ज्यांना खऱ्या अर्थानं विचारवंत म्हणता येईल, अशा नरहर कुरुंदकरांचा काल (१५ जुलै) जन्मदिन होता. त्यानिमित्तानं हा लेख... ‘सेक्युलॅरिझम’ ही संकल्पना भारतात कायमच सोयीस्कर वापरली जाते. या संकल्पनेचं राज्यघटनेनुसार विश्लेषण करणाऱ्या कुरुंदकरांच्या विचारांची ओळख करून देणारा...
.............................................................................................................................................
‘सेक्युलॅरिझम’ हा भारतीय राजकारणात अत्यंत महत्पदास पोहोचलेला विषय आहे. भारतातील प्रत्येक पक्ष आपण ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचं सांगतो. आपलीच धर्मनिरपेक्षता खरी व दुसऱ्यांची खोटी (सुडो) असे म्हणत धर्मनिरपेक्षतेबद्दल संभ्रम निर्माण करतो. धर्मनिरपेक्षतेच्या अर्थासंदर्भात ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या म्हणीप्रमाणे ‘व्यक्ती तितक्या व्याख्या’ अशा प्रकारचा गोंधळ निर्माण झाला आहे. राज्यघटनेत पुरस्कार केलेल्या धर्मनिरपेक्षतेचा नीट अर्थ स्पष्ट करून तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसा प्रयत्न झालेला नाही.
नरहर कुरुंदकरांचं या विषयावरील लेखन अत्यंत महत्त्वाचं असून त्याची चर्चा होणं फार गरजेचं आहे. कुरुंदकरांनी भारतीय संविधानाच्या चौकटीत धर्माचा व धर्मनिरपेक्षतेचा घटनाकर्त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ आपल्या प्रभावी व तर्कनिष्ठ लेखनशैलीद्वारे मांडला आहे. त्यांच्या मते ‘भारतात अनेक धर्म आहेत म्हणून धर्मनिरपेक्षतेची आवश्यकता आहे, हा समज अत्यंत चुकीचा आहे. भारतात फक्त हिंदू धर्म हा एकच धर्म असता तरी आजच्या एवढीच धर्मनिरपेक्षतेची गरज भासली असती. धर्मनिरपेक्षतेचा जन्म दोन धर्माच्या संघर्षातून होत नसतो, तर मनुष्याच्या पारलौकिक व ऐहिक या दोन जीवनाच्या संघर्षातून होत असतो. पारलौकिक जीवनावर धर्माचे मर्यादित अधिपत्य तर ऐहिक जीवनावर राज्याचे म्हणजेच शासनाचे सार्वभौमत्व मान्य करणे हेच भारतीय धर्मनिरपेक्षतेचे गमक आहे.’ कुरूंदकरांनी धर्मनिरपेक्षतेच्या अर्थाचं केलेलं स्पष्टीकरण हे भारतीय संविधानातील अर्थाचंच स्पष्टीकरण आहे.
‘secularism’ या शब्दाचं नेमकं मराठी भाषांतर करणं तसं अवघड काम आहे. ‘अधर्मी’, ‘निधर्मी’, ‘धर्मातीत’ या शब्दांनी त्याचा अर्थ नीटसा स्पष्ट होत नाही, पण ‘इहलोकवादी’ किंवा ‘इहलौकिक’ या सारख्या शब्दांनीसुद्धा तो स्पष्ट होत नाही. त्यातून उलट गोंधळ वाढण्याचीच शक्यता जास्त.
‘सेक्युलॅरिझम’ला दीर्घ असा इतिहास असून त्याचा क्रमक्रमानं विकास होत गेल्यानं, ही संकल्पना, तिचा इतिहास, तिचा विकास समजून घेणं आणि या शब्दाच्या भाषांतराच्या भानगडीत फारसं न पडणं हेच श्रेयस्कर.
फार तपशीलात न जाता सांगायचं तर ‘धर्म म्हणजे माणसाच्या फक्त पारलौकिक जीवनाचा विचार करणारी संस्था किंवा संकल्पना’ असं सेक्युलॅरिझम मानतो. इहलौकिक आचारावर बंधन टाकणं हा सर्व धर्मांच्या विचारांचा पाया आहे आणि सर्व धर्मांना फक्त पारलौकिक बाबींपुरतं मर्यादित करून त्यांचा इहलौकिक प्रभाव नाममात्र करणं हा ,सेक्युलॅरिझमचा गाभा आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
हा पारलौकिक अधिकाराचा मुद्दा दिसतो, तितका साधा किंवा निरुपद्रवी नाही. बोरातल्या आळीत तक्षक लपावा, तसा या एका सूत्रात धर्माचा सारा विषारीपणा लपलेला असतो. माणूस मेल्यावर जरी त्याचा आत्मा परलोकात जातो आणि तिथं तो शरीरापासून वेगळा असतो, तरी इहलोकातील पाप-पुण्यापासून तो मुक्त असत नाही. त्यामुळे धर्म इहलोकात माणसाचं आयुष्य नियंत्रित करतो.
जेव्हा सेक्युलॅरिझम धर्म ही फक्त पारलौकिक बाबींवरचं नियमन करणारी संकल्पना मानतो, तेव्हा तो धर्माचे इहलोकातील अस्तित्व नाममात्र करतो. त्या अर्थानं सेक्युलॅरिझम हा धर्मद्रोह आहे. धर्मानं निर्माण केलेली गुलामी टिकवून ठेवण्यात राजेशाही व सरंजामशाहीचे हितसंबंध गुंतलेले असतात, म्हणून सेक्युलॅरिझमला आपल्या शेजारी व्यक्तीस्वातंत्र्याचं मूल्य निर्माण करून जोपासावं लागतं.
या पार्श्वभूमीवर संविधान ‘सेक्युलर’ आहे म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर कुरुंदकरांनी त्यांच्या ‘वाटा माझ्या तुझ्या’ या ग्रंथात दिलं आहे. त्यांनी सेक्युलॅरिझमच्या तीन कल्पना सांगितल्या आणि तो अर्थ भारतीय सेक्युलॅरिझमला लागू होत नाही, हेही सांगितलं. जी कल्पना भारतीय संविधानात स्वीकारण्यात आली आहे, ती सेक्युलॅरिझमची चौथी कल्पना आहे.
या कल्पनेप्रमाणे प्रत्येक नागरिकाला धर्माबाबत स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ज्यांना जडवादी व्हायचं असेल त्यांना जडवादी होता येईल. ज्यांना एखाद्या धर्मात राहून त्या धर्माच्या काही पद्धती सोडायच्या असतील त्या सोडता येतील. धर्मसत्तेला व्यक्तीचं नियंत्रण करता येणार नाही. व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारता येईल. धर्मत्याग करता येईल. धर्मविषयक बाबतीत प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य हा भारतीय सेक्युलॅरिझमचा मूलाधार आहे.
संसदेचा कायदा सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या कायद्याच्या विरोधी जाणारा सार्वजनिक जीवनाचा भाग धर्माच्या कक्षेतून रद्द होतो. सार्वजनिक व्यवहार (इहलौकिक) राज्यसत्तेच्या ताब्यात असला पाहिजे आणि खाजगी जीवनातील धर्मस्वातंत्र्य सामान्य नीतीमता, शिष्टाचार, आरोग्य आणि सार्वजनिक हित यांच्या विरुद्ध उपयोगात येऊ शकणार नाही. या भूमिकेवर भारतीय संविधानानं स्वीकारलेला सेक्युलॅरिझम जीवनाचं आधुनिकीकरण, व्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही यांच्याशी बांधलेला, सर्वांना समान हक्क व न्याय देणारा आहे.
