सूचक आणि बोलकं मुखपृष्ठ कादंबरीचा मूड सेट करतं आणि मग सुरू होते झिया खानची ‘रोलर कोस्टर लाइफ स्टोरी’
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
नितीन जरंडीकर
  • कादंबरीकार किरण नगरकर
  • Sat , 22 October 2016
  • ग्रंथनामा Granthnama दखलपात्र नितीन जरंडीकर Nitin Jarandikar किरण नगरकर Kiran Nagarkar गॉडस लिटल सोल्जर Gods Little Soldier

विसाव्या शतकाच्या अखेरीस वांशिक आणि धार्मिक हिंसाचार उफाळून आल्याचं एक सार्वत्रिक चित्र पाहावयास मिळतं. धर्माधिष्ठित होत चाललेलं समाजाचं ध्रुवीकरण हा चिंतेचा विषय बनला आहे. ९\११ च्या हल्ल्यानंतर जगाची विभागणी ९\११ पूर्व आणि उत्तर कालखंड अशी झाली. धर्मसंस्थांचे आवाज तीव्र आणि विखारी बनले. या धर्मसंस्थांचे झपाट्यानं होत चाललेलं अवमूल्यन, उग्र बनत चाललेला धर्माधिष्ठित दहशतवाद आणि क्षीण होत चाललेला धर्मनिरपेक्षतेचा सूर या अस्वस्थ बनवणाऱ्या समाजमनाची परखड चिकित्सा करणारी किरण नगरकरांची ‘गॉडस लिटल सोल्जर’ ही अलीकडच्या कालखंडातील एक महत्त्वाची कादंबरी आहे.

मराठी वाचकांना किरण नगरकर हे नाव अपरिचित नाही. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ व ‘रावण आणि एडी’मुळे मराठी वाचकांना माहीत असणारे नगरकर हे उत्तरवासाहातिक कालखंडातील इंग्रजीतून लिखाण करणारे एक प्रमुख भारतीय कादंबरीकार म्हणून गणले जातात. धर्मसंस्थांचं व्यामिश्र स्वरूप हा नगरकरांच्या चिंतनाचा नेहमीच विषय राहिला आहे. त्याचे सूचक संदर्भ त्यांच्या ‘गॉडस लिटल सोल्जर’ पूर्वीच्या कादंबऱ्यांमधून मिळतात. परंतु या कादंबरीमध्ये धर्मचिकित्सा हाच त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहतो. अर्थात असा क्लिष्ट, गंभीर विषय कादंबरीतून हाताळताना कादंबरी प्रकाराचा घाट कसा अबाधित राहील याचं मर्म नगरकरांना ठाऊक असल्याने त्यांनी हा विषय यथायोग्य रीतीनं हाताळला आहे.

एखादी सस्पेन्स थ्रिलर कथा उलगडत जावी त्या पद्धतीनं या कादंबरीचं कथानक उलगडत जातं. झिया खान हा या कादंबरीचा नायक. अफाट बुद्धिमत्ता असणारा झिया कडवा मुस्लीम आहे. उदारमतवादी आई-वडलांपेक्षा झियावर त्याच्या मावशीचा जास्त प्रभाव आहे. अर्थात धार्मिक व नैतिक अधिष्ठान हरवत चाललेल्या व्यवस्थेमध्ये झियाने ‘वली’ किंवा ‘पीर’ बनून नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना करावी एवढीच मावशीची अपेक्षा असते. परंतु वाढत्या वयाबरोबर झियाचा कर्मठपणाही वाढत जातो आणि तो कमालीचा धर्मांध बनतो. उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेल्यानंतरदेखील तो आपली मुस्लीम आयडेंटीटी कसोशीनं जपण्याचा प्रयत्न करतो. अतिरेकीपणातून सलमान रश्दींच्या विरोधात निघालेल्या फतव्यानंतर रश्दींचा खून करण्याचे ध्येय उराशी बाळगतो. रश्दींच्या खुनाच्या अयशस्वी प्रयत्नानंतर वेडापिसा झालेला झिया अफगाणिस्तानात जाऊन अतिरेकी बनतो, काश्मीर खोऱ्यात अनन्वित अत्याचार करताना होरपळून निघतो.

केंब्रिजमध्ये शिकत असताना ज्या यजमानीन बाईंकडे झिया राहतो, त्या मूळच्या मुंबईच्या व झिया कुटुंबियांच्या परिचयाच्या असतात. त्यांच्याकडून झियाला त्याच्या बालपणातील एक रहस्य कळतं. चमत्कारिक आजारानं ग्रासलेल्या तान्हुल्या झियाला डॉक्टरांनी सर्व आशा सोडून दिल्यानंतर यजमानीनबाई त्याला चर्चमध्ये घेऊन जातात आणि येशूच्या पायावर टाकतात. आश्चर्यकारकरीत्या झियाचे प्राण वाचतात. परिणामी, जियाला बाप्तिस्मा द्यावा अशी इच्छा बाई व्यक्त करतात. तथापि झिया ज्या वेळी जाणता होईल त्या वेळी त्याचा निर्णय त्याला घेऊ द्यावा अशी इच्छा त्याचे वडील व्यक्त करतात. इंग्लंडमध्ये यजमानीनबाई झियाला या गोष्टीचं स्मरण करून देतात. परंतु झियाला हा त्याच्या इस्लामच्या वाटचालीतील मोठा अडथळा वाटतो. तथापि अतिरेकी कारवायांतील अनन्वित अत्याचारानंतर झिया पस्तावतो, ख्रिश्चन धर्म त्याला खुणावू लागतो.

त्यानंतर झिया आपल्याला भेटतो तो थेट अमेरिकेत फादर ल्यूसेन्स म्हणून. भूतकाळाच्या सर्व खुणा विसरून झिया आपल्या या नवीन अवतारात स्वत:ला झोकून देतो. गर्भपातविरोधी चळवळीमध्ये सक्रिय बनतो. निराधार मुलांसाठी, नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी संस्था उभारतो. प्रसंगी हिंसेचा मार्गही अवलंबतो. वादळात उदध्वस्त झालेल्या चर्चची पुनर्बांधणी व निराधार मुलांची संस्था यासाठी तो आपली बुद्धिमत्ता वापरून शेअर मार्केटमधून पैसा उभा करतो. परंतु एका क्षणी त्याची शेअर मार्केटमधील गणितं चुकतात आणि तो पूर्ण कफल्लक बनतो. मग मात्र पैसा उभा करण्यासाठी तो शस्त्रास्त्रांच्या तस्करीत उतरतो. या मार्गाने पैसा उपलब्ध करण्यासाठी एक हिंदू मांत्रिक झियाला मदत करतो. या अवैध व्यापारासाठी हिंदू मांत्रिकाकडून झियाला कागदोपत्री पुन्हा एक नवी ओळख मिळते, तो हिंदू बनतो. या टप्प्यावर उरफाड करून आयुष्यभर स्वत:ला शोधत धावणारा झिया हताश होतो. आपल्या साथीदाराला भरकटलेला रस्ता सोडायचा मनोदय सांगतो. पण त्याच्या इराद्याबद्दल शंका वाटून त्याचा साथीदार त्याचा खून करतो.

झियाच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार बारीकसारीक तपशिलांनिशी टिपताना नगरकर धर्मसंस्थांच्या अस्तित्वाविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट होणं आवश्यक आहे की, नगरकर धर्म आणि ईश्वर याविषयी आपले आक्षेप नोंदवत नाहीत तर अर्थकारण आणि सत्ताकारण यांनी पोखरून टाकलेल्या धर्मसंस्थांच्या अस्तित्वाबद्दल ते आपले तीव्र आक्षेप नोंदवत आहेत. ज्या इस्लामचे बाळकडू झियाला त्याच्या मावशीकडून मिळालं, त्या मावशीचा इस्लाम हा कुराणावर आधारित आहे. तिची मोहम्मद प्रेषितावर दृढ निष्ठा आहे. तिच्या लेखी इस्लाम म्हणजे नेक, इनामदार आणि प्रामाणिक असणं आहे. तिच्या धर्मात आत्मपीडन आहे, परंतु हिंसेला बिलकूल थारा नाही. याउलट झियाचा धर्म कुराणापासून कोसो दूर आहे. तो मूलत: दुराग्रह आणि हिंसेवर आधारीत आहे. झियाचा भाऊ, अमानत,  कांदबरीत एके ठिकाणी झियाला विचारतो की, ‘अल्लाहला सैतानापासून वाचवण्यासाठी सैनिकांची का बरं गरज भासावी?’ अर्थात आपली बाजू मांडताना झिया अतिशय बुद्धिचातुर्यानं सांगतो की, ‘हा संघर्ष अल्लाहसाठी नसून अल्लाहवर सच्ची निष्ठा ठेवणाऱ्यांसाठी आहे. सैतानापासून अशा निष्ठावंतांना वाचवण्याची गरज आहे.’

आपल्या ख्रिश्चन अवतारात झिया चर्चसाठी एक पत्रिका लिहितो, ज्यामध्ये तो चर्चच्या भूमिकेविषयी आपली मते मांडतो. त्याच्या मते साधक आणि ईश्वर यांच्यातील चर्चचा जो मोठा हस्तक्षेप आहे तो कमी झाला पाहिजे. त्याच्या मते चर्चपेक्षा श्रद्धेला मुक्त वावर करून देण्याची मुभा असली पाहिजे. या अनुषंगाने कादंबरीमध्ये ‘गुड फेथ’ आणि ‘बॅड फेथ’ याविषयी होणारी चर्चा थेट ‘ओरिजिनल सीन’पाशी येऊन थांबते. ज्यावर संपूर्ण ख्रिश्चन धर्माचा डोलारा उभा आहे. दुर्दैवानं बुद्धिमत्ता आणि अतिरेकीपणा यांच्या द्वंद्वात अडकलेल्या झियाच्या बाबतीत त्याचा अतिरेकीपणा वरचढ ठरतो. परिणामी ज्ञानशोधाच्या मागार्वरून चाललेला झिया पुन्हा भरकटतो.

यानिमित्ताने चर्च, भांडवलशाही व्यवस्थेचे चर्चवर झालेलं आक्रमण, चर्चची दुराग्रही, हेकट भूमिका (हे विधान सर्वच धर्मसंस्थांना लागू पडते.) आणि त्यायोगे शिरकाव करू पाहणारी हिंसेची भाषा ही अस्वस्थ करणारी आहे. झियाच्या हिंदू अवताराच्या निमित्तानं घडणारं धर्माच्या गुन्हेगारीकरणाचं दर्शन हेही कमालीचं त्रस्त करणारं आहे. या ठिकाणी नगरकर ८०-९०च्या दशकात राजकारणात मांत्रिकांचा\महंतांचा हस्तक्षेप कसा वाढला होता आणि या मंडळींची पार्श्वभूमी कशी गुन्हेगारी होती याविषयीही भाष्य करतात.

पण ही कादंबरी केवळ धर्मसंस्थांचं अध:पतन दाखवून संपत नाही, तर मानवी जीवनात धर्माची नेमकी गरज काय आणि त्या धर्माचं विशुद्ध स्वरूप काय असावं हेही विशद करते. बाह्यरूप बदलून, धर्म बदलून ईश्वरप्राप्ती अशक्य आहे हे कडू वास्तव झियाला मरणाच्या दारात उमगतं आणि ईश्वर म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून प्रत्यक्ष जीवन म्हणजेच ईश्वर याचंही त्याला उशिरा का होईना भान येतं.

झियाच्या मनातील धर्म आणि ईश्वर याबद्दलची आंदोलनं आणि त्याचा भरकटलेला मार्ग अधोरेखित करण्यासाठी कादंबरीत अजून एक कादंबरी आकारायाला येते. झियाचा भाऊ, जो एक लेखक आहे, एक कादंबरी लिहितो आहे आणि झिया ती वाचतो आहे.

या कादंबरीमधील कादंबरीचा नायक आहे कबीर. आपणास ठाऊक असलेला कबीर हा मध्ययुगीन संतकवी आहे, पण कादंबरीतील कबीर हा संतपद बहाल होण्यापूर्वीचा आहे. झियाची मुस्लीम-ख्रिश्चन-हिंदू आयडेंटीटी आणि त्यातून होणारी त्याची तगमग आणि कबीराची आपणाला ठाऊक असलेली हिंदू-मुस्लीम आयडेंटीटी या दोहोंतून होणारा दोघांचा प्रवास यानिमित्ताने अधोरेखित होतो. अर्थात कबीर आपल्या हिंदू-मुस्लीम द्वंद्वाबद्दल कोठेही भाष्य करत नाही. पण त्या अनुषंगाने कादंबरीत येणारे प्रसंग हे अत्यंत सूचक आहेत. घनघोर तपश्चर्या केल्यानंतर कबीर एका अजाण मुलाला आपण या पदाला पोहोचण्यासाठी कशाकशाचा त्याग केला याचा पाढा ऐकवतो. तो मुलगा त्याला विचारतो, “म्हणजे आता आपण ईश्वराचादेखील त्याग करणार असाल?” त्यामुळे खाडकन जमिनीवर आलेला कबीर म्हणतो की, “शिष्य हा असा गुरूचा अनादर करणारा असला पाहिजे, कारण तुमचं ध्येय हे ईश्वरप्राप्तीचं आहे, गुरूप्राप्तीचं नाही. गुरूला ओलांडल्याशिवाय पुढचा मार्ग सुकर नाही.”

दुसऱ्या एका प्रसंगात कबीर साऱ्या घरादाराला आग लावत सुटला आहे. भांबावलेले त्याचे मित्र त्याला थांबवायचा प्रयत्न करतात. त्यावेळी कबीर म्हणतो, ‘‘ज्या वेळी आपण निराधार होऊ, ज्यावेळी आपली भूतकाळापासून पूर्ण सुटका होईल, ज्या वेळी आपल्या ‘मी’पणाचा अंत होईल, ज्यावेळी आपण सर्वार्थानं पोरके होऊ, त्यावेळीच खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष केवळ ईश्वरच आपले एकमेव घर असल्याचा साक्षात्कार होईल.’’

पदावलींमधून कबीराची दिसणारी बंडखोरी कादंबरीमध्ये अशा स्फोटक विचारांतून पसरत जाताना दिसते. आणि पुन्हा तो नगरकरांचा कबीर असल्याने मिश्किल आणि थट्टेखारही आहे. या कादंबरीमध्ये झिया आणि कबीराचा एक समांतर प्रवास आहे. कबीराने सांगितल्याप्रमाणे झियाला सर्वांच्या प्रती अनादर आहे. त्याला भूतकाळाची बंधनं जुगारून द्यायची आहेत. तथापि अविवेकीपणा आणि अतिरेकीपणा त्याच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत आणि त्यातच त्याच्या विनाशाची बीजं रोवलेली आहेत. परिणामी नगरकरांची ही कादंबरी केवळ दहशतवादाबद्दलची कादंबरी राहत नाही, तर ती अतिरेकीपणाबद्दलची कादंबरी बनून त्यातून उद्भवणारी शोकांतिका अधोरेखित करते.

नगरकरांच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणे यादी कादंबरीचा अनेक भाषांत अनुवाद झाला आहे. जर्मन अनुवादाला तर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. नगरकर जाहीरात क्षेत्राशी निगडीत असल्याने ते आपल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबाबतदेखील सजग असतात. हार्पर कॉलिन्सनं प्रकाशित केलेल्या या कादंबरीचे मुखपृष्ठ प्रशांत गोडबोले यांनी केलं आहे. या मुखपृष्ठावर एक झाड आहे. त्याच्यावर साप, सफरचंद, वाघ, घुबड इत्यादी प्रतीके आहेत. आकाशामध्ये चंद्र आहे. झाडाचं खाली प्रतिबिंब पडलेलं आहे. मात्र त्यात अणुस्फोट दिसतो. असं सूचक आणि बोलकं मुखपृष्ठ कादंबरीचा मूड सेट करतं आणि मग सुरू होते झिया खानची ‘रोलर कोस्टर लाइफ स्टोरी’.

गॉडस लिटल सोल्जर – किरण नगरकर, हार्पर कॉलिन्स, नवी दिल्ली, पाने – ६२४, मूल्य - ५९५ रुपये.

.............................................................................................................................................

लेखक नितीन जरंडीकर इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.

nitin.jarandikar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Nilesh Pashte

Fri , 21 October 2016

test comments


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......