२०१८ या वर्षासाठीचे ‘केशवराव कोठावळे पारितोषिक’ कथाकार गणेश मतकरी यांच्या ‘इन्स्टॉलेशन्स’ या कथासंग्रहाला जाहीर झाले. पुरस्कार स्वीकारताना मतकरी यांनी व्यक्त केलेलं मनोगत.
.............................................................................................................................................
मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे, पुरस्काराची निवड समिती, रंगमंचावरले आणि प्रेक्षकातले मान्यवर आणि रसिक मित्रहो. केशवराव कोठावळेंच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार स्वीकारताना, मला अतिशय आनंद होतो आहे.
केशवराव आणि माझ्या वडिलांची चांगली ओळख होती, आणि मी कायमच हे नाव आदरानं घेतलेलं ऐकलं आहे. त्यांच्याविषयी, त्यांच्या साहित्यप्रेमाविषयी बोललेलं\ऐकलं आहे. त्यामुळे अशा कर्तबगार माणसाच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे मला विशेष वाटतं.
विशेष आणखीही एका गोष्टीचं वाटतं, ते म्हणजे या पुरस्काराला आता चौतीस वर्षं झाली आहेत. त्यामुळे हा वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या लेखकांना मिळालेला पुरस्कार आहे. या लेखकांची नावं आणि या पुरस्कारासाठी निवडलेली पुस्तकं पाहिली, तर आपल्या साहित्यात ज्या प्रकारचा बदल होतोय, जे ट्रान्झिशन घडतंय, त्याचं रिप्रेझेन्टेशन करणारा, त्याचा एक इंडिकेटर असलेला हा पुरस्कार आहे, असं मानता येईल. या पुरस्कार विजेत्यांपैकी अनेक नावं माझ्या आवडत्या लेखकांचीही आहेत. त्यामुळे साहजिकच, त्या दृष्टीनेही मला हा पुरस्कार महत्त्वाचा वाटतो.
आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे पुरस्कार कथासंग्रहाला आहे.
कादंबरी आणि कथा या दोन्ही फॉर्म्सना आणि फॉर्म्सबद्दल, मी पुष्कळ वाचलेलं आहे. त्यातला कोणता फॉर्म श्रेष्ठ या भानगडीत मी पडणार नाही, पण मला व्यक्तिशः कथा हा फॉर्म अधिक जवळचा वाटतो.
कदाचित याचं एक कारण बाबांचं (रत्नाकर मतकरी) कथासाहित्य खूप प्रमाणात वाचणं, त्यावर बोलणं, जवळून पाहणं हेदेखील असेल, माहीत नाही. आणि केवळ बाबांचंच का, जागतिक साहित्यातलेही अनेक मोठे कथाकार मी वाचलेले आहेत. रेमंड कार्वर, जॉन अपडाईकपासून आताच्या नील गायमन किंवा लेअर्ड बॅरनपर्रंत अनेकांच्या कथा मी वाचल्यात, वाचत असतो, आणि त्यातून माझ्या लक्षात आलंय, की कथा हा फॉर्म अधिक फ्लेक्झिबल आहे. त्यात प्रयोगाला जागा आहे. चक पालानकचं ‘हॉन्टेड’, किंवा हरुकी मुराकामीचं ‘विन्ड अप बर्ड क्रॉनिकल्स’ पाहून दिसतं की, कादंबरी हा मुख्य फॉर्म वापरणाऱ्यांनीही कथेचा प्रयोगशील वापर केलेला आहे.
कादंबरीवर अपेक्षांचं ओझं असतं. वाचक हा अनेक तास ती वाचण्यात इन्व्हेस्ट करत असतो, त्यामुळे त्याच्या कादंबरीकडून काहीएक अपेक्षा असतात. त्या पुऱ्या करणं हे बहुतेकदा मँडेटरी मानलं जातं. याउलट कथेत तुम्ही अशा अपेक्षांनी बांधले जात नाही.
