‘सुरमा’ : उत्तम होता होता राहिलेला चित्रपट
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘सुरमा’चं एक पोस्टर
  • Sat , 14 July 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie Soorma दिलजित दोसांज Diljit Dosanjh तापसी पन्नू Taapsee Pannu अंगद बेदी Angad Bedi

या सिनेमात खूप चांगली गोष्टी जुळून आलेल्या आहेत. पहिली गोष्ट संदीप सिंग या खेळाडूचं सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी अनभिज्ञ असणं. त्यामुळे संदीपच्या आयुष्यात काय घडलं याची मिळणारी माहिती ही सिनेमात दाखवली गेलीय तेवढीच राहते. उगाच वास्तव व सिनेमा यात ते नाहक तुलना करणार नाहीत. धोनीवरील चरित्रपटात ते झालं होतं. दुसरी गोष्ट शाद अलींनी कथा सांगण्यावर दिलेला भर. जो आतापर्यंतच्या खेळाडूंवर आधारित सिनेमांमध्ये दिसून आलेला नाही. तिसरी गोष्ट संदीप सिंगसोबत हरप्रीत कौर व संदीपचा भाऊ विक्रमजीत सिंग यांना पटकथेत दिलेलं महत्त्व. चौथी गोष्ट काही काही प्रसगांचं संयत चित्रीकरण. तरीही सिनेमा उत्तम होण्यापासून वंचित राहतो. तो का ते चर्चिण्याआधी कथानकात काय आहे ते बघू.

पंजाबमधल्या शादाब नावाच्या छोट्या शहरात शाळकरी संदीप सिंग (मोठा दिलजीत दोसांज) हॉकीचे धडे घेण्यासाठी मैदानावर शिक्षा भोगतोय. शिक्षा काय तर पार्श्वभागावर हॉकी स्टीकनं रट्टे खाणं व प्रशिक्षकासाठी समोसे आणून देणं. यथावकाश शिक्षेला कंटाळून हॉकीपटू होण्याचं स्वप्न सोडून देतो. त्याला शेतात पिकांवर पक्षी बसू नयेत यासाठी देखरेखीचं काम दिलं जातं. तिथं मात्र तो हॉकीत ड्रॅग फ्लिक मारतात, त्यापद्धतीनं पक्षी उडवत असतो. मोठा झाल्यावर हॉकीपटू होण्यासाठी जी तोड मेहनत करणार्‍या भाऊ विक्रमजीतसाठी (अंगद बेदी) डब्बा नेऊन द्यायचं काम करतो. एके दिवशी प्रशिक्षकाच्या पुतणीला हरप्रीत कौरला (तापसी पन्नू) बघून परत एकदा हॉकीमधली त्याची रुची उफाळून वर येते. पण त्याच्या चुकीमुळे प्रशिक्षकाला ते कळतं अन त्याचं हॉकीपटू व्हायचं स्वप्न धुळीस मिळतं. दरम्यान भारतीय संघात निवड व्हावी यासाठी प्रयत्न करणार्‍या विक्रमजीतला निवडलं न गेल्यामुळं त्याचं स्वप्न पण हवेत विरलेलं असतं. पण संदीपच्या ड्रॅग फ्लिकचा अचानक लागलेला शोध त्याला व संदीपला त्यांचं भारतासाठी खेळण्यासाठीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची मोठी संधी वाटते. ते संधीचा फायदा उचलतात हे सांगणे न लगे.

पटकथाकार शाद अली, शिवा अनंथ व सुयश त्रिवेदी यांनी ही कथा अभिनेत्री-निर्माती चित्रांगदा सिंगच्या सांगण्यावर लिहिली असावी. कारण २०१४ मध्ये सिंग यांनी संदीप सिंगच्या आयुष्यावर आधारित सिनेमा करण्यासाठी हक्क घेतले होते. शाद अली व टीमनं बर्‍याच चांगल्या गोष्टी कथेत आणल्या असल्यातरी त्यांचं जोडकाम हे सफाईदार नाही. सफाईदार कसं नाही ते म्हणजे पटकथेत काही ठिकाणी अनावश्यक भावूक प्रसंग आहेत, तर काही ठिकाणी जिथं संवादातून पात्रांच्या मानसिकतेचा, त्यांच्या भावभावनांचा निचरा होणं अपेक्षित आहे, तिथं फक्त पार्श्वभूमीला संगीत किंवा गाण्याचा वापर ते करतात. ही एका खेळाडूची कथा आहे. ज्याच्या आयुष्यात एक जीवावर बेतणारा प्रसंग उद्भवल्यामुळे तो त्यातनं बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतोय. इथे त्याचे त्या काळात इतरांशी संबंध कसे होते हे दिसणं अपेक्षित होतं. त्याऐवजी पार्श्वभूमीला गाणं व संगीत वाजवून दिग्दर्शक प्रेक्षकांना भावूक होण्याची वाट मोकळी करून देतो. ही हिंदी सिनेमांची नेहमीची क्लुप्ती आहे. वास्तवामध्ये जेव्हा असे प्रसंग उद्भवतात, तेव्हा माणसं चटकन मानसिक आधार शोधतात. इथं संदीप असा कुठलाच आधार शोधत नाही. त्यामुळे त्याचे प्रयत्न हिरोईझमच्या पातळीवर राहतात ना की, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून.

अशा पद्धतीनं क्लुप्ती वापरणारं उदाहरण म्हणजे... खरं तर त्यावेळी क्लुप्ती म्हणून न वापरता कथानक पुढे नेण्यासाठी वापरलेलं तंत्र म्हणून योग्यच होतं असं म्हटलं गेलं. ते उदाहरण म्हणजे गाईड सिनेमात ‘पिया तोसे नैना लागे रे’ या गाण्यातून नायिका ‘रोजी’ साधी स्त्री ते जगन्मान्य नर्तिका बनते, हा जो प्रवास दाखवला आहे, तो काही महिन्यांचा किंवा वर्षांचा आहे. पटकथेत याचा वापर करून कथानक रचणं ही त्यावेळची गरज होती, कारण प्रेक्षकांना गाणी प्रचंड आवडायची. गाण्यांमुळेच कित्येक आठवडे सिनेमे थिएटरात राहणं, हा परिचित इतिहास आहे. पण या सिनेमात जेव्हा त्याच पद्धतीचा वापर केला जातो, तेव्हा तो ठिगळ लावल्यासारखा वाटतो. काळानुसार कथानक सांगण्याचं तंत्र निर्माण करणं दिग्दर्शकाला प्रगल्भ करतं, तसंच ते इतरांसाठी चांगलं उदाहरण पण ठरतं. दुर्दैवानं शाद अली ही संधी घालवतात. त्यामुळे प्रेक्षकांना ते भावूक व्हायला लावतात ना की विचारी.

हरप्रीत कौर या पात्रावर अन्याय झालाय असं वाटतं. ती ज्या पद्धतीनं संदीपशी वागते ते योग्यच असतं, कारण खेळाडूसाठी खेळ हे ‘आधी लगीन कोंडाण्याचं...’ असतं. बाकी गोष्टी नंतरच येतात. खेळात प्रावीण्य मिळवून देशाचं पर्यायानं खेळाचं नाव उंचावणं हेच त्याचं ध्येय असावयास हवं. इथं हरप्रीतला फक्त संदीपची प्रेयसी म्हणून दाखवून तिच्या संघर्षाला दुय्यम स्थान शाद अली देतात. खर्‍या संदीप सिंगच्या आयुष्यात प्रत्यक्ष अशी एक हरप्रीत आली होती आणि तिनं त्याच्यावर गुदरलेल्या प्रसंगामुळे माघार घेतली होती अशी कथा आहे. पण मुळात हरप्रीत स्वतः उत्तम हॉकीपटू होती. त्याच्याप्रमाणे ती ही देशासाठी खेळली आहे. तिच्यावर कदाचित एक चरित्रपट होऊ शकेल इतकं महत्त्वाचं काम तिचं यात आहे. हेच कथानक तिच्या दृष्टीकोनातून तिला केंद्रस्थानी ठेवून आलं तर एक वर्तुळ पूर्ण होईल. कारण याचं निवेदन तीच करते, पण केंद्रस्थानी संदीप असल्यामुळे तिला दुय्यम स्थान घ्यावं लागतं. तिच्या घरची परिस्थितीही काही प्रसंगात दाखवली आहे. त्यावरून तर तिच्यावरही चरित्रपट यावा असं वाटतं. असं जर झालं तर तापसी पन्नूला अजून एका उत्तम भूमिका साकारायला मिळेल. निर्माते याकडे लक्ष देतील का?

गुलजार यांनी लिहिलेल्या गीतांना शंकर-एहसान-लॉय यांनी स्वरसाज चढवला आहे. एकूण पाचेक गाण्यांपैकी ‘इष्क दी बाजियां’ हे स्वतः गायक-अभिनेता दिलजीत दोसांजनेच गायलेलं गाणं लक्षात राहतं, ते त्याच्या शब्दांसाठी व वापरासाठी. इतर गाणी एकतर प्रसन्न प्रसंगांसाठी किंवा संदीप सिंगच्या प्रेरणादायी कर्तृत्वाचं गौरव करणारी आहेत.

अभिनयात विजय राज ते कुलभूषण खरबंदा योग्य साथ देतात. तापसी पन्नू व अंगद बेदीला दिलजीत नंतर मोठी भूमिका मिळाली आहे. अंगद बेदीची निवड योग्य ठरते, ती त्याच्या समजूतदार अभिनयामुळे व पात्राच्या चढत्या आलेखामुळे. विक्रमजीत स्वतः एक खेळाडू असल्यामुळे त्याला भावावर ओढवणार्‍या संकटाची जाण आहे. ती जाण कशी आहे ते अंगदने दोन प्रसंगात चांगल्या रीतीनं दाखवलं आहे. पहिला प्रसंग आहे हॉस्पिटलमधला व दुसरा मध्यरात्री घरासमोर घडणारा. तापसी पन्नूने या पटकथेची केलेली निवड चांगली आहे. तिने ‘नाम शबाना’ सारख्या सुमार दर्जाच्या पटकथेपासून दूर रहावं. ती चांगली अभिनेत्री आहे हे ‘बेबी’ व ‘पिंक’ मध्ये दिसून आलंय. जर या पात्रावर चरित्रपट करायचा झाल्यास तिच्याशिवाय इतरांचा विचार करणं योग्य नाही.

दिलजीत दोसांजची निवड खर्‍या संदीप सिंगसारखी असली तरी तिला म्हणावे इतके कंगोरे नाहीत. हा दोष दिग्दर्शकाकडे निर्देश करतो. पात्र त्रिमिती होण्यासाठी दोन-चार भावूक प्रसंग, त्याला चांगल्या अभिनयाची साथ इतकच उपयोगाचं नाही, तर एकूण पात्राच्या चढत्या आलेखात निव्वळ खुशालचेंडू असण्यापेक्षा जिवावरील प्रसंगात कणखर वृत्तीचा असणं दाखवणं ही गरजेचं असतं. इथे पटकथेत संदीपला तशी संधीच मिळत नाही. त्यामुळे हिंदी सिनेमात नायकाचा दिसणारा कणखरपणा जितका जेमतेम असतो, तितकाच इथंही आहे. त्यामुळे त्याचे परिणाम अभिनेत्याला भोगावे लागतात. इमानेइतबारे काम करणं इतकंच त्याच्या हातात असतं. दिलजीतला तेच करावं लागलंय.

शाद अलींचा पहिला सिनेमा ‘साथिया’. त्यानंतर आलेले सिनेमे हे कधी आले व कधी गेले या प्रकारात मोडणारे होते. इथं चरित्रपटाची एक उत्तम संधी त्यांना चालून आली होती. त्यांनी केलेला प्रयत्न चांगला असला तरी तो उत्तम होऊ शकला नाही असंच म्हणावं लागतं.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ramesh singh

Mon , 16 July 2018

"शाद अलींचा पहिला सिनेमा ‘साथिया’. त्यानंतर आलेले सिनेमे हे कधी आले व कधी गेले या प्रकारात मोडणारे होते", हे विधान वस्तुस्थितीवर आधारलेले नाही. साथियानंतर पाच वर्षांनी आलेला बंटी और बबली हा शाद अली दिग्दर्शित सिनेमाही हिट या वर्गात मोडणारा होता. त्यानंतरचे झूम बराबर झूम, किल बिल आणि ओके जानू हे चित्रपट मात्र चालले नाहीत. "तापसी पन्नूने ‘नाम शबाना’ सारख्या सुमार दर्जाच्या पटकथेपासून दूर रहावं", यांसारखी वाक्येही टाळणे आवश्यक आहे. तापसी पन्नू काही हा लेख वाचणार नाहीये. तिला द्यावयाचा सल्ला आपण तिला स्वतंत्रपणे कळवणे योग्य राहील. वाचकांना हा मुद्दा कळवायचा असेल तर ते वेगळअया प्रकारा लिहावे. असो. पसंद अपनी अपनी.


Sourabh suryawanshi

Sun , 15 July 2018

movie इतका पण वाईट नाही. अजून effective करण्यासाठी अतिरंजित करावा लागला असता.


Sandip Godse

Sat , 14 July 2018

Nice review..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......