अजूनकाही
पावसा,
स. न. वि. वि.
सुरुवातीलाच दोन खुलासे. म्हणजे नंतर नस्ती भानगड नको. कारण हल्ली कुणाचा काही भरवसा राहिलेला नाही. अगदी ‘आपले’से वाटणारे ‘दुरावले’से झालेले आहेत. त्यामुळे तुझाही भरवसा गृहीत धरता येत नाही.
खुलासा क्रमांक एक : तुझ्या नावापुढे प्रथेप्रमाणे ‘प्रिय’ वगैरे लिहिण्याचा परिपाठ जाणीवपूर्वकच टाळलेला आहे. ती अनवधानानं झालेली चूक नाही. कारण एरवी आमच्या आठवणीतली, बालपणातली, तारुण्यातली आणि आता प्रौढपणातली तुझी काही रूपं ही गोडगोजिरी, साजरी असली, तू अख्ख्या ‘महाराष्ट्राचा व्हलेंटाइन’ असलास, बाल-तरुण-ज्येष्ठ अशा सर्वांना एकाच वेळी (कमी-अधिक फरकानं) रोमँटिक करत असलास तरी गेल्या दहा-बारा दिवसांतलं तुझं वर्तन काही तुला ‘प्रिय’ वगैरे म्हणावं असं राहिलेलं नाही. मुंबई, नागपूर या राज्याच्या दोन राजधान्यांसाठी तरी नक्कीच नाही. तुझ्यापेक्षा ऑनलाईन ट्रोल परवडले असं आता वाटायला लागलं आहे. कारण त्यांचा मारा थोपवता येत नसला तरी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करता येतं, अगदी अतीच झालं तर त्यांना सरळ बॅन करून त्यांच्या मनस्तापापासून निदान स्वत:ची सुटका करून घेता येते. पण तुझ्याबाबतीत तीही सोय नाही. पण तुझं एकंदर वर्तन मात्र त्या ट्रोलांसारखंच झालंय. हल्ली अनेकांचं, अगदी जवळच्या मित्रांचं, आप्तांचं, स्नेह्यांचं आणि आपल्या वाटणाऱ्या माणसांचंही काहीच कळेनासं झालंय. कारण कोण कधी ट्रोलधाडीत किंवा रस्त्यावरच्या झुंडींत सामील होईल याचा भरवसा राहिलेला नाही. त्या यादीत आता तुझीही भर पडली आहे!
खुलासा क्रमांक दोन : सुरुवातीच्या मायन्यानंतर ‘स. न. वि. वि.’ हेही जाणीवपूर्वकच लिहिलेलं आहे. त्यातही अनवधानानं कुठलीही चूक झालेली नाही. आता हे मान्य आहे की, तू आमच्यापेक्षा बराच ज्येष्ठ आहेस. कितीतरी लाख वर्षं वगैरे तुझं वय असेल. त्यामुळे तू आमच्या वाडवडिलांपेक्षाही कितीतरी बुजुर्ग आहेस हे खरं. पण आम्ही हल्ली आपल्या वाडवडिलांच्या वयाच्या व्यक्तींचा, प्रत्यक्षात वाडवडिलांचाही मुलाहिजा ठेवत नाही, तिथं तुझा तरी काय म्हणून ठेवायचा? त्यात तुझं वर्तनही त्या बुजुर्गपणाला साजेसं राहिलेलं नाही. सोशल मीडियावर जे कामधंदा नसलेले काही बुजुर्ग फुकटात, तर काही बुजुर्ग पैशाखातर कुणावर तरी सतत हल्ला करत असतात. त्यांचाच कित्ता या दहा-बारा दिवसांत तूही गिरवलेला आहेस. त्यामुळे ‘सा.न.’ असं न म्हणता ‘स. न. वि. वि.’ एवढंच लिहिलं आहे. खरं तर यातलं ‘वि.वि.’ (विनंती विशेष) हेही लिहिलं नसतं. कारण जसा ऑनलाईन ट्रोलांना विनंती करून उपयोग नसतो, तसाच तुलाही विनंती करून किती उपयोग होईल माहीत नाही. पण त्या ट्रोलांचा बंदोबस्त करायची जशी काही ना काही सोय आहे, तशी काही सोय तुझी अजूनही तरी आम्ही निर्माण करू शकलेलो नाही. त्यामुळे केवळ तरणोपाय नसल्यानं ‘वि.वि.’ हे डब्बे जोडावे लागले आहेत, हे लक्षात घे.
तर पावसा, मूळ मुद्दा असा की, तू सध्या देशात अहोरात्र धूमाकूळ घालत असलेल्या ट्रोलधाडीकडून दीक्षा तर घेतली नाहीस ना? किंवा त्यांच्यात सामील तर झाला नाहीस ना? कारण तुझ्यामुळे एकट्या मुंबईचं काय झालं माहीत आहे का तुला? तुझ्याकडे मराठी वर्तमानपत्रं येतात की नाही माहीत नाही. (त्यात तुला मराठी वाचता येतं की नाही, तेही माहीत नाही.) पण मागच्या दहा-बारा दिवसांतल्या मुंबईच्या वर्तमानपत्रांतल्या हेडलाईन्सची शीर्षकं जरी तू वाचलीस\ऐकलीस तरी तुझ्यामुळे काय हाहाकार माजलाय याची कल्पना येईल. उदा. ‘मुंबईचा दैनादिन’, ‘‘तुंबई’त पावसाची कोसळधार’, ‘आठवडा पावसाचा’, ‘पावसाचा ‘रेड अॅलर्ट’’, ‘मुंबईची पाऊसकोंडी’, ‘सरींचा सप्ताह’, ‘पाऊसदणका’, या मागच्या आठ-दहा दिवसांतील लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि प्रहार या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या हेडलाईन्स वाचल्या\ऐकल्या की, काय दिसतं? तुझं रौद्र, क्रूर रूप!
या हेडलाईन्स वाचल्यावर असं वाटतं की, तू तर ऑनलाईन ट्रोल्सच्याही चार पावलं पुढे गेला आहेस. ते ट्रोल फक्त फुरोगाम्यांना, खाँग्रेसीजनांना, मुस्लिमांना आणि भाजपविरोधकांना लक्ष्य करतात. त्यांची औकात, आयक्यू, जात-धर्म, चारित्र्य सगळं चव्हाट्यावर आणतात. जिथं भाजपविषयी सातत्यानं टीकाच असते, तिथं जाऊन शिव्या घालायच्या, टीकाकारांच्या सात पिढ्यांचा उद्धार करायचा आणि भयानक आरडाओरडा करत शिव्याशाप द्यायचे असा एककलमी कार्यक्रम हे ट्रोल्स करतात. तू तर त्यांनाही मागे टाकलंस. फुरोगामी, खाँग्रेसजन, मुस्लिम, ख्रिश्चन, भाजपविरोधक यांच्यासह सज्जन, अतिसज्जन, देशप्रेमी, जात-धर्मासाठी प्राण हाती (आणि पाकिट खिशात) घेणारे, देशासाठी अहोरात्र राबणारे, पोटासाठी धावाधाव करणारे, श्रद्धाळू, अंधश्रद्धाळू, कुणाच्याही अध्यातमध्यात नसणारे, अशा सर्वांना एकाच तागडीत तोलून सर्वांवर सारखाच कोसळधार कोसळलास.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4419
.............................................................................................................................................
हे काही तू चांगलं केलं नाहीस. तुझ्या या कोसळधारीमुळे नागपुरातलं ‘हिवाळी’ अधिवेशन ‘पावसाळी’ झालं. आता हे खरं आहे की, विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत झालं काय नि नागपुरात झालं काय, त्यातून फारसं काही घडत नसल्यानं त्याचा फार गवगवा करायचं काही कारण नाही. पण तू नागपूर विधिमंडळाचंच पानिपत करून थांबला नाहीस. नागपुरातलं जनजीवनही विस्कळीत करून ठेवलंस. ‘नाग‘पूर’’ अशा काही वर्तमानपत्रांनी हेडलाइन्स केल्या रे! वर्तमानपत्रांना अशा हेडलाईन्स मिळतात, तेव्हा जनसामान्यांना काय भोगावं लागलेलं असतं, याची तुला कल्पना असेलच की रे! तुलाही संसार, लेकरंबाळं असतीलच ना? तुझं तर त्या ऑनलाइन ट्रोल्ससारखं नाही ना, की खोट्या नावांनी हल्ला करायचा. म्हणजे आपण सुरक्षित राहतो. लोक त्या खोट्या नावाचाच पंचनामा करत राहतात.
इकडे राजधानी मुंबईत रेल्वेरूळावरील दोन पूल कोसळले. त्यात एक महिला हकनाक मृत्यू पावली. पण मुंबई हे शहर रस्त्यावरून चालत नाही, ते रूळावरून चालतं रे! तुझ्या या कोसळधार हल्ल्यामुळे मुंबईकरांची केवढी दाणादाण उडाली. त्यात हल्ली अशा आणीबाणीच्या वेळी मराठी वर्तमानपत्रंही मुंबईकरांच्या ‘स्पिरीट’ला उत्तेजन देण्यापेक्षा त्यांच्या लोकलमध्ये चढतानाच्या अगोचरपणाच्या, धाकदपटशाच्या आणि बेमूर्वतखोरपणाच्या वर्तनाचेच दाखले द्यायला लागली आहेत. मग कुठून रे ती शहाण्यासारखी वागणार?
या देशात सध्या बरीचशी माणसं ही न्यायाला, स्वातंत्र्याला, लोकशाहीला, सर्वधर्मसमभावाला इतकंच नाही तर ‘मानुष’तेलाही दिवसेंदिवस तिलांजली देण्याच्या, चूड लावण्याच्या मोहिमेवर निघालेली आहेत. तूही त्यांच्याच टोळीत सामील व्हावंस? गारद्यांच्या (पक्षी ट्रोल्सच्या) गर्दीत रामशास्त्रींनी सामील होण्यासारखंच नाही का रे हे? तसे या देशात सध्या काही रामशास्त्री गारद्यांच्या (पक्षी ट्रोल्सच्या) टोळीत सामील झाले आहेत, काही रामशास्त्री स्वत:च गारदी (पक्षी ट्रोल) झाले आहेत. पण तूही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकशील असं वाटलं नव्हतं रे!
ऑनलाईन ट्रोल्सनी जशी या देशाची ‘व्हर्च्युअल तुंबई’ करून टाकली आहे, तशीच तूही मुंबईनामक राजधानीची ‘तुंबई’ केलीस रे! अशा तुझ्या वागणुकीनं तुझ्या रोमँटिकपणाविषयी, तुझ्या उल्हसितपणाविषयी कसं रे बोलावं? तुला पाहून कवींना कशा रे कविता सुचतील? अशानं तू कसा रे आमच्यासाठी रोमँटिक होशील? देशातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचा तर तू तारणहार मानला जातोस. म्हणजे जायचा म्हणे!
याच आठवड्यात देशाच्या पंतप्रधानांनी एकीकडे छत्तीसगडमधील एका शेतकरी महिलेकडून सरकारच्या धोरणांमुळे आपलं उत्पन्न दुप्पट झाल्याचं खोटंच वदवून घेतलं, तर दुसरीकडे उत्पादनखर्चापेक्षा दुप्पट हमीभावाची धूळफेक केली! त्यात भर तुझी. तुझ्या कोसळधार कोसळण्यानं शेतकरी अजूनच गाळात जाणार रे! वर्तमानपत्रं हल्ली शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आत्महत्या घडल्याशिवाय स्थान देत नाहीत. सरकार शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत त्यांना भुलवतंय आणि तू असा अहोरात्र बेफाम! अशानं लाखोंचा पोशिंदा शेतकरी जगायला मिंधाच होणार रे! त्याला बुडवायलाच तू निघालास की रे!
म्हणूनच म्हटलं तुझ्यात आणि ऑनलाईन ट्रोल्समध्ये फारसा फरक दिसत नाही. त्या ट्रोल्सचं बरं आहे रे. त्यांच्यातल्या काहींना त्यांच्या कामाचे रितसर पैसे मिळतात. काहींना त्यांचा रिकामा वेळ कारणी लावता येतो. इतरांचं चारित्र्यहनन करून, त्यांचा द्वेष करून, त्यांना शिव्याशाप देऊन, त्यांना ‘देशद्रोही’ ठरवून ‘देशहित’ वगैरे साधता येतं, हिंदूधर्माचं पालन करता येतं. स्वत:च गुन्हा करून इतरांवर त्याचा ठपका ठेवल्यानं त्यांचं स्वत:चं पोट भरतं, मनही भरतं.
सगळीच माणसं सारखी नसतात, त्यामुळे काही माणसं ही अशी अमानुषपणे वागणारच. कधी ती जात-धर्माच्या नावानं अशी वागतात. कधी आपल्या आवडत्या दैवताच्या\पक्षाच्या\देशहिताच्या नावानं अशी वागतात. कधी पैशासाठी वागतात, तर कधी आपला रिकामा वेळ सत्कारणी लावण्यासाठीही. तू माणूस नाहीस, त्यामुळे तुझ्याकडून तरी ‘अमानुष’पणा अपेक्षित नाही. ‘माणसांनी माणसांशी माणसासारखं वागणं, हीच मुळात खूप कठीण गोष्ट आहे,’ असं ज्यांना आदरानं ‘गुरुजी’ असं संबोधतात ते नरहर कुरुंदकर म्हणतात! पण पावसानं माणसांशी ‘मानुष’पणे वागावं, ही काही तितकी कठीण गोष्ट नाही रे! ज्या गोष्टी मुळात कठीण नसतात, त्या आचरणात आणायलाही कठीण नसतातच. त्यामुळे तू असा कोसळधार कोसळू नकोस, नागपूरवरही नको, मुंबईवरही नको आणि उर्वरित महाराष्ट्रावरही नको. तू जरा शुद्धीत राहा. फार उन्मादात राहू नकोस. उन्मादालाही शेवटी मर्यादा असते, शेवट असतो. त्या ट्रोल्सच्या नादाला लागू नकोस. तू आपला आमच्यासारखाच सामान्य हो, ‘मानुष’ हो!
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment