अजूनकाही
कायली जेन्नर ही अमेरिकन तरुणी. वयानं फक्त २० वर्षांची. एका पाच महिन्यांच्या मुलीची आई. नुकतीच ती ‘फोर्ब्स’ पाक्षिकाच्या ३१ ऑगष्ट रोजी प्रकाशित होणाऱ्या अमेरिकेतील ‘स्व-कर्तृत्वानं बिलिओनियर झालेल्या महिलांची’ यादी असलेल्या अंकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. ऑगष्टमध्ये कायली २१ वर्षांची होईल.
‘फोर्ब्स’च्या माहितीप्रमाणे पुढील एका वर्षांत कायली फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याचाही रेकॉर्ड मोडीत काढत, त्याला पाठीमागे टाकून जगातील पहिली वयानं सर्वांत लहान पण स्व-कर्तृत्वानं बिलिओनियर बनणारी पहिली व्यक्ती ठरेल.
असं एवढ्या लहान वयात कुणी ‘सेल्फ मेड बिलिओनियर’ झाल्याचं दुसरं उदाहरण सापडणार नाही. अमेरिकत श्रीमंत होण्यासाठी एवढ्या जबरदस्त संधी उपलब्ध आहेत की, तिथं आज रस्त्यावर झोपणारा भिकारीदेखील उद्या श्रीमंत होऊ शकतो. असा चमत्कार फक्त मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेतच होऊ शकतो. अगदी रस्त्यावर झोपणारा, गरिबीत आपलं जीवन जगणारा, पोटाची भूक भागवण्यासाठी अमेरिकेतील इस्कॉन संस्थेच्या हरीकृष्णा मंदिरात जेवण करण्यापासून ते अॅपल कंपनीची सुरुवात करत बिलिओनियर झालेल्या स्टीव्ह जॉब्ससारखी अनेक उदाहरणं अमेरिकेत सापडतील. पण स्टीव्ह जॉब्स वयाच्या ४० व्या वर्षी बिलिओनियर झाला, तर वंचित अशा वर्णद्वेषाचा शिकार ठरलेल्या अश्वेतवर्णीय ओप्रा विन्फ्री या वयाच्या ४९ व्या वर्षी, बिल गेटस वयाचा २६ वर्षी बिलिओनियर झाले. झुकेरबर्ग वयाचा २३ व्या वर्षी तर, ‘स्नॅपचॅट’चा संस्थापकही आपल्या वयाचा विशीतच कोट्यधीश झाला होता.
पण कायली स्पेशल यासाठी ठरते, कारण ती या सर्वांचाही आधी फक्त वयाच्या २१ व्या वर्षी, पुढील वर्षभरात बिलिओनियर बनेल. ‘फोर्ब्स’च्या माहितीप्रमाणे आज तिची एकूण संपत्ती $900mn ची आहे. ‘फोर्ब्स’च्या ‘Self made Richest American Women’च्या चौथ्या यादीत कायलीचा नंबर २७ वा आहे. या यादीत अमेरिकीन पॉप सिंगर बियाँन्स नोवेलेस (Beyonce Knoweles) आणि टेलर स्विफ्ट (Taylor Swift) च्याही पुढे तिला स्थान मिळालं आहे. आज बियाँन्सची एकूण संपत्ती $ 335mn ची आहे, तर टेलरची $330mn.
कायलीला यापूर्वी २०१४-१५चा टाईम्सचा जगातील सर्वांत जास्त प्रभावशाली किशोरवयीन मुलांच्या यादीतदेखील स्थान मिळालं होतं. ‘फोर्ब्स’चा चौथ्या वार्षिकाच्या मुखपृष्ठासाठी निवड झाल्यानंतर कायलीनं आपल्या इन्स्टाग्रामवरील ११० मिलियन चाहत्यांचे नि ‘फोर्ब्स’चे आभार मानताना लिहिंल की, “Thank you for this article and Recognition. I'm so blessed to do what I love everyday. I couldn't have dreamed this up!”
कोण ही कायली जेन्नर? तिचा व्यवसाय नक्की कोणता? तिनं एवढ्या लहान वयात इतके पैसे कमावले कसे? कार्देशियन (Kardashian) कुटुंब अमेरिकेत प्रसिद्ध आहे. आम्हा भारतीयांना अमेरिकन टीव्ही सेलिब्रिटी किम कार्देशियन (Kim Kardashian) नक्की माहिती असेलच. याच कार्देशियन कुटुंबांतील सर्वांत लहान सदस्य, या किमीची छोटी बहीण म्हणजे कायली जेन्नर! वयाचा १० व्या वर्षीच कायली ‘Living With Kardashians’ या रिअॅलिटी टीव्हीमध्ये आपल्या कुटुंबासोबत सामिल झाली नि प्रसिद्धीस पावली. पण सेलिब्रिटी कुटुंबातील असल्या कारणानं मोठ्या होणाऱ्या कायलीला स्वतःचं वेगळं असं अस्तित्व निर्माण करण्यास अडचणी येऊ लागल्या. याच आपल्या कुटुंबाच्या प्रसिद्धीच्या मदतीनं तिनं ‘Puma’ आणि ‘PacSun’ वगैरेंसारख्या ब्रँडसाठी मॉडेलिंगदेखील केलं. याच वेळी इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर तिच्या चाहत्यांची संख्याही वाढत होती. पुढे याच सोशल मीडियाचा तिला आपला व्यवसाय उभारण्यास मदत होणार होती.
इन्स्टाग्रामवर कायलीचे जवळपास ११० मिलियन फॉलोअर्स आहेत. यातील बहुसंख्य फॉलोअर्स हे १८ ते ३४ वयोगटातील स्त्रिया आहेत. याच स्त्रिया पुढे तिचा ग्राहक वर्ग ठरणार होता. सोशल मीडियावर तिनं आपल्या सिग्नेचर ठरलेल्या ‘लीप पॉवट’चे फोटो नि व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे आपल्या सुंदर ओठांचा वापर तिने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी केला.
‘फोर्ब्स’ मासिकानं कायलीनं आपल्या ओठांचा व्यवसाय उभा करण्यासाठी ज्या कल्पकतेनं वापर केला, त्याचं वर्णन काहीसं असं केलं आहे – “What her half sister Kim Kardashian West did for booty, Kylie did for the lips.” (तीची मोठी बहीण किमनं आपल्या सुंदर, सुडौल नितंबांचा वापर प्रसिद्धी नि पैसा कमवण्यासाठी केला, तर कायलीनं आपल्या सुंदर ओठांचा!)
दोन वर्षांपूर्वी कायलीनं आपल्या मॉडेलिंगमधून मिळालेल्या पैशाचा वापर करत ‘Kylie Cosmetics’ नावाची एक कंपनी स्थापन केली. तिनं या कंपनीमार्फत स्त्रियांच्या ओठांना सुंदर आकार देण्यासाठी एक ‘लीप किट’ बनवून ते विकण्यास सुरुवात केली. तिचा संपूर्ण व्यवसाय ऑनलाईन होता. तिनं लीप किट लाँचं केल्याचं सोशल मीडियावरून जाहीर करताच, पुढल्या क्षणी तिचे १५,००० च्या आसपास लीप किट विकलेसुद्धा गेले. ‘eBay’सारख्या वेबसाईटवर $29 किमतीचं लीप किट पुन्हा विक्रीमध्ये $1000 पर्यंत विकलं जाऊ लागलं.
कायलीचं हे लीप किट खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये एवढी उत्सुकता असायची की, इंटरनेट सर्व्हर कधीकधी बंद पडायचे. कायली आपल्या कंपनीचा लीप किटमधील वेगवेगळ्या रंगांतील प्रॉडक्टसची जाहिरात करण्यासाठी तासातासाला इंस्टाग्रामवर आपले फोटो नि व्हिडिओ अपलोड करू लागली. थोड्याच दिवसांत तिची ‘Kylie Cosmetics’ ही कंपनी ‘सौंदर्य प्रसाधन उद्योगा’तली सर्वांत जास्त नावारूपाला आलेली कंपनी ठरली.
कायलीच्या कंपनीमध्ये फक्त सात फुलटाईम, तर पाच पार्ट टाईम कामगार आहेत. या कंपनीची १०० टक्के मालकी कायलीचीच आहे. तिचा व्यवसाय ऑनलाईन असल्यानं आणि स्वतःच्याच प्रसिद्धीचा वापर ती कंपनीच्या जाहिरातीसाठी करत असल्या कारणानं तिला इतर कंपन्यांसारखा मार्केटिंग व मिडेल मॅन वगैरेचा खर्च नसल्यानं तिचे प्रॉडक्टस विकून येणारा नफा हा थेट तिच्याच खिशातच पडतो. तिला ‘Self Made Richest American Women’च्या यादीत स्थान दिल्यानं फोर्ब्स आणि तिचावर सोशल मीडियातून जोरदार टीकासुद्धा होत आहे.
आपल्या कुटुंबाची प्रसिद्धी नि पैशाचा वापर करणारी कायली ओप्रा विन्फ्रीसारखी सेल्फ मेड असू शकते का, असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला जात आहे. टीका तर होतच राहील, पण एवढ्या लहान वयात आपल्या कल्पकतेचा जोरावर बिलिओनियर बनणारी ती फक्त पहिली महिलाच नसून पुरुषांनाही पाठीमागे टाकणारी पहिली व्यक्ती ठरणार आहे. हा चमत्कारच आहे की, तुम्ही घरबसल्या व्यवसाय करून फक्त तीन वर्षांपेक्षा कमी काळात कोट्यधीश होऊ शकता. हा चमत्कार अमेरिकेतील मुक्त भांडवलशाही व्यवस्थेचा आहे. हा चमत्कार भांडवलशाहीनं घडवून आणलेल्या सोशल मीडिया क्रांतीचा आहे.
भांडवलशाहीनं असे अनेक चमत्कार आजपर्यंत घडवून आणले आहेत. कुणाचीही लूट वा शोषण न करता फक्त तुमची कल्पकता विकून तुम्ही आज करोडपती बनू शकता, हे मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेतच घडू शकतं.
आता कायलीची इच्छा तिचा बिझनेस अजून मोठा करत एक मोठं एम्पायर निर्माण करण्याची आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात ती अजून किती दिवस आपला व्यवसाय टिकवू शकते किंवा किती दिवसांत एम्पायर निर्माण करू शकते, हे येत्या काळात दिसेलच.
.............................................................................................................................................
लेखक सागर वाघमारे कृषि पदवीधर असून समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
saggy555@rediffmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
tanya w
Sat , 14 July 2018
महाजालावरून माहितीचे संकलन करून मराठीत ती माहिती मांडणारा प्राथमिक पातळीवरचा लेख आहे. शिवाय लेखकाचा जागतिक, आर्थिक घडामोडींकडे पाहाण्याचा दृष्टिकोनही भाबडा आहे.