संत गणपती महाराज : वऱ्हाड प्रांतातले ‘जोतीबा फुले’!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सुनयना अजात
  • संत गणपती महाराज
  • Thu , 12 July 2018
  • पडघम कोमविप संत गणपती महाराज Sant Ganapati Maharaj

वारकरी संप्रदायातील क्रांतिकारी पाउल उचलून अखंड मानवजातीस ‘अ-जात’तेचा संदेश देणारे समाजसुधारक संत गणपती महाराज यांची आज (१२ जुलै) ७४वी पुण्यतिथी. त्यांनी पाऊणशे वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यात, मंगरूळ दस्तगीर गावात जातिव्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारला होता. त्यांच्या प्रयत्नानं ‘अजात’ हा पंथ निर्माण झाला. जो कुठलीही जात न मानता आजही सुरू आहे. आषाढ वारीच्या निमित्तानं हा लेख…

.............................................................................................................................................

महाराष्ट्रातलं संतांचं कार्य भक्कम आणि प्रचंड आहे. ज्या काळात ही संतमंडळी जन्माला आली, त्या काळात समाजाची अवस्था ही भेदाची होती. तो भेद होता जातिभेदाचा, स्पृश-अस्पृश्याचा, श्रीमंत-गरिबीचा, उचनीचतेचा, स्त्रीपुरुष अशा वेगवेगळ्या प्रकारचा. सोबतच रूढी, प्रथा, परंपरा, कर्मकांड, अंधश्रद्धा यांनी व्यापून होता. कुणीतरी सांगितलं म्हणून हे कार्य करावंच लागतं, अन्यथा आपल्यावर कोप होईल या भावनेत समाज जखडलेला होता.

या सर्वांना वाचा फोडणारा, समाजाची सत्य परिस्थिती दाखवणारा, त्याला जातीपातीच्या गर्तेतून बाहेर काढायचं असेल तर त्याचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न किंवा आपणही माणूस आहोत दास नाही, याची जाणीव करून देणारा प्रयत्न संतांनी केला. ज्या मूठभर लोकांनी संस्कृतीच्या नावाखाली लोकांना देवाचा कोप वगैरेची भीती दाखवून कर्मकांडामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, चातुर्वर्ण्य समाज, वर्णभेदातून जातिभेदाकडे वळण्यासाठी प्रयत्न केला, त्या लोकांनी स्वत:ची व आपल्या वंशजांची वर्चस्वाची व्यवस्था, मक्तेदारी मात्र स्वतःकडे ठेवली. बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी देव धर्माच्या नावाखाली या जनसमुदायाला आपल्या मताप्रमाणे वागण्यास बाध्य केलं. सर्वार्थानं या त्यांच्या जोखडांना नाकारण्याचं कार्य जर कुणी केलं असेल तर ते संतांनी.

जाती न पूछो साधू की । पूछ लीजिये ग्यान ॥

मोल करो तलवार का । पडा रहन दो म्यान ॥

संत कबीरांच्या या दोह्यामध्ये माणसाचं मोल हे त्याच्या ज्ञानानं होतं, जातीनं नाही ही स्वच्छ प्रतिमा सर्वांपुढे मांडली आणि त्या काळात साहित्यनिर्मिती करून क्रांतिकारी पाऊल उचलून समाजजागृतीचे, परिवर्तनाचे कार्य त्यांनी केले.

संत, विचारवंत कोण्या एका जातीचे, धर्माचे नसतात तर ते अखंड मानवजातीच्या उत्थानासाठी काम करतात, ज्यामध्ये अनेक थोर संतांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून आपलं मत पदोपदी प्रदर्शित केलं. ज्या ज्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळाली नाही, त्याच्या स्वाभिमानावर, विवेकावर गदा आली, विरोध झाला तेव्हा तेव्हा तो नव्यानं उभा झाला. ज्या प्रकारे करता येईल त्या प्रकारे स्वता:चा विरोध दर्शवला आणि लोकांना जागृत केलं (त्यांचं प्रबोधनाचं माध्यम त्या त्या काळातील होतं.) दास्य वृत्तीचा स्वीकार न करता देवाची (मूर्ती)पूजा, मंदिरप्रवेश, आध्यात्मिक साहित्याचं वाचन, संस्कृत वाचन, देवाची भक्ती या सर्वांची मक्तेदारी फक्त भटांची नाही, असे विचार संतांनी कीर्तन, प्रवचन, अभंग, ओव्या, दोहे, गौळण, पोवाडा अशी साहित्यनिर्मिती करून केली आणि समाजजागृतीचं मोठं कार्य आपापल्या काळात केलं. त्यामध्ये संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा अशा अनेक संतांचा समावेश होतो. स्त्री संतांचादेखील यात तितकाच मोलाचा सहभाग होता. आपल्या व्यथा या स्त्री संतांनी विठ्ठलाजवळ मांडल्या. संताची परंपरा पुरोगामित्वाची होती आणि समाजजागृतीचीही होती. कधी त्यांचा आवाज कायमचा बंद केला गेला, तर कधी समाजातून त्यांना बहिष्कृत करण्यात आलं; पण त्यांची संघर्षाची लढाई मात्र सुरूच राहिली.

या संतांच्या मालिकेतलं एक नाव आहे संत गणपती उर्फ हरी महाराज विठोबा भबुतकर. त्यांनी वऱ्हाडामध्ये समाजात रुजलेल्या सर्व वाईट कुप्रथांना, रूढी, प्रथा-परंपरा, कर्मकांड, अंधश्रद्धेला, तिलांजली दिली आणि अखंड मानवजात एक करण्याचं कार्य केलं. त्यांची वाटचाल मंगरूळ दस्तगीर ता. धामणगाव (रेल्वे) जि. अमरावती या गावापासून सुरू झाली. वडिलांच्या मृत्यूच्या वेळी त्यांचं वय केवळ सात वर्षांचं होतं. त्यांची आई त्यांना काचणूर ता. आर्वी, जि. वर्धा येथून मंगरूळ दस्तगीरला घेऊन आली. भक्ती मार्गाची अतिशय आवड असलेले छोटे गणपती घोराडच्या केजाजी महाराजांना आपल्या गुरूस्थानी मानून त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सोबत कीर्तन-प्रवचन करायला लागले.

बाल गणपतीच्या मनात आपल्या गुरूविषयी अत्यंत आदर होता. ते भ्रमंती करायला लागले. वारकरी विचाराचे असलेले गणपती कीर्तन, प्रवचन, पंढरीची पायी वारी आणि या सर्वांमधून लोकांना भेटून त्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. गणपती कीर्तन, प्रवचन करून महाराज झाले आणि वाटचाल सुरू झाली, एका नव्या क्रांतिकारी संताची.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4419

.............................................................................................................................................

केजाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गणपतींचं कार्य सुरू राहिलं. त्यांनी देशभ्रमंती करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना पदोपदी समाजातले अनेक ज्वलंत प्रश्न दिसले. त्यावर काय तोडगा काढायचा यावर त्यांचं चिंतन सुरू झालं. त्या प्रश्नांमध्ये माणूस माणसाचा भेद करताना त्यांना दिसला, स्त्रीचा बंदिवास, अघोरी अंधश्रद्धा दिसली, कर्मठ कर्मकांड आणि रूढी-प्रथा-परंपरामध्ये पिचलेला मानवसमाज दिसला. राज्यकर्ते जरी इंग्रज होते तरी व्यवस्थेत समाजात हे भेद आपल्याच लोकांकडून होताना त्यांना दिसले आणि माणूस एक आहे, तो जातीच्या जोखडात बैलासारखा मान खाली घालून गप गुमान व्यवस्थेत माझ्या हेच नशिबात आहे म्हणून स्वीकारत होता. हे दास्यत्व, ही हीनदीन वागणूक, पिळवणूक संत गणपती महाराजांनी आपल्या भ्रमंतीमधून अनुभवली आणि आपल्या कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृतीचं कार्य सुरू झालं. लोकांच्या, बायाबापड्यांच्या मनावर असलेला हा पगडा पुसून काढण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला.

आपल्या ६० हजार पेक्षा जास्त शिष्यांना या कार्यासाठी प्रवृत्त केलं आणि सुरुवात केली स्वत:पासून. भ्रमंती करतांना एकदा अचलपूरला गेले असता त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आटोपला आणि पटवी जातीच्या एका विधवा स्त्री (जिचा सात वर्षांचा मुलगा होता) आंतरजातीय विधवाविवाह केला. त्यामुळे संघर्षाची ठिणगी पेटली आणि विरोध सुरू झाला. एका वकिलानं न्यायालयात केस दाखल केली. ती महाराजांनी स्वत: लढून जिंकली.

