यादवांना ‘तुकोबा’ शेवटपर्यंत कळला नाही!
संकीर्ण - श्रद्धांजली
संपादक अक्षरनामा
  • आनंद यादव (३० नोव्हेंबर १९३५ - २७ नोव्हेंबर २०१६)
  • Mon , 28 November 2016
  • श्रद्धांजली आनंद यादव Anand Yadav संतसूर्य तुकाराम Santasurya Tukaram संतसखा ज्ञानेश्वर santsakha dnyaneshvar झोंबी

वर्षाची अखेर आणि नववर्षारंभ हा काळ साहित्यक्षेत्रातील चैतन्याचा असतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड, साहित्य अकादमीचे पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार, २६ जानेवारी रोजी जाहीर होणारे पद्मसन्मान मागेपुढे जाहीर होतात. अशा चैतन्यमय वातावरणात प्रख्यात ग्रामीण साहित्यिक आनंद यादव यांच्या निधनाची बातमी यावी, हे काहीसे अघिटतच म्हणावे लागेल. मात्र वयाच्या ८२व्या वर्षी झालेले यादव यांचे निधन ही निसर्गनियमाला धरून घडलेली गोष्ट आहे. ६०च्या दशकात ग्रामीण मराठी साहित्याने लोकप्रियतेची एक लाट निर्माण केली होती. यादव त्या काळातच लिहू लागल्याने १९६७ साली त्यांचा ‘खळाळ’ हा कथासंग्रह मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केला. पुढे ७०-७१मध्ये मौजेनेच ‘गोतावळा’ ही कादंबरी प्रकाशित केली. १९८७ साली ‘झोंबी’ ही पहिली आत्मचरित्रात्मक कादंबरी प्रकाशित झाली. (‘नांगरणी’, ‘घरभिंती’, ‘काचवेल’ या नंतरच्या तीन आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या), अस्सल ग्रामीण मातीचा गंध असलेले ‘हिरवे जग’ (१९६०), ‘मळ्याची माती’ (१९७८) हे सुरुवातीचे कवितासंग्रह, अशी विपुल साहित्यसंपदा यादवांच्या नावावर आहे. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत यादवांनी लेखन केले. ‘झोंबी’पर्यंतचे यादवांचे लेखन निर्विवादपणे कसदार होते. त्यातून ग्रामीण स्थित्यंतराची, दूरवस्थेची गाथा अतिशय प्रत्ययकारी पद्धतीने मांडण्याचे काम यादवांनी केले.

पश्चिम महाराष्ट्रात एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या यादवांना लहाणपणापासून जगण्याची संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाचे दाहक वास्तव त्यांनी ‘झोंबी’तून मांडले. तिला साहित्य अकादमीसारखा मानाचा पुरस्कार मिळाला. पु.ल.देशपांडे यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा आशीर्वादही मिळाला. या कादंबरीने यादवांना मराठी साहित्यात प्रस्थापित केले. तोवर जगण्याच्या लढाईच्या वाटेवरले एकेक गड सर करत यादव पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक झाले होते.

कुठलीही व्यक्ती संघर्ष करत करत जेव्हा यश मिळवते, तेव्हा ती सुखासीन झाली की, तिला आपल्या भूतकाळाबद्दल अपराधीपणा वाटायला लागतो. यादवांना मात्र ती बाधा कधी झाली नाही. त्यांनी प्रांजळपणे आपले आयुष्य लेखनरूपाने महाराष्ट्रापुढे मांडले. मात्र त्यासाठी निवड केली ती चरित्रात्मक कादंबरीची. या साहित्यप्रकाराच्या काही मूलभूत मर्यादा आहेत आणि हा साहित्यप्रकार सामाजिक दृष्टिकोनातून फारसा स्पृहणीय नाही. मात्र यादवांनी त्याची तमा न बाळगता हाच साहित्यप्रकार हाताळला. त्यातून ग्रामीण मराठी साहित्याला काही प्रमाणात बळकटी मिळाली. साहित्यिक गुणवत्तेवर यादवांकडे ग्रामीण साहित्याचे पुढारपणही आले. पण नेतृत्व, पुढारपण, तोंडपाटीलकी या गोष्टी यादवांच्या स्वभावात नव्हत्या. त्यांना श्रेय मात्र हवे असायचे, पण चळवळ उभी करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी लागणारी प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना मानवली नाही. त्यामुळे प्रमुख दावेदार असूनही त्यांना ग्रामीण साहित्याचे पुढारपण चांगल्या प्रकारे करता आले नाही. केवळ यादवांमुळे ग्रामीण मराठी साहित्याची चळवळ कमकुवत राहिली नाही. तर ती सक्षम नेतृत्वामुळे, जाणत्यांच्या योग्य मार्गदर्शनाअभावी राहिली. या गोष्टी यादवांना करता आल्या असत्या. त्यासाठीच्या सर्व प्रकारच्या क्षमता त्यांच्याकडे असूनही त्यांनी केल्या नाहीत.

प्राध्यापकाच्या नोकरीत जम बसत गेला, तसतशी यादवांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ तुटत गेली. आपण जे जगलो, ज्यात वाढलो, जिथे राहिलो, तो ग्रामीण महाराष्ट्र बदलत चालला आहे, याचेही भान त्यांना आले नाही. ते एकेकाळच्या मराठी सिनेमांसारखेच ग्रामीण जनजीवनाकडे केवळ मनोरंजनात्मक साहित्यकृतीचा विषय म्हणूनच पाहत राहिले. परिणामी त्यांच्या नावावर फक्त पुस्तके जमा होत गेली. ग्रामीण मराठी साहित्याला सुरुवातीपासूनच कृत्रिम रोमँटिकपणाची, पुनरुज्जीवनवादाची मोठी बाधा जडत गेली. खेडुतांच्या जगण्यातील ताणेबाणे साहित्यातून वक्रोक्तीने मांडले की, त्यातून विनोदनिर्मिती होते. यादवांनी नंतरच्या काळात तशा प्रकारचे कथालेखनही केले, तेव्हा ते आपल्या भूतकाळाचा वापर केवळ लेखन रंजक करण्यासाठी करत आहेत, हे स्पष्ट होत गेले.

तरीही यादवांच्या लेखनाला ग्रामीण मातीचा वास येतच राहिला. त्यांची लेखनशैलीही प्रवाही आणि प्रासादिक असल्याने ते साहित्यिक म्हणून प्रस्थापित होत गेले. मात्र प्रस्थापित झाल्यानंतर आपल्यावरची जबाबदारी वाढते. आपण नंतरच्या पिढीचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड होत असतो, व्हायला हवे, हे भान यादवांना आले नाही असे नाही. पण त्यांच्या साहित्यिक महत्त्वाकांक्षेने त्यावर मात केली. त्यामुळे प्रसिद्धी, पुरस्कार, मानमरातब, कौतुकसोहळे यांचा त्यांना चस्का लागला. त्यातही त्यांना तरतमभाव ठेवता आला नाही. शोषणावर आधारलेल्या कृषिसंस्कृतीची दाहकता मांडणाऱ्या आणि नीतीमूल्यांची परंपरा अबाधित ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्या घराण्यात जन्मलेल्या या मराठीतल्या महत्त्वाच्या साहित्यिकाने कधीच कुठलीच वैचारिक भूमिका ठोसपणे घेतली नाही, मांडली नाही आणि कुठल्या प्रागतिक भूमिकेचा कधी खणखणीतपणे पुरस्कारही केला नाही. त्यामुळे साहित्यिक म्हणून मान्यता मिळवूनही यादवांना साहित्यक्षेत्रात स्वत:च्या वैचारिक भूमिकेचा दाखला कोरता आला नाही. समरसता साहित्य मंचापासून कुठल्याही सामान्य व्यासपीठापर्यंत ते सर्वत्र संचार करत राहिले. आपण विविध हितसंबंध असलेल्या हितशत्रूंच्या कोंडाळ्यात अडकत आहोत, याची त्यांनी कधी तमा बाळगली नाही.

शेवटी त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. यादवांना मराठी साहित्यविश्वात स्वत:ची मुद्रा उमटवता आली नाही. त्यामुळे त्यांना वाचकप्रियता अमाप मिळाली, पण बौद्धिक विश्वात फारशी मान्यता मिळाली नाही. आणि नेमक्या याच गोष्टींनी उतारवयात यादवांचा घात केला. ‘कलेचे कातडे’सारखी भ्रष्ट कादंबरी लिहून यादवांनी पहिल्यांदा आपल्या विश्वासार्हतेचा स्वत:च कडेलोट केला. कविवर्य केशवसुतांनी म्हटले आहे की, ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणीत तयात खोदा, निजनामे वरीती नोंदा’. आणि केशवसुतांच्याही कितीतरी आधी समर्थ रामदासांनी म्हणून ठेवले आहे, ‘जेणें धारिष्ट चढे, जेणें परोपकार घडे, जेणें विषयवासना मोडे, त्या नांव ग्रंथ’. पण ते यादवांना संतपरंपरेचा वारसा जोपासूनही अंगी बाणवता आले नाही. त्यांनी ‘कलेचे कातडे’सारखी कादंबरी लिहून लेखन हे आपल्या वैयक्तिक रागा-लोभाचे हत्यार म्हणून वापरले. १९९४ साली संमेलनाध्यपदाच्या निवडणुकीला ते कविवर्य नारायण सुर्वे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिले होते. तेव्हा त्यांनी मतदारांना स्वत:चा ‘आत्मचरित्र-पट’ पाठवला होता, तो त्यांच्या आत्ममग्नतेचा अतिशय बालिश आविष्कार होता.

पुढे ग्रामीण जनजीवनातला मालमसाला संपल्यावर यादव संतसाहित्याकडे वळले. त्यांनी संत तुकारामावर ‘संतसूर्य तुकाराम’ (ऑक्टोबर २००८) ही ‘संशोधनपूर्वक सिद्ध केलेली वास्तववादी चरित्रात्मक कादंबरी’ लिहिली. अशा प्रकारचा खुलासा कादंबरीच्या मुखपृष्ठावर किती गांभीर्याने करायचा असतो, याची गंधवार्ता यादवांना नव्हती असेच खेदाने म्हणावे लागते. त्यामुळे २००९ सालच्या महाबळेश्वर येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यावर त्यांच्या विरोधकांनी ‘संतसूर्य तुकाराम’ या त्यांच्या कादंबरीवरून वाद उकरून काढला. सुरुवातीला यादवांनी ‘माफी मागणार नाही, आक्षेप घेणाऱ्यांना कादंबरी या वाङ्मयप्रकाराचे भान नाही’ असे लुज विधान केले. त्यामुळे वारकरी संप्रदायातल्या उद्दाम गटाला अजूनच स्फुरण चढले.

त्यात त्यांच्या पूर्वीच्या हितशत्रूंनी आपापले उखळ पांढरे करून घेतले. परिणामी यादवांना संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा तुकोबांच्या चरणी वाहावा लागला आणि त्यांच्याशिवाय त्या वर्षीचे साहित्य संमेलन महामंडळाने पार पाडले. खरे तर हा फार ऐतिहासिक प्रसंग होता. यादवांची तोवरची साहित्यिक कामगिरी ‘कलेचे कातडे’वगळता निर्विवाद श्रेष्ठ होती. शिवाय ते आता उतारवयात पोहचले होते. सर्व प्रकारची मानमान्यता त्यांना ग्रामीण साहित्यिक म्हणून मिळालेली होती. अशा वेळी आपली साहित्यिक म्हणून असलेली संपूर्ण विश्वासार्हता पणाला लागल्यावर यादवांनी ती ऐतिहासिक संधी मानून आपल्या बाणेदारपणाचे दर्शन घडवायला हवे होते. पण त्यांनी ते घडवले नाही. एवढेच नव्हे तर काही दिवसांनी 'लोकसखा ज्ञानेश्वर' (नोव्हेंबर २००५) या चरित्रात्मक कादंबरीबाबतही वाद निर्माण केला गेला. 'ही पुस्तके फाडून टाका' असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी न्यायालयाने यादव आणि त्यांचे प्रकाशक मेहता यांना पुस्तकातील मजकुराची पुष्टी करणारे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोघांना कोणतेही पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन यांनी या पुस्तकांच्या सर्व प्रती फाडून टाकण्याचे आदेश दिले.

थोडक्यात यादवांनी साहित्येतर दबावापुढे स्वत:हून शरणागती पत्करली. झुंडीशी लढताना बाकीचा समाज लगेच तुमच्या पाठीशी उभा राहत नाही. त्यासाठी आधी तुम्हाला स्वत:ला पणाला लावावे लागते. तुमचा नि:संशय प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागतो. तरच लोक तुमच्या बाजूने उभे राहतात. पण याबाबतीत यादव कमी पडले. त्यांना आपली विश्वासार्हता सिद्ध करता आली नाही. त्यामुळे त्यांना पूर्वग्रहाने प्रेरित झालेल्या झुंडींपुढे हताशपणे हार मानावी लागली. अगदी ज्या समरसता मंचाचे काम यादवांनी अनेक वर्षे केले त्यांच्यापैकीही कुणी त्यांच्या बाजूने उभे राहिले नाही. परिणामी यादवांची चोहोबाजूंनी कोंडी होत गेली. ते मराठी साहित्यातून बेदखल झाले. खरे तर त्यांना इतर कुणीही बेदखल केले नाही, त्यांनी स्वत:च त्याची पायाभरणी करत नेली, स्वत:च त्यावर कळस चढवला. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरकाळात गारद्यांच्या झुंडीत सापडलेल्या यादवांना कुणाचीही सहानुभूती मिळाली नाही.

शेवटी त्यांनी २०१३मध्ये लेखननिवृत्ती जाहीर केली. मात्र तिचे स्पष्टीकरणही त्यांनी मानभावीपणाने दिले. ‘‘लेखक कधीही निवृत्त होत नसतो. पण वयोमानामुळे आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याला निवृत्त व्हावेच लागते.‘‘ अशी अपरिहार्यता व्यक्त केली. खरे कारण हे होते की, यादव एकटे पडले होते. त्यांच्या बाजूने मराठी साहित्यातील कुणीही उभे राहायला तयार नव्हते. आणि केवळ स्वत:च्या बळावर आपल्या तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा निकराने लढायची यादवांची तयारी नव्हती. पण तेही त्यांना प्रांजळपणाने कबूल करवले नाही.

त्यामुळे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे की, यादव झुंडशाहीचा बळी ठरले त्याला इतरांपेक्षा ते स्वत:च जास्त प्रमाणात कारणीभूत होते. लोकशाही शासनव्यवस्था असलेल्या देशात कुठलेही स्वातंत्र्य अनिर्बंध नसते, हे त्यांनी कधी जाणून घेतले नाही. आणि आपल्या लेखनाची किंमत चुकवण्याशिवाय तरणोपाय नसतो, हे यादवांना तुकारामावर कादंबरी लिहूनही कळले नाही. त्यामुळे उतारवयात यादवांची शोकांतिका झाली!

editor@aksharnama.com

Post Comment

Balasaheb Raje

Wed , 30 November 2016

यादव कालाचा अचूक व मार्मिक वेध! यादवांनी मराठी साहित्याला संपन्न व समृद्ध केलंय, हे सत्य मात्र कुणीही नाकारू शकत नाही. दीडदमडीच्या तेलापायी भल्याभल्यांचे ऊंट वाहून जातात, दुर्दैवाने यादवही याला अपवाद नाहीत.


Nandkumar More

Wed , 30 November 2016

इतरत्र केवळ स्तुतीपर लेखांचा धडाका चाललेला असताना, यादवांच्या संपूर्ण कारर्कीदीची एवढी चांगली चिकित्सा काेाेणी केली नाही. संपादकीय अतिशय नेेमके आणि यादवांवर प्रका|श टाकणारे झाले आहे. धन्यवाद.


Praveen Bardapurkar

Tue , 29 November 2016

कोणताही पूर्वग्रह न ठेवता , आनंद यादव यांच्या लेखनाचा आणि भूमिकांचा यथोचित आढावा घेणारा लेख . असा लेख अन्यत्र ; विशेषतः मुद्रित माध्यमात वाचायला मिळालेला नाही .


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......