‘मनुस्मृति’ सर्वसमावेशक आहे का?
पडघम - सांस्कृतिक
अंकुश रा. सावंत
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 12 July 2018
  • पडघम सांस्कृतिक मनुस्मृति Manusmriti मनू Manu जातिव्यवस्था Caste System वर्णव्यवस्था Class System

तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. डॉ. अंकुश सावंत यांचं ‘मनुस्मृति : एक समालोचन’ हे पुस्तक १९९६ साली केशव भिकाजी ढवळे या संस्थेतर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणाचा हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

मनूप्रणीत वर्णव्यवस्था ही सर्वसमावेशक म्हणजेच समाजातील सर्व लोकांना सामावून घेणारी आदर्श व्यवस्था आहे, असा भास निर्माण होतो; परंतु सत्य तसं नाही. मनू ठामपणे म्हणतो की, समाज चार वर्णांत विभागला गेला आहे, आणि पाचवा वर्णच नाही. परंतु असं करतानाच समाजातील मोठ्या वर्गाला मनू या चार वर्णांच्या बाहेरच ठेवतो. उदाहरणार्थ, जातिबहिष्कृत आणि गुलाम (दास) यांची व्यवस्था काय?

चार वर्णांचा विचार करताना आपल्याला प्रकर्षानं दिसून येतं की, मनूप्रणीत वर्णव्यवस्था ही जातिव्यवस्थेला पोषक आहे, नव्हे ती अखेर जातिव्यवस्थेतच रूपांतरित होते. वर्ण आणि जाती यांत मनू फरक करतो, परंतु या वर्णव्यवस्थेचा प्रवास अखेर निश्चितपणे जातिव्यवस्थेकडेच होतो. जातिव्यवस्थेची व्यवच्छेदक लक्षणं कोणती? आजच्या हिंदू जातिव्यवस्थेच्या संदर्भात भाष्य करताना डॉ. एन. के. दत्त आपल्या ‘ऑर्गनायझेशन अँड ग्रोथ ऑफ कास्ट इन इंडिया’ या ग्रंथात म्हणतात : ‘वेगवेगळ्या जातींच्या लोकांमध्ये आपापल्या जातीखेरीज इतर जातीशी केलेला वैवाहिक संबंध निषिद्ध मानला जातो. वैवाहिक संबंधाइतकं निषिद्ध नसलं तरीही परजातींच्या लोकांमध्ये मिळून मिसळून खाणंपिणं करणं यावरदेखील बंधनं आहेत. बव्हंशी प्रत्येक जातीसाठी विशिष्ट व्यवसाय ठरविले गेले आहेत. जातीजातीमध्ये उच्चनीचता ठरविण्यात आली असून ब्राह्मण जात ही सर्वश्रेष्ठ जात म्हणून मानली गेली आहे. आपल्या विशिष्ट जातीचे नियम उल्लंघन केल्यामुळे माणूस जातिबहिष्कृत झालेला नसेल, तर केवळ जन्मच त्याला आयुष्यभर त्याच्या जातीशी बांधून ठेवणारा दुवा आहे. एका जातीतून दुसऱ्या जातीतील प्रवेश ही गोष्ट केवळ अशक्य आहे. ब्राह्मण जातीचं वर्चस्व हा या सबंध व्यवस्थेचा मूलमंत्र आहे.’

जातिव्यवस्थेची सारी लक्षणं आपल्याला मनूच्या समाजरचनेत आढळतात. जातिव्यवस्थेतील आंतर-विवाह, सामूहिक जेवणखाण आणि व्यवसाय यांच्यावर असलेले कडक निर्बंध आपल्याला मनुस्मृतीमध्ये पदोपदी आढळतात. ईश्वरनिर्मित फक्त चारच वर्ण असताना आजच्या जाती कुठून आल्या? आपल्याला असं दिसतं की, वर्णव्यवस्थेस आस्ते आस्ते जातिभेदाचं स्वरूप येऊन उच्चनीचतेच्या भावनेनं जनमानसाचा ताबा घेतला. उच्चनीचतेच्या भावनेमुळं आपापल्या वर्णाभोवती संरक्षक भिंती उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली. आपला पिढीजात व्यवसाय हा आपल्या जमातीच्या बाहेरच्या लोकांच्या हाती जाऊ नये, या विचारानं लोक प्रभावित झाले असण्याची शक्यता आहे. या हितसंबंधांपोटीच आस्ते आस्ते जातिव्यवस्था दृढमूल झाली.

मनुस्मृति लिहिली गेली त्यावेळी वर्णावर्णातील भिंती या पोलादी होत्या की, विरविरीत होत्या, आणि सामाजिक निर्बंध हे खूप कडक होते, बोटचेपे होते की अस्तित्वातच नव्हते हा प्रश्न इथं लागू नसून, प्रश्न असा आहे की, या सामाजिक भिंती आणि निर्बंध यांचा वैचारिक पातळीवर स्पष्टपणे केलेला उल्लेख मनुस्मृतीमध्ये आहे किंवा नाही? आणि याचं उत्तर आपल्याला होकारार्थीच द्यावं लागतं. मनुस्मृतीमध्ये केलेले अनेक उल्लेख आपल्याला दाखविता येतील. शुद्राजवळचं अन्न उच्चवर्णियांनी खाऊ नये असं मनू स्पष्टपणे मांडतो. आंतर-विवाहावर कडक निर्बंध आहेत आणि प्रत्येक जातीनं करायचे व्यवसायदेखील स्पष्टपणे सांगितले आहेत. जातिव्यवस्तेचा अविभाज्य घटक असलेल्या पूर्वग्रहाची एक स्वाभाविक परिणती म्हणून आपल्याला मनुस्मृतीमध्ये उच्चवर्णप्रवेशावर निर्बंध घातलेले आढळतात.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4284

.............................................................................................................................................

वर्णव्यवस्था नव्हे, शुद्ध जातिव्यवस्था

मनुस्मृतीमध्ये आपल्याला एक गंमतीची आज्ञा आढळते की, खालच्या वर्णीयांनी उच्चवर्णीयांचे व्यवसाय करण्यावर निर्बंध असला तरी, उच्चवर्णीयांना खालच्या वर्णीयांचे व्यवसाय करण्याची मुभा आहे. काही बाबतीत तर ती मनूची आज्ञा आहे… हा जर दृष्टिकोन आहे, तर या व्यवस्थेला वर्ण वा वर्गव्यवस्था म्हणता येईल का? ही शुद्ध जातिव्यवस्था आहे, कारण ती गुणांवर नसून केवळ जन्मावर आधारलेली आहे.

समाजाच्या अगदी वरच्या आणि अगदी तळाच्या थरांमध्ये मनूनं निर्माण केलेली विषमतेची दरी एवढी मोठी आहे की, ती सामाजिक वा नैतिक कुठल्याही निकषावर असमर्थनीय आहे. दुसऱ्या वर्णांनी ब्राह्मणला पूज्य मानण्यासाठी मनूनं अगदी काळजीपूर्वक व्यवस्था केली आहे. किंबहुना ब्राह्मणवर्णाचं श्रेष्ठत्व मनावर बिंबवण्यासाठीच पानोपानी आटोकाट प्रयत्न केलेला दिसतो. मनू म्हणतो : ‘पूर्वजांचे आणि देवांचे हव्य-कव्य पोहोचविण्यासाठी आणि जगाचे रक्षण करण्यासाठी ब्रह्मदेवाने आपल्या मुखापासून ब्राह्मणास जन्म दिला. ज्याच्या आवाहनामुळेच देव आणि पूर्वज हव्यकव्य ग्रहण करतात, त्या ब्राह्मणाहून कुणीही श्रेष्ठ नाही. सारं जग ही ब्राह्मणांचीच संपत्ती आहे. ब्राह्मणच धर्माचा रक्षक आहे आणि मनूने सांगितलेला धर्म तोच शिकवू शकतो.’

…इथं मनूची ब्राह्मण-धार्जिणी वृत्ती उघड होते. इतर वर्णीयांच्या मनात ब्राह्मणांबद्दल एक प्रकारचा भीतियुक्त आदर निर्माण करण्याचा मनू जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतो. उपरिनिर्दिष्ट लोकांमध्ये मनू ब्राह्मणांच्या सामर्थ्याची जी बढाई मारतो, ती केवळ एक कविकल्पनाच वाटते. इतिहासात तरी या सामर्थ्याची नोंद नाही.

शूद्रांचा तिरस्कार

याउलट, मनू शुद्रांबद्दलचं जे भाष्य करतो ते मात्र आकसानं परिपूर्ण असे आहे. मनुस्मृतीमध्ये शूद्र वर्णाला अत्यंत कठोर आणि अमानुष अशी वागणूक दिल्याचं ठायी ठायी जाणवतं, आणि सुसंस्कृत मन भांबावून अवाक होतं. उदाहरणार्थ, दुसऱ्यांची सेवा करण्याचं काम मनू शुद्राकडे सोपवितो, पण त्याचबरोबर सेवा करण्याला श्ववृत्ती म्हणजे कुत्र्याची वृत्ती असं म्हणून हेटाळणी करतो. मुलाच्या नामकरणाच्या बाबतीत शूद्रावर अन्यायच होतो. मनू म्हणतो : ‘ब्राह्मणाचं नाव मंगलवाचक असावं, क्षत्रियाचं सामर्थ्यवाचक, वैश्याचं धनवाचक तर शूद्राचं निंद्य असावं. शूद्राचं नाव नोकरीचाकरीयुक्त असावं.’ ज्याप्रमाणे इतर वर्णीयांनी ब्राह्मणांना श्रेष्ठत्व प्रदान करण्यासाठी मनू त्यांना धाक दाखवितो, तसाच धाक तो इतर वर्णीयांनी शूद्रांना रौरवातून वर येण्याला मदत करू नये यासाठी दाखवितो. मनू स्पष्टच आदेश देतो की, शूद्राला फलदायी असा उपदेश करू नये. त्याला हविशेष देऊ नये, त्याला धर्माचा अर्थ समजावून सांगू नये किंवा प्रायश्चित्त वा व्रतवैकल्येदेखील सांगू नयेत. जो कोणी या आदेशाचे उल्लंघन करून शूद्राला उपदेश करील वा व्रतवैकल्ये सांगेल तो त्या शूद्रासह असंवृत्त नामक नरकात जाईल. शूद्राला खाजगी मालमत्ता नाही. त्याच्याजवळ असलेली संपत्ती ही तो ज्याची सेवा करतो आहे त्या मालकाची. मनात कसल्याही प्रकारचा किंतू न धरता ब्राह्मणानं आपल्याकडच्या शूद्राची संपत्ती हिरावून घ्यावी… अशा प्रकारे आकसानं शूद्रांना अत्यंत हीन लेखण्याची ही वृत्ती मनुस्मृतीत जागोजागी आढळते.

सारं काही ब्राह्मणांचे हितसंबंध जपण्यासाठी

आदर्श अशा समाजाची स्थापना करायची असेल तर त्यासाठी समाजाच्या एकंदर गरजा लक्षात घेऊन संपूर्ण समाजाची विभागणी करणं हे ओघानं आलं. सर्व समाज केवळ ब्राह्मण वर्ण म्हणून जगू शकणार नाही. त्याचप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्ण, वैश्य वर्ण वा शूद्र वर्ण म्हणूनदेखील जगू शकणार नाही. सगळ्या गरजा तेवढ्याच महत्त्वाच्या; म्हणूनच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे सारेच कमी-अधिक महत्त्वाचे आहेत. मनू तेच करतो. संपूर्ण समाजाची विभागणी चार वर्णांत करून त्यांची कामेदेखील वाटून देतो. एवढंच नाही, तर कुणीही दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ न करता स्वत:चं काम व्यवस्थित करावं असं प्रत्येक वर्णाला बजावतो. ही व्यवस्था आदर्शवत मानली तर संपूर्ण समाजाची प्रगती होणं शक्य आहे, असं एक वेळ गृहीत धरू. परंतु मग स्वाभाविकच प्रत्येक वर्णाचे आर्थिक, सामाजिक, राजकीय हितसंबंध जपण्याची जबाबदारीदेखील मनूवरच येते. पण मनू ही जबाबदारी मात्र न्यायबुद्धीने सांभाळताना दिसत नाही. या व्यवस्थेत शूद्रांना तर काहीच अधिकार नाहीत. समाजाच्या प्रगतीसाठी  वाटेल तसं राबवून घेतलं जाणारं एक मानवी यंत्र म्हणूनच शूद्र वर्णाकडे पाहिलं जातं.

वैश्यांच्या बाबतीतदेखील परिस्थिती वेगळी नाही. त्यांनी फक्त समाजाच्या गरजा भागविण्याचं कार्य करावं. परंतु त्यांच्या सामाजिक आणि राजकीय अधिकारांचा विचार मनुस्मृतीमध्ये केला गेलेला नाही. त्यामुळे वैश्यांची स्थितीदेखील शूद्रांपेक्षा फार वेगळी नाही.

क्षत्रियांच्या हितसंबंधांचा विचारदेखील त्रोटकच आहे. मनू फक्त एका अध्यायात राजधर्माचं वर्णन करताना, क्षत्रियवर्णाचा विचार करताना दिसतो. क्षत्रियांजवळ ताकद आहे, सत्ता आहे, त्यामुळे ते आपला अधिकार बजावणारच, आणि आपल्या हितसंबंधांची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत. परंतु ब्राह्मणवर्ग मात्र या बाबतीत लंगडा आहे आणि म्हणून ब्राह्मणांच्या अधिकारांची आणि हितसंबंधांची आठवण समाजाला वारंवार करून देणं अगत्याचं आहे, असं मनोमन मानून तर मनू वारंवार ब्राह्मणांचा उल्लेख करीत नाही ना, अशी शंका घ्यायला अनेक जागा आहेत.

ब्राह्मणांचे हितसंबंध जोपासण्यासाठीच मनुस्मृतीची निर्मिती झाली आहे की काय अशी शंकेची पाल वारंवार चुकचुकते. क्षत्रियांना चुचकारण्याची अनिवार्य गरज मनू पूर्णपणे जाणून आहे. किंबहुना ब्राह्मणांचे हितसंबंध जपायचे असतील तर क्षत्रिय वर्णाला हाताशी धरलंच पाहिजे, ही व्यावहारिक गरज मनू चांगलीच ओळखतो, आणि म्हणूनच एका ठिकाणी म्हणतो की, ब्राह्मणांशिवाय क्षत्रियांचा आणि क्षत्रियांशिवाय ब्राह्मणांचा उत्कर्ष होत नाही. परंतु ब्राह्मण आणि क्षत्रिय हे वर्ण एकत्र आले तर इहलोकीच नव्हे, तर परलोकीदेखील त्यांचा उत्कर्ष होतो. वैश्य आणि शूद्र वर्णांचा त्यांच्या उत्कर्षाच्या दृष्टीने विचार करण्यची आवश्यकताच भासत नाही, ते फक्त श्रमिक आहेत. मनू स्पष्टपणे म्हणतो : ‘वैश्य आणि शूद्र यांच्याकडून त्यांची ठराविक कामे करवून घ्यावीत, नाहीतर कर्मोल्लंघन करून ते जगास सतावून सोडतील.’ मनू एका ठिकाणी स्पष्टपणे म्हणतो की, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या कामाची सर्वांना कल्पना यावी यासाठी स्वयंभू मनूनं मनुस्मृतीची निर्मिती केली. मनू चार वर्णांबद्दल कितीही बोलत असला, तरी इथं त्याच्या उद्दिष्टांची स्पष्ट कल्पना येते. वैश्य आणि शूद्र यांचा विचार फक्त एक साधन म्हणून करायचा, मुख्य विचार हा ब्राह्मण वर्णाचाच करायचा, आणि ब्राह्मण वर्णाचे हितसंबंध जपण्यासाठी केवळ क्षत्रिय वर्णाचा विचार करायचा असं त्याचं धोरणं दिसतं.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Mon , 16 July 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......