अजूनकाही
विद्रोही कवी डॉ. यशवंत मनोहर यांची ‘डॉ. आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली?’ ही पुस्तिका २००५ साली प्रकाशित झाली आहे. नागपूरच्या युगसाक्षी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेतील हा संपादित मजकूर…
.............................................................................................................................................
मागल्या शतकात जोतीराव फुल्यांनी ‘जाळून टाकावा | मनुग्रंथ||’ असे म्हटले होते (समग्र वाङ्मय, महाराष्ट्र शासन, १९९१, पृ. ५५१). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे ‘मनुस्मृती’ जाळली. ‘मनुस्मृती’ जाळण्याची योजना डॉ. आंबेडकरांनी आधीच ठरविलेली होती. ती योजनाबद्ध कृती होती. महाडला परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपाच्या दारातच शृंगारलेली वेदी तयार करण्यात आली होती. प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या परिषदेतही तसा ठराव झाला होता. रात्री ९ वाजता त्या वेदीवर ‘मनुस्मृती’ एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते जाळण्यात आली. डॉ. आंबेडकरांनी याच परिषदेत नव्या समताभारताच्या निर्मितीसाठी उपकारक ठरेल अशा नव्या स्मृतीची मागणी केली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर : कीर, नववी आवृत्ती १९९२, पृ. १०५-१०६). या ठिकाणीच मांडल्या गेलेल्या ठरावातला दुसरा ठराव ‘मनुस्मृती’च्या संदर्भातला आहे. तो ठराव असा : “शूद्र जातींचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटविणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी ‘मनुस्मृती’तील पुढील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदुमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्त्वाशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे, असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे.” (बहिष्कृत भारत आणि मूकनायक : महाराष्ट्र शासन १९९०, पृ. १६३-१६७)
‘मनुस्मृती’ जाळण्याचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ३ फेब्रुवारी १९२८च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अंकातही दिलेले आहे. ‘स्वराज्य’ या पत्राचे संपादक रा. भुस्कुटे यांनी ‘मनुस्मृती’ जाळण्याच्या संदर्भात काही आक्षेप घेणारे पत्र बाबासाहेब आंबेडकरांना पाठविले होते. त्यातील आक्षेपांना बाबासाहेबांनी सडेतोड उत्तर दिले. त्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात – “आम्ही जे ‘मनुस्मृती’चे वाचन केले आहे, त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.” (पृ. १५८ : २)
‘रिडल्स इन हिंदुइझम’ (खंड ४) या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८व्या क्रमांकाचे एक संपूर्ण रिडलच ‘MANU’S MADNESS’ म्हणजे ‘मनूचा वेडेपणा’ या नावाने लिहिले आहे. इथेही त्यांनी ‘मनुस्मृती’ची चिकित्सा केलेली आहे. बाराव्या खंडातही (पृ. ७१९-७२४) डॉ. आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ची समीक्षा केलेली आहे. काही लोकांचे असे म्हणणे असू शकते की, ‘मनुस्मृती’ ही गतकाळात होऊन गेली. आता हिंदूंच्या वर्तनाशी तिचा काहीही संबंध नाही. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, असे समजणारांची ही मोठी गफलत आहे. त्यांनी लिहिले आहे – “Manu is not a matter of the past. It is even more than a past of the present. It is a ‘living past’ and therefore as really present as any present can be.” (पृ. ७१९)
या प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार ‘मनुस्मृती’ हा वर्तमानकाळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे. याचा अर्थ असा की, ‘मनुस्मृती’ची निर्मिती इ.स.च्या आरंभकाळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे. मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातींची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद, त्याने शिकविलेली अंधश्रद्धा आणि परस्परतुच्छता या गोष्टी केवळ आज कायम आहेत असे नाही, तर त्या आज अधिक कडवे रूप धारण करीत आहेत.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4446
.............................................................................................................................................
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ जाळली त्याची ही अशी कारणे आहेत. ‘मनुस्मृती’ या नावाचे एक पुस्तक जाळणे, ‘मनुस्मृती’ या नावाची एक प्रत जाळणे, हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश नाही. ‘मनुस्मृती’ जाळणे याचा अर्थ मनुस्मृतीने लोकांच्या मनात भरलेली विषमता जाळणे असा आहे. ‘मनुस्मृती’ने लोकांच्या मनावर उच्चनीचतेचे संस्कार केलेले आहेत आणि या संस्कारापासून ती लोकांना मुक्तच होऊ देत नाही. या देशातील लोकांची मने ‘मनुस्मृती’ने विषमतेशी पक्की बांधून ठेवली आहेत. त्यामुळे लोकांना समता ही गोष्ट अस्तित्वात असू शकते असे वाटतच नाही. म्हणूनच ‘मनुस्मृती’ जाळणे म्हणजे लोकांची ही समजूत जाळणे होय. याप्रकारे लोकांची मने बदलणे, लोकांचे मानसशास्त्र बदलणे अर्थात मनांतर करणे हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश आहे. समता जाळणारा हा ग्रंथ जाळणे, लोकांची माणुसकी जाळणारा हा ग्रंथ जाळणे, हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश आहे.
माणसांमध्ये उच्चनीचतेचे हलाहल पसरवणारा मनूचा कायदा आता चालू ठेवणे योग्य नाही. मानवी मूल्यांच्या दृष्टीने, मानवअधिकाराच्या प्रतिष्ठेसाठी हा जन्मजात विषमता सांगणारा, सनातन म्हणजे विश्वारंभापासूनचा आणि तो कधी बदलू नये या हेतूने सांगितलेला हा कायदा यापुढे चालणे योग्य नाही. समतेला, स्वातंत्र्याला, बंधुतेला आणि सामाजिक न्यायालाही जन्मालाच येऊ न देणारा हा कायदा जाळून टाकायलाच हवा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तीव्रपणे वाटले आणि त्यांनी मनूच्या विषमतेला आग लावली. पवित्र मानला गेलेला हा विषमतेचा कायदा जाळला जाऊ शकतो, हे लोकांच्या मनावर बिंबवावे आणि त्यांच्या मनात स्वतंत्र विचार करण्याची, समतेची प्रस्थापना करण्याची ताकद जागवावी, हा ‘मनुस्मृती’ जाळण्यामागचा उद्देश होता, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment