अजूनकाही
एखाद्या चित्रपटाची एकूण मांडणी तसेच परिणाम पाहता त्याच्या दिग्दर्शक, पटकथाकारांचं कसब लगेच लक्षात येतं. ‘यंग्राड’कडे पाहता ‘रिंगण’ या दिग्दर्शकीय पदार्पणातील चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या मकरंद माने या दिग्दर्शकाकडे तसं कथनाचं कौशल्य असल्याचं दिसून येतं. आणि ‘रिंगण’ काही अपघाती उत्तम चित्रपट नव्हता हेही स्पष्ट होतं.
विकास ऊर्फ विक्या (चैतन्य देवरे) या नायकाच्या कथनानं चित्रपटाला सुरुवात होऊन आपण काही वर्षांपूर्वीच्या त्याच्या पौगंडावस्थेतील जीवनात जाऊन पोचतो. ज्यात आपली ओळख त्याचे तीन मित्र- गणेश ऊर्फ बाप्पा (जीवन कराळकर), मोन्या (शिव वाघ) आणि अनंत ऊर्फ अंत्या (सौरभ पदवी) यांच्याशी होते. अर्थातच इथून पुढील भाग अधिक हलक्याफुलक्या अशा मित्रांच्या कथेच्या माध्यमातून पुढे जात राहतो. मात्र सोबतच या सर्वांना एका भाईविषयी असलेल्या सुप्त आकर्षणामुळे चित्रपट तेही उपकथानक सोबतीला घेतो. त्या अनुषंगानं त्यांनी बल्लाळ भाऊसाठी (विठ्ठल पाटील) काम करणं ओघानं आलंच. याखेरीज विकासच्या प्रेमाचं एक लहानसं उपकथानकदेखील आहेच. मग ही सर्व टोकं एकत्र येऊन एका पॉइंटला येऊन चित्रपटाचा पूर्वार्ध संपतो.
पुढे चित्रपट बऱ्याच वेगवेगळ्या वळणांवरून जात असला तरी त्याचा सूर काहीसा - तरुण वयात होणाऱ्या चुका - असा असल्याचं लक्षात येतं. शिवाय चित्रपटाच्या शेवटी तसं कार्ड आल्यानं आधीच बाळबोध वाटणाऱ्या शेवटानंतर ते कार्ड विनोदी वाटतं.
प्रत्येक पिढीचा आणि त्यातही पुन्हा प्रत्येक दशका-अर्धदशकाचा असा एखादा चित्रपट असतो. या दशकाचा तसा चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’. ज्याचा अगदी मराठीच नव्हे तर अनुराग कश्यपसारख्या दिग्दर्शकाच्या ‘मुक्काबाज’वरही थोडाफार का होईना प्रभाव होता. ‘यंग्राड’वरही तो प्रभाव, सकारात्मकरित्या जाणवत राहतो. एक बऱ्यापैकी चांगली कलाकृती पाहता नक्कीच स्वीकारार्ह आहे. मात्र आधी चित्रपटाच्या उत्तरार्धात काही उणीवा जाणवत राहतात. ज्या त्याच्या पूर्वार्धाची उत्तम म्हणावी अशी मांडणी पाहता खटकतात. या उणीवा तशा फार विशेष नाहीत. कारण त्या मुख्यतः लेखनाच्या पातळीवरील आहेत. मात्र त्या टाळता येणं शक्य होतं हे जाणवत राहतं. यात शशांक शेंडे आणि अझीझ मदारी यांनीही सहलेखन केलं असल्यानं गाडी इथंच तर चुकीच्या मार्गानं गेली नसेल ना, अशी शंका येत राहते. अर्थात या उणीवा प्रथमदर्शनी मुळीच लक्षात येत नाहीत. जो मानेच्या कौशल्याचा आणि प्रेक्षकाला कथनामध्ये भावनिक पातळीवर खिळवून ठेवण्याचा यशस्वी प्रकार झाला.
उत्तरार्ध वास्तव दाखवण्यापासून कचरत नसला तरी त्यातील जेलमधील गॉड-वजा पात्र (शरद केळकर); विकास आणि इतर कैद्यांचा स्वैर वावर या गोष्टी खटकत राहतात. ‘इस धंदे में रहना हैं, तो कुछ तरीके सीखने होंगे’ हे आणि असेच इतर फिल्मी संवाद त्या पात्राला आणि दृश्यांना अधिकच सोयीस्कर बनवतात. तरीही त्याच्या पात्राशी एक नातं कायम राहून त्याची गोष्ट रंजक वाटते. मात्र शेवट अगदीच गमतीशीर आणि फिल्मी प्रकारे झाल्यानं दिग्दर्शकाला संदेश देण्याची इतकी का ओढ लागली असेल, असा प्रश्न पडतो.
न्यायालयातील आणि पोलीस स्टेशनमधील ओझरती पण चांगली दृश्यं; उत्तरार्धातील एक भूतकाळ आणि वर्तमान एकत्र आणून तयार होणारं एक दृश्य, अशा काही तुकड्यांमध्ये दिग्दर्शकाचं विशेष कौतुक वाटतं.
चित्रपटातील गाणी काही विशेष अडथळा ठरत नाहीत. ‘यंग्राड’ हे शीर्षक गीत आणि अर्ज हे जेलमधील चित्रण असलेलं अशी दोन गाणी त्यातल्या त्यात अधिक चांगली आहेत. पार्श्वसंगीत लक्षात राहणारं आहे.
संवाद उगाचच ग्रामीण होऊ पाहणारे नाहीत. शिवाय पात्रनिवड उत्तम असल्यानं पात्रांचे संवाद, लहेजा कृत्रिम वाटत नाही. शशांक शेंडे यांनी अभिनयाबाबत सविता प्रभुणे यांच्यासोबत नेहमीप्रमाणेच चांगली कामगिरी केली असली तरी खरा उत्तम अभिनय देवरे, कराळकर आणि इतरांनी केला आहे. कराळकरचा पडद्यावरील वावर उत्तम (आणि ‘शिकारी’पेक्षा उजवा) आहे.
एकूणच थोड्याफार फरकानं खिळवून ठेवणारी पटकथा, एक चीअरफूल पूर्वार्ध आणि उत्तम अभिनय यांच्यामुळे ‘यंग्राड’ किमान एकदा पहावा असा बनतोच. शिवाय ज्याच्या पुढील चित्रपटाची वाट पहावी असा दिग्दर्शक दिसून येतो आहे ते वेगळंच.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment