अजूनकाही
सध्या सर्वत्र ‘संजू’ हा चित्रपट बघावा की न बघावा याच्या चर्चा माध्यमांसह समाजमाध्यमांवर रंगल्यात. दरम्यान चित्रपटानं संमिश्र वाहवा मिळवून शे-दोनशे कोटी दोन-तीन दिवसांत कमवले. अलीकडच्या काळात असे विरोध झालेले सिनेमेच भरपूर गल्ला जमवत असल्यानं, निर्माते आणि माध्यमंच हे सगळं घडवून आणतात काय, अशी शंका जनसामान्यांत उमटू लागली असून, हे सर्व मुद्दाम घडवलं जातं, यावर त्यांचा विश्वासही बसू लागलाय. तरीही विरोध होत राहतात, सिनेमे प्रदर्शित होऊन पैसे कमवत राहतात.
अशा वातावरणात मंगेश जोशी लिखित व दिग्दर्शित ‘लेथ जोशी’ हा मराठी चित्रपट ६ जुलै रोजी प्रदर्शित झालाय. त्याची वर्तमानपत्रांसह, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसंच डिजिटल मीडियातही परीक्षणं, समीक्षा झालीय. चित्रपटाच्या गतीचा एक मुद्दा सोडला तर हा चित्रपट एक चांगला चित्रपट आहे, यावर सगळ्यांचं एकमत आहे. सगळ्यांनीच हा चित्रपट आवर्जून पाहावा असं मत मांडलंय. आपल्याकडे काही समीक्षक इतक्या विस्तारानं सिनेमाची गोष्ट समीक्षेत लिहितात की, ती वाचल्यावर प्रेक्षकाला कुठलीच उत्सुकता राहणार नाही! समीक्षेतला हा दोष समीक्षक समजून घेतील तो सुदिन!
‘लेथ जोशी’ हा चित्रपट काय आहे, त्यात कोण आहे, काय घडतं याचे (नको) इतके तपशील आता सर्वत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती इथं करण्याचं काहीच प्रयोजन नाही. मग हा चित्रपट पहावा(च) असा आग्रह कशासाठी? त्याचं संक्षिप्त स्पष्टीकरण –
‘श्वास’ या चित्रपटाला सुवर्णकमळ पुरस्कार मिळाल्यावर मराठी चित्रपटांनी निर्मितीच्या बाबतीत हनुमान उडी मारली आणि कलात्मकतेच्या बाबतीत मराठी चित्रपट दहा पावलं पुढे गेला. म्हणजेच निर्मिती बेसुमार वाढली. त्यात अर्थातच सुमारांची सद्दी झाली, पण त्याच वेळी काही मोजक्या सिनेमांनी मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला ही मोठीच घटना आहे. उल्लेखनीय म्हणजे एखादा अपवाद वगळता ही सर्व मंडळी नव्या पिढीची व पहिल्यांदाच सिनेनिर्मिती करणारी आहेत. पण आपल्या माध्यमांनी जितकी नोंद ‘दुनियादारी’, ‘शाळा’, ‘टाईमपास १ व २’, ‘नटसम्राट’, ‘कट्यार’, ‘लय भारी’ आणि ‘सैराट’ची घेतली, तितकी या नव्या आश्वासक व चित्रपट माध्यम ‘चित्रपट’ म्हणून वापरणाऱ्या दिग्दर्शकांची घेतली नाही. उलट ‘कोर्ट’, ‘कौल’सारख्या चित्रपटांची खिल्ली याच क्षेत्रातल्या निर्माते, कलावंत व तंत्रज्ञांनी उडवली. ‘कोर्ट’ला सुवर्णकमळ देणाऱ्या परीक्षकांची तर भर थिएटरात हुर्यो उडवण्यात आली.
या पार्श्वभूमीवर ‘लेथ जोशी’ प्रदर्शित झालाय. २०१६ साली निर्माण झालेला आणि तीन महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित या चित्रपटाला प्रदर्शनाचा पडदा पाहायला २०१८ साल उजाडावं लागलं, हे लक्षात घेण्यासारखं गंभीर कारण आहे. आजघडीला चित्रपटनिर्मितीपेक्षा चित्रपट वितरण ही सर्वांत मोठी समस्या आहे. काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपटाला हिंदी चित्रपटांची स्पर्धा होती. आता ती तुलनेनं कमी होऊन मराठी चित्रपटाला मराठी चित्रपटाचीच स्पर्धा आहे. यात ‘लेथ जोशी’सारख्या सर्वथा वेगळ्या चित्रपटांची जी प्रदर्शनीय कोंडी होते, तिथं आपल्या समाजाच्या अभिरूचीचा प्रश्न उभा ठाकतो.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4448
.............................................................................................................................................
काही लोक प्रेक्षकांच्या अभिरूचीचा लसावि काढून त्यांना सरसकट झोडपतात. असे झोडपणारे हे विसरतात की, तो प्रेक्षक स्वत:च्या पैशानं तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघतो. आणि अभिरूची मिरवणारे वेळ काढून थिएटरमध्ये जात नाहीत. जागतिक सिनेमा पेन ड्राईव्हवर बघणारे जसे महाभाग आहेत, तसंच नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट मोबाईलवर पाहिला असं अभिमानानं सांगणारेही उच्च अभिरूचीवाले असतात. त्यात सध्या तंत्रज्ञानानं मोबाईल आपल्या लेड स्मार्ट टीव्हीला जोडण्याचा पर्याय दिला असल्यानं दूधात साखर!
वेगळी अभिरूची जोपासणाऱ्या मंडळींसाठी किंवा अशा मंडळींनी देशभर फिल्म सोसायटीद्वारे नवा प्रेक्षक तयार केला. तो ६० ते ९० टक्के असा चार दशकं प्रसंगी पदरमोड करून तयार केला. मात्र ९०नंतरच्या इंटरनेट क्रांतीनं फिल्म सोसायट्यांचाच ‘लेथ जोशी’ केला! एखादं कौशल्य, कला, कारागिरी नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पर्यावरणात निकामी ठरते आणि त्याभोवतीच सुगरणीच्या घरट्यासारखं आयुष्य विणलेल्यांची हतबलता, त्याची गोष्ट हा ‘लेथ जोशी’चा कणा आहे. चित्रपट माध्यमातून केलेलं हे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भाष्य हे या माध्यमाची खरी ताकद दाखवतं. परंतु मनोरंजन या उद्देशानं किंवा मार्केटसाठी मसाला भरून केलेले चित्रपट आणि त्यांना मिळणारा (त्या अर्थानं) अंध पण धो धो प्रतिसाद, हे ‘लेथ जोशी’सारख्या चित्रपटासमोरचं आव्हान आहे.
हे आव्हान लेखन\दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती या पातळ्यांवर स्वीकारल्यानंतर त्याला प्रेक्षक म्हणून सक्रिय पाठिंबा देणं, ही आपली अभिरूची जबाबदारी किंवा कर्तव्य ठरतं. कारण अगदी लो बजेट म्हटली तरी सध्या मराठी चित्रपटाची निर्मिती किमान एक ते दीड कोटीपर्यंत जाते. वितरण, प्रसिद्धी यासाठीचा खर्च वेगळाच. कलात्मक आशय देणाऱ्या चित्रपटांसाठी ३०-४० लाखांचे अनुदान देणाऱ्या शासनाच्याच चित्रपट महोत्सवात ‘लेथ जोशी’सारखे चित्रपट बेदखल होतात. तेव्हा अशा चित्रपटांची लढाई आणखी मोठी होते.
या सर्व कारणांनी ‘लेथ जोशी’सारखा चित्रपट झी वाहिनी, इरॉस, एव्हरेस्ट यांसारख्या मोठ्या वितरण संस्था व्यावसायिक मूल्यं नसल्यानं नाकारतात. या वितरण संस्थांची वितरण व प्रसिद्धीची ताकद कुणा एकांड्या व धनाढ्य(ही) निर्मात्याकडे येणं अशक्य. शेवटी अशक्यप्राय परिस्थितीतच ‘लेथ जोशी’सारखा चित्रपट प्रदर्शित होतो. प्रदर्शित झाला तरी चित्रपटगृहात तो केवळ प्रेक्षक संख्येवरच तग धरू शकतो. आणि तिथंच हा अभिरूची बदलण्याचा मुद्दा उपस्थित होतो.
‘लेथ जोशी’सारख्या चित्रपटाला केवळ बॉक्स ऑफिसवर यश मिळावं यासाठी अभिरूचीबदल घडवून हजेरी लावा असं म्हणायचं नाहीए, तर चित्रपट माध्यमाबद्दलच अधिक साक्षर होण्यासाठी ‘कोर्ट’, ‘कौल’, ‘लेथ’ जोशीसारखे चित्रपट स्वाध्याय म्हणून पाहिले पाहिजेत. बॉक्स ऑफिस सोबतीनं प्रेक्षकही घडावा.
‘श्वास’ हा एक नितांत सुंदर चित्रपट होता. त्यातील दृश्यात्मकता काही प्रसंगात लोभस होती. भावनिक मुद्द्याभोवती फिरणारा हा चित्रपट सुवर्णकमळ मिळाल्यानं(च) आर्थिक यश पाहू शकला. मात्र मराठी चित्रपटांनी बोलपटाकडून चित्रपटाकडे नेण्याची सुरुवात निशिकांत कामतच्या ‘डोंबिवली फास्ट’पासून सुरू झाली. ही वाट पुढे उमेश कुलकर्णी, सुयश डहाके, नागराज मंजुळे, अविनाश अरुण यांनी दमदारपणे पुढे नेली. पण याच पिढीतील सतीश मनवर (गाभ्रीचा पाऊस, तुहा धर्म कोनचा), आदिश केळूसकर (कौल), चैतन्य ताम्हाणे (कोर्ट) यांनी थोडा पुढचा पल्ला गाठला. या यादीत आता मंगेश जोशी हे नवा दाखल झालंय.
लेथ जोशी हा पूर्णपणे लेखक\दिग्दर्शक मंगेश जोशी यांचा चित्रपट आहे. त्यांनी हा चित्रपट त्यांना हवा तसा बनवला आहे. चित्रपटाच्या शीर्षकापासून प्रमुख कलाकार (चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी), ओम बूतकर, सेवा चौहान) निवडीपर्यंत दिग्दर्शकाची छाप दिसते. मंगेश जोशी यांचा हा ‘लेथ जोशी’ ज्या पुण्यात घडतो, ज्या पद्धतीनं घडतो, ते पाहून ‘आळेकरी शैली’ची आठवण येते. पेठांमधून अनुभवायला येणारा तिरकस पुणेरीपणा, विक्षिप्तपणा आणि जुन्या, नव्याचा संकर हे कुठल्याही स्मरणरंजन, अथवा जुनं ते सोनं किंवा विनोदाला कारुण्याची झालर न लावता कमालीच्या तटस्थतेनं कॅमेऱ्याच्या भाषेतून कथा सांगत राहतो. मंगेश जोशी यांचं हे मोठंच यश, त्यापेक्षा कर्तृत्व आहे. याच चित्रपटात त्यांनी मार्क्सवादी नेते कॉ. अजित अभ्यंकर यांना उद्योगपती बनवून आणखी एक कमाल केलीय. अभ्यंसकरही मरणासन्न उद्योगपती वाटले!
चित्रपट काहीसा संथ आहे आणि प्रमुख व्यक्तिरेखा जोशी अंमळ जास्तच रूक्ष झालीय असं अनेकांना वाटतेय\वाटू शकेल. पण आता या तंत्रमंत्राच्या पलीकडे जात आणि त्या अर्थानं गोष्ट नसलेल्या गोष्टीचा चित्रपट पाहण्यासाठीची आपली दृश्य माध्यमातली साक्षरता वाढविण्याची गरज आहे.
आपल्याला अधिक दृश्य साक्षर करण्यासाठी नव्या दमाची तरुण मंडळी उत्साहानं तयार आहेत. यापूर्वी जसं आपण अमूर्त चित्रकलेला मॉडर्न आर्ट, प्रायोगिक नाटकाला कवायत किंवा प्रायोगिक सिनेमाला वास्तववादाचा कडेलोट म्हणून हिणवलं, वाळीत टाकलं, शिक्के मारले. पण त्यातूनच आजची आपली चित्रसाक्षरता वाढल्यानं आपल्याला ‘न्यूड’ पाहायला मिळतो, ‘मसान’ पाहायला मिळतो, ‘वीर दी वेडिंग’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ समजून घेता येतो.
मंगेश जोशीच्या ‘लेथ जोशी’नं एकाच चित्रपटातून अनेक गोष्टी शिकण्याची संधी दिलीय. त्यातली सर्वांत महत्त्वाची म्हणजे भावनातिरेक टाळून रेल्वे ज्या लीलया रूळ बदलते, त्या पद्धतीनं तो समाज बदल दाखवतो, तोही तटस्थपणे.
‘संजू’वर तुटून पडणाऱ्या व ‘झिंगाट’वर थिरकणाऱ्या कोलाहलात ‘लेथ जोशी’ एखाद्या कवितेसारखा अनुभव देतो. म्हणून तो पाहायला(च) हवा.
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Sun , 22 July 2018
Alka Gadgil
Wed , 18 July 2018
Thanks for Chitra saksharta