अजूनकाही
साधना प्रकाशनातर्फे नुकतेच तरुण लेखक संकल्प गुर्जर यांचे ‘हिरवे पान’ हे छोटेखानी पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेले प्रास्ताविक...
.............................................................................................................................................
मार्च २०११ ते मार्च २०१२ या वर्षभरात ‘हिरवे पान’ नावाचे एकपानी, साप्ताहिक सदर मी ‘साधना’त चालवले होते. त्या सदरात वर्षभरात एकूण ३३ लेख प्रकाशित झाले होते. त्या ३३ पैकी निवडक २० लेखांचा समावेश या पुस्तिकेत केलेला आहे. आज पाच-सहा वर्षांनी जे लेख वाचायला आवडतील त्यांचाच समावेश इथे केलेला आहे. अगदीच तात्कालिक स्वरूपाचे अथवा आज रस वाटणार नाही असे लेख मुद्दाम घेतलेले नाहीत. हे सदर चालू होते त्याच काळात मी ‘शाळा पाहिल्यावर’ नावाचा एक लेख ‘साधना’त लिहिला होता. तो लेख या पुस्तिकेच्या एकूण आशयाला पूरक असाच असल्याने पुस्तिकेत समाविष्ट केला आहे. या सदराच्या लेखनाची प्रक्रिया आणि त्यावरील प्रतिक्रिया दोन्हींचा परामर्श सदरातील शेवटच्या लेखात घेतलेला आहे. त्यामुळे इथे पुन्हा ते सांगण्यात अर्थ नाही.
या सदरातील लेखनाला पुस्तिकेच्या स्वरूपात छापावे अशी सूचना ‘साधना’च्या संपादकांकडून आल्यावर मी त्याबाबत सुरुवातीला फारसा उत्साही नव्हतो. (त्यामुळेच सदरातील लेखांची निवड त्यांनी केली आहे.) हे सदर लिहिले ‘तेव्हाचा मी’ आणि ‘आताचा मी’ यात बराच फरक पडलाय. तो पाच-सहा वर्षांपूर्वीचा काळ मागे टाकून मी तसा आता बराच पुढे आलोय. या सदराची पुस्तिका करायची म्हणजे मग मला मनाने पुन्हा त्या काळात जाणे आणि या सदराचा माझ्या आजच्या जगण्याशी नेमका कशा प्रकारे संबंध येतो, याचा विचार विचार करणे भाग होते. असे असतानाच या सदराबाबत माझ्या मनाचा एक कोपरा हळवासुद्धा आहे. त्यामुळे एका बाजूला मनाने वर्तमानातून त्या काळात, मागे जाण्याबाबत नाखुशी असणे आणि दुसरीकडे त्या सदराबाबत मनात जपलेल्या आठवणी, भाबड्या वाटाव्यात अशा काही घटनांचा आवेग यांच्या कात्रीत मी सापडलो होतो. अजूनही त्यातून पूर्णतः सुटलोय असे म्हणवत नाही. कदाचित भूतकाळाच्या आठवणी आणि वर्तमानाचा रेटा यांच्यात अपरिहार्य असा संघर्ष असावा. या प्रास्ताविकात भूतकाळात काय घडले यात रमण्यापेक्षा माझ्या आजच्या जगण्याची पाळेमुळे या सदरात कशी दिसतात हे पाच मुद्द्यांच्या आधारे सांगतो.
एक- हे सदर संपले त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात पदवी पूर्ण करून मी दिल्लीला एम.ए.साठी सार्क विद्यापीठात प्रवेश घेतला. आधी एम.ए. आणि नंतर पीएच.डी.साठीसुद्धा ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ हाच विषय मी निवडला होता. राष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यात जो रस मला होता, त्याला पुण्यात आल्यावर चांगले खतपाणी मिळाले. फर्ग्युसन कॉलेजात असल्याने भारतातील महाराष्ट्राबाहेरचे प्रदेश उदा- नागालँड व भारताबाहेरील भूतान, अफगाणिस्तान, सुदान, कंबोडिया, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स अशा देशांच्या मुलांमध्ये वावरायची संधी मिळाली. या सदरात माझ्या या मुलांशी असलेल्या मैत्रीबाबत, आम्ही एकत्र जी मजा केली त्याबाबत अनेकदा पूर्ण लेख लिहिले किंवा लेखांत उल्लेख केले आहेत. सदरातील ३३ पैकी १२ लेख असे आहेत. त्यावरून मनाने मी या मुलांमध्ये आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किती गुंतलो होतो याचा पुरेसा अंदाज यायला हरकत नसावी. त्यामुळे एका बाजूला या आंतरराष्ट्रीय मुलांमध्ये वावरणे, काही प्रमाणात भीती जाणे आणि दुसरीकडे इंग्रजी सुधारणे अशा स्तरांवर मला त्याचा फायदा झाला. त्यामुळे दिल्लीला सार्क विद्यापीठात आल्यावर मला इंग्रजी भाषा, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आणि सातत्याने परदेशी मुलांची संगत या तिन्ही स्तरांवर त्रास झाला नाही. अगदी सहजपणे मी इथे वावरू शकलो. अन्यथा सार्क विद्यापीठात या तिन्ही घटकांमुळे मुलांना सुरुवातीच्या काळात तरी बराच त्रास सहन करावा लागतो.
दोन- मला दिल्लीत वेगळ्या प्रकारचा त्रास झाला. इथे आल्यावर दिल्लीतले खाणे-पिणे, थंडी आणि उन्हाचा तीव्र तडाखा, पावसाचा अभाव, या शहराचा एकूण स्वभाव आणि काही शिक्षकांचे वर्तन यामुळे अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पुण्यात ज्या प्रमाणात चांगली माणसे भेटली होती त्याचा विचार करता दिल्लीत याबाबत तर दुष्काळच पडलाय असे वाटत असे. त्यामुळे मग हे शहर आपल्यासाठी नाही असे वाटे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जेव्हा जेव्हा दिल्ली सोडून जायची इच्छा होई तेव्हा तेव्हा मी स्वतःला जाणीव करून देत असे की आपण दिल्लीत, जसे पुण्यात असताना करायचो तसे वेगळे काहीही केले नाही-नवे अनुभव घेणे, वेगळ्या लोकांशी संवाद करणे वगैरे; तरीही औपचारिक शिक्षणाशिवाय कर्तृत्व दाखवावे अशी एक गोष्ट खास आपल्याकडे आहे जी इतरांकडे नाही. ‘हिरवे पान’ नावाचे सदर. हे सदर लिहिताना एका बाजूला वाचकांचा प्रतिसाद आणि दुसरीकडे आपण काहीतरी वेगळे, चांगले करतोय अशी भावना यामुळे दिल्लीला येताना मी बराच आत्मविश्वास घेऊन आलो होतो.
या आत्मविश्वासाशिवाय दिल्लीतील सुरुवातीच्या काळात टिकून राहणे खूपच अवघड होते. त्यामुळे सदर लिहिल्यानंतरच्या काळात या सदराने मला मानसिक स्तरावर एक प्रकारची सुरक्षितता दिली. त्याचा दिल्लीत खूपच उपयोग झाला.
तीन- या सदरामुळे मी ‘साप्ताहिक साधना’, पुणे शहर आणि मराठी वाचन-लेखनसंस्कृती यांच्याशी वैयक्तिक स्तरावर अधिकाधिक जोडला गेलो. सदर लिहिल्यानंतर मी दिल्लीत जाऊनसुद्धा माझे मराठी लेखन आणि वाचन चालूच राहिले. कदाचित आज मला दिल्लीत राहूनही मराठीत लिहिण्याचा आणि मराठीशी कनेक्टेड असल्याचा, ‘साधना’शी आपले नाव जोडले गेल्याचा जो आनंद मिळतो तो आनंद हे सदर लिहिले नसते तर मिळाला नसता. याच काळात मी ‘साधना’शीसुद्धा कनेक्टेड राहिलो. माझा ‘साधना’शी असलेला संपर्क दिल्लीत गेल्यावर क्रमाने वाढतच गेला. त्यामुळेच पुढे जानेवारी २०१५ मध्ये ‘सार्क विद्यापीठातील दिवस’ नावाचा आठ देशांतील मुलांच्या अनुभवांवर आधारित असा ‘साधना’चा ‘युवा अभिव्यक्ती’ अंक काढू शकलो. (त्याचेही पुस्तक आता प्रकाशित होत आहे.) त्यामुळेच आज मागे वळून पाहताना असे वाटते की, जर तेव्हा हे सदर लिहिले नसते तर मी ‘साधना’शी आणि त्या माध्रमातून मराठी वैचारिक विश्वाशी इतक्या जवळून जोडला गेलो नसतो. ‘हिरवे पान’ या सदरामुळे वाचकांचे आणि ‘साधना’ परिवारातील लोकांचे जे प्रेम माझ्या वाट्याला आले, त्यामुळे साधनाविषयी मला वाटणाऱ्या जवळकीचे रूपांतर पूर्ण प्रेमात झाले. वयाने इतके लहान असूनही आपल्याला ‘साधना’त सन्मान मिळतो, आपल्या लेखनाला चांगला प्रतिसाद मिळतो याची भावना खूपच सुखावणारी होती.
चार- या सदरामुळे माझ्या वयाच्या विशीपर्यंत जे काही बरे-वाईट मला सांगायचे होते आणि ज्या भाषेत सांगायचे होते ते सांगून झाले. इतके दिवस मनात साचून राहिलेले बाहेर पडल्याने नवे अनुभव घेण्यासाठी मी तयार झालो. भावनिक वाढीसाठी असे व्यक्त होणे फार आवश्यक होते. लिहून मोकळा झाल्यामुळे जुन्या घटकांविषयी असलेल्या भावनांची तीव्रता बरीच कमी झाली. काहीबाबत तर मनात एक वेगळ्या प्रकारची स्वस्थता आली. ‘शाळा पाहिल्यावर’ हा लेख या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हे सदर चालू नसते तर तो लेख पण मी लिहू शकलो नसतो.
त्या काळातील माझ्या भाषेतील इंग्रजी शब्दांचा वापर पाहता आज थोडेसे ओशाळल्यासारखे होते. हेच लेखन मी अधिक चांगल्या भाषेत करू शकलो असतो असे वाटते. परंतु हा आजचा विचार झाला. तेव्हा मी ज्या वैचारिक, भाषिक आणि मानसिक जगात वावरत होतो त्याचेच प्रतिबिंब या सदरात उमटले आहे. त्यामुळे आज सदराची भाषा किंवा विषय यांविषयी अधिक काही भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
पाचवा आणि शेवटचा मुद्दा- या सदराचे स्वरूपच असे होते की, ज्यामध्ये मी माझे विचार, भावना, अनुभव यांची अभिव्यक्ती करणे अपेक्षित होते. त्यामुळे मी कॉलेजच्या काळात जे काही जगलो ते आणि जे काही वेगळे केले त्यातून हा मजकूर तयार झाला. कॉलेजच्या गतिमान काळात बऱ्याचदा आपण काय केले याची इतकी समग्र आठवण पुढे राहीलच असे नाही. मात्र मला मी जे केले त्यावरच आधारित सदर लिहायचे असल्याने हे सदर हा माझ्या तेव्हाच्या जगण्याचा एक संदर्भबिंदू आणि दस्तऐवज म्हणून आज शिल्लक राहिलेला आहे. आधी आपल्याला हवे तसे जगायचे आणि मग त्याचे लेखन करून आनंद मिळवायचा असा हा दुहेरी आनंदाचा मामला होता. त्यामुळे ही निवडक ‘हिरवी पाने’ वाचताना- मला लिहिताना मिळालेला- थोडाफार आनंद तरी वाचकांना मिळावा अशी इच्छा आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4438
.............................................................................................................................................
लेखक संकल्प गुर्जर दिल्लीस्थित साउथ एशियन विद्यापीठामध्ये पीएच.डी. करत आहेत.
sankalp.gurjar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment