आज जॉर्ज ऑर्वेलची ११५वी जयंती. जॉर्ज ऑर्वेलची ‘1984’ ही कालातीत राजकीय भाष्य करणारी कादंबरी! सत्तेचा विचार उघड करणारं अद्भुत वास्तव-कथन म्हणजे 1984! १९४८ साली लिहिलेली ही कादंबरी आजच्या घडीलाही तिचे कुठलेही संदर्भ हरवत नाही आणि कालातीत होते. या कादंबरीचा मराठी अनुवाद अशोक पाध्ये यांनी केला असून नुकतीच तिची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या कादंबरीच्या चौथ्या प्रकरणातला हा संपादित अंश... अभिव्यक्तीस्वातंत्र्याची सर्व पातळ्यांवर कशा प्रकारे गळचेपी केली जाते याची साक्ष देणारा...
.............................................................................................................................................
“हं ऽऽऽ!” असे म्हणून विन्स्टनने अजाणताच एक खोल नि:श्वास सोडला. कचेरीतील दैनंदिन कामाची सुरुवात करताना त्याच्याकडून नेहमीच असा नि:श्वास टाकला जाई. हे इतके सहज होत असे की, जवळच्या प्रकाशवाणीच्या धाकाचाही त्याच्यावर परिणाम होत नसे. विन्स्टनने स्पीकराइट यंत्र जवळ ओढले, माउथपीसवरची धूळ फुंकून उडवली आणि आपल्या डोळ्यांवर चष्मा चढवला. स्पीकराइट यंत्राचे वैशिष्ट्य असे होते की, यावर बोलले असता त्यानुसार आपोआप कागदावर मजकूर उमटत जाई. हवेच्या नळीमधून कागदाच्या चार गुंडाळ्या त्याच्या टेबलावर उजव्या हाताला येऊन पडल्या होत्या. त्याने त्या गुंडाळ्या सरळ केल्या व एकत्र टाचून ठेवल्या.
तो जेथे काम करत होता ती जागा अगदी छोटी व बंदिस्त असल्याने तिला क्युबिकल म्हटले जाई. त्या क्युबिकलच्या भिंतींना तीन भोके होती. स्पीकराइट यंत्राच्या उजवीकडील भिंतीतील भोकातून एक हवेची नळी उगवलेली होती. लिहिलेले कागद, चिठ्ठ्या वगैरे त्यातून बाहेर पडत. डावीकडील भिंतीतील भोकातून एक मोठा पाइप बाहेर आला होता. यातून वृत्तपत्रे येऊन क्युबिकलमध्ये पडत असत. बाजूच्याच भिंतीत सहज हात पोहोचेल एवढ्या अंतरावर एक लंबवर्तुळाकृती फट होती. तिच्यावर जाळीचे आच्छादन होते. या फटीचा उपयोग नको असलेले कागद नष्ट करण्यासाठी केला जाई. अशा कित्येक हजार फटी त्या इमारतीमधील भिंतींमधून होत्या. प्रत्येक खोलीतील एकेक फट सोडली, तर साऱ्या व्हरांड्यातून व कॉरिडॉर्सधून दर ठरावीक अंतरावर अशा फटी ठेवलेल्या होत्या. काही कारणामुळे या फटींना ‘मेमरी होल’ असे म्हटले जात होते. एखादे कागदपत्र नष्ट करावयाचे असेल किंवा कोणास जर कागदाचा वाया गेलेला कपटा कुठे पडलेला दिसला, तर तो कागद उचलून जवळच्याच मेमरी होलमध्ये टाकून दिला जाई. ही सवय सर्वांना लागलेली असल्याने प्रत्येकाकडून अशी कृती सहजगत्या व आपोआप केली जाई. फटीत पडलेला कागद गरम हवेच्या झोतात सापडून भिरभिरत पुढे प्रवास करीत एका मोठ्या भट्टीत पडून नष्ट होई. अशा अनेक प्रचंड भट्ट्यांचे कोनाडे इमारतीमध्येच कोठेतरी लपलेले होते.
विन्स्टनने त्या उलगडलेल्या चार गुंडाळ्या वाचल्या. प्रत्येकीत एक-दोन ओळींचीच सूचना होती. शब्दांसाठी संक्षिप्त केलेली अनेक अक्षरे वापरून ती सूचना तयार केलेली होती. त्या सूचना पूर्णपणे न्यूस्पीक भाषेत नसल्या, तरी त्यांत न्यूस्पीकमधील बरेच शब्द वापरलेले होते. मंत्रालयातील अंतर्गत कारभारासाठी अशी संक्षिप्त भाषा वापरलेली होती. त्या सूचना कागदावर अशा उमटलेल्या होत्या :
times 17. 3. 84 bb speech malreported Africa rectify (टाइम्स 17. 3. 84 बीबी भाषणात आफ्रिकेबद्दल चुकीचा वृत्तान्त. दुरुस्त करा.)
times 19. 12. 83 forecasts 3yp4th quarter 83 misprints verify current issue (टाइम्स 19. 12. 83 भविष्यातील अंदाज 3 वायपी 4 था तुकडा. 83 छपाईच्या चुका सध्याचे अंक पाहून पडताळा.)
Times 14. 2. 84 miniplenty malquoted chocoloate rectify (टाइम्स 14. 2. 84 मिनी प्लेन्टीकडून चॉकलेटबद्दल चुकीचा उल्लेख. दुरुस्त करा.)
times 3. 12. 83 reporting bb dayorder doubleplusungood refs unpersons reweite fullwise upsub antefiling (टाइम्स 3. 12. 83 बीबीचा आजची आज्ञा वृत्तान्त अत्यंत वाईट. नको त्या माणसांचे संदर्भ. सर्व वृत्तान्त परत नव्याने लिहून ती फाइल वरती मंजुरीसाठी पाठवा.)
किंचित बरे वाटून विन्स्टनने चौथी सूचना बाजूला ठेवली, कारण ते एक गुंतागुंतीचे आणि जबाबदारीचे काम होते. अन् प्रत्येक वेळी त्याचा आधीच्या कामाशी संबंध येत असे. बाकीच्या तिन्ही सूचनांवरील काम ठरावीक प्रकारचे होते. फक्त दोन नंबरचीच सूचना पाळण्यासाठी अनेक याद्यांतून आकडेवारी तुडवीत जावे लागणार होते.
‘टाइम्सचे’ आधीचे अंक मिळविण्यासाठी विन्स्टनने प्रकाशवाणीच्या पडद्याजवळील नंबराची तबकडी फिरविली. काही मिनिटांतच त्याला हवे असलेले अंक हवेच्या पाइपमधून येऊन त्याच्या पुढ्यात पडले. त्याला ज्या सूचना केल्या गेल्या होत्या त्यानुसार या अंकांतील काही लेख किंवा बातम्या काही कारणानुसार बदलावयास हव्या होत्या, असे ठरवले गेले होते. ‘बदलावयास’ असे म्हणण्यापेक्षा शासकीय भाषेत ‘शुद्ध करावयास’ पाहिजे होत्या. उदाहरणार्थ, १७ मार्चच्या टाइम्सच्या अंकात बिग ब्रदरच्या आदल्या दिवशीच्या भाषणाचा जो वृत्तान्त आला होता, त्यात त्याने असे भाकीत वर्तविले होते की, दक्षिण हिंदुस्थानातील आघाडीवर शांतता असेल आणि युरेशियाकडून लवकरच उत्तर आफ्रिकेवर चढाई केली जाईल. प्रत्यक्षात मात्र युरेशियन हायर कमांडकडून फक्त दक्षिण हिंदुस्थानवरच चढाई केली गेली. उत्तर आफ्रिकेकडे त्यांनी बघितलेसुद्धा नाही. म्हणून बिग ब्रदरच्या भाषणातील एक परिच्छेद अशा रीतीने नव्याने लिहून काढावयास हवा होता की, प्रत्यक्षात घडलेल्या घटनांचे जणू त्याने आधीच अचूक भाकीत केले होते. असाच प्रकार १९ डिसेंबरच्या टाइम्सच्या अंकाबाबत होता. १९८३च्या शेवटच्या तीन महिन्यांत विविध नित्योपयोगी वस्तूंचा किती खप होऊ शकेल, याचा शासकीय अंदाज दिला होता. हे तीन महिने म्हणजे नवव्या त्रैवार्षिक योजनेच्या काळाचा सहावा भाग होता. मात्र नंतर प्रसिद्ध झालेल्या ‘टाइम्सच्या’ अंकात प्रत्यक्षात किती खप झाला होता, याची आकडेवारी आली होती. त्यावरून प्रत्येक बाबतीत शासकीय अंदाज पूर्णपणे कोलमडले असल्याचे सहज लक्षात येत होते. त्यामुळे आता नवीन आकडेवारीप्रमाणे मागची आकडेवारी सुधारून घेणे, हे विन्स्टनचे काम होते.
तिसऱ्या सूचनेनुसार त्याला एक साधी चूक दुरुस्त करावयाची होती; अन् हे तर केवळ दोन मिनिटांचे काम होते! अगदी नुकतेच म्हणजे आदल्या फेब्रुवारीत मिनिस्ट्री ऑफ प्लेन्टीने एक जाहीर आश्वासन दिले होते. शासकीय भाषेत याला ‘नि:संदिग्ध वचन’ असे म्हटले जाई. या वचनानुसार १९८४मध्ये रेशनवरील चॉकलेटमध्ये कसलीही कपात केली जाणार नव्हती अन् प्रत्यक्षात त्या आठवड्याच्या शेवटी रेशनवरील चॉकलेटचे प्रमाण ३० ग्रॅमवरून २२ ग्रॅमवर येणार होते, हे विन्स्टनला माहिती होते. म्हणून आता फक्त मूळ वजनाऐवजी ‘एप्रिलमध्ये केव्हातरी चॉकलेटच्या रेशनवरील प्रमाणात कपात करण्याची जरुरी भासण्याचा संभव आहे,’ असे घातले असते म्हणजे काम झाले असते.
.............................................................................................................................................
या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/160
.............................................................................................................................................
प्रत्येक सूचनेबरहुकूम विन्स्टनने काम केले. स्पीकराइट यंत्रातून निघालेला दुरुस्त्यांचा मजकूर त्याने त्या-त्या टाइम्सच्या अंकांना जोडून ते सारे हवेच्या पाइपामध्ये ढकलून दिले. नंतर त्याने मूळ सूचनांचे कागद आणि त्याने लिहिलेले मुद्दे व टिपणे मेमरी होलमध्ये टाकून दिली. ते तत्काळ आत खेचले जाऊन अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. विन्स्टनची ही नंतरची कृती एवढी चटकन व अजाणता झाली होती की, त्याच्यामध्ये भिनलेल्या सवयीचाच हा परिणाम असावा, असेच एखाद्याला वाटावे.
त्या हवेच्या नळ्यांच्या व पाइपांच्या अदृश्य जाळ्यामध्ये कागद सरकवल्यावर प्रत्यक्षात काय घडते, हे त्याला नीट, तपशीलवार माहीत नव्हते; पण जे होत असावे, ते त्याला ढोबळमानाने ठाऊक होते. आलेल्या सूचनांनुसार त्या-त्या टाइम्सच्या अंकात दुरुस्त्या केल्या, त्या ताडून पाहिल्या आणि दुरुस्ती जोडलेला तो अंक परत पाठवून दिला की, पुढे नवीन दुरुस्तीसह तो अंक परत छापला जाई. जुना अंक नष्ट केला जाऊन त्या जागी नवीन अंकाची प्रत ठेवली जाई. बदलाची ही प्रक्रिया सतत चालू असे. वृत्तपत्रांखेरीज इतर नियतकालिके, पुस्तके, पुस्तिका पत्रिका, पोस्टर्स, चित्रपट, साउंडट्रॅक, व्यंगचित्रे, छायाचित्रे... थोडक्यात, विचार करावयास लावणारे, राजकीय व सैद्धान्तिक मजकूर असलेले कोणतेही वाङ्मय किंवा कागदपत्रे असतील, तर त्या सर्वांच्या बाबतीत बदलाची प्रक्रिया सतत चालूच ठेवली जाई. प्रत्येक दिवशी, अगदी दर मिनिटाला ही क्रिया चालू ठेवून भूतकाळ वर्तमानकाळाशी सुसंगत आणि अद्ययावत ठेवला जाई. त्यामुळे पक्षाने केलेला प्रत्येक अंदाज किंवा भाकीत कसे खरे ठरले आहे, हे कागदोपत्री पुराव्यानिशी सिद्ध करणे सहज जमे. चालू काळाला व क्षणाला विसंगत ठरणारी कोणतीही बातमी व व्यक्त केलेले मत कागदोपत्री ठेवू दिले जात नसे. पक्ष त्याला हवा तसा इतिहास बदले, खरवडून स्वच्छ करे आणि परत नव्याने रचून फिट्ट बसवे. जेव्हा जेव्हा गरज भासली होती, तेव्हा तेव्हा अनेकवार पक्ष असे करत आला होता. एकदा असे केले की, ‘हा इतिहास पूर्वरचित आहे, खोटा आहे.’ असे सिद्ध करणे केवळ अशक्यप्राय होऊन बसे.
विन्स्टन रेकॉर्ड्स खात्याच्या ज्या विभागात काम करत होता त्याच्यापेक्षा शत पटीने मोठ्या असलेल्या याच खात्याचा एक विभाग होता. प्रसिद्ध झालेली सर्व आक्षेपार्ह पुस्तके, वृत्तपत्रे आणि इतर कागदपत्रे गोळा करणे व नष्ट करणे एवढेच त्या विभागातील माणसांचे काम होते. राजकीय युती बदलल्याने, बिग ब्रदरचे अंदाज चुकल्याने टाइम्सचा एखादा अंक बारा-बारा वेळा बदलला जाई. बदललेला ताजा अंक मूळच्या जुन्या तारखेसह फायलीत ठेवला जाई. ‘हा अंक खोटा आहे’ असे म्हणण्यासाठी दुसरी वेगळी प्रत कोठेही अस्तित्वातच राहू दिली जात नसे. पुस्तकेसुद्धा पुन्हा पुन्हा मागवून घेऊन नव्याने लिहिली जात असत व प्रसिद्ध करताना त्यात कोठेही पूर्वीच्या मजकुरात केलेल्या बदलाचा अजिबात उल्लेख नसे. फार काय, विन्स्टन ज्या सूचनांप्रमाणे काम करून नंतर त्या ताबडतोब जाळून नष्ट करीत होता, त्या सूचनांमध्ये कोठेही ‘खोटा मजकूर तयार करा.’ अशा अर्थाचे शब्द नव्हते. ‘मजकुरात अनवधानाने झालेल्या चुका’, ‘मुद्रणदोष’ किंवा ‘चुकीचे उद्गार’ असा उल्लेख करूनच संदर्भ दिला जाई! म्हणून ‘या चुका दुरुस्त कराव्यात’ अशा आशयाच्या त्या सूचना असत.
मिनिस्ट्री ऑफ प्लेन्टीची आकडेवारी दुरुस्त करताना विन्स्टनला वाटले, ‘हा सारा प्रकार ‘खोटा दस्तऐवज निर्माण करणे’ या प्रकारातही मोडत नाही. एका कागदाच्या जागी दुसरा मूर्खपणाने भरलेला कागद ठेवणे, असा हा प्रकार आहे.’ बहुतेक सर्व मजकुराचा वास्तव जगाशी कोठेच संबंध उरला नव्हता. फार काय, जे असत्य खपवायचे होते, त्याच्याशीही या मजकुराचा कोठेच थेट संबंध राहत नव्हता. आकडेवारी मूळ मजकुरात असू दे, नाहीतर सुधारित मजकुरात असू दे, ती नेहमीच ‘अद्भुत’ प्रकारात मोडत होती. नवीन आकडेवारीचा मजकूर तयार करण्यासाठी बराच वेळ विचार करावा लागे. उदाहरणार्थ, मिनिस्ट्री ऑफ प्लेन्टीने तीन महिन्यांत बुटांच्या जोड्यांचे उत्पादन अंदाजे १४ कोटी ५० लाख इतके होईल, असे भाकित वर्तविले होते, परंतु प्रत्यक्षात ६ कोटी २० लाख बूटजोड्या तयार झाल्या; तथापि, विन्स्टनने अंदाज परत लिहून काढताना ५ कोटी ७० लाख एवढा आकडा लिहिला. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्तच उत्पादन केले असे म्हणावयास त्याने मुद्दामच वाव ठेवला. आता ६ कोटी २० लाख हा आकडाच मुळात खरा नव्हता. तेव्हा तो ५ कोटी ७० लाखांपेक्षा किंवा १४ कोटी ५० लाखांपेक्षा किती खरा होता, याबद्दल प्रश्नच येत नव्हता. मुळात बूटजोड्या अजिबातच तयार केल्या गेल्या नव्हत्या, हेच सत्य असण्याचा संभव अधिक होता. त्यापेक्षाही बहुतेकांना सत्य काय होते, ते माहीत असण्याची अजिबात शक्यता नव्हती व बाकीच्यांना त्यात रस वाटत नव्हता. ओशियानियाची निम्मी लोकसंख्या अनवाणी असताना त्यातून काही कळले असते, तर एकच की, दर तीन महिन्यांनी कागदावर बुटांचे भरमसाठ उत्पादन होत होते. कागदोपत्री नोंद झालेली कोणतीही छोटी किंवा मोठी बाब असू दे; तिच्यातील सत्यता अशाच प्रकारची होती. प्रत्येक गोष्ट अशी आभासमय जगात विरून जात होती. अखेर तारीख व वर्षही अनिश्चित होऊन जात होते.
विन्स्टनने हॉलमध्ये पाहिले. पलीकडच्या भिंतीलगत असलेल्या क्युबिकलमध्ये एक लहान, रेखीव चेहऱ्याचा, हनुवटीवर काळे केस ठेवलेला असा माणूस काम करीत होता. तो टिलॉटसन होता. मांडीवर एक घडी केलेले वृत्तपत्र ठेवून स्पीकराइट यंत्राच्या माउथपीसेसमध्ये अगदी तोंड घालून तो बोलत होता. तो जे काही बोलत होता ती फक्त प्रकाशवाणी व तो यांच्यातील एक गुप्त बाब होती, असा भास तो निर्माण करीत होता. त्याने वर पाहिले अन् त्याच्या चष्म्यातून विन्स्टनच्या दिशेने एक नापसंतीचा प्रकाश चमकून गेला.
विन्स्टनला टिलॉटसनबद्दल फारशी माहिती नव्हती व तो नक्की काय काम करत असे, हेही माहीत नव्हते. रेकॉर्ड्स खात्यातील माणसे आपल्या कामाबद्दल सहसा कधी बोलत नसत. त्या लांबलचक व बिनखिडक्यांच्या हॉलमध्ये कागदांची सळसळ व अनेकांच्या बोलण्याचा घुमणारा आवाज फक्त ऐकू येत असे. त्यातील डझनावारी माणसांना फक्त रोज कामासाठी लगबगीने जाता-येताना व दोन मिनिटांच्या तिरस्कार-प्रदर्शनाच्या वेळी आपल्या भावना प्रदर्शित करताना विन्स्टन पाहत असे; पण तरीही त्यांची नावे त्याला ठाऊक नव्हती. त्याच्या शेजारच्याच क्युबिकलमध्ये एक रूपेरी केसांची लहान बाई दिवसभर राबत असे. जी माणसे ‘अंतर्धान’ पावली असल्याने अस्तित्वात नव्हती असे ठरले होते, त्यांची नावे शोधून काढणे आणि ती वृत्तपत्रांतून उखडून टाकणे, हे तिचे काम होते. एक प्रकारे ती या कामासाठी योग्यच होती. कारण दोन-एक वर्षांपूर्वी खुद्द तिचा नवराच असा ‘अंतर्धान’ पावला होता.
आणखी काही क्युबिकल्सनंतर एक अत्यंत शेळपट, नेहमी तंद्रीत असणारा व कानावर भरपूर केस असलेला प्राणी काम करीत होता. त्याचे नाव अॅम्पलफोर्थ होते. त्याच्याजवळ काव्यातील वृत्त व छंद यांचे उत्तम ज्ञान होते. तात्त्विकदृष्ट्या ज्या कविता, गाणी वगैरे आक्षेपार्ह असतील, पण तरीही ज्या काव्यसंग्रहांत काही कारणाने ती समाविष्ट करावी लागत असतील, त्यांचा विपर्यास करून तसेच नवीन काव्य (ते याला ‘अंतिम साहित्य’ असे म्हणत) निर्माण करण्याचे काम तो करीत असे. या हॉलमधील अशी एकूण पन्नास माणसे म्हणजे एका विभागाचा उपविभाग होता. रेकॉर्ड्स खात्याच्या एकूण अवाढव्य व गुंतागुंतीच्या व्यापाच्या मानाने हा उपविभाग फारच लहान होता.
या हॉलच्या खाली व वरती अनेक मजल्यांवर माणसांचे ताफेच्या ताफे कल्पनाही करता येणार नाही असली शेकडो कामे करीत होते. यांत अवाढव्य छापखाने होते, अनेक उपसंपादक होते, टायपोग्राफीतील तज्ज्ञ होते, मजकुरांची छायाचित्रे घेण्यासाठी खास स्टुडिओ होते, प्रकाशवाणीच्या कार्यक्रमांचे तज्ज्ञ होते, या कार्यक्रमांसाठी कामे करणारी तंत्रज्ञ मंडळी होती, निर्माते होते, अभिनयपटू होते; पण त्यातही विशेषत: दुसऱ्याच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणारे लोक जास्त होते. त्या इमारतीत संदर्भ शोधण्यासाठी खास कारकुनांची फौज होती. जी पुस्तके व नियतकालिके मागे घ्यायची असत त्यांची यादी करणे, एवढेच त्यांचे काम होते. तिजोरीसारख्या सुरक्षित व भक्कम अशा हजारो जागा होत्या. त्यांत बदल केलेल्या प्रती जपून ठेवल्या जात. तशाच काही लपविलेल्या भट्ट्याही होत्या. त्यांत मूळ प्रतींचा नाश होत राही; अन् तिथेच कुठेतरी या सर्वांवर नियंत्रण ठेवणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या व एकूण सर्व कामात सुसूत्रता राखणाऱ्या अधिकारी व्यक्ती होत्या. त्या धोरणात्मक निर्णय घेऊन भूतकाळाचा कोणता भाग जसाच्या तसा ठेवायचा, कोणता बदलून टाकायचा व कोणता पूर्णपणे नष्ट करायचा हे ठरवीत असत.
खुद्द रेकॉर्ड्स खाते ही मिनिस्ट्री ऑफ ट्रूथची फक्त एक शाखा होती. या मंत्रालयाचे प्रमुख काम केवळ भूतकाळ दुरुस्त करणे नव्हते; तर ओशियानियाच्या नागरिकांना वृत्तपत्रे, चित्रपट, क्रमिक पुस्तके, प्रकाशवाणीवरील कार्यक्रम, नाटके, कादंबऱ्या वगैरे सतत पुरविणे हे होते.
थोडक्यात, पुतळ्यापासून घोषवाक्यापर्यंत, बालगीतापासून जीवशास्त्राच्या एखाद्या प्रबंधापर्यंत आणि लहान मुलांच्या मुळाक्षरांच्या पुस्तकापासून न्यूस्पीक भाषेच्या शब्दकोशापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती, सूचना किंवा मनोरंजनपर साहित्य पक्षाची तत्त्वप्रणाली पटवण्यासाठी निर्माण करून प्रसृत केले जात असे. तसेच या मंत्रालयावर केवळ पक्षाच्या विविध प्रकारच्या मागण्या पुरवण्याचीच जबाबदारी नव्हती, तर याच साऱ्या साहित्याची मजूर वर्गाच्या स्तरानुसार पुनर्निमिती करण्याचीही जबाबदारी होती. मजूर वर्गासाठी वेगळी, समांतर यंत्रणा काम करीत होती. सर्वसाधारणपणे ही यंत्रणा साहित्य, संगीत, नाट्य व मनोरंजनात्मक कामे हाताळत होती. त्यांच्याकडून उथळ स्वरूपाची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत. त्यात मुख्यत्वेकरून खेळ, गुन्हे, भविष्य, खळबळजनक मजकूर असलेल्या छोट्या कांदबऱ्या, अश्लील चित्रपटांची परीक्षणे आणि भावना उद्दीपित करणारी गाणी एवढाच मजकूर असे. ही गाणी एखाद्या शोभादर्शक यंत्राप्रमाणे (कॅलिडेस्कोप) असलेल्या काव्यनिर्मिती यंत्रावर यांत्रिकपणे निर्माण केली जात. या यंत्राचे नाव ‘व्हर्सीफिकेटर’ असे होते. अश्लील वाङ्मय निर्माण करणारा एक मोठा उपविभाग होता. त्याला न्यूस्पीक भाषेत ‘Pornosec’ (पॉर्नोसेक) म्हणत. अत्यंत खालच्या पातळीवर तयार केलेले हे अश्लील वाङ्मय सील केलेल्या पिशव्यांतून पाठविले जाई. निर्माण करणाऱ्यांखेरीज कोठल्याही पक्षसभासदाला त्याकडे चुकूनही पाहण्यास परवानगी नव्हती.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment