ट्रम्प यांनी कोणत्या लाभासाठी पुतिन यांची गळाभेट घेतली?
पडघम - विदेशनामा
देवेंद्र शिरुरकर
  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
  • Thu , 19 July 2018
  • पडघम विदेशनामा व्लादिमीर पुतिन Vladimir Putin डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

निरंकुश सत्ता हाती एकवटण्याची महत्त्वाकांक्षा मनात बाळगणे हे तसे पाप म्हणता येणार नाही. पण कोणाच्या तरी विध्वंसाचा हेतू मनात बाळगून तशी कृती करणे हे निश्चितपणे पाप असते आणि हा जगासाठीही चिंतेचा विषय ठरतो. संपूर्ण व्यवस्थेने आपल्या तालावर नाचले पाहिजे हा दुराग्रह मनात बाळगणाऱ्यांचे काय होते? याचा प्रत्यय गत अनेक शतकांपासून आलेला आहे. अनिर्बंध सत्ताधीश व्हायच्या स्वप्नांना बेताल बडबड आणि दिशाहीन लहरीपणाचे कोंदण मिळाले की, त्या चिंतेच्या विषयालाही करुण विनोदाची झालर चढते. खरे तर अशा व्यक्ती त्या-त्या काळासाठी विनोदाच्या, चेष्टेचा विषय बनतात, पण त्यासोबतच त्या काळाचीही क्रूर चेष्टा करत असतात.

जागतिक शांतता, स्थैर्य, शांततापूर्वक सहअस्तित्व असल्या उदात्त स्वप्नांच्या व संकल्पनांच्या उद्घोषात फिनलँडमधील हेलसिंकी महानगरात पार पडलेल्या शिखर बैठकीमुळे सध्याच्या काळाची ही चेष्टा ताजी होत आहे.

अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ऊराऊरी भेट अखेर संपन्न झाली. ‘जगातील एकमेव महासत्ता’ असे बिरूद मिरवणाऱ्या अमेरिकेचा राष्ट्रप्रमुख, तशाच बिरुदासाठी आसुसलेल्या रशियन राष्ट्रप्रमुखाला भेटला, एवढाच खरे तर या भेटीचा अर्थ आहे. मात्र या भेटीपूर्वीच्या आणि भेटीनंतरच्या संभाव्य घडामोडींचे अंत:प्रवाह निश्चितपणे दखलपात्र आहेत. महासत्ता होण्याचा ध्यास घेतलेल्या चीनची हातघाईही सध्या प्रस्थापितांना अस्वस्थ करत आहे.

कोणे एकेकाळी परस्परांचे कट्टर हितशत्रू असलेल्या अमेरिका आणि रशियाचे हे सुखद तराणे आश्चर्यजनक असले तरी जागतिक शांततेस पोषक ठरेलच, असा गैरसमज करून घेता येणार नाही. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयी होण्यात पुतिन यांचा सहभाग असण्यापर्यंत या दोघांतील सौहार्दाची चर्चा सुरू होते. निरंकुश सत्ता प्रस्थापित करण्यासाठीच राज्यकारभाराचे धोरण राबवणारे सत्ताधीश प्रत्यक्षात या कृतीला चेहरा मात्र भलताच गोंडस देत असतात.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4446

.............................................................................................................................................

आर्थिक लाभासाठी शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवले जात असते. आपली उत्पादित शस्त्रसामग्री विकल्या जावी म्हणून मग जगभरात कुठे ना कुठे हिंसाचार व्हायला हवा असतो. त्यासाठी मानवाधिकाराचे उल्लंघन, दहशतवादाचे सावट, लोकशाहीच्या अस्तित्वास आव्हान, राष्ट्रीय सुरक्षितता धोक्यात अशी आवरणे दिली जातात.

अमेरिका आणि रशिया यांचा गत काही वर्षांतला हा इतिहास पाहता हेलसिंकी शिखर बैठकीतील ट्रम्प व पुतिन यांनी परस्परांची केलेली भलामण प्रचंड हास्यास्पद ठरते. मुळात ज्या दोन देशांच्या सत्तास्पर्धेमुळे जगाची विभागणी होऊन बेसुमार रक्त सांडले जाते, त्या देशांनी पांघरलेली लोकशाहीची झूल कितीही सोनेरी भासत असली तरी मानवतावादाची कत्तल करताना उडालेले शिंतोडे काही लपवता येत नाहीत. त्यामुळे रशियाने सीरियात लोकशाही वाचविण्यासाठी कसा अटोकाट प्रयत्न केला? आणि अमेरिकेने जागतिक कल्याणासाठी आखाती देशांत कसे पराक्रम गाजवले? याबाबतचे वास्तव जगभरातील सुज्ञांना चांगलेच ज्ञात असते. तिथे ट्रम्प यांनी रशियाच्या कारनाम्याचे व पुतिन यांनी अमेरिकेच्या हव्यासाचे केलेले समर्थन हे ‘लबाड लांडगं ढ्वाँग करतंय’ या श्रेणीतच मोडते. तुझे पाप मी पाप मानत नाही, माझे पाप तू दुर्लक्षित कर, एवढाच अर्थ या भलामणीतून निघतो.

कोरियन द्वीपकल्पातील समस्यानिवारणातील महत्कार्य पार पाडल्याबद्दल पुतिन यांनी ट्रम्प यांचे आभार मानणे  असो वा इराणवरील बहिष्कारास्त्रासाठी ट्रम्प यांनी पुतिन यांची सहानुभूती मिळवणे असो, या सगळ्या कसरतीमधून जागतिक शांततेला सद्गती मिळो, एवढीच अपेक्षा करता येते.  आपण सोडून इतर सर्वजण जागतिक शांततेचे मारेकरी असल्याचा डांगोरा एवढ्या मोठ्या आवाजात पिटायचा की जगभरातील सगळी उदात्त तत्वे नेमकी आहेत तरी कोणाकडे? असा संभ्रम निर्माण करण्यात हे सत्ताधीश माहीर असतात.

पुतिन यांनी केलेल्या पराक्रमाचे कौतुक करत ट्रम्प यांनी या दोन्ही देशांतील परस्परसंबंधांचे नवे पर्व सुरू झाल्याची घोषणा केली आहे. अमेरिका-रशिया यांच्यातील तणावपूर्वक संबंधांमागे जागतिक शांतता अबाधीत राखण्याची प्रेरणा कारणीभूत असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. रचनात्मक, विधायक कामासाठी ही मैत्री अनिवार्य असल्याचा उद्घोष ते करत आहेत. विध्वंसकाने विधायकतेचा जयघोष केल्यासारखेच आहे ते! 

हेलसिंकी करारास ट्रम्प यांनी ऐतिहासिक मैत्रीसाठी टाकलेले पुढचे पाऊल असे संबोधले आहे. परस्परांबद्दलची संपुष्टात आलेली (की, अस्तित्वातच नसलेली?) विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्याची तळमळ असल्यामुळे हे दोन उदारमतवादी, लोकशाहिक देश एकत्र आल्याची ग्वाही या दोघांनीही दिली आहे. अर्थात डोनाल्ड यांनी भविष्यात प्रदिर्घकाळ चालणाऱ्या मैत्रीपूर्ण प्रक्रियेची ही केवळ सुरुवात असल्याचे वाक्य आपल्या वक्तव्यात जोडून दिले आहे.

पाळत ठेवण्यात प्रवीण असलेले पुतिन या आपल्या भरोसेमंद मित्राच्या वचनावर कितपत विश्वास ठेवतील? याबाबत आताच शंका उपस्थित करण्याचे कारण नाही. ट्रम्प यांनी कोणत्या तात्कालिक व प्रदीर्घकाळ परिणामकारक लाभासाठी पुतिन यांची गळाभेट घेतली? याचा ऊहापोह आता येत्या काळात आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार करतील. पण याची सर्वाधिक कल्पना उपजतच धूर्त असलेल्या पुतिन यांच्याखेरीज अन्य कोणाला असू शकणार?

दरम्यान हेलसिंकी विमानतळ ते शिखर बैठकीचे घटनास्थळ या मार्गावर लोकशाहीवाद्यांनी डोनाल्ड यांच्या स्वागताप्रीत्यर्थ लावलेल्या बिलबोर्डस्नी या बैठकीस चार चाँद लावले आहेत. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचे असेच जंगी स्वागत इंग्लंडमध्येही करण्यात आलेले आहे.

प्रसारमाध्यमे बदमाश असतात. ती जनतेची दिशाभूल करतात. कारण त्यांना जनहितामध्ये रस नसतो, अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या ट्रम्पतात्यांच्या देशात लोकशाही कशी नांदत असेल? असे प्रश्न उपस्थित करायचे नसतात. हे गृहीत धरूनच अभिव्यक्तीस्वातंत्र्य असलेल्या मातीत फिनलँडवासियांनी ट्रम्प, पुतिन या दोन्ही अनिर्बंध सत्ताधीशांचे स्वागत केले.

या दोन्ही धोरणी नेत्यांना हेलसिंकी येथे केलेली वक्तव्ये नंतरच्या काळात स्मरणात राहतील का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तूर्तास तरी जागतिक रंगमंचावरील तीन मोठ्या देशांच्या  सत्तास्पर्धेत किमान नुकसान सहन करताना ‘चित्ती असू द्यावे समाधान’ असे सांगत आपण तरी दुसरे काय करणार आहोत? 

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......