अजूनकाही
चोवीस जूनच्या मध्यरात्री एका कोचिंग क्लासच्या संचालकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करणार्यांची धरपकड करण्यात आली. संचालक फक्त पस्तीस वर्षांचे होते. गेल्या पाच-सहा वर्षांतच लातूरमधल्या विविध भागांत त्यांनी क्लासेसचं जाळं विणलं होतं. त्यापूर्वी त्यांची एका क्लासेसमध्ये भागीदारी होती. व्यवसायात वितुष्ट आल्यामुळे त्यांनी स्वतंत्ररीत्या क्लासेस चालवायला सुरुवात केली. मागच्या चार वर्षांपासून त्यांचे क्लासेस तेजीत होते. कमी काळात त्यांनी केलेली प्रगती पाहून पूर्वीच्या भागीदारानंच त्यांची हत्या करवली असं दिसून आलं. खून करवण्यासाठी वीस लाख रुपये दिले गेले. हे झालं घटनेचं सार. यातून फक्त माहिती मिळते. पण एक प्रश्न उपस्थित होतो- इतकी स्पर्धा का निर्माण झालीय क्लासेसमध्ये की, ते एकमेकांच्या जीवावर उठलेत? याचं उत्तर शोधायचं असेल तर गेल्या एकोणतीस वर्षांत लातूरमध्ये नेमकं काय घडत होतं, हे बघावं लागेल.
या काळाचे दोन टप्पे दिसतात. पहिल्या टप्प्याला एकोण्णव्वद साली सुरुवात झाली. लातूरमधल्या एका महाविद्यालयातले काही विद्यार्थी त्या वर्षीच्या राज्य पातळीवरच्या मेरीट लिस्टमध्ये आले. महाविद्यालयानं घेतलेल्या मेहनतीचा तो परिणाम होता. साधारण ब्याण्णवपर्यंत दरवर्षी तिथली मुलं मेरीटमध्ये यायला लागल्यावर त्यांच्या या यशस्वीतेचं कारण काय असावं, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ते सांगितलं. मग त्यांनी तयार केलेलं परीक्षेत भरपूर गुण घेऊन मेरीट यायचं मॉडेल लातूर शहर व जिल्ह्यातल्या सर्व शाळा-महाविद्यालयांनी आंधळेपणानं वापरायला सुरुवात केली. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी न चुकता दरवर्षी मेरीट लिस्टमध्ये यायला लागले.
या प्रकारातून लातूरमधील शैक्षणिक वातावरणच बदलून गेलं. जो तो फक्त मेरीटमध्ये येण्याची भाषा करू लागला. तदअनुषंगानं क्लासेसही वाढायला लागली. काही वर्षांतच लातूरात मराठवाड्यापासून ते थेट पुण्यातून पालक पाल्यांना घेऊन यायला लागले. ज्या महाविद्यालयानं याची सुरुवात केली, ते सुरुवातीला ‘शाहू पॅटर्न’ असं अभिमानानं स्वतः विषयी म्हणू लागले. नंतर तो शहर व जिल्ह्याच्या अभिमानाची गोष्ट झाल्यामुळे त्याचं नाव ‘लातूर पॅटर्न’ असं झालं.
याचे परिणाम कसे होते हे पुण्यात शिकायला गेलो असताना आम्हाला शिकवणार्या फडके सरांनी सांगितले. ते म्हणाले, पुण्यातल्या शाळा व महाविद्यालयांनीदेखील हे मॉडेल राबवायला सुरुवात केली होती. माझ्या एम.ए.च्या एका मैत्रिणीनं सांगितलं की, तिच्या धुळ्याच्या महाविद्यालयानं लातूरच्या ‘त्या’ महाविद्यालयाला भेट देऊन ते मॉडेल समजून घेतलं होतं. यामुळे उभ्या महाराष्ट्राचं किती नुकसान झालं असेल याचा विचार केला तरी चित्र पुरेसं स्पष्ट होतं. आज तर ‘पॅटर्न’ या शब्दापूर्वी त्या त्या भौगोलिक जागेचं नाव लावून त्यांचा पॅटर्न कसा भारी, एकमेव आहे, हे अभिमानानं सांगितलं जातं. उदा. मुंबई पॅटर्न, कोकण पॅटर्न, अमरावती पॅटर्न.
एकीकडे शाळा-महाविद्यालयांनी हे मॉडेल राबवायला सुरुवात केली, तर दुसरीकडे त्याचवेळेस खाजगी क्लासेसची सुरुवात झाली. मी शहाण्णव साली दहावी झालो, तेव्हा ‘लातूर पॅटर्न’ त्याच्या अत्युच्च शिखरावर होता. आम्ही ज्या क्लासेसना जायचो, तेसुद्धा आपले विद्यार्थी मेरीटमध्ये यावेत यासाठी झटायचे. त्यावेळी आजच्यासारखे चौकाचौकात, गल्लीबोळात शहराचं सौंदर्य विद्रूप करणारे मोठमोठे फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिंग्ज नव्हते. वर्तमानपत्रांत ते जाहिराती द्यायचे नाहीत, पण तोंडी प्रचारामुळे त्यांच्याकडे विद्यार्थी यायचे. क्लासेस सुरू केले तर पारंपरिक नोकरीच्या चक्रात अडकायची गरज नाही, यावर बर्याच जणांचा विश्वास बसायला लागला, तोही याच काळात. त्यातल्या काहींनी आज शाळा सुरू केल्या आहेत. तसेच लातूरमध्ये क्लासेसचा व्यवसाय म्हणून पेव फुटण्याचा काळही हाच होता.
या मॉडेलचा परिणाम दोन हजार सालापर्यंत दिसायला लागला. या पद्धतीनं भरपूर गुण घेऊन स्पर्धेत पहिले, दुसरे आल्यानं पुढील आयुष्यात आपण जे काही करणार आहोत, त्यावर याचा काडीचाही परिणाम होणार नाही, हे जाणवायला लागलं. ही क्षणिक गोष्ट आहे याची जाणीव व्हायला लागली. याच्यावर टीकाही व्हायला लागली. अगदी दिवंगत वैज्ञानिक डॉ. वसंत गोवारीकर यांनी लातूरात आल्यावर या मॉडेलचे व मेरीटमध्ये येण्याचे जाहीर वाभाडे काढले होते. त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्दयाकडे लक्ष वेधलं होतं. ते म्हणाले होते, ‘हे जे विद्यार्थी भरपूर गुण घेऊन पहिले-दुसरे येतात, ते पुढे इंजिनिअरिंग-मेडिकलला गेल्यावर नापास का होतात? त्यांना साधं इंग्रजी बोलता येत नाही.’ आज या सगळ्याचा विचार केला तर लक्षात येतं, यामुळे आमच्या पिढीचं किती नुकसान झालं ते.
दुसरा टप्पा सुरू होतो दोन हजार सालापासून ते आजपर्यंत. मोबाईलमध्ये अॅप असतं. ते पहिल्यांदा इन्स्टॉल केलं की, काही दिवसांनी ते अपडेट करावं लागतं. सध्याची ‘लातूर पॅटर्न’चा अवस्था ही अशीच अपडेटेड अवस्था आहे. ‘लातूर पॅटर्न व्हर्जन २.०’ असं म्हणूयात याला. या अठरा वर्षांच्या काळात लातूरनं त्या जुन्या मॉडेलला तिलांजली दिलेली दिसत नाही, तर उलट आजच्या काळानुसार तिच्यात जुजबी बदल करून तेच मॉडेल जोमानं वापरात आहे असं दिसतं. अपडेट केलेलं अॅप जसं ताजंतवानं होऊन नवीन फीचर्ससहीत फुल्ली ऑपरेशनल होतं तसं.
दोन हजार सालापूर्वी इंजिनिअरिंग व मेडिकलला जाणं प्रतिष्ठेचं समजलं जायचं. मेरीटमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी इंजिनिअरिंग नाही तर मेडिकलला जायचा. आजचे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरच्या त्याच इंजिनिअरिंगच्या जेईई (JEE) व मेडिकलच्या नीट (NEET) या प्रवेश परीक्षांना बसतात. ज्यांना भरपूर गुण मिळतात, ते प्रचंड फी भरून इंजिनीअर किंवा डॉक्टर बनतात. म्हणजे दोन हजार सालापूर्वी जे चित्र दिसत होतं, तेच आजही दिसतंय.
फरक कुठे पडलाय मग? आज फक्त या क्लासेसना मोठ्या व्यवसायाचं स्वरूप आलंय. आपला मुलगा/मुलगी कोणत्या क्लासेसचा विद्यार्थी आहे, हे पालक अभिमानानं सांगताहेत. महाविद्यालयं क्लासेसच्या तुलनेत आपण मागे नाहीत, हे दाखवण्यासाठी त्यांचे किती विद्यार्थी या प्रवेश परीक्षांमध्ये भरपूर गुण घेऊन नाव उंचवताहेत, हे त्यांच्या परिसरात मोठमोठे फ्लेक्स/होर्डिंग्ज लावून दाखवतायत. आमच्यावेळी ‘भरपूर गुण घ्या व ज्ञानी व्हा’ असा नारा शिक्षक मंडळी द्यायची. आजचा नारा तोच आहे. फक्त शाळा-महाविद्यालय-क्लासेस अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहेत.
या भरपूर गुण घेण्याच्या नादात संपूर्ण शहरात शाळा-महाविद्यालयं-क्लासेसचं रूपांतर कारखान्यात झालंय, याबद्दल मात्र कुणी चकार शब्द काढत नाही. कारण हेच आज उत्पन्नाचे मोठे स्रोत झाले आहेत. नोकरी करून तुटपुंज्या पगारात घर चालवण्यापेक्षा एखादा ‘यशस्वी होण्याची खात्री’ देणारा क्लास चालू केला आणि पालकांना थोडं भुलवलं की, विद्यार्थ्यांचा ओघ वाढायला कुठलाही अडथळा राहत नाही. त्यासाठी वाट्टेल तेवढी फी आकारली तरी कुणी आक्षेप घेणार नाही, अशी आजची अवस्था आहे. एकुणात आजची पिढीही आमच्यासारखीच यात भरडली जात आहे. सर्व काही तेच व तसंच आहे.
या पार्श्वभूमीचा विचार केला की, एका क्लास संचालकांच्या हत्येसाठी वीस लाख रुपये मोजणारे त्यांचे पूर्वीचे भागीदार किती कमावत असतील याचा अंदाजच केलेला बरा!
वरील प्रवेश परीक्षेत इथले विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत म्हटल्यावर कोटामधील प्रथम क्रमांकाच्या एका क्लासनं इथं शाखा उघडली आहे. वाहत्या गंगेत हात धुऊन घेऊन आपलं उखळ पांढरं करून घ्यायचं असा सर्वांचा उद्देश आहे. सोबत बिर्ला, पोद्दार व तत्सम मोठ्या शहरांतल्या शिक्षणसंस्था इथं शाळा सुरू करतात, तेव्हा त्या पाठीमागची आर्थिक गणितं किती मोठी असतील याचा विचार केलेला बरा. परिणामी या संचालकांसोबत झालेल्या शोचनीय गोष्टीचं कौतुक वाटत नाही, धक्का मात्र बसतो. या शाळा-महाविद्यालय-क्लासेसमुळे हॉस्टेल्स, मेस यांच्या संख्येतही वाढ झालीय. शिकायला आलेले विद्यार्थी-कुटुंब भाडेकरूच्या रूपात सहज उपलब्ध होणारं ठराविक मासिक उत्पन्न झाले आहेत.
व्यवसाय करणारा एक विशिष्ट वर्ग पूर्वी असायचा. मारवाडी, गुजराती यांचीच ती मक्तेदारी आहे असं सर्वत्र मानलं जायचं. त्यांचं क्षेत्र ठरलेलं होतं. आपल्या सामाजिक चौकटीत ते रूढ झालेलं होतं. आज शिक्षणसंस्था-क्लासेस चालू करणं ही वरील समाजगटांची मक्तेदारी नाही. कमी शिकलेला किंवा व्यवसायाची कसलीही पार्श्वभूमी नसणारा व्यक्तीही यात पडू शकतो. बाजाराचा अंदाज घेऊन थोडी मेहनत केली की, खोर्यानं पैसा ओढता येतो, हे असंख्य शाळा-महाविद्यालयं-क्लासेसच्या जाहिराती पाहून सांगता येतं. त्यामुळे त्यांच्यात छुपी स्पर्धा निर्माण होणारच. संचालकांची हत्या हे त्याचंच एक दृश्य रूप.
या सर्व धबडग्यात शाळा-महाविद्यालयात नापास झालेले विद्यार्थी कुठे जातात, याचा विचार कुणीच करत नाही. ‘लातूर पॅटर्न’ ही कादंबरी लिहिताना हाच विचार होता. कारण वरील सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावं यासाठी आहेत की नापास व्हावं म्हणून? कितीही सुविधा उपलब्ध असल्या तरी या जीवघेण्या स्पर्धेत आपण मागे पडणार ही भीती या शैक्षणिक वातावरणात कायमच असते. तसंच आपण किती शिकतो यापेक्षा शिकलेल्या गोष्टींचा वापर महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर किती व कशा प्रकारे करतो हे महत्त्वाचं. दुर्दैवानं सध्या वारं कुठल्या दिशेनं वाहत आहे, याचाच विचार सर्व मंडळी करताना दिसतायत. त्यामुळे घडलेली घटना कितीही शोचनीय असली तरी ती घडायला एकूण समाजव्यवस्थाही कारणीभूत आहे, हे विसरता येत नाही.
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी ‘लातूर पॅटर्न’ या कादंबरीचे लेखक आणि सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Pandurang Bhalerao
Mon , 02 July 2018
प्रत्येक क्लास मालकाने विध्यार्थी वर्गाला आणि त्यांच्या पालकांना भुलवून अफाट संपत्ती जमवली आहे , आणि त्याच धनाचा उपयोग आज हे लोक , विध्यार्थ्यांना मारण्यपासून ते , क्लास मालकांना मारण्यापर्यंत करत आहे । प्रामुख्याने नावाजलेले कलासचे मालक लोक । अजून एक महत्वाची बाब म्हणजे त्याच भागात कॉलेज तरुणींना पैसे देऊन भुलवून वैश्यव्यवसाय करवला जातो , कारण सगळेच शिकण्यासाठी येतात असेही नाही , आणि विध्यार्थी आई वडिलांना लातूर मध्ये शिकायचं म्हणून हट्ट करतात । कारण सर्व प्रकारच्या सोयी तिथे सहज प्राप्त होतात । आता तर तिथे B ग्रेड असणारे सिनेमे दाखवणारे चित्रपट गृह तयार झाले आहे । म्हणजे इकडे गरम होणे , आणि तिकडे शांत होणे ।
Pandurang Bhalerao
Mon , 02 July 2018
माझ्या भावाचा मुलगा तिथे शिकत आहे । यातून मला याची कल्पना आहे ।
Pandurang Bhalerao
Mon , 02 July 2018
सर लातूर पॅटर्न जे काही आहे यावर बोललं पाहिजे । कारण तिथे जे चालतं ते अत्यंत भयंकर आहे ।
ADITYA KORDE
Mon , 02 July 2018
परीक्षेत बऱ्यापैकी मार्क मिळवलेला मुलगा किंवा मुलगी आपल्याला कला शाखे कडे जायचे आहे असे म्हणाला /म्हणाली तर घरात कुणी गेल्याप्रमाणे सुतकी कळा पसरते. त्याने इंजिनियरच व्हायला पाहिजे किंवा डॉक्टर. अर्थात घरातले कुणी आधीच डॉक्टर असेल किंवा तसा व्यवसाय असेल तर तर त्याला त्याची ही सक्ती होतेच. त्याची आवड आणि बौद्धिक पात्रता असो व नसो.(हे मी वैयक्तिक अनुभवावरून लिहितोय.) बर तो मुलगा पुढे इंजिनियर झाला तरी तो इंजिनियरिंगशी संबंधीत काम करेल ह्याचे शक्यता कमीच. आता विषय निघालाच आहे म्हणून ह्या इंजिनियरिंग बद्दल थोडे लिहिलेच पाहिजे. एखाद्या देशात महामारीचा प्रकोप होऊन सगळीकडे रुग्णच रुग्ण दिसावे तसे काहीसे भारतात इंजिनियरिंग पदवीधरांचे होऊ लागले आहे. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा पासून एकही नोबेल पारितोषिक शास्त्र-अभियांत्रिकी विषयातल्या संशोधनासाठी/ कामासाठी भारतीय नागरिकालाला मिळालेले नाही. पण भारतात दरवर्षी सगळ्यात जास्त इंजिनियर तयार होतात. काम कोणतेही करो पदवी मात्र इंजीनियरीन्गची. नितीश कुमार , अरविंद केजरीवाल, जयराम रमेश, क्रीति सेनोन (कि कीर्ती सेनोन), सुशांत सिंग राजपूत, राम गोपाल वर्मा, कादरखान, रघुराम राजन हे लोक शिक्षणाने इंजिनियर आहेत पण काम इंजीनियरचे करत नाहीत. भारतात दरवर्षी जवळपास १५ लाख मुलं इंजिनियरिंगची पदवी घेऊन बाहेर पडतात. १५ लाख हा आकडा कदाचित तुम्हाला आपली १२५-१३० कोटी लोकसंख्या ऐकून फार वाटत नसेल तर जगात इतर काही प्रमुख देशात दरवर्षी बाहेर पडणाऱ्या इंजिनियरची संख्या बघा म्हणजे तफावत लक्षात येईल रशिया ४५४४३६ अमेरिका २३७८२६ इराण २३३६९५ जपान १६८२१४ द कोरिया १४७८५८ इंडोनेशिया १४०१६९ युक्रेन १३०३९१ मेक्सिको ११३९४४ फ्रान्स १०४७४६ ही जगाशी तुलना आणि आकडेवारी झाली. पण भारतातदरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या किती आहे? तर ती आहे ५२हजार, उच्च शिक्षण घेतलेल्या म्हणजे MD MS अशा तज्ञांची संख्या धरली तर साधारण ६० हजार दरवर्षी. तफावत कळतेय का? १५ लाख कुठे आणि ६०-६५ हजार कुठे.ह्यात डिप्लोमा म्हणजे पदविका प्राप्त करणारे इंजिनियर धरले नाहीत. त्याहून आश्चर्य आणि दु:खाची गोष्ट अशी कि त्याना काम द्यायला पुरेशा संधी नाहीत असे नव्हे( ते तर झालेच) पण ह्यापैकी फक्त ७-७.५% पदवीधरच एखादे इंजिनियरिंगचे काम करण्याच्या पात्रतेचे असतात.बहुतांश इन्जिनियर मुलांना Core Engineering असलेली कामे नको असतात. मार्केटिंग, सेल्स, विमा–रिस्क असेसमेंट अशा अनेक ठिकाणी काम करायचा त्यांचा कल असतो.पण अगदी हार्ड कोअर इंजिनियरिंग नसले तरी साधे अप्लाईड-इंजिनियरिंग असलेले काम देखिल त्याना नको असते.मशीनवर जाऊन हात काळे करणे सोडूनच द्या. मी स्वत: Tata Motors सारख्या एका इंजीनियरीन्गशी संबंधीत कंपनीत काम करत असल्याने मी हे गेल्या कमीतकमी २३ वर्षांचे निरीक्षण लिहिले आहे. https://www.indiatoday.in/education-today/featurephilia/story/engineering-employment-problems-329022-2016-07-13 रशिया अमेरिका जपान फ्रांस असे देश विकसित राष्ट्र आहेत त्यांच्याकडे दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्या लोकाना द्यायला काम असेल ही पण भारताचे काय , आपल्या कडे एवढ्या नोकर्या आहेत का?काम आहेका? बाजारात मागणी आणि पुरवठा ह्यांचा ताळमेळ बिघडला कि भाव प्रचंड वाढतात तरी किंवा पडतात तरी हे आपल्याला माहिती आहेच तसे काहीसे आता होऊ लागले आहे. तरीही इंजिनियरिंगकडे लोकांचा कल वाढतोच आहे.असे का होत असावे. नुकताच एका नातेवाईकाशी शिक्षण ह्या विषयावर संवाद झाला. त्याचा मुलगा दहावीला ८९% गुण मिळवून पास झाला. आता पुढे काय? म्हणून पत्नीकडे कल चाचण्या करून घ्यायला आला होता. त्याच्याशी बोलताना integrated कॉलेज/क्लासेस ह्या नव्या प्रकाराबद्दल समजले म्हणजे तसे थोडेफार ऐकून होतो पण हा खरा प्रकार काय आहे ह्याची त्याच्या कडून मिळालेली माहिती चकित करून गेली. आणि थोडा फार उलगडा झाला.बर्याच जणाना माहिती असेलच पण तरीही ज्याना माहिती नसेल त्यांच्या साठी थोडक्यात माहिती अशी- integrated कॉलेज/क्लासेस म्हणजे असे कोचिंग क्लासेस ज्यांनी एखाद्या कॉलेजशी संधान साधून, एखादा करार केलेला असतो. हे कोचिंग ११वी १२वी शास्त्र शाखेसाठी असते. साध्या कोचिंग क्लासेस मध्ये फक्त ११वी किंवा १२वीच्या विषयांचीच तयारी करून घेतली जाते पण integrated कॉलेज/क्लासेसमध्ये १२वी नंतर होणाऱ्या इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षांची-म्हणजेच JEE-Main (Joint Entrance Examination)ची खास तयारी चांगली २ वर्षे करून घेतली जाते. आजकाल इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षेत नुसते बरे किंवा चांगले मार्क मिळवून उपयोग नसतो तर चांगलेच, पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजेत नाहीतर IIT किंवा त्याच्या तोडीच्या इतर नामचीन इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश मिळणार नाही. आणि चांगल्या म्हणजे नामांकित कॉलेज मधून जर पदवी मिळाली नाही तर चांगली( म्हणजे गलेलठ्ठ पगाराची)नोकरी किंवा परदेशी जायची संधी कशी मिळणार! त्यामुळे अशा पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्याची हमी देणाऱ्या integrated कॉलेज/क्लासेसचे हल्ली पेव फुटले आहे.त्यांची फीही अर्थात तशीच असते. पुण्यात नामांकित(!) क्लासेस साधारण ४ ते ५ लाख रुपये फी आकारतात तर अहमदनगर, सातारा अशा ठिकाणी ही फी २.५ ते ३ लाख असते. ११ वी १२ वी करता फीची आकारलेली भरमसाट रक्कम सोडता ह्यात काही गैर असेल असे वरकरणी कुणाला वाटणार नाही पण तसे ते नाही. हे क्लासेस साधारण दिवसाला ६-७ तास मुलांची इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षांची-म्हणजेच JEE-Main (Joint Entrance Examination)ची खास तयारी करून घेण्यासाठी खातात. आता ११वी १२वी शास्त्र शाखेला प्रयोगशाळा, जर्नल्स, रोजचे तास, त्याला उपस्थिती ह्यांना किती महत्व! पण मग हे integrated कॉलेज/क्लासेसच्या ६-७ तासांचे कसे नियोजन करायचे. तर ह्या क्लासेसच्या मालकांनी कॉलेजेसशी आधीच संधान बांधून ठेवलेले असते. मुलांनीपूर्ण दिवस ह्या क्लास मध्येच तयारी करायची. मुलांनी करायचे प्रयोग, त्याची निरीक्षणे अगदी त्यांची उपस्थिती हे सगळे manage(!) केले जाते. (काही बाबतीत तर सकाळी ९ ते संध्याकाळी ८ असे १०-१२ तास विद्यार्थी इथे काढतात) ही गोष्ट पालकांपासून लपवून ठेवली जात नाही, तर उलट ही कशी अभिनव क्लृप्ती आहे. अशा पद्धतीने सादर केली जाते, अभिमानाने.जणू ११वी १२वी ही दोन वर्षे फक्त प्रवेश परीक्षेच्या तयारी साठीच आहेत . हा एक गंभीर गुन्हा तर आहेच आणि ह्यात पालकांपासून ते कॉलेजेस पर्यंत आणि त्यापुढे ही अनेकजण सामील आहेत.पण त्यातला बळी जाणारा घटक जो विद्यार्थी आणि त्याचे पालक, तो देखील स्वखुशीने त्यात सामील होतो आहे.म्हणजे अपराध करणारा आणि तो ज्याचे नुकसान करतोय तो बळी दोघेही एकत्र येऊन अभिनव युती करताहेत. ह्या प्रकाराला जगात तोड नाही. मी स्वत: बिबवेवाडी पुणे परिसरातल्या एका नामवंत क्लासला भेट देऊन केलेले निरीक्षण सांगतो. हा क्लास उघड पणे स्वत:ला integrated कॉलेज/क्लास म्हणवत नाही, अजूनतरी. तितका नामवंत नसल्याने दोन वर्षांची फी फक्त ३.५लाख रुपये, ती जर एकरकमी आणि रोख भरली तर २०-२५हजार रुपये कमी होणार. (हवी असल्यास) रीतसर पावतीही मिळणार (काळे धन वगैरे काही नाही.) २५० मुलांचे प्रवेश आधीच झालेत. आता सगळेजण काही एकरकमी पैसे भरत नाहीत, भरू शकत नाहीत तर त्याना हप्ते बांधून दिले जातात (म्हणजे दोन वर्षाच्या ८ कोटी ७५ लाखाची सोय झाली)एका बिल्डींगचे दोन मजले ह्यांचेच. बाकी खेळण्याचे मैदान, प्रयोगशाळा सोडाच पार्किंगची ही सोय नाही. डबे खायला कॅन्टीन नाही.पिण्याच्या पाण्याची मात्र सोय चांगली होती आणि प्रत्येक वर्ग वातानुकुलीत होता. मुलगे आणि मुलींसाठी वेगवेगळे स्वच्छतागृह आहे पण एका मजल्यावर मुलांसाठी आणि दुसर्या मजल्यावर मुलींसाठी, ते सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या पाहता अपुरे, आणि का असावे? कागदोपत्री हा साधा क्लास म्हणजे शिकवणी आहे जिथे दिवसाचे एखाद दोन तास फक्त विद्यार्थी येतात. पण प्रत्यक्षात ते तिथे दिवसाचे १० ते १२ तास घालवतात.११वी १२वीचा अभ्यास कॉलेजेस मध्ये होतच नाही. इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षांची तयारी करताना तो आपोआप होतोच असे मला सांगितले गेले. ती तयरी करून घेणार्या शिक्षकांच्या पात्रतेचे काय? त्याना किती पगार दिला जातो असल्या प्रश्नाची उत्तरे मिळाली नाहीत आणि संशय आल्यामुळे लवकरच माझी तिकडून गोड बोलून बोळवण करण्यात आली.अनेक क्लासेस आता स्वत:चीच खोटी कॉलेजेस सुरु करतात . एका खोलीत ऑफिस आणि बाकी काही नाही बाकी सगळे पैसे खायला घालून manage करतात. मिकीज कॉलेज, ग्लोबल कॉलेज , राव कॉलेज, भाटीया कॉलेज ही असली नाव असलेली कॉलेजेस आपण कधी कुठे ऐकली होती? अक्ख्या पुणे शहरात असे किती क्लासेस असतील आणि ह्यात किती मोठा आर्थिक(गैर) व्यवहार आणि किती मोठमोठ्या लोकांचे हितसंबंध गुंतले असतील? कसे झाले हे एवढे मोठे? कुणी ह्याना पोसले? आपण सारासार विचार हरवून बसलेल्या पालकांनी. भारतात दरवर्षी साधारण १०-१२ हजार जागा IIT प्रवेशासाठी उपलब्ध असतात.( देशभरात २३ IIT संस्था आहेत) आणि परीक्षेला बसणारे विद्यार्थी असतात साधारण १२-१५ लाख.ह्या १२-१५ लाख मुलांपैकी पहिल्या अडीच लाख मुलाना दुसर्या प्रवेश परीक्षे साठी प्रवेश मिळतो (JEE Advanced). उपलब्ध जागा आणि परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांची संख्या ह्यातली तफावत लक्षात घेता हे क्लासेस आणि पालक किती दडपण आणत असतील मुलांवर ह्याची कल्पनाच केलेली बरी. अजूनतरी केंद्रीय परीक्षा बोर्डाच ह्यांनी खिशात टाकले असून आता ते निकालही पैसे भरून manage केले जातात असे काही खात्रीलायक रीत्या समजलेले नाही त्यामुळे आपले नाव टिकवायचे असेल तर ह्या क्लासेसना मुलाना चरकात घालून पिळून काढावच लागतं.