रॉबर्ट स्मॉल्स पुढे साक्षर झाला. राजकारणात गेला. आफ्रिकन-अमेरिकनांच्या न्याय्य हक्कांसाठी मरेपर्यंत झगडला!
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
कॅ. मिलिंद परांजपे
  • ‘बी फ्री ऑर डाय’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Thu , 05 July 2018
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक बी फ्री ऑर डाय Be Free or Die Cate Lineberry केट लाइनबेरी रॉबर्ट स्मॉल्स Robert Smalls’

४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्तानं अमेरिकेविषयीचा एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा हा परिचय.

.............................................................................................................................................

अमेरिकेतल्या दक्षिणेकडील राज्यात गुलागिरीची अनिष्ट प्रथा होती. १८६१ ते १८६५ या काळात उत्तर म्हणजे युनियन आणि दक्षिण म्हणजे कॉन्फडरेसी राज्यांमध्ये त्यावरून यादवी युद्ध होऊन दक्षिणेचा पराभव झाला आणि सर्व गुलाम मुक्त झाले ही माहिती इतिहास प्रसिद्ध आहे. पण अनेक गुलामांनी धाडसानं पळून जाऊन किंवा अन्य मार्गांनी स्वतःचं स्वातंत्र्य मिळवलं त्याची फार थोडी माहिती लोकांना आहे. अशाच एका रोमांचकारी सत्यघटनेवर संशोधन करून केट लाइनबेरी यांनी लिहिलेलं ‘Be Free or Die - the amazing story of Robert Smalls’ escape from slavery to Union hero’ हे पुस्तक गतवर्षी प्रकाशित झालंय.    

रॉबर्ट स्मॉल्स हा निरक्षर काळा गुलाम त्याच्या मालकानं ‘प्लँटर’ नावाच्या मालवाहू बोटीवर कामाला ठेवला होता. बोटीचा मालक रॉबर्टला पगार न देता त्याच्या गोऱ्या मालकाला देत असे. यादवी युद्धात दक्षिणेच्या राज्यांच्या म्हणजे कॉन्फडरेसीच्या सरकारनं ‘प्लँटर’ तिच्या मालकाकडून भाड्यानं घेतली होती.

२३ वर्षांचा रॉबर्ट बोटीच्या कामात तर तरबेज होताच, पण बंदरात जाण्या-येण्याचा मार्ग आणि नौकानयनातही कुशल झाला होता. त्यामुळे गोरा कॅप्टन त्याच्यावर खुशाल विश्वास टाकत असे. बोटीवर आणखी सात गुलाम इतर कामांसाठी होते. चार्ल्सटन या दक्षिण कॅरोलाइनाच्या बंदरात बोट असताना बोटीचे गोरे कॅप्टन, चीफ ऑफिसर आणि इंजिनिअर रात्री गावात आपापल्या घरी गेले.

ही संधी साधून रॉबर्टनं भल्या पहाटे बोट धक्क्यावरून बाहेर काढली. दुसऱ्या धक्क्यावर जाऊन आधी ठरवल्याप्रमाणे आपली पत्नी, मुली, बोटीवरील इतर गुलामांच्या पत्नी यांना घेतलं आणि थेट बंदराबाहेर नाकेबंदीसाठी वेढा घालून उभ्या असलेल्या उत्तरेच्या म्हणजे युनियनच्या आरमाराकडे बोट नेऊन शरण गेला. बंदराचं संरक्षण करायला तीन किल्ल्यांचा कडक पहारा होता. बाहेर पडताना रॉबर्टनं कॅप्टनची नेहमीची टोपी डोक्यावर घातली, झेंडा लावला, प्रत्येक वळणावर योग्य ते सांकेतिक भोंगे वाजवले. बंदराबाहेर पडेपर्यंत उजाडायला लागलं होतं, त्यावेळेस कॉन्फडरेसीचा झेंडा काढून पांढरा तहाचा बावटा फडकावला. युनियनच्या युद्धनौकेच्या आश्चर्यचकित झालेल्या कॅप्टननं त्याला आश्रय देऊन प्लँटर बोट ताब्यात घेतली. रॉबर्ट आणि बरोबरचे पंधरा गुलाम स्त्री-पुरुष मुक्त झाले.

रॉबर्टनं एवढी जोखीम घेतली होती की, तो जर पकडला गेला असता तर सर्वांचा मृत्यू नक्की होता. बोटीवरचे इतर गुलाम श्वास रोखून, थरथरत रॉबर्टच्या हुकमांचं पालन करत होते. त्या घटनेचं लेखिकेनं केलेलं वर्णन खिळवून ठेवणारं आहे. शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून पळून जाण्याइतकीच हेही कृत्य रोमांचकारी होतं. बोटीत सैन्याला लागणारा महत्त्वाचा कार्गो (माल) भरलेला होता. तो माल आणि शत्रूची बोट मिळवून आणल्याबद्दल त्याला ‘प्राईझ अवार्ड’ मिळालं. बोटीच्या किमतीच्या मानानं ते अगदीच कमी असलं तरी दक्षिणेची नामुष्की झाली, गोऱ्यांना वाटणाऱ्या स्वतःच्या वर्णवर्चस्वातली हवा निघून गेली. युनियननं रॉबर्टला हीरो केला. गोऱ्या कॅप्टनवर कोर्ट मार्शल झालं.

युनियन आरमाराचा सरखेल (अॅडमिरल) एवढा खुश झाला की, त्यानं रॉबर्टला पायलट केलं. कॉन्फेडरेसीबरोबर झालेल्या अनेक लढायात त्यानं भाग घेतला. एका लढाईत शत्रूनं इतका मारा केला की, बोटीचा गोरा कॅप्टन घाबरून लपून बसला. रॉबर्टनं कॅप्टनची जबाबदारी घेऊन बोटीला सुखरूप बाहेर काढलं. तेव्हापासून त्यालाच ‘प्लॅंटर’चा कॅप्टनही केलं गेलं. आफ्रिकन-अमेरिकनांना बंदुका देऊन सैन्यात त्यांची पलटण उभारण्यात तो क्रियाशील राहिला. प्रेसिडेंट लिंकनशीही भेट झाली.

पण उत्तरेकडील फिलाडेल्फिया या शहरात ट्राममध्ये काळा म्हणून सीटवरून त्याला उठावं लागलं, त्यावेळेस या सर्व प्रसिद्धीचा काही उपयोग झाला नाही! काळ्या उतारूंनी फुटबोर्डावर उभं राहून प्रवास करण्याच्या मानहानीपेक्षा त्यानं खाली उतरून चालणं पसंत केलं. उत्तरेकडील राज्यात गुलामगिरी नसली तरी वंशभेद होताच.

‘प्लॅंटर’च्या जुन्या मालकाची त्याच्यावर खुन्नस होतीच. यादवी संपल्यावर एकदा सैन्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किनाऱ्यावरील बेटांची इन्स्पेक्शन करून सव्हाना बंदराला नदीतून परत आणताना जुन्या मालकाच्या दुसऱ्या बोटीच्या कॅप्टन मॅकनल्टीनं रॉबर्टच्या ‘प्लँटर’ला अगदी जवळून ओव्हरटेक करून डावीकडे दाबायचा प्रयत्न केला. बोट डावीकडे गेली असती तर चिखलात रुतली असती. तसं न करता रॉबर्टनं बोटीचा वेग वाढवला आणि दिशा कायम ठेवली. त्यामुळे बोट दुसऱ्या बोटीच्या साइडला टेकली आणि तिला अर्धा मैल ढकलत गेली. मॅकनल्टी एवढा चिडला की, त्यानं बाहेर डेकवर येऊन रॉबर्टवर पिस्तूल रोखलं. रॉबर्टनं त्याची शॉटगन बाहेर आणली आणि म्हणाला- “आता मार, पण नेम चुकवू नकोस, कारण माझा चुकत नाही.”  

सैन्यातले वरिष्ठ अधिकारी हा प्रकार पाहत होते. ते बाहेर आले. त्यांनी दोघांनाही माघार घ्यायला लावली. बंदरात पोचल्यावर मॅकनल्टीला अटक झाली.      

यादवी युद्ध संपल्यावर त्याचा आणि त्याच्या आईचा जो गोरा जुना मालक होता, त्याचंच घर रॉबर्टनं विकत घेतलं. आणि उदार मनानं त्याच्या फॅमिलीला जेवायला बोलावलं. तेही आमंत्रण स्वीकारून आले, पण वेगळ्या टेबलावर जेवले.

रॉबर्ट स्मॉल्स पुढे साक्षर झाला. राजकारणात भाग घेऊन दक्षिण कॅरोलाइनामधून पाच वेळा काँग्रेसवर निवडून आला. आफ्रिकन-अमेरिकनांच्या न्याय्य हक्कांसाठी मरेपर्यंत झगडला. यादवी युद्धाचा रॉबर्टच्या अनुषंगानं असलेला इतिहास तेवढाच लेखिकेनं या पुस्तकात घेतला आहे.

गुलामांना गुराढोरांसारखं विकत किंवा अमानूष मारहाणही करत. त्याचं चीड आणणारं वर्णन वाचताना मनाला यातना होतात. फ्रेडरिक डग्लस, नाथनिएल टर्नर, डेन्मार्क व्हेसी अशा अपरिचित अमेरिकन काळ्या गुलामांची नावं आपल्या वाचनात येतात. त्यामुळे त्यांची माहिती गूगलवर काढली तरी त्या अशिक्षित गुलामांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दाखवलेल्या असामान्य धैर्यानं आणि कर्तृत्वानं आपण अचंबित होतो. आणि आपल्याला आफ्रिकन-अमेरिकन माणसांबद्दल आदर वाटू लागतो.

हे पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर आपल्या, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची आठवण येत राहते. आणि पुस्तक हातातून खाली ठेववत नाही. पुस्तकाच्या लेखिकेनं रॉबर्टच्या पतवंडांची टीव्हीवर घेतलेली मुलाखत अमेरिकेत बरीच गाजली. ती मुलाखत बघूनच पुस्तक वाचलं आणि हे परीक्षण लिहिलं. या सत्य घटनेवर सिनेमा निघेल अशी अपेक्षा पुस्तकाच्या मलपृष्ठावर अभिप्राय लिहिणाऱ्यांची आहे.

.............................................................................................................................................

‘Be Free or Die : The Amazing Story of Robert Smalls' Escape from Slavery to Union Hero’ – Cate Lineberry,

जून २०१७, पाने - २७२, हार्डकव्हर - $२५.९९

.............................................................................................................................................

लेखक कॅ. मिलिंद परांजपे निवृत्त नौदल अधिकारी आहेत.

captparanjpe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......