अजूनकाही
मराठी माणसाच्या जगण्या-वागण्याचे प्रतिबिंब उमटलेल्या मराठी साहित्याचा वेलू गगनावरी पोहचूनही बरीचशे वर्षे उलटली आहेत. मराठी जनांच्या अस्तित्वापासूनचा प्रवास आपल्या विविध अंग-प्रत्यांगातून प्रवाही ठेवण्याचे काम साहित्य व साहित्यिक मंडळींकडून यथाशक्ती पार पाडल्या जाते आहे. त्या अर्थी हा अमृताचा पेला कधीच रिकामा राहिलेला नाही, तर तो रसरशीतपणा, उत्साह, रंजकता, प्रबोधन आणि इतर गुणविशेषांनी भरभरून वाहतो आहे. मऱ्हाटी भाषा ते मराठी सांस्कृतिक प्रवाहाची वाटचाल अचूकपणे पुढच्या पिढ्यांकडे प्रवाहीत करण्याचे काम अव्याहत सुरू आहे. या अशा उत्साही, प्रवाही परंपरेचा पाईक होण्याची संधी सर्वसामान्य मराठी रसिकांना उपलब्ध व्हावी यासाठी आयोजित करण्यात येणारे ते साहित्य संमेलन असते. गत काही वर्षांत या शारदेच्या महोत्सवास जत्रेचे बीभत्स स्वरूप प्राप्त झाले आहे. कारण जत्रा म्हणावे तर मनमुराद भटकण्याची, हवे ते निवडण्याची, स्वीकारण्याची, अनुभवण्याची संधीही या केवळ देखण्याच उपचारांत राहिलेली नाही.
वाचक एखाद्या लेखकाची कलाकृती वाचताना, अनुभवताना तल्लिन होतो, तो क्षण संमेलनाएवढाच मोलाचा असतो. वाचकाला त्याच्या व्यवहारी जगात अडकलेल्या मनाला आपल्या लिखाणाद्वारे मनसोक्त वैचारिक, काल्पनिक विश्वात विहंगावलोकन करायला लावणे, हे तर लेखकाचे स्वप्न असते. तर वाचकासाठी आवडत्या लेखकाने अशी अनुभूती वारंवार द्यावी, यापेक्षा अन्य सुखाची काय तमा असते? वाचनानंद, वाचनानुभूती अथवा आत्मिक विकसनशीलतेला गती प्रदान करणारे ते साहित्य आणि अशी सृजनशील साहित्यिक मंडळी ‘याची देहि याचि डोळा’ अनुभवण्यास मिळणारा सोहळा म्हणून वाचक संमेलनाकडे पाहतो.
आवडता लेखक आणि वाचक यांची नित्य भेट पुस्तकाच्या/ लिखाणाच्या माध्यमातून तशी होत असतेच. जसा लाडक्या विठुरायाकडे जाण्याचा सदाचारी मार्ग संतसज्जनांच्या वारीतून जातो, तसाच अक्षरानंदाचा मार्ग ज्या लेखकांचा लेखणीद्वारे दिसतो अशा सेतुचल सज्जनाला उराऊरी भेटण्याचे पवित्र स्थळ म्हणून अस्सल वाचक साहित्य संमेलनाकडे पाहतात. आता दरवर्षी हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी म्हणून ज्या औपचारिक रचनात्मक यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून गत काही वर्षांत केवळ अहंभाव जोपासणाऱ्या कुरापतीच घडताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुशल नियोजनाच्या कार्यक्रमाला साहित्याच्या नावावरील भोजनावळी असेच मानावे लागेल. या संमेलनात साहीत्यिक नसतात, साहित्य नसते आणि रसिकांनी तर या बाजारबुणग्यांच्या उपद्रवमूल्याकडे केव्हाच पाठ फिरवलेली आहे. तरीही हा उपक्रम का सुरू ठेवायचा, हा रसिकांचा खरा प्रश्न आहे. त्यासाठी सरकारकडून अनुदानाची खिरापत मिळवायची म्हणजे पुन्हा सर्वसामान्य जनतेच्या खिशावरच भार पडणार. ही असल्या सुमारांची सद्दी कधी संपणार?
‘नेमिची येतो पावसाळा’च्या चालीवर होणारी ही जत्रा भलतीच विनोदी होत चाललीय. हल्ली तर वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या वाचूनच काही मंडळी साहीत्यिक आहेत, हे वाचकांना कळायला लागले आहे. अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी वाचून नंतर यांनी काहीतरी लिहिले आहे, हे जर कळवून घेण्याइतके अरसिक महाराष्ट्रात कोणीच नाही. लोकप्रियही नाही, कसदारही नाही अशा श्रेणीत लिहिणारे लोक अध्यक्षपदी निवडले जातात तरी कसे? कारण याच दर्जाची आणि श्रेणीतील काही सरंजामशाही मंडळी साहित्य संघ, साहित्य महामंडळावर ठाल मांडून बसलेली आहेत. या असल्या निवडणुकबाज मंडळींच्या राजकारणातील निरर्थक ‘कौतिकां’मुळे अनेक दिग्गज साहित्यिक अध्यक्षपदाच्या बहुमानापासून वंचित राहिलेले आहेत. रसिकांना केवळ वाचनानंद देणाऱ्या अनेक विद्वानांना राजकीय प्रवाहापेक्षाही लज्जास्पद पातळी गाठलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे पाठ फिरवावी लागलेली आहे. त्याबद्दल मराठी वाचक या असल्या सुमारांना कधीच माफ करू शकणार नाही.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा सन्मानपूर्वक निवडण्यात यावा, यासाठी मराठी साहित्य महामंडळात घटनादुरुस्ती करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या सकारात्मक बदलाबाबत काही भाष्य करायला जावे, तोवर विविध साहित्य संघाच्या घाऊक ठेकेदारांनी त्याविरोधात ओरडही सुरू केली आहे. निवड प्रक्रियेवर प्रभाव टाकून असलेल्या या उठवळ लोकांमुळेच अनेक दिग्गजांनी अध्यक्षपद नको बाबा, असे सांगत या सोहळ्यांना काट मारलेली आहे. तर काहींनी या आखाड्यात उतरून या हितसंबंधी गटांचे कुटील कारस्थान जवळून अनुभवलेले आहे. या ठेकेदारांची अभिरुचीहीनता पुण्यातल्या साहित्य संमेलनातील अध्यक्षपदाच्या निवडीनंतरही आनंद यादव यांच्यावरील आक्षेपाच्यानिमित्त पाहावयास मिळालेली आहे. हा वाईट प्रसंग अस्सल वाचक अद्याप विसरलेले नाहीत.
त्यामुळे काही परिवर्तन करायचेच असेल तर प्रारंभी या रचनात्मक यंत्रणांवरील मांडवली बादशहांना घरचा रस्ता दाखवायला हवा. तरच हे पवित्र सोहळे पूर्वीप्रमाणे दिमाखदार होतील. अन्यथा साहित्याशी संबंध नसलेली सुमारांची सद्दी जशी सुरू आहे तशीच राहू द्या ना ! नाहीतरी या असल्या गावोवागी भरणाऱ्या गल्लाभरू थाटमाटाला वाचकांचा कुठे प्रतिसाद मिळतो आहे?
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
????? ???????
Wed , 04 July 2018
माझ्या इमेल खात्याचे नाव मराठी युनिकोडात आहे. ते वरील कमेंटवर दिसत नाही आहे. प्रश्नचिन्हे दिसत आहेत. ही बहुदा मराठी युनिकोडशी सुसंगत असण्याबद्दलची तांत्रिक गडबड असावी. कृपया दुरुस्ती करावी. - सुबोध केंभावी
????? ???????
Wed , 04 July 2018
>>वाचक एखाद्या लेखकाची कलाकृती वाचताना, अनुभवताना तल्लिन होतो, तो क्षण संमेलनाएवढाच मोलाचा असतो.<< हे ह्या लेखातील वाक्य महत्त्वाचे आहे. अशा वाचकांचा दबाबगट बनवणे ह्या दिशेने काम केल्यास काही सकारात्मक बदल घडवता येईल. हे कसे जमवता येईल ह्याचे मार्गदर्शन करणारे लेख लिहिले पाहिजेत. साहित्य संमेलनांमधील फालतूगिरी हा काही नवीन विषय राहिलेला नाही. त्यावर अनेकांनी परखड टीका करूनही फारसा बदल झालेला दिसत नाही.