अजूनकाही
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाटच नव्हे, तर जनतेच्या मोदी यांच्यावरील विश्वासाची सुनामी आहे. त्यामुळेच भाजपला यश मिळाले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील भाजपचा विजय साजरा केला.
१६४ मतदारसंघांमध्ये ५२ नगराध्यक्ष, त्यातले निम्मे विदर्भातले, निवडून आलेल्या सर्वाधिक नगरसेवकांची ८५१ ही संख्या दुसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेसपेक्षा जेमतेम १०० ने जास्त, त्यातही निम्मे विदर्भाचे, युती आणि आघाडी यांच्यातली तफावत तर जेमतेम ८० जागांची; ही सुनामी असेल तर ती कोणत्या जलशिवारात उसळली आहे, तेही सांगून टाकायला हरकत नाही, अध्यक्षमहोदय!
……………………………
२. प्रश्नोत्तरांच्या तासात काँग्रेसने जाणूनबुजून सभात्याग केला आहे. चर्चेमध्ये आपण उघडे पडू अशी त्यांना भीती वाटत आहे. हे खूपच दुर्दैवी आहे. देशातली जनता अशा राजकारणाला वैतागली आहे. या कृत्याने काँग्रेस नागरोटामधील शहीदांचा अपमान करत आहे : वेंकय्या नायडू.
देशातली जनता अशा राजकारणाला वैतागली असती, तर २०१४आधीच्या दहा वर्षांत तुम्ही हेच करत आलात, त्याची बक्षिसी २०१४च्या बहुमताने दिली गेली नसती. आपण सभागृह बंद पाडतो तेव्हा त्यासाठीचं कारण तेवढं महत्त्वाचं असतं, असं एकेकाळी तुम्हाला वाटत होतं, आता काँग्रेसला वाटतं.
……………………………
३. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलाला वाढदिवसाला मर्सिडीझ भेट दिली. त्यांना अनेक महागड्या गाड्यांचा शौक असून विक्रोळीच्या चाळींमध्ये दारिद्र्यात बालपण व्यतीत केल्यानंतर त्यांनी अतिश्रीमंतीत झेप घेतली आहे. त्यांचं वांद्र्यात तीनमजली घर असून घाटकोपरमध्येही आलिशान बंगला कम कार्यालय आहे.
हे पाहा. गाडीची सगळी रक्कम त्यांनी चेकने दिली आहे, असा खुलासा केलाच आहे. शिवाय, त्यांच्या खात्यांमधल्या आठ नोव्हेंबरनंतरच्या व्यवहारांची माहिती अमित शहांकडे (हा हा हा हा) जाईलच. नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला कसा आळा बसला आहे, हे सांगण्यासाठी ते विविध वृत्तवाहिन्यांवर चमकत होते की नाही? मग त्यांच्या सचोटीवर आणि देशभक्तीवर शंका कशी घेता तुम्ही?
……………………………
४. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 'फिर से' या कुणाल कोहली दिग्दर्शित चित्रपटासाठी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ ऑपेरा हाऊस येथे चित्रित, अहमद खान यांच्या नृत्यदिग्दर्शनात अमिताभ बच्चनबरोबर अमृता झळकल्या, भूषण कुमार यांची निर्मिती.
'फिर से' असं अल्बमचं नाव असल्यामुळे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुत्राचा चित्रपट, त्यांनीच रामगोपाल वर्माला घेऊन दहशतवादी हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या ताजमहाल हॉटेलचा मारलेला फेरफटका, माजी पंतप्रधानांच्या कविता गाणाऱ्या गायिकेला, त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला लाभलेले राष्ट्रीय सन्मान, अशा विविधरंगी आठवणींचा पट 'फिर से' जागा झाला मनात.
……………………………
५. नोटाबंदी निर्णयानंतर नोकरदारांचा पहिला पगार आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनची रक्कम बँक खात्यात जमा होणार असताना बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा असल्याने बँकांसमोरच्या रांगाही कायम आणि पैसे काढण्यावर सर्वत्र अघोषित मर्यादाही कायम.
या निर्णयाने काल्पनिक काळ्या पैशावाल्यांचं धाबं दणाणणार असल्याच्या आनंदात 'मी मरेन, पण तुला रंडकी करीन' या चेवाने रांगा लावलेल्या तमाम देशभक्तांच्या पदरात आता कॅशलेस इकॉनॉमीचं पिंटुकलं गाजर पडलेलं आहे… पण, आता मारुतीच्या बेंबीत बोट अडकलंय, गार गार लागतंय म्हणण्यावाचून गत्यंतर काय?
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment