अजूनकाही
निर्मल वर्मा यांच्या ‘कौवे और काला पानी’ या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कथासंग्रहाचा आनंद थत्ते यांनी ‘कावळे आणि काळं पाणी’ या नावाने केलेला मराठी अनुवाद नुकताच साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित झाला आहे. त्याला आनंद थत्ते यांनी लिहिलेले हे मनोगत..
.............................................................................................................................................
हिंदी भाषेत साहित्यनिर्मिती करणारे निर्मल वर्मा हे भारतीय साहित्यातले अग्रगण्य कथा-कादंबरीकार होते. ‘नयी कहानिया’ या हिंदी साहित्यातील चळवळीत भीष्म सहानी, मोहन राकेश, कमलेश्वर, अमरकांत, राजेंद्र यादव यांच्या बरोबर अग्रणी होते. त्यांची ‘परिंदे’ ही कथा (१९५९) या चळवळीची सुरवात मानली जाते.
एखादा बडा ख्याल सुरू व्हावा तशा अतिशय संथ लयीत त्यांच्या कथा सुरू होतात आणि त्याच लयीत त्यांची बढत होते. त्यांच्या कथा वाचकाला अतिशय वेगळ्या वातावरणात नेतात. त्यांच्या कथेतील भौगोलिक प्रदेश हा भारताची राजधानी दिल्ली, भारतातली निम शहरं, पहाडी प्रदेशातली गावं आणि कस्बे, युरोपातली (पूर्व आणि पश्चिम) शहरं असा वैविध्यपूर्ण असतो.
पावसाची विविध रूपं, विविध ऋतूमधलं ऊन आणि त्याचे विभ्रम, पहाडातला पाऊस आणि बर्फ, युरोपातली थंडी अशा निसर्गाची ते अशी वर्णनं करतात की, तो त्यांच्या कथेतील एक अनिवार्य घटक होऊन जातो. हा निसर्ग त्यांच्याकथेतील पात्रांच्या मनोवस्था अतिशय समर्थपणे व्यक्त करतो.
त्यांच्या कथा मानवी नातेसंबंधांच्या असतात. स्त्री-पुरुष संबंधांच्या असतात. विफलनातेसंबंधांच्या असतात. तुटलेल्या नात्यांची, त्यातल्या ताण्याबाण्यांची खोलवरची अनुभूती देणाऱ्या असतात. या सगळ्या खेळाकडे त्यातला निवेदक अतिशय तटस्थपणे बघत असतो.
या अनुभवांचं चित्रण करत असताना काळाचा केलेला वापर अतिशय गुंतागुंतीचा असतो. घडत असलेल्या घटनेवर भूतकाळातल्या घटनांची, वर्तनांची, संभाषणाची दाट सावली पसरलेली असते. आणि त्यातली पात्र तो अनुभव जगत असताना वर्तमान आणि भूत या दोन काळांच्या आंदोलनात सतत गुरफटलेली असतात.
हे जगणं जगत असताना नाती जोडली जाणं अपरिहार्य असतं, ती निर्माण होतात, ती फुलत असतानाच त्यात त्यांच्या तुटले जाण्याचे संकेत जाणवू लागतात. त्यात एक प्रकारची अगतिकता असते, अपरिहार्यता असते. पिळवटून टाकणारं दुःख असतं आणि एक प्रकारचा मूक, हतबल शहाणीवेचा स्वीकार असतो. आणि तो वाचकाला स्वतःच्या नात्यांसंबंधी विचार करायला प्रवृत्त करतो.
यातला निवेदक पात्रांमार्फत आणि भाष्यांमधून सुख, दुःख, प्रेम, नातं या विषयी चिंतन करत असतो. हे चिंतन अतिशय तरल आणि काव्यात्म भाषेत असतं. आणि त्यातला दुःखाचा स्वर काळीज कुरतडत जातो. या चिंतनाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ते अतिशय अनोख्या शब्द प्रतिमांतून आपल्या समोर येतं. आणि त्यातला निवेदक अतिशय अलिप्तपणे त्या घटनांकडे बघत असतो. हा निवेदक अतिशय संवेदनशील असतो. दुःखाच्या विविध स्तरांची, त्यातल्या गुंतागुंतीची, निसर्गाच्या विविध प्रतिमांचा नावीन्यपूर्ण वापर करत अशी रचना करतो की, वाचक गुरफटत जातो.
त्यातल्या वातावरणाचा, चिंतनाचा, उपमांचा, तरलतेचा आणि विषण्णतेचा पगडा वाचकाच्या मनावर बसू लागतो. मग ती कथा मनावर ताबा गाजवायला लागते. हळूहळू आपली पकड मजबूत करत नेते. आणि अखेरीस वाचकाला आपण पूर्ण जखडलो गेलोय याची जाणीव होते. पण त्यातून सुटका होत नाही. बाहेर पडू म्हणता पडता येत नाही. त्यातल्या पात्रांची दुःख, वेदना, आपण भोगतोय, किंवा कधीतरी भोगलंय, किंवा कधीतरी भोगावं लागेल असं वाटतं. आणि आपण फरफटत जातो.
मग शरण जाणं हाच एक उपाय उरतो.
माझ्या अत्यंत आवडत्या लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद माझ्या हातून झाला याचा मला खूप आनंद झाला आहे.
.............................................................................................................................................
कावळे आणि काळं पाणी - निर्मल वर्मा, अनुवाद : आनंद थत्ते, साहित्य अकादमी, नवी दिल्ली.
पाने – १६२, मूल्य – १७५ रुपये.
ISBN - 978-93-87567-44-3
.............................................................................................................................................
लेखक आनंद थत्ते मराठी-इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अनुवादक आहेत.
thatte.anand7@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment