अजूनकाही
रिचा जैन नावाच्या नागपूरच्या महिला अचानक चमत्कारिकरीत्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांचा पराक्रम तो काय? त्यांनी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५०० बोकडांचं शारजाला जाणारं विमान अडवलं. शारजा आणि आखात विमानातून बोकडांची निर्यात होणार होती. बोकड विकून धनगर समाजाला पैसे मिळणार होते. चांगले, भरपूर. अशी निर्यात वाढली की, विदर्भात शेळ्या-मेंढ्या पालनाला चालना मिळणार होती. धनगरांसह इतर पशुपालक शेतकरी समाजाच्या घरात पैसा खुळखुळणार होता.
बोकडांचं विमान थाटामाटात पाठवलं जाणार होतं. त्यासाठी खास समारंभ होणार होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिराज्यमंत्री गजेंद्र शेखावत, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर येणार होते. धनगर समाजातून आलेले खासदार डॉ. विकास महात्मे यांनी या समारंभासाठी, बोकड निर्यातीसाठी पुढाकार घेतला होता.
अॅमिगो लॉजिस्टिक्स, युएसए इन्टरप्रायझेस या उद्योग कंपन्यांच्या साहाय्यानं हा उपक्रम तडीस जाणार होता. उद्योग, कृषी खातं, मिहान आणि एअर इंडिया यांचं सहकार्य होतं. असा सगळा सरकार पुरस्कृत उद्योग पुढे जात असताना रिचाबाईंनी खोडा घातला. त्या अखिल जैन समाजाच्या प्रतिनिधी आहेत. दिगंबर पंथीय आहेत. त्यांनी बोकडांच्या हिंसेला विरोध केला. विमान थांबवा म्हणाल्या. संत्रीसाठी प्रसिद्ध असलेलं नागपूर बोकड निर्यातीसाठी कुप्रसिद्ध करायचं का? बोकडांच्या हिंसेमुळे नेपाळात भूकंप झाले. तशी विघ्नं नागपूर परिसरावर येतील. बोकडांच्या तळतळाटाचं पाप नको, असे युक्तिवाद करत. रिचाबाईंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही गळ घातली. नंतर सारी सरकारी यंत्रणा हलली. आणि विमान अडवण्यात रिचाबाई यशस्वी झाल्या.
जैन संघटना यापूर्वीही शाकाहारासाठी आग्रही होत्या. हिंसा नको, असं जैन धर्म सांगतो. त्याबद्दलही सर्वांना आदर आहे. पण सरकारी धोरणावर त्याचा परिणाम असा थेट कधी झाला नव्हता. गोवंश हत्याबंदीचा कायदा झाला, पण म्हशी, रेडकू कापू नका, त्यांचं मटन खाऊ नका, असं कुणी म्हणत सरकारला वेठीस धरलं नव्हतं. शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, मासे खाण्यात हिंसा आहे, हे जैन समाज म्हणे! पण ते जाहीर म्हणायची आणि आता बोकड खाण्याला आमचा विरोध आहे, अशी भूमिका घेऊन भांडायची जैन संघटनांना हिंमत कुठून आली?
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4284
.............................................................................................................................................
हे समजून घ्यायचं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकारणाची पद्धत लक्षात घ्यावी लागेल. समाज शाकाहारी असला पाहिजे, ही भूमिका जैनांची, पण तिचा राजकीय वापर करणं संघ परिवाराच्या हिताचं आहे. मांसाहार करणं अपवित्र, अशुद्ध, अस्वच्छ, वाईट, पाप. म्हणून अमानवी, राक्षसी. मांसाहारी माणसं कमी दर्जाची. खालच्या पातळीची. मांसाहार कोण करतं, तर त्यात जास्ती संख्या बहुजन समाजाची. यात कोण येतं? इतर मागासवर्गीय (ओबीसी), आदिवासी, ख्रिश्चन, पारशी, शीख, दलित, मुस्लीम. म्हणजे ब्राह्मणेतर. संघ परिवाराचं राजकारण\संघटन मुस्लीम, ख्रिश्चन द्वेषावर उभं आहे. या समूहांचा द्वेष करण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण ते मांस खातात, शाकाहारी नाहीत हे आहे. मांस खाणाऱ्यांचा द्वेष करण्याचा संघ परिवाराचा अजेंडा चलाखीनं आता जैनांच्या खांद्यावर दिला गेलाय. संघाची ही चाल यशस्वी ठरताना दिसतेय. या चालीच्या यशातली एक पायरी म्हणून नागपूरचं बोकडांचं विमान अडवलं गेलं.
बोकड निर्यात बंदीच्या भानगडीनं बहुजन समाजात राग वाढणं साहजिक आहे. या समाजातील धनगर आणि इतर पशुपालक समाजाचा शेळ्या-मेंढ्या पाळणं हा वर्षानुवर्षांचा व्यवसाय आहे. भारतभर शेतीला पूरक उद्योग म्हणून हा समाज शेळ्या-मेंढ्या पाळतोय. शेळ्या-मेंढ्या-बोकडांची निर्यात होऊ लागली तर या व्यवसायाची भरभराट होईल. ज्या शेतकरी कुटुंबात शेळ्या-मेंढ्या-कोंबड्या पाळतात, तिथं आत्महत्या कमी होतात. कारण शेती तोट्यात गेली तर अडीअडचणीला त्या विकून उदरनिर्वाह करता येतो. आजारपण, मुलांचं शिक्षण अशा खर्चाला पैसे उभे करता येतात.
शिवाय शेळ्या-मेंढ्यांचा धंदा व्यावसायिक पद्धतीनं अधिक भांडवल गुंतवून केला तर अल्पावधीत श्रीमंती घरात येते, अशी उदाहरणं आहेत. अशा या हुकमी व्यवसायावर या बोकड निर्यात बंदीच्या भूमिकेनं गदा आणण्याचा प्रयत्न होतोय.
रिचाबाईंनी बोकड विमान अडवलं, त्यात सर्वांत मोठी अडचण धनगरांच्या नेत्यांची झालीय. खासदार महात्मे हे धनगर आरक्षण चळवळीतून पुढे आले आहेत. या चळवळीचे नेते म्हणून त्यांना भाजपनं खासदारकी दिली. तसे महात्मे हे संघ परिवाराशी स्नेह असलेले. पण विदर्भात त्यांच्या मागे धनगर समाज आहे. त्याचा भाजप, संघ परिवाराला उपयोग करून घेता येईल, अशा हेतूनं त्यांना खासदारकी दिली गेली. धनगर समाजानंही आरक्षणाचं आश्वासन देणाऱ्या भाजपला मोठ्या संख्येनं मतदान केलं. सत्तेवर आल्या आल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत तुम्हाला आरक्षण देतो, असं सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार वर्षं उलटून गेली तरी आरक्षण देण्यात अपयशी ठरले आहेत. आरक्षण मिळेल की नाही, एस.टी. प्रवर्गात समावेश होणार की नाही या चिंतेनं धनगर समाज हतबल झालाय.
महात्मे यांनी या संतापाची वाफ निघून जावी म्हणून बोकड निर्यातीची फुंकर घातली होती. पण जैन समाजाच्या विरोधापुढं सरकारनं नांगी टाकली आणि महात्मेही गळपटले. महात्मे यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली. ते केविलवाणे होऊन म्हणताहेत, ‘जैन समाजाला समजावून सांगू. बोकड निर्यात फायदेशीर आहे. धनगरांचं त्यात हित आहे हे पटवून देऊ.’
तर दुसरीकडे महादेव जानकर हे धनगर नेते तोंड लपवताहेत. जानकर पशुसंवर्धन मंत्री आहेत. त्यांनी या विषयावर भूमिका घ्यायला हवी होती. पण ते बोलायला तयार नाहीत. त्यांची आमदारकीची मुदत संपत आली होती. विधान परिषदेत भाजपच्या कोट्यातून आमदारकी मिळाली तर मंत्रीपदी राहता येणार होतं. बोकड निर्यात बंदीची भानगड घडत असताना त्यांना आमदारकी मिळाली. त्या आनंदात ते मश्गुल आहेत. राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. तिथं जानकर आमदारकी मिळाल्याचा आनंद घेऊन मिरवताहेत, पण बोकड बंदीवर अवाक्षर काढायला तयार नाहीत.
एसटी आरक्षण लांबवलेल्या भाजपनं धनगर समाजाच्या भळभळत्या जखमेवर आता बोकड बंदीचं मीठ रगडलंय. त्यामुळे हा समाज येत्या काळात आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जैनांच्या मांसाहार विरोधाच्या मनमानीवर आधीच मुंबईत तीव्र संताप आहे. तो पर्युषण पर्वाच्या काळात उफाळून येत असतो. नागपुरात बोकड विमान रोखलं यामुळे जैन समाजातला आक्रमक गट आता अधिक धिटाईनं मोठ्या शहरात मांसाहाराला विरोध करू लागेल. संघ परिवार अर्थातच या आक्रमक गटाची पाठराखण करेल. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन संस्था या संघटना जशा हिंसक वातावरण तयार होण्यासाठी पूरक माहोल तयार करतात, तसा हिंसक माहोल जन्माला घालण्यासाठी जैन समाजाला संघ परिवार वापरण्याची शक्यता आहे. त्यातून वातावरण अधिक हिंसक बनेल. त्याचा स्फोट येत्या पर्युषण पर्वात होऊ शकतो.
भारतात ९०-९५ टक्के समाज मिश्रहारी आहे. मांस हा त्याच्या अन्नातला महत्त्वाचा, जीवनावश्यक घटक आहे. आमचंच म्हणणं खरं, आमचाच विचार मोठा, शाकाहार हाच शुद्ध, अशी अव्यवहारी भूमिका घेणाऱ्या गटांना हा समाज, हा देश, त्याची संस्कृती कळलेली नाही. महात्मा गांधी शाकाहारी होते. पण ते मांसाहारींचा द्वेष करत नसत. म्हणून त्यांच्या वर्ध्याच्या आश्रमात सरहद्द गांधी म्हणजेच खान अब्दुल गफार खान यांच्यासाठी मांस शिजे. कधी ते बीफही असे. गांधींना हा देश कळला होता. संघ परिवार गांधींना प्रात:स्मरणीय मानतो. पण त्यांचं जगणं समजून घेत नाही. म्हणून या गडबडी सुरू आहेत.
संघाचं देशावर राज्य आलंय. त्या काळात जैन समाज बोकड निर्यात बंदीची मागणी करतोय. त्याला संघाचा आशीर्वाद आहे. हे सर्व जनतेला कळत नसेल असं संघ परिवाराला वाटत असेल, पण ती वस्तुस्थिती नाही. हा गांधींचा देश आहे!
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Wed , 11 July 2018
✔