अजूनकाही
१. नोटाबंदीनंतर पालिकांमध्ये वसुलीकरिता जुन्या नोटा स्वीकारण्यास मुभा देण्याचा निर्णय भाजपच्या पथ्यावरच पडला. पालिकांच्या तिजोरीत भर टाकण्यास एका रीतीने भाजपनेच मदत केली आणि मतदारांना जुन्या नोटांच्या साह्याने ‘करमुक्त’ करून त्यांना खूश केले. त्याचा फायदा भाजपला झाला. : नगरपालिका निवडणुकांतील भाजपच्या यशाचे एक इंगित.
आता अन्य पक्षांनी किमान या गोष्टीवरून तरी भाजपविरोधात बोंब ठोकू नये. ते सत्तेत असते, तर त्यांनीही भाजपप्रमाणेच पैसा गोळा केला असता आणि तो निवडणुकीत याच प्रकारे सार्थकी लावला असता, यात शंका नाही. जुन्या नोटा मतदारांमार्फत सरकारला द्यायच्या आणि पुढची संपूर्ण टर्म नव्या नोटांमध्ये मलिदा खायचा! काळा पैसामुक्त भारताची ही खरी नोटाबदली!
……………………..
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांना आठ नोव्हेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत बँक खात्यांचे तपशील पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पाहा पाहा, स्वपक्षीयांवरच ‘सर्जिकल स्ट्राइक’ म्हणून कौतुकारत्या सुरूही झाल्या. यात कसला आलाय स्ट्राइक? आमदार-खासदार सोडा, कोणताही काळा पैसा बाळगणारा इसम भांगेच्या नशेत तरी आपल्या अधिकृत खात्यांमार्फत गैरव्यवहार करतो का? आठ नोव्हेंबरनंतर तर निश्चितच करणार नाही. भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या उद्योजक, व्यावसायिक हितचिंतकांनी आठ नोव्हेंबरआधीच्या एक-दोन महिन्यांमध्ये काय व्यवहार केले, याचा धांडोळा घ्यायचा सोडून ही निरर्थक उठाठेव करणं म्हणजे निव्वळ धूळफेकच नाही का?
……………………..
३. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अव्वल ठरलेल्या टीना दाबी हिने याच परीक्षेत दुसऱ्या आलेल्या अतहर आमिर उल शफी खान याच्याशी लग्न करण्याचा निर्णय म्हणजे लव्ह जिहाद : हिंदू महासभेच्या अकलेचे तारे, हिंदू महासभेचे प्रतिनिधी लवकरच टीना दाबीच्या कुटुंबियांची भेट घेऊन योग्य सल्ला देणार.
माणसाची अत्यंत खासगी बाब असलेला धर्म बाजारात बसवला की, तो असाच लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करायला लागतो. आपल्या धर्माचं संख्याबळ वाढवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या अशा संघटनांनी आपल्या अनुयायांना परधर्मीय मुलींवर (तरी) प्रेम करायला शिकवून त्यांच्याशी लग्न करून उलटा ‘लव्ह जिहाद’ करायला काय हरकत आहे? होईल ना फिट्टमफाट!
……………………..
४. ४६९ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, नोटबंदीचा दणका : आघाडीच्या वर्तमानपत्रातली बातमी
नोटाबंदीच्या दणक्यामुळे चिलीतील चिमण्यांची संख्या वाढली, अलास्कामध्ये बर्फ पडलं, ग्वाटेमालातील पेरूचं पीक घटलं आणि अझरबैजानमध्ये खजुराच्या झाडावर संत्री लागली, या बातम्यांचीही प्रतीक्षा आहे.
……………………..
५. मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यातल्या भाषणांत गोमंतक कमी आणि पाकिस्तान जास्त आहे. दिल्लीत किंवा हिंदुस्थानच्या सीमेवर द्यायला हवीत अशी वीरश्रीयुक्त भाषणे पर्रीकर हे गोव्यातील म्हापसा, पेडणे, पणजी, सावर्डे, फोंडा अशा ठिकाणी देत आहेत. हे म्हणजे सशाची शिकार करायला जाताना वाघाला मारायला चाललोय असा आव आणण्यासारखे आहे. मनोहर पर्रीकरांना हे बाळकडू पुरेपूर मिळाले आहे : ‘सामना’चा अग्रलेख
पर्रीकर हे छुपे शिवसैनिक आहेत की काय? उंदीर पकडताना वाघ मारत असल्यासारखा वीरश्रीचा आव आणण्याचे सगळे गुण त्यांच्यात त्याशिवाय का आले? शिवाय हे 'बाळ'कडूच असेल, तर ते दुसऱ्या कोणत्या ठिकाणावरून मिळणार?
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment