराशी लढणं गरजेचं आहे. त्यांना स्वतःच्याच बिभत्स लैंगिक सत्तासंबंधांचं आकलन होणं गरजेचं आहे. स्त्री-पुरुषांमध्ये मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. स्त्रीवादी विचार हा पुरुषांनाही मुक्त, निकोप आणि अंतिमतः माणूस व्हायला शिकवणारा विचार आहे, हे लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच स्त्री-पुरुष द्वैताच्या (Binary) पलीकडे जाणारी पितृसत्तेविरुद्ध लढाई लढली पाहिजे.

 

लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

kundapn@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......