अंबाजोगाई साहित्य संमेलन ही अंबाजोगाईची सांस्कृतिक ओळख आहे!
पडघम - साहित्यिक
गणपत व्यास
  • आठवे अंबाजोगाई साहित्य संमेलन
  • Sat , 23 June 2018
  • पडघम साहित्यिक आठवे अंबाजोगाई साहित्य संमेलन

२३ व २४ जून रोजी आठवे अंबाजोगाई साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष गणपत व्यास यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

अंबाजोगाई या शहराला मोठी साहित्यिक परंपरा व वारसा लाभला आहे. मराठीचे आद्यकवी संत श्री मुकुंदराज स्वामींचे ‘विवेकसिंधू’ व ‘परमामृत’ हे ग्रंथ गुरु-शिष्यांचा आदर्श संवाद व सामान्य माणसालाही चिंतन करायला लावणारे ग्रंथ आहेत. तसेच मराठी, हिंदी, तेलगू व कानडी भाषेत विपुल साहित्यसंपदा, ज्यात ‘पासोडी’, ‘ग्रंथराज’, ‘गीतार्णव’, ‘पदार्णव’ यांसारख्या ग्रंथांसोबत भारुडे, गवळण, वासुदेव, पिंगळा अशा लोकसाहित्याचा समावेश असलेली साहित्यनिर्मिती करणारे नवकोट नारायण, सर्वज्ञ संत श्री दासोपंत स्वामींचा वारसा या शहराला लाभला आहे. त्यांचे संगीत व साहित्य याचा नव्याने अभ्यास करावा लागेल. अभ्यासू साहित्यिकांची हे साहित्य वाट पाहत आहे. प्रा. रा. द. अरगडे सरांनी ‘ग्रंथराज’ या ग्रंथावर एक अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित केला आहे. दासोपंत संशोधन मंडळाच्या वतीने काही काम होईल अशी अपेक्षा आहे. डॉ. सौ. वैशाली गोस्वामी, उदय दीक्षित हे या दृष्टीने कार्यरत आहेतच.

१९६० साली या शहरात रामकाका मुकद्दम, अ‍ॅड. रा. स. देशपांडे, श्री. दि. इनामदार, व वि.भा.पाठक यांचा पहिला प्रातिनिधिक काव्यसंग्रह ‘चंद्र लपे पापणीत’ हा प्रसिद्ध झाला. याच दरम्यान रा. ज. संदीकर यांचा ‘शिवपूजन’ हा बालगीतांचा संग्रह प्रकाशित झाला. कविता आणि बालगीतांनी अंबाजोगाईची आधुनिक परंपरा सुरू होते.

अंबाजोगाईला देशपातळीवर साहित्यिक ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी सर यांनी ‘संपल्या सुरावटी’, ‘देवगिरी बिलावल’, ‘बेगम समरु’, ‘गुरूदेव’ या कांदबऱ्या तर ‘काया-परकाया’, ‘प्रज्ञा-पार्वती’, ‘मौनातील समाधी’, ‘आस्वाद तरंग’ इत्यादी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ‘बिढार’ या भालचंद्र नेमाडेंच्या पुस्तकाचा मराठीतून हिंदी, ‘निशिगंधा’ या कादंबरीचे इंग्रजीतून मराठी अनुवाद केलेले आहे. त्यांना राज्य व केंद्र शाससनाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

अण्णा तथा रा .द. अरगडे सरांनी ‘घट डोईवर घट कमरेवर’, ‘अग्निकन्या’, ‘राया’, ‘मला दिल्लीला घेऊन चला’, ‘प्रेम आंधळ असतं’, आणि ‘बायको पीएच.डी. होते’ अशी पाच नाटकं लिहिली. दासोपंतांच्या ‘ग्रंथराज’ या ग्रंथाचा भावानुवाद केला आणि ‘अक्षरपूजा’ हा वैचारिक लेखसंग्रह प्रकाशित केला आहे.

डॉ. सौ. शैला लोहिया भाभींचा ही मोठा सहभाग साहित्य लेखनात आहे. त्याचा उल्लेख करणे माझे कर्तव्य आहे. ‘भूमी व स्त्री’ (लोकसाहित्य), ‘स्वरांत’, ‘तिच्या डायरीतील पाने’ व ‘कथालिका’ हे कथासंग्रह तर ‘गजाआडच्या कविता’ हा काव्यसंग्रह, ‘देश परदेश’ हे प्रवासवर्णन तर ‘वाहत्या वाऱ्यासंगे’, ‘मन तरंग’, ‘रुणझुणत्या पाखरा’ हे ललितसाहित्य तसेच त्यांनी बाल कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. ‘इत्ता इत्ता पाणी’, ‘सातरंग सात सूर’ व ‘बाबाचा परसाद’ तसेच प्रौढ साक्षरासाठीही त्यांचे लेखन आहे. त्यात ‘जगावेगळा संस्कार’, ‘सुखाची वाट’, ‘मी स्वयंसिद्धा’ या पुस्तकांचा समावेश आहे.

माझे मित्रवर्य बलभिम तरकसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवत अनेक पुस्तके लिहून साहित्यसेवा व विचारसेवा केली आहे. त्यांनी अनेक कवितासंग्रह व नाटकं लिहिली. त्यापैकी ‘तरंगिणी’, ‘प्रतिशोध’, ‘सुगंध मातीचा’, ‘नामांतर’ असे गाजले, ‘भीम गीतांजली’ असे कवितासंग्रह तर ‘हिसाब’, ‘स्वातंत्र्य मिळालंय म्हणं’, ‘कथा घुंगराची’ ही नाटकं प्रसिद्ध आहेत.

पाचव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. डॉ. संतोष मुळावकर यांचा आणि माझा अत्यंत जवळचा संबंध होता. पहिल्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या वेळी मुळावकर सर अंबाजोगाई मसाप शाखेचे अध्यक्ष तर मी सचिव होतो. अत्यंत विनोदी आणि तितकेच संवेदनशील असलेले मुळावकर सर यांचीही ग्रंथसंपदा बरीच मोठी आहे. त्यात ‘तिबक सिक्सर’, ‘पुष्पाचं लफडं’, ‘एन्क्रोचमेंट’, ‘धुळवंड’ हे विनोदी कथासंग्रह, स्पीड ब्रेकर ही विनोदी कादंबरी, मोराचे पिस, येथे पाहुणे मिळतात, घरातल्या घरात, या एकांकीका, ‘पिठातलं मीठ’ हे दोन अंकी नाटक, ‘तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी’, ‘निरुपण’ हे ललितसाहित्य तर ‘विमल विचार’, ‘कथानुयोग’, ‘मराठी जैन कथासंग्रह’, ‘आमचे उच्च शिक्षण-आमच्या अपेक्षा’ हे संपादन प्रसिद्ध आहे.

डॉ. श्रीहरी नागरगोजे पहिल्या व दुसऱ्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. सहाव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले. ते एक उत्तम शल्य चिकित्सक व प्रशासक आहेत. ग्रामीण व शहरी समृद्ध जीवनानुभव लाभलेले नागरगोजे सर यांनी लिहिलेले ‘श्री’ हे आत्मचरित्र वाचनीय आहे.

सातव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा स्व. सौ. मंदाताई देशमुख, सरळ, सालस, संवेदनशील असे हे अंबाजोगाईतील महिला साहित्यीक व्यक्तिमत्त्व. प्रचंड वाचन, अभ्यास, चिंतन. सामाजिक जाणिवांची उत्कट भावना त्यांच्या चिंतन लेखनातून दिसून येते. पुढचं पाऊल व नक्षलविश्वाची गौंडराणी या कादंबऱ्या त्यांच्या हातून लिहील्या गेल्या. काही काळ अंबाजोगाई मसाप शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या. त्या काळात महिला साहित्य संमेलन झाले.

अंबाजोगाई शहराची आणखी एक ओळख म्हणजे रामकाका मुकद्दम. साहित्य, संगीत, राजकारण, समाजकारण, नाटक अशा विविध क्षेत्रात मुक्त संचार करणारे हरहुन्नरी कलंदर, पण तरल संवेदना असूनही निर्भीडपणे आपले विचार व्यक्त करणारे, लहानांसाठी लहान तर मोठ्यांसाठी मोठे असलेले स्वातंत्र्यसैनिक रामकाका यांची आज प्रकर्षाने आठवण येते. ‘बेहोश चालताना’ हा एकच कवितासंग्रह प्रकाशित असला तरी त्यातील वेदना आणि सौंदर्य याचा अजोड मिलाप दिसतो. रामकाका राज्य व देशपातळीवर अनेक खाजगी व शासकीय संस्थांवर कलावंतांचे प्रतिनिधित्व  करत होते. ‘कलासंगम’ ही अंबाजोगाई येथील सर्वांत जुनी संगीत नाट्य कलेचा अविष्कार करणारी संस्था, त्यात रामकाकांचा मोलाचा सहभाग होता.

डॉ. लक्ष्मणराव काळेगावकर यांनी ‘मनोहर अंबानगरी’ हे अंबाजोगाईचे भौगोलिक, ऐतिहासिक दर्शन घडवणारे पुस्तक प्रकाशित केले. त्यांचा ‘रोग निवारण शास्त्र’ हा वैद्यकीय तर ‘योगेश्वरी महात्म्य दर्शन’ हा ग्रंथही त्यांच्या नावावर आहे. 

माझे मित्र अमर हबीब यांची ‘नाते’ व ‘कलमा’ ही समाज दर्शन घडवणारी पुस्तकं आहेत. मुक्त पत्रकारिता व शेतकरी स्वातंत्र्याचा लढा उभारणं हे त्यांचे प्रमुख काम. त्यांनी लिहिलेले ‘डंकेल प्रस्ताव’, ‘संवाद’, ‘आकलन’, ‘जनमन’ हे लेखसंग्रह. शेतकरी समस्यांची उकल करण्यासाठी केलेली लेखसंपदा भूषण वाटावी अशी आहे. त्यांनी अनेक पुस्तकांची संपादनं केली आहेत. पाठ्यपुस्तक मंडळाच्या बालभारतीच्या संपादक मंडळावरही त्यांनी काम केलं आहे.

डॉ. अरविंद देशपांडे यांनी ‘द टेक्स बुक ऑफ माय लाईफ’ हे आत्मचरित्र इंग्रजीतून लिहिलं आहे. याच बरोबर ‘ट्यूबर क्युलॉसिस चान्सेस अ‍ॅण्ड चॅलेंजेस’ व ‘क्षयरोग नियंत्रण पत्रिका’ ही वैद्यकिय माहितीची पुस्तके प्रकाशित आहेत.

प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे ‘दलित वेदनांचा जळजळता निखारा’, ‘मोरपंखी’ या काव्यसंग्रहातून व राज्यभर होणाऱ्या कविसंमेलनातून विचार पेरत आहे. याशिवाय विद्याधर पांडे यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. समीक्षात्मक लेखन करणारे प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, कवी वराट गुरुजी, सोनियाचा पिंपळकार दिनकर जोशी, प्रा. गौतम गायकवाड, दगडू लोमटे, डॉ. विजया इंगोले, शितल बोधले, निशा चौसाळकर, प्रा. डॉ. अलका तडकलकर, प्रज्ञा अपेगावकर, वैशाली गोस्वामी, संपदा कुलकर्णी, प्रा. भगवान शिंदे, प्रा. विष्णु कावळे, प्रा. संजय खाडप, प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे, प्रा. रवी पाठक, भागवत मसने, रणजित डांगे, मंगल व्यास, अमृत महाजन, नामदेव गुंडाळे असे अनेक साहित्यिक अंबाजोगाई शहराने दिले. त्यात कै. प्रा. हरिहर मातेकर, रामकृष्ण डिघोळकर गुरुजी व प्रा. मधुकर इंगोले सरांचा उल्लेख करणे मी माझे कर्तव्य समजतो.

एक धडपडता कार्यकर्ता, उत्कृष्ट संयोजक व अनुराग पुस्तकालयाचे ग्रंथ वितरक अभिजीत जोंधळे यांना त्यांचे वडील स्व.अरविंद जोंधळे यांच्याकडून ग्रंथ-वारसा लाभलेला आहे. त्यांचे संस्कार आणि अभिजीतची वाचन चळवळ यातून अंबाजोगाई परिसरातील २० शाळांना पुस्तक पेटीचा लाभ मिळतो. ‘शब्दोत्सव’ हा त्यांचा दिवाळी अंक सतत १४ वर्षापासून प्रतिवर्षी अंबाजोगाईकरांना वाचायला मिळतो. आजवर महाराष्ट्रातील उत्कृष्ट ३५ प्रकल्पांची माहिती शब्दोत्सवनं दिली. मी त्याच्या या अमूल्य कार्यास भरभरून शुभेच्छा देतो.

या गावाला शिल्प-कलेचाही मोठा वारसा लागलेला आहे. येथील बाराखांबी, खोलेश्वर मंदिर, चौभारा गणेश मंदिर, उत्तरेश्वर मंदिर ही उत्कृष्ट वास्तुकलेची उदाहरणं हत्तीखाना व परिसरात अप्रतिम प्राचीन लेण्या तसेच अंबाजोगाई परिसरात अनेक शिलालेख व भग्नावस्थेतील सुंदर कोरीव-कातीव मूर्त्या सापडतात. हा तत्कालीन शिल्प व वास्तुकलेचा ठेवा या शहरास लाभला आहे.

योगेश्वरी नूतन विद्यालयातील शिक्षक श्री.गणेश कदम यांनी नुकताच सावित्रीबाई फुलेंचा अर्धाकृती पुतळा तयार केला असून गोदावरीबाई कुंकुलोळ योगेश्वरी कन्या शाळेत त्याचे अनावरण करण्यात आले आहे. मानवलोक मध्ये कला शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. तेथे काकडे व अन्य कलावंत कलेची साधना करतात.

त्र्यंबकराव वसेकर, बुरांडे गुरुजी, दिलिप बडे, सोनकांबळे गुरुजी यांनी काढलेली तैलचित्रे आजही अंबानगरीचे वैभव वाढवतात. तर त्र्यंबक पोखरकर हे अफलातून चित्रकार गव्हाच्या काड्या जाळून त्यांला मिळणाऱ्या विविध रंगछटांचा वापर करून कोलाज-चित्रे काढतात. त्याला जगभर प्रसिद्धी मिळाली आहे. दिलीप बडे यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात केलेले काम अंबाजोगाईचा नावलौकिक वाढवणारे आहे. या शिवाय विद्याधर पंडित या कलावंतानेही या क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे.

याशिवाय या शहरात वर्षाचे ३६५ दिवस कुठल्यानं कुठल्या साहित्यिक, समाजसेवी, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांकडून विविध कार्यक्रम राबवले जातात. त्यातील माझ्या माहिती व स्मरणात असलेल्या काही संस्थांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. त्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ताई महोत्सव, बालझुंबड, नरहर कुरुंदकर स्मृती संस्थान, मानवलोक, मनस्वीनी महिला प्रकल्प, रोटरी क्लब, आंतरभारती-अंबाजोगाई, आई प्रतिष्ठान, दीनदयाळ बँक व्याख्यानमाला, कीर्तन महोत्सव, स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला, जमाते इस्लामी, दासोपंत संशोधन मंडळ, प्रा. माधव मोरे प्रतिष्ठान यांच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच आम्ही अंबाजोगाईकर, मानवलोक, हेल्पिंग हँड, हेमंत राजमाने सेवाभावी संस्था यासारख्या अनेक समाजिक संस्थेच्या माध्यमातून शहराच्या विविध समस्या सोडवण्यासाठी उपक्रम राबवले जातात.

एक खंत वाटते. अंबाजोगाई गावात प्रथितयश नवोदित असे शेकडो साहित्यिक, कवी, कथाकार आहेत, पण बालसाहित्य का कुणास ठाऊक उपेक्षित राहिले आहे. वास्तविक मोठ्यांच्या कथा, कादंबऱ्या, चरित्र, नाटक, ललित साहित्य, काव्य हे वाचण्यासाठी बालवाचक निर्माण करणे ही साहित्यिकांची जबाबदारी आहे. बिचारे बालक स्वत: आवडीप्रमाणे व इच्छेनुसार पुस्तक खरेदी करू शकत नाहीत आणि मोठी माणसं त्यांच्यासाठी अवांतर अफाट खर्च करतील, त्यांचे लाड पुरवतील, पण बालसाहित्याची पुस्तके आवर्जून घेणार नाहीत. वाचन उत्तेजन व ग्रंथप्रेम इत्यादी गोष्टी फक्त भाषणातून व विचारवंतांच्या लेखनातूनच समोर येतात. सर्व पालक व साहित्यिकांना बालसाहित्याकडे प्राध्यान्यक्रमाने लक्ष देण्याची विनंती यावेळी मी करतो. आपल्या शहराचा विचार करता माझ्यासह स्व.संतुकराव भोकरे यांच्या बालकविता, स्व.डॉ.शैलाताई लोहिया यांच्या तीन बालकादंबऱ्या, सौ.अनुराधा भोकरे यांचे दोन बालगीत संग्रह, श्री. अमर हबीब यांची ‘खरी कमाई’ हे पुस्तक, वि.र.जोशी यांच्या ‘कथा रामानंदाच्या’ हे पुस्तक व प्रा.डॉ.अलका तडकलकर यांचा ‘सदाचार’ हा बालकथासंग्रह हे एवढेच बालसाहित्य प्रकाशित आहे.

बालसाहित्याची निर्मिती करण्यासाठी लेखकाला बालक व्हावं लागतं. स्वत:चं मोठेपण विसरून जावं लागतं. बालविश्वात रमण्याचे कौशल्य अंगी बाणवून त्यात एकरूप व्हावं लागतं. भविष्यात बालसाहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल आणि चिमुकल्यांची टी.व्ही, मोबाईलपासून थोडीशी सुटका होईल. नैतिकतेचं बोधामृत बालपणापासूनच मिळेल व आजची समाज व्यवस्था व अवस्था परिवर्तीत होईल अशी अपेक्षा करतो.

साहित्य म्हणजे काय असतं? माझ्या अकलनाप्रमाणे झुळझुळणारा झरा, खळखळणारी नदी, गडगडणारे मेघ, सूर्योदयाच्या लाल तांबुस सोनेरी छटांनी तरुशिखरांची अविस्मरणीय देखणी छबी लेखणीतून उतरतानांच, गांजलेले, शोषित, अर्धपोटी किंवा उपाशी जी माणसं आपल्या अवतीभवती लाजिरवाणे जीणे जगतात त्यांचा हुंकार-उद्रेक-विद्रोह-अकांत आणि ज्वालामुखीचे दर्शन ज्या लेखणीतून गर्भश्रीमंतांचे पहाड गदगदून हलवलं आणि त्यांचे हृदय परिवर्तीत होऊन समता व शोषणमुक्त, भेदमुक्त, जात-धर्म-पंथ-रंग-प्रांत हे सर्व वाद मिटतील तेच वास्तववादी साहित्य आहे.

गेल्या काही दशकापासून देशात व आपल्या राज्यात एका अस्वस्थतेचं वातावरण आहे. पण सुदैवानं आपल्या गावातील साहित्याला समता व बंधुतेचा सूर गवसलेला आहे. वाट कठीण आहे, अडथळ्याच्या उतरंडीच्या उतरंडी या वाटेवर आहेत. पण मला खात्री आहे, साहित्याची ही दिंडी समतेचे मंदिर निश्चित गाठेल. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, विठ्ठलराव अरक, डॉ. द्वारकादास लोहिया, डॉ. सुरेश खुरसाळे, प्रा.माधव मोरे, प्रा.एस.के.जोगदंड यांसारख्या मंडळींनी ही वाट घालून दिली आहे.

मराठी आपली मातृभाषा. आपण बोलतो मराठी-लिहितो मराठी-मराठी सरकार निवडतो-मराठी भाषिकांचे. सरकारची भाषा मराठी इतकं सारं असूनही मराठीचा झेंडा त्रिखंडात मिरवत असतानाही, हजारो मराठी प्राथमिक शाळा बंद केल्या जात आहेत आणि दरवर्षी शेकडो, हजारो इंग्रजी माध्यमांच्या शाळा अगदी खेडोपाडी, तांड्यावर पेरल्या जात आहेत. ज्या शाळांमधून पालकांचं कंबरडं मोडावं एवढी फस वसूल केली जाते. त्या शाळांकडे पालकांचा ओढा, त्यांची मानसिकता बदलून निर्माण केला जातो आणि मराठी भाषेच्या आपल्या गावरान मुलं मातीच्या शाळांकडे दुय्यम दर्जानं दीनवाणं बघताहेत. मग मराठी भाषेच काय? जगातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिलं पाहिजे तरच माणूस घडणं-घडवणं शक्य आहे असं सांगतात. आपण मात्र आपली मुलं, नातवंड इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतो. याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.

या शहराने १९८३ ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, १९८५ ला अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अखिल भारतीय ध्रुपद धमार संगित संमेलन, २००५ ला मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन, २०१५ला मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन, २०१८ ला मराठवाडा साहित्य संमेलन, २०१८लाच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, शाखा अंबाजोगाईच्या वतीने संपन्न झालेलं जिल्हा बालकुमार साहित्य संमेलन अनुभवलेलं आहे. अंबाजोगाईनं सातत्यानं मराठी भाषेची सेवा केली आहे. या भाषेचं संवर्धन व्हावं म्हणून सदैव पुढाकार घेतला आहे. म्हणून अंबाजोगाईला मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं ही मागणी मला रास्त वाटते.

आठव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची माहेरवाशीणही संकल्पना आहे. संयोजकांनी अत्यंत विचारपूर्वक ही संकल्पना स्वीकारली आहे. स्त्रियांवर होणारा नेहमीचाच अन्याय काही अंशी तरी दूर व्हावा, त्यांना त्यांचं मन मोकळं करण्याची संधी मिळावी. आपला लेखनाविष्कार प्रगट करता यावा या उद्देशानं अंबाजोगाईच्या लेकी गावात व बाहेरगावी आपल्या संसार-चक्रात येणारी सुख-दु:खाची कथा, कविता सादर करता यावी या उद्देशानं माहेरवाशीनींचं एक स्वतंत्र सत्र आयोजित केलेलं आहे. या सत्रात त्यांनी त्यांचे विचार मुक्तकंठानं मांडावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो.

अंबाजोगाई साहित्य संमेलन ही अंबाजोगाईची सांस्कृतिक ओळख आहे. तिचं जतन आणि संवंर्धन करण्याचा संकल्प करून मी माझं भाषण पूर्ण करतो.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......