अजूनकाही
शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुकांचे निकाल राज्यातील सर्वच प्रस्थापित पक्षांना धडे शिकवणारे आहेत. खासकरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. मुंबई आणि नाशिक शिक्षक तर मुंबई आणि कोकण पदवीधर असे चार आमदार निवडून देण्यात आलेत. नाशिक, मुंबई आणि कोकण या टापूतील शिक्षक पदवीधर या मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष या निवडणुकीत निष्प्रभ ठरले आहेत. नागपूरला पावसाळी अधिवेशन पहिल्यांदा होत असताना हे निकाल लागलेत. शिक्षक पदवीधर असा सुज्ञ मतदार या निवडणुकीत मतदान करतो. संघटनात्मक सक्रिय कार्यकर्त्यांचं भक्कम पाठबळ असल्याशिवाय या निवडणुका जिंकता येत नाहीत, हे पुन्हा एकदा या निवडणुकांनी अधोरेखित केलं आहे.
या निवडणुकांत शिवसेनेनं चारपैकी नाशिक आणि मुंबई अशा दोन्ही जागा जिंकल्या. मुंबईतून विलास पोतनीस व नाशिकमधून किशोर दराडे विजयी झालेत. मुंबई पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदार आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना तिकीट नाकारून शिवसेनेनं पोतनीस या ७० वर्षाच्या उमेदवाराला ऊभं करून जोखीम स्वीकारली होती. मंत्री डॉ. सावंत नाराज होते. अशा अवस्थेत सेनेनं ही निवडणूक लढवून पोतनीसांना साडेअकरा हजार मतांनी निवडून आणलं. या मतदार संघात सेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली. भाजपचे अमित मेहता यांनी चांगली लढत दिली. पण मुंबईत सेनेची संघटना खूप मजबूत आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात सेनेचं नेटवर्क सक्रिय असल्यानं ते लष्करी शिस्तीनं निवडणुकीत उतरतं. विरोधकांना पराभूत करण्यासाठी रात्रंदिवस सेनेचं नेटवर्क वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करतं. असंच नेटवर्क मुंबईत भाजपकडेही आहे. पण सेनेची ताकद वरचढ ठरली. मराठी पदवीधर मतदारांची संख्या जास्त असल्याने सेनेचा विजय झाला.
मुंबई पदवीधर मतदार संघातून काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र कोरडे हे उमेदवार होते. कोरडे यांच्यासाठी शेकापचे आमदार जयंत पाटील मुंबईत प्रचार करत होते. कोरडे हे शरद पवारांचेच उमेदवार होते. पोतनीस-मेहतांच्या लढतीत ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले, एवढा त्यांचा दारुण पराभव झाला. कोरडे यांना पन्नासेक डाव्या संघटनांचा पाठिंबा होता. तीन मोठे राजकीय पक्ष, पन्नास संघटना बरोबर असूनही कोरडेंचा करुण पराभव झाला. यातून या पक्ष-संघटनांची राजकीय विश्वासार्हता किती खालावली आहे याचा प्रत्यय येतो. शेतकरी कामगार पक्षाचं मुंबईत काही काम नव्हतं. पण काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांची मुंबईतली संघटना ही दिशाहीन ठिसूळ झाली आहे काय, असा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे. मुंबईत शरद पवारांच्या डावपेचांची काही डाळ शिजली नाही.
कोकण पदवीधरांची निवडणूक शरद पवार यांनी भलतीच प्रतिष्ठेची केली होती. पूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झालेले निरंजन डावखरे भाजपमध्ये गेल्यानं पवार चिडले होते. काही करून डावखरे यांना पराभूत करायचंच असा पवित्रा पवारांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी या मतदार संघात प्रचार मेळावे घेतले. नवी मुंबईत वाशी इथं राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप यांचा संयुक्त मेळावा घेतला होता. त्यात पवार म्हणाले होते, ‘डावखरे यांच्या विरोधात मी स्वतः उभा आहे असं समजा. डावखरे जिंकले तर मी हरलो असं होईल. माझी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.’ हे पवार का सांगत होते? राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जाऊ इच्छिणाऱ्यांना ते इशारे देत होते काय? पण कोकणात काँग्रेसचा प्रभाव नाही. राष्ट्रवादी हा पक्ष घराण्यांमध्ये वाटला गेलाय. राष्ट्रवादी सरदारांचा पक्ष झालाय, सामान्य जनतेचा पक्ष राहिला नाही. त्यामुळे या मतदार संघातले राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. याउलट या मतदार संघात विजयी डावखरेंविरोधात सेनेच्या संजय मोटे यांनी चांगली लढत दिली. ही लढतही अर्थात सेनेची संघटना गावोगाव बळकट असल्यानं देता आली हे उघड आहे. पण डावखरेंच्या विजयानं पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष मोठ्या घराण्यांतल्या युवराजांसाठी काम करतो. पण घराण्याबाहेरच्यांसाठी सक्रिय होत नाही, हे या निवडणुकीत स्पष्ट दिसलं.
नाशिक पदवीधरची निवडणूक उमेदवारांनी पैठणी, पैसे वाटल्यानं वादग्रस्त ठरली. नाशिक जिल्ह्यात येवला इथं पैठणी तयार होते आणि याच जिल्ह्यात मालेगाव इथं नऊवारी लुगडे तयार होतात. पण उमेदवारांनी पैठणी वाटण्यास पसंती दिली. शिक्षकांसारख्या शिकलेल्या मतदारांनी पैठण्या, पैसे स्वीकारले म्हणून टीकाही झाली. निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली गेली. माध्यमांत चर्चा, बातम्या झाल्या. पैठण्या मतदारांनी जाळण्याचेही प्रकार झाले. सर्वच उमेदवार श्रीमंत होते. त्यांनी पैठण्या, पैसे वाटले असं बोललं गेलं. आता मतदारांनीच अशा उमेदवारांना धडे शिकवावेत असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं. लेखक हेरंब कुलकर्णी यांनी त्यात पुढाकार घेतला होता. निवडणुकीत जसे गैरप्रकार झाले, तसा त्याविरोधात आवाजही उठला. हे शिक्षक जागृत असल्याचंच प्रतीक म्हणता येईल. या निवडणुकीत सेनेचे किशोर दराडे विजयी झाले, तर काँग्रेस, राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेले संदीप बेडसे यांचा पराभव झाला. बेडसे यांना टीचर डेमोक्रेटिक फ्रंट (टीडीएफ) या शिक्षकांच्या संघटनेनं पाठिंबा दिला होता. एकेकाळी महाराष्ट्रात या शिक्षक संघटनेचा दबदबा होता. आता या पुरोगामी विचाराच्या संघटनेची शकलं झालीत. पैसेवाले उमेदवार या संघटनेच्या नेत्यांना विकत घेतात आणि त्यांना वापरतात, हे चित्र या निवडणुकीत दिसलं. ही संघटना आता विचारशून्यता आणि फाटाफुटीनं शेवटची घटका मोजत आहे.
शिवसेना-भाजपचा झंझावात काँग्रेस-राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांना अडवता आला नाही. पण मुंबईत हा झंझावात रोखण्यात लोकतांत्रिक जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी यश मिळवलं. कपिल हे गेल्या दोन वेळेपासून मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार आहेत. १२ वर्षांपूर्वी भाजपच्या ताब्यातला हा मतदार संघ त्यांनी खेचून आणला. दोन वेळा टिकवला. शिक्षणाचं खाजगीकरण, शाळांचं कंपनीकरण याविरोधात ते सडकेवर आणि विधिमंडळात लढत राहिले. विनोद तावडे शिक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांनी तावडेंच्या शिक्षकांना छळणाऱ्या हडेलहप्पी कारभाराला एकाकी विरोध केला होता. त्यामुळे तावडेंचा त्यांच्यावर राग होता. या निवडणुकीत काही करून कपिल पाटील यांना पराभूत करायचंच या हेतूनं तावडे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. तावडेंनी या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरली. भाजप उमेदवार अनिल देशमुख यांना बळ दिलं. सत्ता देशमुखांमागे उभी केली.
दुसऱ्या बाजूला शिवसेनेनंही कपिल पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिला होता. उद्धव ठाकरे यांनी सेनेची सगळी ताकद या उमेदवारामागे उभी केली. मतदान दिवसाच्या अगोदर दोन दिवस या मतदार संघातही शिक्षकांना एका मताला ५ ते १० हजार रुपये वाटल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. सत्ता, पैसा यांच्या ताकदीला मुंबईचे शिक्षक बधले नाहीत. कपिल पाटील यांनी चार हजार पन्नास मतं घेत हॅटट्रिक केली. तिसऱ्यांदा विधान परिषदेत पोचले.
शिक्षक भरतीच्या चळवळीच्या बळावर हे शक्य झालं. वैचारिक स्पष्टता आणि सामान्य माणसांच्या हिताचा अजेंडा असेल तर लोक बळ देतात. हा धडा कपिल पाटील यांच्या विजयातून काँग्रेस-राष्ट्रवादीला घेता येईल. अन्यथा या निवडणुकीचे निकाल दोन्ही काँग्रेसला धडकी भरायला लावणारे आहेत. पवारांचे डाव खरे झाले नाहीत, हे या निवडणुकांच्या निकालावरून दिसलं. या निवडणुकांतून हे पक्ष काही शिकले नाही, तर त्यांना भाजप-सेनेचा सामना करणं भविष्यात अवघड जाणार आहे.
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Fri , 13 July 2018
✔