मी अनेकदा कादंबरी आणि कथा यांची तुलना फीचर फिल्म आणि शॉर्ट फिल्म यांच्याशी करतो. ते थोडं साहजिकही आहे. कारण मी लेखक असायच्या कितीतरी आधीपासून चित्रपट समीक्षक आहे.
कादंबरीचा आवाका, आणि आशयाचं वजन पाहिलं तर ती थोडी चित्रपटासारखी असते. कादंबरी वाचायला जसा अधिक वेळ लागतो, तसा चित्रपट पाहायलाही. त्यामुळे दोन्हीकडून आस्वादकाच्या अपेक्षा तयार होतात, ज्या पुऱ्या करणं अपेक्षित असतं. आता जो प्रेक्षक चित्रपटाविषयी निश्चित अपेक्षा ठेवतो, तो शॉर्ट फिल्मबाबत मात्र खूप फ्लेक्झिबल असतो. त्यातला प्रयोग त्याला आवडला नाही, तरीही तो ती पाहायची तयारी ठेवतो, कारण त्यात वेळेची गुंतवणूक कमी असते.
लघुकथेचंही असं असतं. ती कमी वेळात वाचणं शक्य असल्यानं तिच्यातला वेगळेपणा लक्षात घेण्याची वाचकाची तरारी असते. त्यामुळे लेखकाला वेगळं ट्राय करून पाहणं शक्य होतं. हे या फॉर्मचं महत्त्व आहे. वेळोवेळी लोकांनी या फॉर्मवर बोलणं, लिहिणं, त्याला मान मिळणं, यातून तो फॉर्म टिकायला, त्याकडे नवे साहित्यिक वळायला मदत होते.
‘इन्स्टॉलेशन्स’ हे माझं फिक्शन या प्रकारचं दुसरं पुस्तक आहे. पहिल्या ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’मध्येही कथेचा फॉर्म होता, पण त्या कथा या सेल्फ कन्टेन्ड असल्या, तरी कादंबरीमधल्या प्रकरणांसारख्या होत्या, त्यामुळे त्यांच्या जोडकामातून एक स्वतंत्र गोष्ट मांडली जात होती. ‘इन्स्टॉलेशन्स’मध्ये तसं नाही. इथल्या कथा या स्वतंत्र कथा आहेत. एकमेकांशी संबंध नसलेल्या. ढोबळमानानं पाहिलं, तर या दोन्ही पुस्तकांमधे काही साम्यस्थळं दिसतात.
एकतर त्या सरळच शहरी आहेत.
माझ्या पिढीच्या यंग अर्बन प्रोफेशनल्सच्या आहेत.
त्या बऱ्याचशा प्रथमपुरुषी निवेदनातून उलगडणाऱ्या आहेत, आणि जिथे तसं निवेदन नसेल, तिथेही त्या एका व्यक्तिरेखेला धरून, तिचा दृष्टिकोन मांडणाऱ्या आहेत.
त्यातली भाषा अनेकदा मिश्र भाषा आहे. आज बोलताना ज्या प्रकारे भाषा वापरली जाईल तशीच ती आहे.
प्रत्यक्ष घटनांपेक्षा त्यातल्या व्यक्तींच्या मानसिक स्थित्यंतराला त्यात अधिक महत्त्व आहे.
पण तरीही ‘खिडक्या’ आणि ‘इन्स्टॉलेशन्स’मध्ये मला एक महत्त्वाचा फरक वाटतो. तो म्हणजे ‘खिडक्या’ हे एखाद्या प्रोसिजरलसारखं, शंभर टक्के वास्तवात घडणारं आहे. ‘इन्स्टॉलेशन्स’मध्ये वास्तव आहे, पण त्याला भौतिक जगाची मर्यादा घातलेली नाही. घटनांमधून दिसणारं वास्तव आणि मनोव्यापार, यांमधली सरमिसळ यांमध्ये आहे. त्यामुळे काही वेळा त्यातल्या सगळ्याच घटनांना रीअल वर्ल्ड स्पष्टीकरणं नाहीत आणि ती असणं हे कथा पूर्ण होण्यासाठी मला आवश्यक वाटत नाही. त्या दृष्टीने या दोन पुस्तकांमध्ये काहीतरी लक्षात येण्यासारखं प्रोग्रेशन आहे.
मी जेव्हा कथा लिहायला लागलो, तेव्हा ती निरीक्षणातून आलेली होती. तेही कॉन्शसली, या प्रकारचं काही लिहावं या विचारातून केलेलं निरीक्षण असंही नाही, तर आपलं कॅज्युअल, सहज होत गेलेलं निरीक्षण. त्यामुळे माझ्या बऱ्याच कथा, या माझ्या नजरेच्या टप्प्यात ज्या प्रकारची घरं, ज्या प्रकारची कुटुंबं, ज्या प्रकारच्या व्यक्तिरेखा आहेत, त्यांचं चित्रण करतात.
या कथांमध्ये समाजाचं चित्रण आहे, पण ते अधिक व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनातून केलेलं, बिग पिक्चरकडे पाहण्यापेक्षा ज्याला त्याला-ज्याच्या त्याच्यापुरता समाज कसा दिसेल, या विचारातून केलेलं. त्यामुळेच कदाचित त्यात पोलिटिकल रिअॅलिटीचा भाग कमी आहे, आणि इन्डीविजुअलिस्टीक भाग अधिक आहे.
आपल्याकडे आता जो मध्यमवर्ग, अपर मिडल क्लास आहे, तो आणि माझ्या पालकांच्या पिढीचा मध्यमवर्ग, यात मला फरक दिसतो. तेव्हाचं कुटुंबाचं स्ट्रक्चर वेगळं होतं, इन्कम ग्रुप्स वेगळे होते, राहणीमान वेगळ्या प्रकारचं होतं. एक साधं उदाहरण घ्यायचं, तर चाळीसारख्या वस्तीचं घेता येईल.
तेव्हा बराच मध्यमवर्ग हा चाळींशी आयडेन्टीफाय करत होता. आज चाळ हा प्रकार कमी उरलाय आणि काही वर्षांत तो संपूनही जाईल. तीच गोष्ट करमणुकीच्या आणि त्याहीपेक्षा अधिक कम्युनिकेशन्सच्या साधनांची. नुसतं इन्टरनेट आणि स्मार्टफोन या दोन गोष्टी घेतल्या तरीही आपल्या जीवनपद्धतीत झालेली क्रांती म्हणता येईल.
त्यामुळे तो काळ आणि आताचा काळ यात फार साम्य उरलेलंच नाही. त्या मध्यमवर्गाबद्दल बोलणारं साहित्य आपल्याकडे खूप प्रमाणात आहे, पण पोस्ट ग्लोबलायजेशन काळातलं त्या मानानं कमी आहे.
आज जो मध्यमवर्ग आहे, मी ज्या लोकांबद्दल लिहितो, तो काही प्रमाणात आत्मकेंद्री, आपल्यापुरतं पाहणारा आहे, पण मी हे दोष म्हणून म्हणत नाही. तो तसा असण्यात मला एक प्रकारची अपरिहार्यता दिसते. पूर्वी एकत्य कुटुंबपद्धती होती. सर्व कुटुंबाने कुटुंबातल्या सर्वांचा विचार करावा अशी एक पद्धत होती. For better or worse, आज ती उरलेली नाही. आज कुटुंबाचा आकार लहान झाल्याने प्रत्येक जण स्वतःचा, स्वतःपुरता असा विचार अधिक प्रमाणात करू शकतो.
आज मला वाटतं, की व्यक्ती म्हणून आपण अधिक स्वतंत्र आहोत. आपल्यावर कोणाकडून असलेल्या अपेक्षांचं ओझं नाही, आणि कोणाकडून आपल्याही फार अपेक्षा नाहीत. प्रत्येकाच्या दृष्टीनं त्यांचं स्वतःचं मत, स्वतःचं अस्तित्व, हे महत्त्वाचं आहे.
प्रत्येकाची एक नजर आहे, एक दृष्टिकोन आहे. माझ्यासह, आजच्या नागरी साहित्यात आढळणाऱ्या बऱ्याच लेखकांच्या कथा या त्या दृष्टिकोनाबद्दलच आहेत.
माणसाच्या स्वकेंद्री होण्यात, आयसोलेटेड होत जाण्यात जसा राहणीमानातल्या बदलाचा वाटा आहे, तसा तंत्रज्ञानाचाही. जनसंपर्क हा पूर्वी प्रत्यक्ष होता, त्याला महत्त्वही होतं, याउलट आज वेगवेगळ्या ऑल्टरनेटीव्जनी त्याची जागा घेतलीय. याची अनेक साधीसाधी उदाहरणं आहेत.
पूर्वी मुलांनी मित्रांमध्ये खेळायला जाणं हे गृहीत धरलेलं होतं. आता लहानपणापासूनच मुलं आणि त्यांची गॅजेट्स यांचं एक वेगळं विश्व तयार होतं. ही गॅजेट्स वेगवेगळ्या प्रकारची आणि पूर्वी प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या जागा घेणारी असू शकतात.
काही टॅबलेट्ससारखी शैक्षणिक उपयोगाची असतात. काही गेमिंग कन्सोल्स / टीव्हीसारखी खेळ आणि अवांतर वाचनाची जागा घेणारी असतात. गप्पा वगैरेही बहुधा व्हॉट्सॅप वरूनच होतात.
यामुळे वाचन कमी होतं वगैरे आपल्या तक्रारी असतात, पण मला यात आक्षेप घेण्यासारखं काही वाटत नाही. व्हिजुअल लॅन्ग्वेज हा या नव्या पिढीचा स्ट्राँग पॉइंट आहे. त्यामुळे त्याचा तिथं कल असण्यात गैर काय?
मोठ्यांच्या आयुष्यातही तंत्रज्ञानाचं अस्तित्व असंच आहे. फोन्स, सोशल नेटवर्क, कम्प्युटर्स या सगळ्यातून त्याचंही एक आभासी जग तयार व्हायला लागलंय.
आर्थिक आणि राहणीमानातले वरवरचे फरक साहित्यातून दिसत आहेत. पण अशा माणसांभोवती तयार होणाऱ्या नव्या कोशांचं चित्र साहित्यात अधिक प्रमाणात दिसायला हवंय.
‘ललित’च्या गेल्या दिवाळी अंकात एक परिसंवाद होता, की ‘मराठी साहित्यात नागरजीवनाचं चित्रण ओसरलं आहे काय?’ गंगाधर गाडगीळ, अरुण साधू, ह. मो. मराठे यांसारख्या लेखकांनी एकेकाळी या नागरजीवनाविषयी साहित्यात बरंच लिहिलं, तेवढं आज लिहिलं जात नाही आहे का?
मला वाटतं नागरीजीवन साहित्य म्हणजे कुठलं साहित्य, याचाही आता अमुक एका प्रमाणात फेरविचार व्हायला हवा. आता माझ्या लिहिण्याचं उदाहरण घेतलं, तर मी मुंबईचा आहे, आणि माझ्या लिहिण्यात मुंबई येते.
मुंबई हे तसं युनिक शहर आहे. जुन्रा मुंबईवरला इंग्रजांचा प्रभाव, या शहरातले सामाजिक स्तर, शहराची वाढ एकाच दिशेनं होण्यामधून तयार झालेले, विकास आराखड्यातल्या त्रुटींपासून ते माणसांना सतत करायला लागणाऱ्या त्रासदायक प्रवासापर्यंतचे अनेक प्रॉब्लेम्स, भारताची आर्थिक राजधानी असल्यानं तिच्यावर येणारा अपेक्षांचा बोजा, आणि त्याचवेळी बॉलिवुडसारखं चित्रपटांचं केंद्र इथं असण्यामुळे मुंबईला आलेलं ग्लॅमर वगैरे. हे असंच आपल्याला भारतातल्या दुसऱ्या कोणत्याही शहरात दिसणार नाही.
आपण एरवी सहज बोलताना पुणं कसं मुंबईसारखं होतंय म्हणतो, पण प्रत्यक्षात त्यांच्या विकासातलं साम्य हे वरवरचं आहे. मुंबईतलं जीवन आणि पुण्यातलं हे तसं एकसारखं असणार नाही. त्यामुळे मुंबईचा ज्या प्रकारचा अनुभव साहित्य आपल्याला देईल त्यापेक्षा पुण्याचा अनुभव वेगळा असेल.
आपण जेव्हा ग्रामीण साहित्याचा विचार करतो, तेव्हा तिथले समाजाचे स्तर, जातीजमाती, बोलीभाषा, या सगळ्यात ते साहित्य कुठलं आहे, यानुसार फरक पडत जातो. शहराचा विचार करताना मात्र आपली एक अपेक्षा असते की, शहरी म्हणजे शहरी, त्यात असा कितीसा फरक असणार? पण तसं नाही. तिथंही फरक पडतोच. दोन गावांमधली बोली जर वेगळी असेल, तर दोन शहरांमधली नसेल का? केवळ ती इंग्रजाळलेली, असं लेबल तिला लावणं हे पुरेसं नाही.
माझ्या कथांमधली बोली बऱ्याच प्रमाणात मुंबईची, तीही तिथल्या विशिष्ट वर्गाशी जोडलेली. ती जेव्हा तृतीयपुरुषी निवेदनात येते, तेव्हा ती शुद्ध मराठी असते, पण जेव्हा व्यक्तिरेखा बोलतात, तेव्हा भाषा त्या त्या व्यक्तिरेखेच्या पार्श्वभूमीनुसार मिश्र असते.
या भाषेची थोडी गंमत आहे. मुळात अशी भाषेची सरमिसळ मी ‘खिडक्या...’ लिहिताना केली, तीही मी ती करतोय असं बिलकुलच लक्षात न येता. पण ज्यांनी ज्यांनी पुस्तकाबद्दल लिहिलं, त्यांनी त्यांनी या भाषेबद्दल लिहिलं. हे मला आश्चर्य वाटण्यासारखं होतं, कारण मुळात मी स्वतः जसं बोलतो, त्याच भाषेत मी लिहिलं होतं.
मग कोणी असाही प्रश्न उपस्थित केला, की यात इंग्रजीचा बराच वापर आहे, तर ग्रामीण वाचकांना हे कळेल का? किंवा कोणी म्हणालं, की तुमच्या डोळ्यासमोर कोणता वाचक वर्ग होता?
ग्रामीण वाचकांना मिश्र भाषा कळणार नाही असं मला वाटत नाही. शहरी वाचक जेव्हा ग्रामीण भाषेचा वापर असलेलं साहित्य वाचतो, तेव्हा त्याला तरी कुठे प्रत्येक शब्दाचा अर्थ लागतो? ग्रामीण बोलीतले अनेक शब्द तर शब्दकोशातही सापडण्यासारखे नसतात. त्यांचा संदर्भानं अर्थ लावला जाऊ शकतो. मग शहरी वाचक जर ग्रामीण भाषा संदर्भानं समजून घेत असेल, तर उलट होणंही सहज शक्य आहे. आणि वेगळं वातावरण, वेगळा अनुभव वाचायला तर लोकांना हवा असतोच. त्यामुळे हा मला फार अडचणीचा प्रश्न वाटत नाही. शिवाय भाषेचा असा वापर अनुभवाला टेक्श्चर देण्यासाठी असतो. वाचन दुर्बोध व्हावं म्हणून नाही.
एक गोष्ट नक्की, की कथा लिहिताना माझ्या डोळ्यांसमोर कोणताही स्पेसिफिक वाचकवर्ग नव्हता, नसतो. तरीही कदाचित कथांमधलं वातावरण, व्यक्तिरेखा, वगैरे पाहता प्रामुख्यानं छोट्या किंवा मोठ्या शहरातला तरुण वर्ग, व्यावसायिक वा नोकरदार माणूस या कथांचा टिपिकल वाचक म्हणता येईल. या कथांमधल्या व्यक्तिरेखा, त्यांचे प्रश्न या वाचकाला परिचित असतील.
आता त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवं, की शहरांची व्याप्ती अलीकडे फार वाढली आहे. पूर्वीची गावं आजकाल छोटी शहरं झाली आहेत आणि मोठी शहरं मेट्रोपोलिस बनण्याकडे वाटचाल करतायत. ग्रामीण तरुण शहरी होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय.
टीव्ही, इन्टरनेट, सेलफोन्सनी आपण सर्वच जोडले गेल्यानं सर्वांची आयडिअल्स, महत्त्वाकांक्षा त्याच प्रकारची आहे. या साधनांमधून आपण सगळेच खूप जवळ आलोय. एकाच दिशेनं सर्वांचा प्रवास चाललाय. काही दिवसांत गावं आणि शहरं, यांमधे म्हणावा असा फरकच उरणार नाही. एक युनिव्हर्सल इक्विलिब्रीअम तयार होईल. अशी वेळ येईल जेव्हा सर्व गोष्टींची उपलब्धता, आवडनिवड, माहिती, भाषाज्ञान, हे सारं सर्वांकडेच असेल. मग तो ग्रामीण असो वा शहरी. इथला असो, वा परदेशात राहणारा. ते जेव्हा होईल, तेव्हा सर्व प्रकारच्या कथा सर्व प्रकारचा वाचक वाचेलच. त्यामुळे आत्ता कोण वाचतंय हा विचार करण्यापेक्षा, आत्ता काय सांगायचंय याचा विचार मला अधिक महत्त्वाचा वाटतो.
सिनेमामध्ये जसा गोष्ट सांगणारा सिनेमा असतो आणि जीवनानुभव देणारा सिनेमा असतो, तसंच साहित्याचंही असतं. गोष्टीला प्राधान्य आलं की इतर गोष्टी दुय्यम ठरतात. जीवनानुभवाला आलं की निरीक्षणाला प्राधान्य येतं. कथाभाग दुय्यम ठरतो. मराठी साहित्यात गोष्टी सांगणारं, आणि जीवनानुभव देणारं असं दोन्ही प्रकारचं साहित्य आहे. त्यामुळे सर्व साहित्य सारख्या पद्धतीनं प्रादेशिकता दाखवेल, तपशील पुढे आणेल, विशिष्ट स्थानाशी जोडलेली कथानकं, संकल्पना, विचार समोर आणेल असं मुळातच होणार नाही.
त्यातही, तपशील हा केवळ समोर दिसणारा, किंवा घटनांमधून येतो तेवढाच नसतो, तर या शहरांची, गावांची मानसिकता त्या कथांमधून, त्यातल्या व्यक्तिरेखांमार्फत अधोरेखित होणं महत्त्वाचं. केवळ संदर्भांची रेलचेल, ही स्थानिक समाजजीवनाचं लक्षण नाही, तर कथांमधून प्रकट होणारी वृत्ती ही खरी महत्त्वाची आहे.
आज साहित्यासंबंधात एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे एकूण साहित्यालाच वाचक आहे का? आणि असला, तर त्याप्रमाणात मराठीला किती वाचक आहे?
आणि मराठीत जो वाचक आहे, तो टिकेल का? हा उपप्रश्न.
पुस्तक, साहित्य टिकेल का याविषयी उम्बेर्तो एको आणि ज्रॉ क्लॉड कॅरीए यांची चर्चा असणारं ‘धिस इज नॉट द एन्ड ऑफ द बुक’ हेच नाव असलेलं एक पुस्तक माझ्याकडे आहे, ज्यात हे दोन विद्वान निःसंदेहपणे म्हणतात की, ही एक फेज आहे. पुस्तक विविध मार्गांनी टिकेल. ते तर असंही म्हणतात की डिजिटल माध्यमं आली, तरी संस्कृती टिकेल, ती छापील पुस्तकांमधूनच.
मराठी पुस्तक कसं टिकेल हा एक जरा वेगळा प्रश्न आहे. आणि त्याचं कारण वाचनाविषयीची एकूण अनास्था हे आहेच. पण त्याचबरोबर मराठीतून होणाऱ्या शिक्षणाचा दर्जा आणि हे शिक्षण घेणाऱ्यांचं घसरतं प्रमाण हाही आहे.
शिक्षणाच्या इंग्रजीकरणामुळे मराठी वाचकसंख्या काही प्रमाणात कमी झाली असेल का?
इंग्रजी वाचनाकडे आपसूक वळल्यानं या वाचकाचा आपल्या साहित्याशी परिचयच झाला नसेल का? आणि मागणी तसा पुरवठा या न्यायानं वाचकांची कमतरता पाहता मराठीतलं लिखाणही कमी झालं असेल का?
मराठी वाचक आहे, पण जितका असू शकला असता तितका नाही. याला इंग्रजी शिक्षण हे एक कारण आहेच. मी तर मराठी माध्यमाचा असून, त्यात लिहिणारा असूनही मराठीपेक्षा अधिक इंग्रजी वाचतो, मग मुळात ज्यांचं शिक्षणच इंग्रजीतलं, ते मराठीकडे केवळ वाचनासाठी वळतील, असं वाटत नाही. आपल्या शाळा या कला, साहित्य इत्यादीची गोडी लावत नाहीत. पूर्वी जे नियमित वाचक होते, ते प्रामुख्यानं करमणुकीच्या साधनांच्या अभावापायी वाचायला लागले, वाचत राहिले.
आजकाल इन्टरनेट, टीव्ही आणि फोन ही तीन माध्यमं सर्वात शक्तिशाली आणि सर्वसाधारणपणे कोणाचाही सर्वाधिक वेळ खाणारी आहेत. त्यांच्या समोर वाचनाचा उत्साह टिकणं कठीणच. मुंबईचंच पाहायचं, तर सकाळपासून रात्रीपर्यंत कामात असणारा आणि तीन-चार तास प्रवासात घालवणारा माणूस घरी आल्यावर पुस्तक वाचेल, का टीव्हीपुढे बसेल? छोट्या शहरात, गावात, अजून जीवन एवढं कटकटीचं झालेलं नाही, त्यामुळे वाचनाला आवश्यक तो निवांतपणा तिथं काहीसा टिकून आहे. त्यामुळे अशी शक्यता आहे की, या जागाच पुढे लेखन-वाचनाची मोठी केंद्रं होतील.
आज लेखन-वाचन संस्कृतीला दोन अधिक इमिजिएट, प्रॅक्टिकल म्हणावेत असे धोके मला दिसतात.
आज आपण छापील पुस्तकांबरोबर इतर मार्ग ट्राय करायला लागलोय. इ-बुक्स, ऑडिओ बुक्स येतायत, लोक तीही वाचतायत, ऐकतायत. हे स्वागत करण्यासारखं निश्चित आहे.
चांगले फोन्स, टॅब्लेट्स यांमधून लोकांना या डिजिटल ऐकण्या-वाचण्याची सवय होतेय, हा संस्कृतीचा प्रसारच आहे. पण पायरसी, या मुद्याचा पुरेसा विचार झालाय असं मला वाटत नाही. आजही फेसबुक ग्रुप्स, व्हॉट्सॅप ग्रुप्ससारख्या ठिकाणी लोक चांगल्या प्रथितयश लेखकांच्या पुस्तकांच्या pdf files शेअर करताना दिसतात.
अमेरिकन/ब्रिटिश पब्लिशिंग इन्डस्ट्रीत पायरसीचं प्रमाण खूपच आहे, पण त्यांच्या विस्ताराच्या तुलनेत आपला प्रकाशन व्यवसाय हा लहान आहे. त्यांच्याकडे पायरसी मोठ्या प्रमाणात असतानाही विकत घेऊन पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या खूप आहे. आपल्याकडे आज हा डिसिप्लीन तयार व्हायला हवाय.
प्रकाशकांनी त्यांच्याकडून होईल ती काळजी जरूर घ्यावी, त्याची गरजही आहे. पण वाचकांनी आपण पायरसीत सहभागी होणार नाही हे ठरवायला हवं. नवी पुस्तकं लिहिली, वाचली जात राहायला हवी असली, तर संबंधितांना त्यांचा रास्त मोबदला मिळायला हवा. तरच व्यवसाय वाढेल, टिकेल.
दुसरा धोका आहे, तो सोशल नेटवर्कवर लिहिण्याच्या उत्साहाचा. सोशल नेटवर्कवर लिहिण्याचे फायदे तर आहेतच. तत्काळ प्रतिक्रिया हा मोठा फायदा. अगदीच टोकाचं न लिहिल्यास सेन्सॉरशिप न होता ते वाचकापर्यंत जाण्याची संधी, शक्यता, हा दुसरा मोठा फायदा. पण या लिखाणाला सतत मिळणाऱ्या प्रतिक्रियांमधून तयार होणारी डीक्शनची शक्यता हा नवीन लेखकांसाठी, किंवा लेखनाचं पोटेन्शिअल असलेल्या पण ते वापरून न पाहिलेल्या व्यक्तींसाठी धोका आहे.
आपण छोट्या फॉरमॅटमध्ये लिहीत गेलो, त्यातून- त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमधून आपल्याला समाधान मिळायला लागलं, तर आपण त्या छोट्या फॉरमॅटमध्ये अडकण्याची शक्यता तयार होते, आणि मोठ्या लांबीचं काही लिहिण्यापासून आपण लांब राहण्याचीही.
आज सोशल नेटवर्कवर असे अनेक जण आहेत जे मनात आणतील तर उत्तम लेखन करू शकतील. त्यांना वाचक असल्याचं इथं सिद्धही होतंय. पण ते या माध्यमावर इतके खूश आहेत, की त्यापलिकडे पाहावं असं त्यांना वाटत नाही. स्वतःला या ठिकाणी एस्टॅब्लिश केल्यावर नव्या फॉर्ममध्ये जाण्याची त्यांची तरारी तरी नाही, किंवा त्यांना तशी गरज वाटत नाही. अंगभूत शक्यता असलेल्या लेखकानं त्या न वापरणं हा लेखनसंस्कृतीला एक प्रकारचा धोकाच आहे. यातून कसं बाहेर पडावं, याचा प्रत्येकानं आपल्यापुरता विचार करणं आवश्यक आहे.
आज मराठीत अनेक चांगले लिहिते लेखक आहेत. कथासाहित्याबद्दल बोलायचं तर त्यातही जयंत पवार, मनस्विनी लता रवींद्र, आसाराम लोमटे, प्रणव सखदेव अशी नव्या विचारातून लिहिणाऱ्या लेखकांची काही प्रातिनिधिक नावं घेता येतील.
पण काळ स्थित्यंतराचा असल्यानं साहित्यनिर्मिती अधिक व्हायला हवीय. नवे फॉर्म्स, नवे जान्र वापरले जायला हवे आहेत, अधिक प्रयोग व्हायला हवे आहेत. ते करतीलशी अधिक नावं आपल्याला हवी आहेत. या दृष्टीनं आज लिहिते झालेले अनेक ब्लॉगर्स, फेसबुक लेखक हे पुढल्या टप्प्यावरचे पोटेन्शिअल लेखक आहेत.
आज या प्लॅटफॉर्मवरून मी या नव्या आणि पोटेन्शिअल लेखकांना आवाहन करतो की, त्यांनी आपण जे लिहितोय त्याचा अधिक गंभीरपणे विचार करायला हवा आणि तत्कालीन कमेन्टरीपेक्षा अधिक टिकणारं काही लिहायला हवं. तसं झालं तर आज आपल्याला दिसणारा साहित्याचा पट उद्या कितीतरी विस्तृत झालेला दिसेल.
.............................................................................................................................................
गणेश मतकरी यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Mon , 16 July 2018