अजूनकाही
सत्ता ही अशी एकच गोष्ट निर्विवाद प्रभावी असते, जिचा मोह भल्या-भल्यांना सुटत नाही. निरामय, नि:संग जगणारेही तसा आभास निर्माण करत या देवीची आराधना करतात. मग प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेत अंगाला तेल लावून शड्डू ठोकणाऱ्यांची काय व्यथा? सत्तेचा महिमा सर्वज्ञात आहेच, पण त्या जोडीला मोह जडला की, चराचर सृष्टीच्या, व्यवस्थेच्या सर्वांगातून अनिर्बंध स्पर्धेचे विषाणू थैमान घालायला लागतात.
मानसिक पातळीवर प्रगल्भ असलेल्या खऱ्या योग्यांसाठी मोह ही माया असते, तर सत्तेचा मोह जडणे हा विनाश असतो. पण हल्ली ‘येनकेनप्रकारेण’ सत्ता साध्य करणे हाच मुळी योगसाधनेचा मार्ग ठरला आहे. धुतल्या तांदळासारखे कोणीच नसल्याचे अंतस्थपणे ज्ञात असूनही तसा आभास निर्माण करत सर्व सत्ताकांक्षी वारंवार सदाचार, सद्वर्तनाचा उद्घोष करत असतात.
२०१९ च्या महाआखाड्याला आणखी बराच काळ जायचा आहे. तत्पूर्वीच्या घडामोडींकडे पाहताना या सत्ता-मोह सूत्राकडे दुर्लक्ष करणे भाबडेपणा ठरेल. व्यक्ती हा निसर्गत:च जसा समाजशील असतो तसाच तो सत्ताकांक्षी असतो, याचा विसर न पडता या कुस्त्यांकडे पहायला लागेल.
२०१४ साली प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या भाजपला पुन्हा अशाच बहुमताची आस आहे, तर भाजपच्या सत्तारोहणापूर्वी सलग १० वर्षे सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसला २०१९ साली सत्ता मिळवण्याची आस लागलेली आहे. तसा या दोन्ही पक्षांच्या कारभारात फारसा फरक नाही. कारण या दोन्ही पक्षांच्या सत्ताकाळापूर्वी सर्वसामान्य नागरिकांच्या आशा-अपेक्षा आजही तशाच प्रलंबित आहेत.
भाजपसमोर बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मनातील अपेक्षाभंगाची धास्ती आहे तर काँग्रेससमोर या असंतोषाचे प्रकटीकरण न करता आल्याचे वैषम्य आहे. व्यवस्थेतील समस्याविशेषाचे अस्तित्व मान्य करत त्यांच्या निर्मूलनासाठी सुनिश्चित-नियोजित प्रयत्न करावे लागतात, हे मान्य करण्यात दोन्ही पक्षांनी मनाची दारे उघडलेली नाहीत. सबगोलंकारी प्रारूप राबवणारी काँग्रेस आणि मूळ समस्येवरून इतरत्र लक्ष विचलित करणारा भाजप आपल्याला न्याय देऊ शकेल अशी आशा शेतकरी, बेरोजगार अशा विविधांगी भूमिकेत असलेल्या मतदारांना वाटेनाशी झाली आहे. सर्वच स्तरांतील निराशेतून ज्या मतदारांनी गत लोकसभेत भाजपला भरभरून मतदान केले, त्यालाही चार वर्षे झाली आहेत. आणखी आठ महिन्यांनी नव्या सरकार स्थापनेच्या शक्यता आजमावल्या जातील. जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे ‘रिकाम्या हाताला काम’ आणि ‘घामाला दाम’ देण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.
तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रघात असल्याप्रमाणे मूळच्या दृढनिश्चयी, वलयांकित नेत्याच्या प्रतिमेचे वलय ‘लार्जर दॅन लाईफ’ करण्यावरच भर देण्यात आला आहे. अगदी असाच प्रकार गत काही वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीतही झालेला आहे. राजकीय प्रक्रियेत सहभागी घटकांकडून देशाला व्यवहारकुशल, करारी बाणा असलेला नेता मिळाला असल्याचे जाणवणे तसे नवीन नाही. व्यक्तिगत पातळीवर मुत्सद्देगिरी, करारी असलेल्या इंदिरा गांधी काय अथवा जनसामान्यांच्या मनात प्रचंड आशावाद जागवणारे मोदी काय, प्रत्यक्ष जनतेच्या पदरात काय पाडू शकले, हा प्रश्न महत्त्वाचा असतो. प्रवाहपतितांच्या उदात्तीकरणाच्या लाटांतसुद्धा या कुशल नेत्यांनी सर्वसामान्यांच्या जगण्याला काही आकार दिला आहे काय, ही शंका दुर्लक्षित ठेवता येत नाही.
व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा सिद्धीस नेण्यासाठी पणाला लावलेले कौशल्य, क्षमता आणि सत्तासंघर्षात शह-काटशह देताना खेळलेल्या चालींचा मोह क्षणभर आकर्षित करणारा असला तरी हा सर्व खेळ ज्याच्या जोरावर व ज्याच्यासाठी सुरू आहे, त्याच्या जीवनशैलीत चार सुखाचे क्षण आले आहेत काय, हेच अखेरीस निर्णायक ठरत असते.
भावनिक कोलाहलात अडकल्यामुळे व्यवस्थेतील बऱ्या-वाईटाकडे तटस्थपणे पाहू न शकलेला मतदार आता केवळ व्यवस्थेकडेच नाही तर राजकीय प्रक्रियेकडेही सावधपणे पाहायला लागलेला आहे. कसलाही घाम न गाळता प्रक्रियेत सहभागी झाल्यामुळे संबंधितांच्या मालमत्तांत होणारी वाढ हा आता त्याच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय बनत चालला आहे. मतदारांच्या मानसिक अवस्थेत झालेला हा बदल ‘मुकी बिचारी कुणी हाका’ हा दृष्टिकोन बाळगणाऱ्या संबंधितांनी लक्षात घेतला तर बरे!
भारतातील बहुतांशी लोकसंख्या ही तरुण आहे. हा युवा तंत्रज्ञानस्नेही जीवनशैलीमुळे मनोरंजन आणि वास्तव यात तफावत करायला शिकलेला आहे. तो या राजकीय प्रक्रियेकडे स्वत:च्या चष्म्यातूनच पाहतो. प्रादेशिक अस्मितांच्या लाटांवर उभे असलेले इमले किती ढिसाळ असतात, याचीही कल्पना प्रत्येक राज्यातल्या समृद्ध बेटांनी त्याच्या मनाला करून दिलेली आहे. कुठल्या तरी भावनिक आवाहनापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवरील विधायक परिवर्तन महत्त्वाचे असते, हे त्याला पटलेले आहे. काही वर्षांपूर्वी दिल्लीत झालेली फसवणूक त्याला पुन्हा नको आहे. विरोधी पक्षांच्या वर्तनातील गांभीर्याचा अभाव आणि सत्ताधाऱ्यांनी संवेदनशील मुद्यांवर धारण केलेले मौन या दोन्हींकडे अभिनिवेशविरहित समतोल बुद्धीने पाहण्याचे भान त्याला कालौघात आलेले आहे.
त्यामुळे २०१९ च्या कुस्तीत तो काय निर्णय घेतो, हे पाहणे रंजकच नव्हे तर राजकीय प्रक्रियेलाही कलाटणी देणारे ठरेल.
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Wed , 27 June 2018
✔