कुरुंदकरांच्या या अर्थानुसारच भारतीय संविधानानं कलम २५ नुसार धर्मस्वातंत्र्य फक्त पारलौकिक व अध्यात्मिक बाबींपुरतं मर्यादित केलं आहे. त्यानुसार धर्म मर्यादित अर्थानं (परलोकापुरता) शिल्लक राहतो आणि मानवी जीवनसुद्धा धर्माच्या कचाट्यातून मुक्त होतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
कुरुंदकरांचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी सेक्युलॅरिझमचा संविधानातील अर्थ सांगून भारतीय सेक्युलॅरिझमसमोरील आव्हानांची अचूक मीमांसा केली आहे. मुस्लिम जमातवाद व त्याच्या प्रतिक्रियेतून वाढत असलेला हिंदू जमातवाद समजून घेताना हिंदू व मुस्लिम मनाचा शोध घेतला. सर्व समाजहिताच्या, विकासाच्या तळमळीतून कुरुंदकर त्यांच्या ‘अन्वय’ या ग्रंथातील ‘धर्म आणि मन’ या लेखात म्हणतात, “सेक्युलर राजकारणाची प्रचंड स्पर्धा मुस्लिम अंधश्रद्धांना कुरवाळण्यासाठी, गोंजारण्यासाठी चालू असते. भारतीय राजकारणात सेक्युलॅरिझमचा विचार हा अल्पसंख्याकांच्या हितरक्षणासंदर्भात करण्याची घोडचूक नेहमीच केली जाते, जी त्याच्या मूळ संकल्पनेला मारक आहे. भारतीय नेते धर्मस्वातंत्र्याची जी कल्पना मांडतात, ती कल्पना व विचार हिंदूपद्धतीप्रमाणे असते. या पद्धतीप्रमाणे मनुष्य समूहाचे अनेक धर्म असू शकतात. प्रत्येकाने आपल्या धर्माप्रमाणे वागावे, दुसऱ्यालाही त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य द्यावे. भारतीय संविधानात याच पद्धतीने धर्मस्वातंत्र्याची कल्पना स्वीकारलेली आहे. मुसलमानांची तक्रार ही असते की, हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार स्वीकारलेली ही कल्पना आमच्या वर लादू नका. हे हिंदू धर्मांचे आमच्यावर आक्रमण आहे. आम्हाला असे धर्मस्वातंत्र्य नको आहे, तर आमच्या इस्लामच्या पद्धतीनुसार धर्मस्वातंत्र्य पाहिजे आहे.”
इस्लामनुसार धर्मस्वातंत्र्य म्हणजे काय, हे कुरुंदकर सांगतात, “इस्लाम हाच जगातील एकमेव सत्य धर्म असून बाकी सारे धर्म खोटे असल्यामुळे ते नष्ट करण्याचा अधिकार इस्लामनेच मुसलमानांना दिलेला आहे. त्यानुसार धर्मस्वातंत्र्य म्हणजे इतरांना मुसलमान करण्याचा हक्क, इस्लामेतरांविरुद्ध जिहाद करून त्यांना गुलाम करण्याचा किंवा ठार मारण्याचा हक्क, इस्लाम प्रदेशनिष्ठा जाणत नसल्यामुळे व जगाचे एकच मुस्लिम राज्य करण्यावर विश्वास ठेवीत असल्यामुळे भारताला राष्ट्र न मानण्याचा हक्क बिगर इस्लामी राजवट असेल तर तिच्या विरुद्ध लढण्याचा हक्क, पैगंबरांवर किंवा कुराणावर कोणी टीका करू लागला तर त्यांचे हातपाय तोडण्याचा हक्क, इस्लाममधील काही भाग आज उपयोग शून्य झाला आहे असे म्हणणाऱ्यांना मृत्यूदंड देण्याचा हक्क इत्यादी त्यात येतात. या आमच्या पद्धतीनुसार भारतीय संविधानाने आम्हाला हे धर्मस्वातंत्र्य दिलेले नाही अशी मुसलमानांची तक्रार असते. ही तक्रार हिंदू राज्यकर्त्यांना समजत नसते, कारण त्यांना फक्त हिंदू पद्धतीनेच विचार करता येतो. त्यांचे मन हिंदू असल्यामुळे ते मुसलमानांचा धर्म, मन, प्रेरणा, इच्छा इ.काहीही समजून घेऊ शकत नाहीत.”
मुस्लीम समस्या ही समस्या आहे, हे हिंदूना का वाटत नाही, याचं कुरुंदकरांनी दिलेलं स्पष्टीकरण हे असं आहे. भ्रमावर जगणारा हा समाज सत्याच्या प्रकाशात जागा कसा होईल, हा एक प्रश्न आहे आणि हिंदू समाजात असणारी मुस्लीम समाजाबाबतची उदासीनता कमी कशी होईल हा दुसरा प्रश्न आहे. सेक्युलर राज्यव्यवस्थेत अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण होत असेल तर ती एक अनुषंगिक बाब झाली. सेक्युलॅरिझम फक्त अल्पसंख्याकांच्या हितरक्षणासाठी नसतो, तर तो मुख्यत्वे बहुसंख्याकांच्या हितरक्षणासाठी व हितसंवर्धनासाठी असतो, ही बाब नजरेआड करून चालणार नाही. जर सेक्युलॅरिझम समाजाला धर्माच्या गुलामगिरीतून मुक्त करून समतेकडे आणि विकासाकडे घेऊन जात असेल तर त्याला समाजातील बहुसंख्याकांच्या हिताला नजरेआड करून कसं चालेल? भारतात हिंदू हे बहुसंख्य (८५ टक्के) आहेत म्हणून सेक्युलॅरिझम त्यांना धर्माच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आवश्यक आहे.
मुसलमान किंवा ख्रिश्चन या देशात असले काय किंवा नसले काय सेक्युलॅरिझमला त्यानं काही फरक पडत नाही, कारण सेक्युलॅरिझम सामाजिक पातळीवर धर्माचं प्रभाव क्षेत्रच मानत नाही. भारत हे हिंदू राष्ट्र बनलं पाहिजे असं म्हणणाऱ्यांची संख्या काही थोडीथोडकी नाही. किंबहुना हे मत असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. खरं पाहता त्यांच्यापैकी कोणाजवळही हिंदू राष्ट्राची स्पष्ट कल्पना नाही किंवा असेलच तर ती त्यांना उघडपणे सांगावीशी वाटत नसावी.
हिंदू राष्ट्राच्या समर्थकांना उद्देशून कुरुंदकर म्हणतात, “हिंदू राज्य म्हणजे काय, हा प्रश्न हिंदुत्ववाद्यांना एकदा विचारला पाहिजे. भारतीय संविधानात स्मृतीच्या कायद्याविरुद्ध कोणताही कायदा अस्तित्वात असणार नाही, जो कायदा ज्या प्रमाणात विरोधी जाईल, तो कायदा त्या प्रमाणात रद्द होईल, असे कलम समाविष्ट करण्यास भारतातील हिंदुत्ववादी तरी तयार आहेत काय? धर्मशास्त्राप्रमाणे हिंदू राज्य करायचे तर स्त्रियांचे समानतेचे हक्क रद्द केले पाहिजेत. अस्पृश्यांचे सगळे हक्क रद्द करून त्यांना शिक्षण बंदी केली पाहिजे. जातीजातींना आपापसात विवाह करण्यास बंदी केली पाहिजे आणि ब्राह्मण राज्याने अवध्य मानला पाहिजे. असल्या प्रकारची हिंदू धर्मशास्त्राला अनुसरणारी राज्य रचना हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांना तरी मान्य आहे काय? कारण हे राज्य हिंदूंनाच गुलाम बनविते अन्य धर्मीयांचा तर विचारच नाही. हेच सूत्र सर्व धर्मराज्यांना सारखे लागू पडते.”
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
कुरुंदकर धर्मांध वृत्तीचा समाचार घेताना जसे हिंदूचा समाचार घेतात, तसाच ते मुसलमानांचाही घेतात. जे कोणी हिंदू मुस्लिमांना भारतातून हाकलून द्यायची गोष्ट करतात किंवा स्वप्नं बघतात त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, २०-२५ कोटी लोकसंख्येला देशातून हाकलून देणं ही सोपी गोष्ट नाही आणि ती हिंसा व अत्याचाराविना घडणं शक्यही नाही. हिंसा आणि विध्वंस या गोष्टी मूल्यांचा ऱ्हास करतात. त्यामुळे हजारो वर्षांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा मातीमोल होतो. राजाराम मोहन रॉय ते अगदी अलिकडच्या नरेंद्र दाभोलकरांसारख्या समाजसुधारकांनी जे काही थोडेफार हिंदू समाजाला आधुनिक, समजूतदार, विज्ञाननिष्ठ, सहिष्णू बनवलं आहे ते समूळ नष्ट होण्याचा धोका यात आहे. एवढी मोठी किंमत देणं आपल्याला परवडणार नाही.
सेक्युलॅरिझमची गरज आपल्याला गेल्या २०० - २५० वर्षांतल्या पुरोगामी हिंदू चळवळीनं जे काही या हिंदू धर्माला दिलं आहे, जे काही थोडंफार प्रबोधन झालं आहे त्याच्या रक्षण व संवर्धनासाठी आहे. कुरुंदकर म्हणतात, मुस्लिम समाजात आधुनिक मन निर्माण करणारी प्रभावी सेक्युलर चळवळ असती, आपल्याच धर्माने निर्माण केलेल्या आपल्याच प्रजेच्या गुलामगिरीची चीड असणारे मन जर मुस्लिम समाजात निर्माण झाले असते, तर फक्त हा सेक्युलर प्रवाहच फाळणी टाळू शकला असता. तसा प्रवाह नव्हता हे फाळणीचे मूळ कारण.
आजही वाढत्या हिंदू जातीयवादास रोखण्यासाठी मुस्लिम समाजात सूधारणावाद प्रभावी करणं एवढा एकच उपाय असू शकतो. हिंदूंनाही एकत्र येण्यासाठी आपल्या मनावरील धर्माचा सगळा गंज घासूनपुसून काढणं आवश्यक आहे. ज्या दिवशी हे जमेल त्या दिवशी मुसलमानांवर चिडण्याची गरज संपलेली असेल, कारण पंच्याऐंशी टक्के जनता मनानं आधुनिक होण्याची प्रक्रिया घडत असतानाच पंधरा टक्के आपोआपच आधुनिक होत असतात. भारतीय सेक्युलॅरिझमचा खरा प्रश्न भारतीय संविधानाच्या चौकटीत मुस्लिम जमात कशी पचवावी हा नाही, पंच्याऐंशी टक्के असणारा हिंदू समाज मनानं ‘सेक्युलर’ कसा करावा हा आहे.
.............................................................................................................................................
लेखक डॉ. दत्ताहरी होनराव श्री हावगीस्वामी महाविद्यालय (उदगीर) इथं राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहेत.
dattaharih@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 19 July 2018
दत्ताहरी होनराव, काही निरीक्षणे व भाष्ये नोंदवतो. १. >> राज्यघटनेत पुरस्कार केलेल्या धर्मनिरपेक्षतेचा नीट अर्थ स्पष्ट करून तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसा प्रयत्न झालेला नाही. >> राज्यघटनेत कुठेही सेक्युलर या शब्दाची व्याख्या दिलेली नाही. २. >> सर्व धर्मांना फक्त पारलौकिक बाबींपुरतं मर्यादित करून त्यांचा इहलौकिक प्रभाव नाममात्र करणं हा ,सेक्युलॅरिझमचा गाभा आहे. >> सेक्युलर हा शब्द ख्रिश्चन आहे. जेव्हा ख्रिश्चन चर्चचे धार्मिक वादविवाद व्हायचे त्या वेळी पारलौकिक संबंध नसलेली कृत्ये सेक्युलर मानली जात. कुरुंदकरांनी लावलेला अर्थ नेमका ख्रिश्चन धर्मगुरूंना अभिप्रेत असलेलाच अर्थ आहे. हा योगायोग नाही. ३. >> संसदेचा कायदा सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या कायद्याच्या विरोधी जाणारा सार्वजनिक जीवनाचा भाग धर्माच्या कक्षेतून रद्द होतो. >> याचा सेक्युल्यारिझमशी काहीही संबंध नाही. ४. >> त्यानुसार धर्म मर्यादित अर्थानं (परलोकापुरता) शिल्लक राहतो आणि मानवी जीवनसुद्धा धर्माच्या कचाट्यातून मुक्त होतं. >> हा जो धर्म आहे ते केवळ कर्मकांड आहे. भारतात धर्म हा शब्द कर्तव्य या अर्थीही वापरला जातो. त्यामुळे भारतातला धर्म इहलोकातही पाळला जाणं अपेक्षित आहे. कर्तव्यासंबंधी राज्यघटना कसलंही मार्गदर्शन करीत नाही. ऐहिक धर्म मोडीत काढण्यापूर्वी थोडा विचार करायला हवा. ५. >> मुसलमान किंवा ख्रिश्चन या देशात असले काय किंवा नसले काय सेक्युलॅरिझमला त्यानं काही फरक पडत नाही, कारण सेक्युलॅरिझम सामाजिक पातळीवर धर्माचं प्रभाव क्षेत्रच मानत नाही. >> साफ चूक. सेक्युलॅरिझम हा शब्दच मुळी ख्रिश्चन आहे. ६. >> हिंदू राष्ट्राच्या समर्थकांना उद्देशून कुरुंदकर म्हणतात, “हिंदू राज्य म्हणजे काय, हा प्रश्न हिंदुत्ववाद्यांना एकदा विचारला पाहिजे....." >> प्रश्न समर्पक आहे. भारताला मातृभूमी मानणाऱ्या सर्वांच्या कर्तव्याविषयी तेवत असलेली सामायिक जाणीव हा हिंदुराष्ट्राचा गाभा आहे. ७. >> भारतीय संविधानात स्मृतीच्या कायद्याविरुद्ध कोणताही कायदा अस्तित्वात असणार नाही, जो कायदा ज्या प्रमाणात विरोधी जाईल, तो कायदा त्या प्रमाणात रद्द होईल, असे कलम समाविष्ट करण्यास भारतातील हिंदुत्ववादी तरी तयार आहेत काय? >> हो. गरज काय घटनेच्या विरोधात जायची? घटनादुरुस्तीची सोय आहे ना? ८. >> " .... अस्पृश्यांचे सगळे हक्क रद्द करून त्यांना शिक्षण बंदी केली पाहिजे. जातीजातींना आपापसात विवाह करण्यास बंदी केली पाहिजे आणि ब्राह्मण राज्याने अवध्य मानला पाहिजे. असल्या प्रकारची हिंदू धर्मशास्त्राला अनुसरणारी राज्य रचना हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांना तरी मान्य आहे काय? कारण हे राज्य हिंदूंनाच गुलाम बनविते अन्य धर्मीयांचा तर विचारच नाही. हेच सूत्र सर्व धर्मराज्यांना सारखे लागू पडते.” >> हा कुरुंदकरांचा जावईशोध आहे. हा प्रकार त्यांना कुठे सापडला? काही संदर्भ वगैरे ? ९. >> जे कोणी हिंदू मुस्लिमांना भारतातून हाकलून द्यायची गोष्ट करतात किंवा स्वप्नं बघतात त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, २०-२५ कोटी लोकसंख्येला देशातून हाकलून देणं ही सोपी गोष्ट नाही >> पाकिस्तान्यांना पडतात का असले प्रश्न ? १०. >> .... तर फक्त हा सेक्युलर प्रवाहच फाळणी टाळू शकला असता. तसा प्रवाह नव्हता हे फाळणीचे मूळ कारण. >> कुरुंदकरांना फाळणीकालीन इतिहासाचं काडीमात्र ज्ञान नाही. जिना टिळकांबरोबर होता तेव्हा सेक्युलरच होता ना? मग तो फाळणीवादी कसा काय झाला ? यासंबंधी कुरुंदकरांचा काही अंदाज वा निरीक्षण वा अनुमान उपलब्ध आहे का ? ११. >> ज्या दिवशी हे जमेल त्या दिवशी मुसलमानांवर चिडण्याची गरज संपलेली असेल, .... >> मुसलमान आपापसांत इतके झगडताहेत की त्यांच्यावर कोणीही हिंदूने चिडायची गरजच नाहीये हो. असो. नव्या परिस्थितीमुळे कुरुंदकरांच्या विचारांवर नव्याने चिंतन झालं पाहिजे. आपला नम्र, -गामा पैलवान