अजूनकाही
राजकुमार हिरानी व ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांच्यात काही संबंध असावा का? दोघंही सर्जनशील. दोघांच्याही दृष्टीनं विनोदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फरक पडतो तो मूल्यदृष्टीत. श्याम मनोहरांची मूल्यदृष्टी समकालीन वास्तवावर ब्लॅक कॉमेडीच्या आधाराने ताशेरे ओढण्याची, तर हिरानींची प्रेक्षकांना खळखळून हसवत गंभीर विषय गळी उतरवण्याची. त्यांच्या सर्जनशीलतेचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘लगे रहो मुन्नाभाई’. त्यात त्यांची सर्व दिग्दर्शकीय वैशिष्ट्यं शोकेसमध्ये ठेवल्यासारखी छानपणे मांडलेली आहेत. गांधीजींचं तत्त्वज्ञान एका खुशालचेंडू व्यक्तिमत्त्वासोबत जोडून स्वातंत्र्यपूर्व काळातली विचारसरणी हलक्याफुलक्या पद्धतीनं आजच्या काळाशी जोडण्याची कल्पनाच अफलातून होती. त्यांनी हा यशस्वी फॉर्म्युला पुढे सर्वच सिनेमांत वापरला. ‘संजू’सुद्धा त्याला अपवाद ठरत नाही.
संजय दत्त उर्फ संजू (रणबीर कपूर) आपल्या घरी एक चरित्र वाचतोय. जी त्याचीच असते. ‘बाबागिरी’ असं नाव असणारं ते चरित्र कुणा डी. एन. त्रिपाठी (पीयूष मिश्रा) नावाच्या गीतकारानं लिहिलेलं असतं. पत्नी मान्यता दत्तलाही (दिया मिर्झा) ते आवडलेलं नसतं. ती संजूला विनी डियाझ (अनुष्का शर्मा) या यशस्वी चरित्रकार लेखिकेला भेटायला सांगते. पहिल्याच भेटीत त्याला नकार देणारी विनी त्याची बाजू समजून घ्यायला तयार होते. कारण ती त्याच्यावर पुस्तक लिहिणार आहे, ही बातमी छापून आलेली असते आणि तो एका महिन्यात जेलमध्ये जाणार असतो. तो त्याची कहाणी सुरुवातीपासून म्हणजे ‘रॉकी’ या त्याच्या पहिल्या सिनेमापासून सांगायला सुरू करतो.
हिरानींचा पहिला सिनेमा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ अनपेक्षितरित्या यशस्वी झाला. सोबत संजय दत्तच्या कारकीर्दीलाही नवं वळण लागलं होतं. वैद्यकीय क्षेत्रातील काही कळींच्या मुद्द्यावर त्यांनी विनोदाच्या साहाय्यानं भाष्य केलं होतं. पुढील सिनेमा करायचा तर तोच फॉर्म्युला वापरायचा का नाही, याची त्यांना खात्री नसावी. कारण खुशालचेंडू मुन्नाभाई व गांधीजी हे विजातीय टोक प्रेक्षकांना पसंत पडेल का नाही ही शंकाच होती. पण प्रेक्षकांनी प्रचंड प्रमाणात उचलून धरल्यावर आणि ‘गांधीगिरी’ हा नवीनच शब्द रूढ केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याला गंभीर विषय प्रेक्षकांना हसवत सांगण्याचा फॉर्म्युला सापडलाय. तो उत्तम आहे. त्याचाच परिपाक म्हणून त्यांनी शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा ‘थ्री इडियट्स’सारखा सर्वच प्रेक्षकांना खेचून आणणारा सिनेमा बनवला.
हा फॉर्म्युला काय आहे? तर एक गंभीर विषय घ्यायचा. एक खुशालचेंडू व्यक्तिमत्त्व असणारा नायक घ्यायचा, जो कायमच त्या विषयाकडे तिरकस-गांभीर्यानं बघेल. विनोदी प्रसंग, संवादांची साथ घ्यायची. हिंदी व्यावसायिक सिनेमात असणारे हातखंडे म्हणजे गाणी, उत्तम चित्रीकरण, नावाजलेले अभिनेते, उच्च निर्मितीमूल्यं वापरायची. प्रेक्षकांना मेलोड्रामा आवडतो म्हणून तोही वापरायचा. अशी एक चौकट तयार झाली की, शिक्षणव्यवस्थेपासून ते देव-धर्मापर्यंतचे विषय हाताळायचे.
पण तरीही हा फॉर्म्युला प्रत्येक वेळी यशस्वी होईलच असं नाही. तिथं कामाला येतो, तो त्यांचा जाहिरात क्षेत्रातील दांडगा अनुभव. तीस सेकंदांच्या जाहिरातीत एखाद्या प्रॉडक्टचा प्रभाव टाकणं किंवा पानभर जाहिरात असेल तर ती नेमकेपणानं गिऱ्हाईकांच्या गळी उतरवण्यासाठी आकर्षक पद्धतीनं तयार करणं हे कौशल्याचं काम असतं. हिरानींचा हाच अनुभव त्यांच्या कथा प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यासाठी कामाला येतायत.
इथंसुद्धा ते व अभिजात जोशी हे ‘लगे रहो...’ पासूनचे त्यांचे पटकथाकार ही कथा सांगण्यासाठी, रिचर्ड अटनबरोंनी चार्ली चॅप्लिनवरील चरित्रपटासाठी जशी एका काल्पनिक पत्रकाराची निर्मिती केली होती, तशी इथं दोन पात्रं निर्माण करून करतात. यातील एक आहे यशस्वी चरित्रकार विनी डियाझ व संजूचा मित्र म्हणून कमलेश कपासी उर्फ कमली. सिनेमाची सुरुवात संजूनं स्वतः कथा सांगण्यानं होतं. विनी लेखिका असल्यामुळे तिला संजूची कहाणी ऐकण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. कमलेश मात्र पूर्णतः काल्पनिक पात्र आहे. असा कुणी मित्र संजय दत्तच्या आयुष्यात नसावा. पण त्यांचे असंख्य मित्र-नातेवाईक व इतरांचं मिश्रण असणारं हे प्रातिनिधिक पात्र आहे. त्यामुळे संजूच्या कहाणीला एक दृष्टिकोन मिळतो. तसंच पटकथाकार-दिग्दर्शकाला कथा सांगण्यासाठी मोकळीकता मिळते. त्याची ओळखही दत्त कुटुंबांचा चाहता म्हणून करून देण्यात येते. त्याचं पटकथेतलं अस्तित्व संजूच्या चांगुलपणाचं प्रतीक या दृष्टीनं बघता येईल. तसंच त्याची भावनिक बाजू दाखवण्यासाठीही ते उपयोगाला येतं.
तरीही हिरानी काही महत्त्वाच्या गोष्टींना जाणूनबुजून दूर ठेवतात. उदाहरणार्थ संजय दत्तची दोन लग्न. पहिल्या लग्नापासून संजूला त्रिशला नावाची मुलगी आहे. त्याचा पुसटसा उल्लेखही ते करत नाहीत. तर दुसरी गोष्ट संजूची बहीण माजी खासदार प्रिया दत्त. प्रिया व अजून एका बहिणीचं पात्र येतं, पण त्यांच्या भूमिका खूपच त्रोटक आहेत. मोक्याच्या क्षणी त्या गायबच होतात. त्याचं अमली पदार्थांचं सेवन व अतिरेकी असण्याच्या घटनांना सिनेमाच्या केंद्रस्थानी ठेवल्यावरही हिरानी संजूच्या आयुष्यात असणार्या इतक्या महत्त्वाच्या या व्यक्तींना का दूर ठेवतात याचं उत्तर मिळत नाही. कदाचित संजय दत्तनेच त्यांना मनाई केली असेल किंवा त्यांच्यालेखी यांचं महत्त्व नसेल. त्यामुळे जिथं सुनील दत्त किंवा कमलेशचं पात्र वाढतं, तिथं बहीण प्रियाचं पात्र दुय्यम होत गायब होतं. अगदी मान्यता दत्तचं पात्रही खोलात जाऊन उभं केलेलं नाही.
हे दोष सोडले तर हिरानी संपूर्ण लक्ष संजूचं अमली पदार्थांचं सेवन व त्याच्यावर अतिरेकी असण्याचे आरोप यावर केंद्रित करतात. त्यानं यातून बाहेर यायचा प्रयत्न कसा केला, तसंच अतिरेकी असल्याचा ठपका बसल्यामुळे जेलमध्ये जाण्याची नामुष्की कशी ओढवली हे दाखवतात. संजू यात निर्दोष होता, फक्त काही चुकीच्या व्यक्तींच्या नादानं त्याच्या आयुष्याची वाताहत झाली अशी हलक्या हातानं त्याची भलामणही करतात. कथेत त्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्यामुळे प्रसारमाध्यमं व एकूण परिस्थिती कशी वाईट होती, यांना खलनायक म्हणून दाखवलं जातं.
संजू अमली पदार्थांचं व्यसन करायला लागतो, तेव्हा एके ठिकाणी म्हणतो, ‘आईला कॅन्सर झाला म्हणून मी याच्या आहारी गेलो’ किंवा त्याची गर्लफ्रेंड रुबी हीचं लग्न ठरतं म्हणून तो परत अमली पदार्थ घ्यायला लागतो. कथेच्या चौकटीत नायकानं दिलेली कारणं पटतात, पण बाहेर आल्यावर विचार केल्यास तार्किकतेत बसत नाहीत. प्रत्यक्ष आयुष्यात नशापाणी करणारी व्यक्ती अशी कारणं देत असेल असं वाटत नाही.
हिरानी संजूच्या पर्यायानं सुनील दत्तच्या आयुष्यातील काही प्रसंग घेतात. उदाहरणार्थ बाबरी मशिदीचा पाडाव व नंतर उसळेलल्या दंगली, मुंबईतले बॉम्बस्फोट, संजूचं अंडरवर्ल्डशी असणारी जवळीक, त्यांची खासदारकी, त्याचे भोगावे लागलेले परिणाम वगैरे गोष्टी कौटुंबिक आघाडीवर काय झालं यासाठी येतात.
सुनील दत्तनी प्रत्यक्षात संजयशी त्या काळात किती संवाद ठेवला असेल ते माहिती नाही, पण इथं ते त्याला वेळप्रसंगी साथ देतात. त्यांना आवडणारी जुनी हिंदी गाणी त्याला लढण्याची प्रेरणा मिळावी यासाठी ऐकवतात. प्रत्यक्ष आयुष्यात खलनायक ठरलेल्या आपल्या मुलाच्या पाठीशी त्याचे वडील नेहमी खंबीरपणे उभे होते हे मात्र यातून अधोरेखित होतं. बाप-मुलाचं नातंसुद्धा यातून बघायला मिळतं. मेलोड्रामाचा घेतलेला आधार गरजेचा होता का असं वाटत राहतं. प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूक म्हणून ठिक आहे, पण एका टप्प्यावर ते नको वाटतं. तीच गोष्ट पार्श्वसंगीताची. काही ठिकाणी त्याची गरज नव्हती असं वाटतं.
अभिनयात मनीषा कोईरालापासून ते दिया मिर्झापर्यंत सर्वच जणांनी चांगलं कामं केलं आहे. परेश रावल व विक्की कौशल यांच्या भूमिका मोठ्या असल्यामुळे अभिनयाला बराच वाव मिळाला आहे. ते त्यांचं काम अतिशय चोखपणे करतात. ज्याच्या खांद्यावर हा सर्व डोलारा उभा केलेला आहे, त्या रणबीर कपूरनं मात्र ‘भूमिका’ जगली आहे. कितीतरी प्रसंग आहेत, ज्यात तो रणबीर असण्याचं त्याचं अस्तित्वच पुसून टाकतो. उदाहरणार्थ ‘रॉकी’चा प्रीमियर. निःसंशय हा त्याचा सध्याचा सर्वोत्तम अभिनय आहे. हिरानींची गाणी हे एक स्वतंत्र प्रकरणच असते. इथं ती तितकी प्रभावी नाहीत. ‘थ्री इडियट्स’सारखी ती कायमची लक्षात राहणारी नाहीत.
हिरानींचा हा सर्वोत्तम सिनेमा आहे का? तर नाही. तो नंबर अजूनही ‘लगे रहो मुन्नाभाई’चाच आहे. पण तरीही इतर चरित्रपटांना एक वास्तव व काल्पनिकतेचं मिश्रण असणारी विश्वसनीय कथा कशी मांडायची याचा आदर्श मात्र त्यांनी यातून घालून दिला आहे, हे नक्की.
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 03 July 2018
किती ती लाल करायची एका गुन्हेगाराची. काही धरबंद? चार लेख आले अक्षरनामावर. सावरकरांच्या चित्रपटावर कधी परीक्षण छापून आलं नाही ते. पतिव्रतेच्या गळ्यांत धोंडा अन वेश्येला मणिहार. -गा.पै.