खरे भांडण ‘मनुस्मृती’शी नाही, समाजरचनेशी आहे. अन्याय्य विषमरचना जतन करू पाहणाऱ्या मनोवृत्तीशी आहे.
पडघम - सांस्कृतिक
नरहर कुरुंदकर
  • ‘मनुस्मृती : काही विचार’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि ‘मनुस्मृती’ दहन
  • Tue , 17 July 2018
  • पडघम सांस्कृतिक मनुस्मृति Manusmriti मनू Manu डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkarनरहर कुरुंदकर Narhar Kurundkar

‘मनुस्मृती : काही विचार’ हे विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक फेब्रुवारी १९८३मध्ये लोकवाङ्मय गृहातर्फे प्रथम प्रकाशित झाले. नुकतीच त्याची नवी आवृत्ती देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केली आहे. या पुस्तकाच्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

‘मनुस्मृती’ दहनाचा कार्यक्रम नियोजनपूर्वक, जाणीवपूर्वक होता. त्यात ऐनवेळी सुचले तसे केले हा प्रकार नव्हता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ दहनाला एक व्यापक व विधायक बैठक दिलेली होती. युरोप-अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण घेतलेल्या आंबेडकरांना निदान ‘मनुस्मृती’ दहनाच्या वेळी आपण काय करीत आहो याची पूर्ण जाणीव होती. फ्रेंच राज्यक्रांतीचे आकर्षण सर्वांच्याप्रमाणे बाबासाहेबांनाही होते. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीने घोषित केलेली प्रसिद्ध त्रयी आहे. या त्रयीविषयी उत्कट ओढ बाबासाहेबांच्या मनात होती. फ्रान्समध्येसुद्धा क्रांतीपूर्व काळात जो कायदा होता, तो विषमतेचाच होता. क्रांतीच्या नेत्यांनी राज्यक्रांतीच्या वेळी समतेचा जाहीरनामा घोषित केला आणि विषमतेचा कायदा जाहीर रीतीने जाळण्यात आला. मानवमात्राच्या समतेचा पुरस्कार करणारा हा जाहीरनामा ही अठराव्या शतकातील युरोपातील एक युग बदलणारी घटना होती. महाडच्या या परिषदा ज्या काळातील आहेत, त्या काळात डॉ. आंबेडकर हे हिंदू धर्मावर श्रद्धा असणारे कार्यकर्ते होते. म्हणून महाडच्या दुसऱ्या अधिवेशनात सर्व हिंदुमात्रांच्या समतेचा जाहीरनामा घोषित करण्यात आला. एका ठरावाच्याद्वारे सर्व हिंदूंचे समानतेचे हक्क जन्मसिद्ध आहेत असे सांगण्यात आले आणि त्यानुसार समतेविरुद्ध जाणारा ग्रंथ म्हणून ‘मनुस्मृती’चे दहन करण्यात आले.

लो. टिळक ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे म्हणत. बाबासाहेबांनी ‘समता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे सांगितले. महाडला ‘मनुस्मृती’चे दहन करण्यात आले, त्याचे कारण ‘मनुस्मृती’ हा हिंदूंचा पूज्य ग्रंथ आहे हे नव्हते. हिंदूंचे पूज्य ग्रंथ अनेक आहेत. ज्यांना केवळ हिंदू धर्माची विटंबना वा अवहेलना करावयाची आहे, त्यांना कोणताही पूज्य ग्रंथ दहन करता येईल. पण इ.स. १९२७ साली ही भूमिका नव्हती. ‘मनुस्मृती’ हा हिंदूंचा पूज्य ग्रंथ आहे हा मुद्दा त्या वेळी महत्त्वाचा होता. जो ग्रंथ समतेच्या विरोधी जातो, तो ग्रंथ पूज्य असू शकत नाही. ‘मनुस्मृती’ हा ग्रंथ पूज्य नव्हे. हा ग्रंथ जागोजागी शूद्रांचा उपमर्द करतो. त्यांच्या गुलामगिरीचे समर्थन करतो. शूद्राला गुलाम करावे असे तर हा ग्रंथ सांगतोच, पण या कृत्याचे समर्थनही नैतिक-धार्मिक पातळीवरून करतो. हे शूद्रांचे ‘मनुस्मृती’त प्रतिपादन केलेले दास्य धार्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही. सामाजिक व आर्थिक गुलामगिरीचे प्रतिपादन व समर्थनही या ग्रंथात आहे. यामुळे हा ग्रंथ दहनयोग्य ठरविण्यात आला. या निमित्ताने जी भाषणे झाली त्यात भर सामाजिक व आर्थिक गुलामगिरीवर होता. खरे म्हणजे कुणीतरी एक मुद्दा मांडावयाला हवा होता की, खरी गुलामगिरी आर्थिक असते. शूद्रांची ही गुलामगिरी मूलत: आर्थिक आहे. ही आर्थिक गुलामीच क्रमाने सामाजिक व आर्थिक गुलामगिरीचे रूप घेते. सत्य हेच आहे; पण या पद्धतीने ते मांडण्यात आलेले दिसत नाही.

‘मनुस्मृती’ दहनाचा ठराव बाबासाहेबांचे एक सहकारी गंगाधर नीळकंठ तथा बापूसाहेब सहस्त्रबुद्धे म्हणून एक कोकणस्थ ब्राह्मण होते, त्यांनी मांडला. सहस्त्रबुद्धे यांनी आपले भाषण विचारपूर्वक ठरविलेले होते. आपल्या विवेचनाला आधार म्हणून त्यांनी ‘मनुस्मृती’तील अनेक श्लोक वाचून दाखविले. (मनुस्मृती १|९९, १०३, २|२३८, ३|१३, ५|९२, ८|२०, ११४, १२३, २७०, २७१, २७२, २७५, २८०, २८१, २८२, ४१७, १०|५०, ५१, ५६ हे ते श्लोक) आठवा अध्याय विशेष आक्षेपार्ह मानला गेला हे उघड आहे. कारण तो गुन्हे व शिक्षा यांचा अध्याय आहे. सहस्त्रबुद्धे यांनी उदधृत केलेली स्थळे तर आक्षेपार्ह आहेतच, पण आक्षेपार्ह स्थळांची यादी याहीपेक्षा कितीतरी मोठी आहे. या ठरावाला श्री. पां. ना. राजभोज व थोरात यांनी अनुमोदन दिले. सूचक एक ब्राह्मण, अनुमोदक राजभोज व थोरात ही योजना काळजीपूर्वक झालेली आहे. यानंतर विधीपूर्वक ‘मनुस्मृती’चे दहन करण्यात आले.

.............................................................................................................................................

‘काळी मांजर - एडगर अॅलन पो च्या निवडक गूढकथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4446

.............................................................................................................................................

या ‘मनुस्मृती’ दहनाबाबत बाबासाहेबांची भूमिका काय आहे? ही भूमिका केवळ शब्दांच्यामधून समजून घेता येणार नाही. शब्दांच्यामधून काय सांगितले, कोणत्या जागा सोडून दिल्या यांचा नीट विचार करून ही भूमिका समजून घेतली पाहिजे. प्राचीन ग्रंथ जाळून नष्ट करणे व ज्ञानसाधन नष्ट करणे हा रानटीपणा बाबासाहेबांना मान्य नव्हता. ते स्वत: ज्ञानाचे पूजक व संग्राहक होते. म्हणून ‘मनुस्मृती’ दहन म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरून हा ग्रंथ नष्ट करण्याचा कार्यक्रम नव्हे, हे आपण समजून घेतले पाहिजे. खरे भांडण पुस्तकाशी नाही. खरे भांडण समाजरचनेशी आहे. ही अन्याय्य विषमरचना जतन करू पाहणाऱ्या मनोवृत्तीशी आहे. ‘मनुस्मृती’ दहन हे त्या मनोवृत्तीच्या निषेधासाठी करावयाचे प्रतीकात्मक दहन आहे. ‘मनुस्मृती’चे दहनच करावयाचे तर संशोधकांनी, अभ्यासकांनी सिद्ध केलेली अभ्यासाला उपयोगी प्रत जाळण्याची गरज नाही. ते अभ्यासाचे साधन असते. ‘मनुस्मृती’च्या अभ्यासाला निरुपयोगी आणि स्वस्त मिळणाऱ्या प्रती आहेत. त्या जाळाव्यात. महत्त्व निषेधाला आहे. जाळण्यात येणाऱ्या प्रतीला महत्त्व नाही.

सारी हिंदू परंपराच विषमतेची समर्थक परंपरा आहे. या परंपरेत निर्माण झालेल्या सगळ्याच ग्रंथांमधून विषमतेचे समर्थन असणार ही गोष्ट उघड आहे. आता आपण काय सारेच ग्रंथ जाळीत बसणार? शेवटी ‘ग्रंथ जाळणारे’ ही कीर्ति प्राप्त करणे यात मोठासा गौरव नाही. एक माणूस अगर एक ग्रंथ किंवा सर्व माणसे अगर सर्व ग्रंथ यांच्याशी वैर हा काही या दहनाचा हेतू नाही. एक धक्का देऊन सर्व सवर्ण समाजाला खडबडून जागा करणे व निषेध नोंदविणे हा इथे हेतू आहे. म्हणून इहलौकिक कायदा सांगणारा, सर्वाधार धर्मशास्त्रांचा ग्रंथ मनूचा. तो आम्ही दहन करतो. सर्व परंपरा व कायदे यांचा आधारवड मनू आहे. ‘मनुस्मृती’चे दहन म्हणजे प्रतीक रूपाने सर्व परंपरेविरुद्ध विद्रोह आणि बंड.

मागचे सगळे जगच विषमतेचे आहे. ही विषम समाजरचना भारतातच होती असे नाही, सर्व जगभर ती होती. मात्र जगभर विषमता होती, कायद्याने मान्य होती, पण धर्माने ती पवित्र व पूज्य ठरविलेली नव्हती. धर्माचा भाग म्हणून पवित्र व पूज्य विषमता हे फक्त हिंदू समाजरचनेचे वैशिष्ट्य आहे. मागची दोन हजार वर्षे अस्पृश्यता पाळली याचा राग हे ‘मनुस्मृती’ दहनाचे कारण नव्हे. रागाचे खरे कारण काल तुमच्या पूर्वजांनी आम्हास गुलाम केले होते हे नाही. राग, संतापाचे कारण आजही ही गुलामगिरी संपविण्यास हिंदू समाजमन तयार नाही. आजही हा सारा अन्याय समर्थनीय मानणारे लोक आहेत. गुलामगिरी समर्थक अशा आजच्या मंडळींचा हा निषेध आहे. मागच्या इतिहासाचा राग वर्तमानकाळी काढण्याचा हा प्रकार नाही. काही जणांचे मन भूतकाळात रमलेले असते. बाबासाहेब भूतकाळाचा अभ्यास करणारे पंडित होते. पण त्यांचे मन भविष्यकाळात रमलेले होते. भूतकाळाबाबत फक्त कुढत बसणे यात त्यांना फार रस नव्हता. ‘मनुस्मृती’ दहनामागची ही भूमिका मला पटते, समर्थनीय वाटते.

फुले ‘मनुस्मृती’ जाळावी असे म्हणतात. बाबासाहेबांनी ती प्रत्यक्ष दहन केली आहे. भारतीय संविधानाने ज्या दिवशी सर्व नागरिकांची समता घोषित केली आणि सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा सांगितला त्या दिवशी तत्त्वत: ‘मनुस्मृती’ कायदा म्हणून भारतीय पातळीवर जळाली. तो योग बाबासाहेबांच्या जीवनात येतो. म. फुले यांच्यानंतर ‘मनुस्मृती’चे फार मोठे विरोधक म्हणून बाबासाहेबांचे नाव घ्यावे लागेल. बाबासाहेबांची ‘मनुस्मृती’विरोधी मते त्यांच्या लिखाणात सर्वत्र पसरलेली आहेत. पण ही सारी मते एकत्रपणे आणि विस्ताराने दोन ग्रंथांत नमूद झालेली आहेत. दोन्ही ग्रंथ इंग्रजीतून आहेत. एका ग्रंथाचे नाव ‘शूद्र कोण होते?’ असे आहे. दुसऱ्या ग्रंथाचे नाव ‘अस्पृश्यता’ असे आहे. ‘मनुस्मृती’ हा ग्रंथ विषम समाजरचनेचा पुरस्कार करणारा, विषमतेचे समर्थन करणारा आहे. यामुळे हा ग्रंथ निषेधार्ह व दहन करण्याजोगा आहे, हे बाबासाहेबांचे म्हणणे मला एकदम पटते.

............................................................................................................................................

नरहर कुरुंदकरांच्या उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/search/?search=Narhar+kurundkar&search_type=Authors&doSearch=1

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......