मनोहरपंत, तुम्ही ऐसे कैसे ज्ञानी?  
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • मनोहर जोशी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई
  • Sat , 30 June 2018
  • पडघम राज्यकारण मनोहर जोशी Manohar Joshi शिवसेना Shiv Sena बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आदित्य ठाकरे Aditya Thackeray

बातम्या ऐकण्यासाठी टीव्ही लावला तर शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मनोहरपंत जोशी यांचं भाषण सुरू होतं. बऱ्याच वर्षांनी मनोहरपंताना ऐकण्याचा योग आला म्हणून तेच चॅनेल सुरू ठेवलं. महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर सत्तेत का आली नाही, असा प्रश्न त्यांना पडला असल्याचं मनोहरपंतानी सांगितलं आणि पुढे जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते अभ्यास करताहेत, असं त्यांनी जाहीर केल्यावर प्रश्न पडला- मनोहरपंतांचे ऐसे कैसे हे ज्ञान?

मनोहर जोशी ही काही साधी आसामी नव्हे. शिवसनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मनोहरपंत आहेत. सेनेचे मुंबईचे पहिले महापौर, विधानपरिषद आणि विधानसभा सदस्य, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते, मग राज्यातील सर्वार्थानं पहिल्या बिगर काँग्रेसी सरकारचे मुख्यमंत्री, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे सभापती, अशी सत्तेतली अनेक महत्त्वाची पदं मनोहरपंतांनी भूषवलेली आहेत. (२०१४च्या विधानसभा निवडणुकीपासून सेना-भाजप युतीचे संबंध ताणले गेले नसते तर एव्हाना ८० वर्षीय मनोहरपंत राज्यपाल झालेले असते.) एका भिक्षुकाच्या घरच्या, वार लावून जेवणाऱ्या या मुलाने राजकारणात अचंबित करणारी झेप घेतली. त्याचं सर्व श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना असल्याचं असल्याचं मनोहरपंतानी अनेक वेळा नमूद केलंय.

त्यांना शिवसैनिक ‘सर’ म्हणतात. कारण हजारो युवकांना रोजगाराभिमुख विविध कौशल्यं शिकवणाऱ्या कोहिनूर टेक्निकलचे ते प्राचार्य होते. प्रभावी वक्तृत्व असणारे, क्रीडाप्रेमी मनोहरपंत अत्यंत चांगले वाचक आहेत. त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत. त्या पुस्तकांची तडाखेबंद विक्री झालेली आहे. त्या लेखनासाठी संशोधन केल्याचं त्यांनीच सांगितलेलं आहे. म्हणजे ते एक लोकप्रिय लेखक आणि संशोधकही आहेत.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मनोहरपंतांचं टायमिंग अचूक कसं असतं याचा एक अनुभव सांगतो. ‘मराठी’ हा शिवसेनेचा बाणा आहे. मुख्यमंत्री झाल्यावर सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात मनोहरपंत आवर्जून मराठीत बोलत असत. एकदा उद्योजकांच्या एका कार्यक्रमात त्यांनी अचानक पूर्ण भाषण इंग्रजीत केलं. एक पत्रकार म्हणून त्या कार्यक्रमाला मी त्यांच्यासोबतच गेलेलो होतो. सर्वांनाच मनोहरपंतांच्या अस्खलित इंग्रजी भाषणानं धक्का बसला. कार्यक्रम संपवून परत जातांना ‘अचानक इंग्रजीत भाषण कसं काय केलं तुम्ही?’, असा प्रश्न विचारला तेव्हा मनोहरपंत म्हणाले होते, ‘मराठीचा पुरस्कर्ता आहे म्हणजे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला इंग्रजी येत नाही या भ्रमात कुणी राहू नये म्हणून टाकलेला हा गुगली आहे’.

एक अत्यंत यशस्वी आणि बडा उद्योजक असंही मनोहरपंतांचं अजून एक रूप आहे. थोडक्यात मनोहर जोशी हे एक बहुपेडी प्रेरणादायी यशकथा आहेत. अशी चौफेर विद्वता असूनही शिवसेना राज्यात स्वबळावर सत्तेत आलेली नाही याची खंत मनोहरपंताना आहे, असं त्यांनीच बोलून दाखवलं. यातून शिवसेनेवर असणारी त्यांची निष्ठा किती प्रखर आहे असं अनेकांना वाटू शकेल, पण तो केवळ एक आभास आहे, असं त्यांचं भाषण पूर्ण नीट ऐकल्यावर लक्षात येतं.

सेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्याच्या छत्रछायेची ‘संपन्न’ता अनुभवलेले, त्या छायेत छत्रचामरे झुलवलेले, नंतर दुसऱ्या पिढीतील उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व (‘दोन्ही’ डगरीवर अत्यंत सफाईनं हात ठेवून) फुलताना बघितलेले आणि आता तिसऱ्या पिढीतील आदित्यच्या नेतृत्वाची कळी फुलताना जवळून पाहणारे मनोहर जोशी यांच्यासारखे ज्ञानी आणि प्रकृतीनं ठणठणीत नेते आता सेनेत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेही नाहीत. म्हणूनच मनोहरपंताचं भाषण ऐकल्यावर तुकोबाच्या ओळी आठवल्या-

‘ऐसे कैसे झाले ज्ञानी | वर्म कळुनि म्हणविती अज्ञानी ||’

खरं तर, शिवसेना स्वबळावर स्तत्तेत का आलेली नाही या प्रश्नाचं नेमकं उत्तर देऊ शकणारा एकच ‘ज्ञानी’ नेता सेनेत आहे आणि तो म्हणजे मनोहरपंत जोशी. कारण सेनेची वाटचाल जवळून अनुभवताना, पक्ष आणि सत्ता अशा दोन्ही पातळीवर सर्वाधिक ‘मिळवून’ घेण्याचं मनोहरपंतांचं ‘कसब’ही अतुलनीय आहे. ‘पक्षाची शिकार करताना शिकाऱ्याला अन्य काहीही नाही, तर जिथं बाण मारायचा आहे, त्या पक्षाचा एक डोळाच फक्त दिसतो, हे पंतांचं गुणवैशिष्ट्य आणि तोच त्यांचा कमकुवतपणा आहे’, अशा आशयाचं बोचरं विधान सेनेला मिळणारं पहिलं महापौर आणि मुख्यमंत्रीपद हुकलेल्या (ते मनोहरपंतानी मिळवलं!) सुधीर जोशी यांनी ते महसूल मंत्री असताना एक दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखात केलेलं होतं. त्याचं स्मरण यानिमित्तानं म्हणूनच झालं.

इतका प्रदीर्घ काळ संघटनेत घालवल्या नंतरही आपण संघटनेसाठी काय केलं; शिवसेनेच्या व्यापक भल्यासाठी विधानसभेचं विरोधीपक्ष नेतेपद छगन भुजबळ यांना देण्याचा उमदेपणा का दाखवला नाही, सेना स्वबळावर सत्तेत यावी या कळकळीपोटी छगन भुजबळांच्या बाहुंना बळकट आधार का दिला नाही; सेना-भाजप युतीचं मुख्यमंत्रीपद सुधीर जोशी यांच्याकडे जाऊ देण्याचं औदार्य का दाखवलं नाही; छगन भुजबळ, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, लीलाधर डाके, प्रमोद नवलकर, सतीश प्रधान, आनंद दिघे यांच्यासारखं रस्त्यावर उतरून संघर्ष उभं करत संघटना बांधण्याऐवजी आपण कायम ‘सर’ या कोशात कसे अडकून राहिलो; ग्रामीण महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात मोर्चे, दिंड्या काढून, आंदोलनं करून शिवसेना बळीराजाच्या सोबतीला आल्याची दवंडी दिवाकर रावते यांच्याप्रमाणे अनेक गावाच्या सीमेवर का दिली नाही; अशा सर्व आंदोलनांत आजाराची तमा न बाळगता ज्या तडफेनं उद्धव ठाकरे सहभागी झाले, तेव्हा त्यांच्या खांद्याला खांदा द्यायला का पुढे झालो नाहीत; ( कुपोषणग्रस्त मेळघाटच्या एका दौऱ्याचा अपवाद वगळता) दररोज कणाकणांनी मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी धूळभरल्या रस्त्यात का चाललो नाही... अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मनोहरपंताना अन्यत्र कुठे जाण्याची गरज नाही. मनाच्या कप्प्यात बंद करून ठेवलेल्या त्या गुपितांची तपशीलानं मांडणी केली की, ‘बिटवीन द लाईन’ काय दडलेलं आहे, हे समजेल आणि शिवसेना स्वबळावर का सत्तेत आली नाही याची संगती सहजपणे मनोहरपंतांना लागेलच.

भाजपशी सेनेनं केलेली युती हे स्वबळ न मिळण्याचं एक प्रमुख कारण आहे, हे मनोहरपंताना आठवत नसावं हे एक आश्चर्यच आहे. युती झाल्यावरही ‘शत प्रतिशत’साठी भाजपचे राज्यातील नेते-कार्यकर्ते सतत क्रियाशील राहिले आणि सेनेचे नेते-सैनिक-लोकप्रतिनिधी  फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्यावर अवलंबून राहिले. त्या काळात उद्धव ठाकरे राजकारणात यायचे होते; राज ठाकरे थोडेफार सक्रीय होते आणि सेनेत मनोहरपंत जोशी हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते समजले जात असत, पण भाजप हातपाय पसरतोय आणि त्याचा तोटा भविष्यात सेनेलाच आहे हे मनोहरपंतांनी लक्षात घेतलं नाही. ते लक्षात आलं असेल तर त्यांनी कधी स्पष्टपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर का टाकलं नाही, हेही कळायला मार्ग नाही.

सेनेची धुरा सांभाळल्यावर हे लक्षात आलं ते उद्धव यांच्या. नंतर उद्धव ठाकरे यांची पक्षावर पूर्ण पकड निर्माण होण्याच्या काळात नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी सेनेत बंड केलं. उद्धव यांच्यावर चौफेर जहरी टीकास्त्र सोडलं गेलं. ‘शिवसेना संपली’ ते ‘खिळखिळी झाली’, ‘सेनेचा आक्रमकपणा लोप पावला’, ‘वाघाची मांजर झाली’... अशा टीकेला तोंड देत बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा करिष्मा आणि वक्तृत्व व्यक्तिमत्त्वात नसूनही आरोग्याच्या क्लिष्ट कुरबुरींवर मात करत अलिकडच्या काही वर्षांत उद्धव ठाकरे यांनी त्यांचं नेतृत्व प्रस्थापित केलं. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सेनेच्या जागाही वाढवून दाखवल्या. त्यासाठी ते राज्याच्या प्रत्येक भागात फिरले. स्वत:ची टीम तयार करताना शिवसेनेला राडेबाजीच्या प्रतिमेतून मुक्त करत एक गंभीर राजकीय पक्ष म्हणून प्रतिमा मिळवून दिली.

उद्धव यांच्या या प्रयत्नात मनोहरपंत कांठावर राहूनच सहभागी (?) झाले. पद आणि ठाकरे ‘कृपा छाया’, केवळ आपल्यावरच राहावी अशी ‘मनोहरपंती मानसिकता’ त्यामुळे सेनेत वाढली आणि महाराष्ट्रात फोफावलीही. आणखी एक म्हणजे, संपर्क प्रमुख आणि स्थानिक नेते यांच्यातील वितंडवादाची दरी  वेळीच मिटवणं गरजेचं होतं. संपर्क प्रमुख संस्थानिकासारखे वागतात आणि त्यांना मुंबईबाहेरचे जग मुळातून ठाऊक नाही. त्यामुळे धुसफूस सेनेत कायम धुसफूस आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे पक्षबाह्य हितसंबध निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जिंकलेल्या लोकसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीत पुरेसं यश मिळत नाही आणि विधानसभेवर भगवा फडकला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेनेला भरघोस यश मिळत नाही, असा अनुभव अनेक ठिकाणी का येतो आहे, हे जाणून आणि इतरांना जाणवून देत मनोहरपंत कधी कृतीशील राहिल्याचं दिसलेलं नाही.  

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

वाशिममध्ये वर्षानुवर्षे खासदार आहे, पण एकही पंचायत समिती सेनेच्या ताब्यात नाही. यवतमाळ, औरंगाबाद, वाशीम, नागपूर, परभणी, ठाणे, कल्याण, मावळ अशा अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. नेत्याला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत नमस्कार घालायचा आणि कार्यकर्त्याला फटका मारणाऱ्या खासदार तसंच आमदारांनी केवळ त्यांच्या निवडणुकीतील विजयापुरता विचार न करता पक्षाच्या प्रत्येक पातळीवरील निवडणुकीतील विजयाचा विचार करण्याची संस्कृती शिवसेनेत रुजायला हवी, तरच  यशाचे मनोरे सर्वत्र उभारले जाऊ शकतील. दिल्लीत खासदार कामाचे काय दिवे लावतात याचंही ऑडीट व्हायला हवं. मतदार संघातून आलेल्यांच्या राहण्या-भोजनाची व्यवस्था आणि कोणी तरी तयार करून दिलेल्या निवेदनांवर सह्या करणं म्हणजे खासदारकी नसते. बहुसंख्य आमदारांच्या बाबतीतही हे लागू आहे. आमदार-खासदार जनहिताची कोणती कामं करतात याचा वस्तुनिष्ठ लेखा-जोखा कळण्याची यंत्रणा हवी, पण त्यासंदर्भात ठोस भूमिका मनोहरपंत यांनी कधी घेतल्याचं आठवत नाही. किंबहुना सेनेच्या हितासाठी आणि त्यातून स्वबळ निर्माण होण्यासाठी मनोहरपंतांनी कधी हातात छडी घेतल्याचं दिसलेलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेतल्या ‘कडवट’ सैनिकाला बळ पुरवण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी हात का आखडता घेतात, याचा शोध घेऊन अशा प्रकारांना चाप लावण्याचा प्रयत्न मनोहरपंतांनी आजवर केलेला नाही आणि आता त्यांना अचानक स्वबळाचा साक्षात्कार झालेला आहे.

स्वबळ का नाही याचा अभ्यास करण्याची मनोहरपंतांची भाषा स्पष्टपणा न दाखवता कोणावर तरी खापर फोडणारी आहे. कोणाविषयी तरी आकस ठेवणारी आहे. सेनेचं स्वबळ ही मनोहरपंतांची खंत आहे की, सेनेच्या विद्यमान नेतृत्वावर म्हणजे उद्धव ठाकरे आणि उदयाला येणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्व कौशल्याच्या मर्यादांवर सोडलेले तीर आहेत, असाही खल त्यातून निर्माण झालेला आहे. म्हणूनच ‘मनोहरपंत, तुम्ही ऐसे कैसे ज्ञानी...’ असा प्रश्न कुणाला पडला, तर त्यात गैर काहीच नाही!

(संदर्भ- डॉ. राजीव वाघमारे, नाशिक/ महेश जोशी, औरंगाबाद)

.................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 03 July 2018

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर. अतिशय रोचक आणि समर्पक विवेचन आहे. मनोहरपंतांची परिस्थिती थोडीफार सगळ्याच मराठ्यांची होत आली आहे. मराठा गडी शिलंगणाला मोठ्या आवेशात घोड्यासारखा फुरफुरंत असतो. पण दिवाळीला हिशोबात थंडा पडतो. कोणीतरी म्हंटलंय की मराठे युद्धांत जिंकंत, पण तहांत हरंत. याला अपवाद फक्त शिवाजीमहाराजांचा. आजच्या विजयाची उत्तुंग भरारी ही उद्याच्या संघर्षाची पहिली पायरी आहे, हा विचार महाराजांनी कधीच नजरेआड केला नाही. असो. तर, आता शिवसेनेस काय करावं लागेल? माझ्या मते संघ व भाजप हे जसं श्रमविभाजन आहे तसं शिवसेनेत सुरू करावं लागेल. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण असं सूत्रं घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना चालवली. त्यात सत्ताकारणास मर्यादित वाव होता. कारण की २०% राजकारण करून कोणीही सत्तेच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही. पण आता तर सत्ता हातात घ्यायचीये. तीही स्वबळावर. मग यासाठी वैचारिक सुस्पष्टतेसोबत पद्धतशीर प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून हे श्रमविभाजन आवश्यक पडतं. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......