अन्न काला

महाराजांनी आपल्या अनेक शिष्यांना सोबत घेऊन अन्न काल्याची सुरुवात केली. कारण कुठलंही धार्मिक कार्य असलं तर अनेक जाती\धर्म\पंथाचे लोक एकत्र येतात आणि आपली भक्ती संपली की, आपापल्या घरी, नातेवाईक, जात, समाजात वळतात. महाराजांनी या भक्तांना सांगितलं की, आपापल्या घरात शिजलेलं अन्न आणा आणि त्याचा काला करून तो प्रत्येकानं प्रसाद म्हणून भक्षण करावा. महाराजांच्या भक्त परिवारामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक होते. १९१६चा तो काळ होता. जवळपास सर्वत्र अस्पृशता पाळली जात होती. हा नीच, तो उच्च असा भेद होता. त्यामुळे महाराच्या घरची भाकर आम्ही कशी खावी, याचा विचार अनेक भक्तांना पडला. त्याचं निरसन महाराजांनी केलं आणि अन्नाच्या रूपानं जात कालवली. या रोटी व्यवहारानं क्रांतीची पाउलवाट सुरू झाली. मग त्या पाउलवाटेचा रस्ता बनवण्यासाठी महाराजांनी अनेक निर्णय घेतले. त्यातलाच एक निर्णय होता बेटी व्यवहाराचा.

बेटीव्यवहार

बेटीव्यवहार जर आपसात झाले तर आपापसातला जातीयवाद नष्ट होऊन या भारतातून जात नष्ट होऊन अखंड मानवजात एक होईल असं स्वप्न उराशी बाळगून या कार्याची सुरुवात झाली. आपल्या शिष्यांना, जनतेला आवाहन करून आपसात वेगवेगळे आंतरजातीय विवाह सुरू केले. इतक्यावरच महाराज थांबले नाहीत तर उद्या या मुलीच्या जीवाला धोका झाला, पुरुषानं दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवले व तिच्या अस्तित्वावर गदा आली तर त्यावर तोडगा काढून ब्रिटिश सरकारच्या काळातील तेव्हाच्या एक रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दोघांचीही संमती नोंदवून साक्षीदारांच्या सह्या व्हायच्या. ही पद्धती होती, महाराजांची.

स्त्री बंदिनी ते स्वामिनी

स्त्रीला बंधमुक्त करण्याचंही काम महाराजांनी त्या काळातकेलं. त्यांनी सांगितलं स्त्रीला वाटत असेल तर तिनं मंगळसूत्र घालावं, सौभाग्याच्या लेण्यापेक्षा सौदर्याचं प्रतीक म्हणून वापरायचं असेल तर ती स्वतंत्र आहे. त्याचीही सुरुवात आधी आपल्या घरातून केली व गुरू आज्ञेनं कित्येक स्त्रियांनी ही बंधनं झुगारली. ते म्हणतात-

स्त्रियांना शिक्षण देत । नाही कपटी जन ॥

याचे सांगती कारण । चित्त देऊन ऐकणे ॥

ज्ञानवान स्त्रिया होतील । पतीसंगे भांडतील ॥

सम अधिकार मागतील । त्यांना ते पडतील देणे ॥

अशा भाषेत त्यांनी स्त्रीबद्दल तत्कालीन लोकं काय विचार करतात हे आपल्या अभंगांमधून सांगितले. त्या काळात लोकांना जातीवरून ओळखले जात होते (उदा. महागु मातंग, दिनू कुंभार, महादेव माळी, गोदा मायरीन इ.) अशाच खालच्या मानल्या जाणाऱ्या जातीतील स्त्रियांना शिक्षणासाठी प्रेरित केलं. त्यातील ‘झिंगा गोंडीन व गोदा  मायरीन’ या स्त्रियांनी त्या काळात अभंग रचना केली. त्यांचे अभंग आजही पाहावयास मिळतात. स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल महाराज  म्हणतात -

कोण्याही जातीची कोणी । कांता आणावी करूनी ॥

तिचे लग्न तिच्या मनाने । झाले जगी पाहिजे ॥

मंदिरप्रवेशाची घटना

समाजातील ज्या लोकांना महाराजांनी आपल्या विचारांनी जोडले होते, त्यांना त्यांच्या जातीतून बेदखल करण्यात आलं. या लोकांना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास मनाई होती. तेव्हा महाराज ज्या ज्या ठिकाणी आपले सहकारी व शिष्यांना घेऊन राहिले, त्या त्या ठिकाणी त्यांनी विहिरी खोदून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. महाराजांनी मंगरूळ दस्तगीर येथे ९ ते ११ नोव्हेंबर १९२९ या दरम्यान एक वऱ्हाड मध्यप्रांतात बहिष्कृत परिषद घेतली आणि हजारो बहुजनांना एकत्र करून स्वत:च्या मालकीच्या विठ्ठल मंदिरात बहुजन, अस्पृश्यांचा प्रवेश घडविला. या प्रसंगी  त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं होतं. मात्र तेव्हा बाबासाहेब कलकत्त्याला होते आणि अन्य कामात व्यस्त असल्यानं त्यांनी कलकत्त्याहून तेव्हाचे अस्पृश्यांचे नेते विराटचंद्र मंडल यांना पाठवलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसीय संमेलन झालं. चळवळीत काम करणारी महाराष्ट्रातील सत्यशोधक मंडळी या तीन दिवसाच्या संमेलनाला उपस्थित होती. विषय होता- ‘बोलक्या सुधारकांनो, इकडे लक्ष द्या.’

परिषदेच्या शेवटी मंदिरप्रवेश, कारकून पगारवाढ, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे मिश्रविवाह, बहिष्कृत वर्गाच्या मुलांसाठी वसतिगृह सक्तीचं, पोलीस खात्यात बहिष्कृतांना जागा, लोकसंख्येच्या मानानं स्थानिककामात प्रतिनिधी निवडणं, लेबर कमिशन व राउंड टेबल कमिशनमध्ये प्रतिनिधी निवडणं, अशा प्रकारच्या मागण्या सरकारकडे करण्यात आल्या. शेवटी स्पृश्य-अस्पृश्यांचं एकत्र सहभोजन झालं. यामध्ये ब्राह्मण, मराठे, राजपूत, कुणबी, माळी, तेली, व मांग जातीचे लोक सहभागी होते. या घटनेचे पडसाद देशभर दिसून आले.

अजात

रूढी, प्रथा, परंपरा मोडताना त्यांनी वाईट प्रथांना तिलांजली देत जन्मानंतर जावळ काढण्यापासून ते मृत्यूनंतर होणाऱ्या मुंडनापर्यंतच्या सर्व विधींना महाराजांनी विरोध केला. समाजातून जात नष्ट व्हावी म्हणून त्यांनी माणसाला जन्मजात चिकटलेली जात संपवण्यासाठी, सर्व मानवजात एक होण्यासाठी जात नाकारली आणि आम्ही ‘अजात’ आहो, जात मानत नाही, असा संकल्प केला. समाजातून जात नष्ट करायची असेल तर आंतरजातीय विवाह व्हायला हवेत म्हणून आपल्या शिष्यांच्या मिश्र विवाहाला सुरुवात केली. हे विवाह करताना स्त्रीची सुरक्षितता जपण्यासाठी या विवाहाला कायद्याचं स्वरूप प्राप्त करून दिलं. त्या काळात एक रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं की, जर पती पत्नीला सांभाळण्यास सक्षम नसला, पुरुषानं व्यभिचार केला तर स्त्री स्वतंत्र आहे. ती तिला वाटेल तो निर्णय घेऊ शकते. शेवटी साक्षीदारांच्या सह्या केल्या आणि स्पष्ट उल्लेख केला की मी पांढरी झेंडीधारी हा विवाह स्वीकार करतो आणि अजात असं नमूद केलं. मिश्र विवाहातून होणारं अपत्य हे जातिहीन म्हणजे अजात असेल असं महाराजांनी जाहीरपणे सांगितलं. आम्ही जात मानत नाही, आम्ही अजात आहोत, शाळेचा दाखला, कोतवाल नोंद, सातबारा, यावर ‘अजात’ लिहायला सुरवात झाली. त्यावेळी कित्येक लोक ‘अजात’ झाले. महाराज आपल्या अभंगात म्हणतात-

देव एकच आहे । दुसरा नाही ॥

कोट्यवधी पुरावे । यासी केव्हाही ॥

आणि अजात असे । देव तो जाणा ॥

असे सदा म्हणती । पंथही नाना ॥

बाप अजात ज्याचा । त्या लेकरा जात ॥

गण्या म्हणे । कोठून आली जगात? ॥

गौरव

डिसेंबर १९२५ मध्ये अखिल भारतीय ब्राह्मणेतर अधिवेशन झाले होते त्या अधिवेशनाला कोल्हापूरचे राजे छत्रपती राजाराम महाराज उपस्थित होते. त्यांच्यासोबत  डॉ. पंजाबराव देशमुख आणि त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीत काम करणारे तेव्हाचे समाजसुधारक उपस्थित होते, याअधिवेशनाचं गणपती महाराजांना मिळालं होतं. त्यांच्या या अद्वितीय कार्याला पाहून छत्रपती राजाराम महाराज यांनी विदर्भातील ‘खरा जोतीबा’ असे गौरवउद्गार संत गणपती महाराज यांच्याबाबत काढले. जातिभेदातीत कृतीतून केलेलं कार्य व गावागावात कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागरणाचं कार्य यामुळे नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी महाराजांना सुवर्णजडित अंगरखा, मुकुट आणि पंचा देऊन त्यांना सन्मानित केलं.

.............................................................................................................................................

लेखिका सुनयना अजात या संत गणपती महाराजांच्या पणती आहेत.

yeotkarsunayana@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Amit Lokhande

Fri , 13 July 2018

सुंदर लेख ....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......