अजूनकाही
जामनेरमधील तरुणांना मिळालेली वागणूक ही पुन्हा एकदा या समाजव्यवस्थेच्या असण्यातील उणीवांची ठसठशीत जाणीव करून देणारी आहे. या घटना आपण नेमक्या कोणत्या व्यवस्थेचा भाग आहोत, याचा सातत्याने विचार करायला भाग पाडत असतात. या दुर्घटना अशा एका समाजातील, व्यवस्थेतील आहेत जिथे सुधारणावादाचा, पुरोगामित्वाचा केवळ दंभ गोंजारला जातो.
कुठे सार्वजनिक ठिकाणी मनमोकळेपणे वावरल्याबद्दल शिक्षा भोगावी लागते तर कुठे राज्यघटनेने प्रदान केलेले अथवा त्याहूनही प्राचिनतम अशा निसर्गदत्त हक्कांचा लाभ घेतला म्हणून वाळीत टाकण्याचे प्रकार केले जातात. जामनेरमधील घटनाही याला अपवाद नाही.
हा सगळा प्रकार विशिष्ट जात, धर्म, राजकीय विचारसरणी यांच्यापुरताच सीमित नाही तर एक समाजव्यवस्था म्हणून आपल्या वाटचालीतील अपूर्णत्वाची ठिगळे दाखवणारे कटू वास्तव आहे. आपल्यासारख्याच रक्तामांसाच्या, आपल्यातल्याच भाऊबंदांना आणि मानव नावाच्या एकमात्र जातीचा अविभाज्य घटक असलेल्यांना जगणे नाकारण्याचा नतद्रष्टपणा वारंवार होत असतो. त्यामागे मानवतावाद, अखिल मानवजातीचा अपमान होत असतो.
आधुनिकतावाद, शैक्षणिक वाटचालीने येणाऱ्या सामूहिक प्रगल्भतेने एखादा समाज, व्यवस्था उदारमतवादी होते, हा जो गैरसमज जगभरात कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो, त्याची प्रचीती भारतात जरा जास्तच येत असते. अंधश्रद्धा, कर्मकांड, वर्णव्यवस्था आणि त्यातून प्रबळ ठरलेली जातव्यवस्था एवढी बेलगाम झाली आहे की, या दुर्गुणांना गाडल्याशिवाय भारत नावाच्या संकुचित टोळक्यांचा समूह उन्नत होणार नाही, ही भूमिका एकेकाळी राज्यातील सुधारकांनी टाहो फोडून मांडली होती. त्यामागचे दुर्दैवी वास्तव आजही आपली पाठ सोडायला तयार नाही.
केवळ शासनकर्ते बदलले म्हणून हा समाज कधीच उन्नातावस्थेप्रत जाणार नाही, हे वास्तव आगरकरांपासून फुले, शाहू महाराज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या धुरिणांनी बजावलेले आहे. उदारमतवादाचा बुरखा पांघरून आपापल्या संकुचित अस्मिता कवटाळून बसलेल्या निद्रिस्त समाजाच्या चौकटी मोडण्याचे शाश्वत मार्गही या सुधारकांनी सुचवलेले आहेत.
दुर्दैवाने अशा दुर्घटना घडल्या की, राज्यभरात पुरोगामित्वाची झूल पांघरलेले स्वार्थी लोक जागे होतात, चार दिवस कुजबुजतात आणि पुन्हा व्यक्तिगत हितसंबंधांत गुरफटून जातात. भारतीय समाजव्यवस्थेचे मूळ दुखणे दूर करण्याचे सुधारकांचे उपाय अमलात आणण्यापेक्षा तुकड्या-तुकड्यांनी विखुरलेल्या जातीसमूहांच्या ठेकेदारीतच ज्यांना स्वारस्य असते असे तथाकथित नेते, समाजकारणी, संघटक चार दिवस प्रसारमाध्यमांवर वांझोट्या चर्चा करण्यात धन्यता मानतात. यात गरिबीवर बोलून श्रीमंत होणाऱ्या एनजिऑलॉजिस्ट दुकानदारांचाही समावेश असतो.
एक समाज म्हणून अनिवार्य अशा सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी या लोकांना वेळच मिळत नाही. जातश्रेष्ठत्व, अस्मितांबद्दलचे खोटे गैरसमज यापेक्षा एका आधुनिक, उदारमतवादी, समान पातळीवरील समाजसंरचनेच्या जडणघडणीचे शिवधनुष्य कोणालाच पेलायचे नसते. मग या दुर्घटनेतील संबंधित संशयितांचा उद्धार करून सर्व काही विसरले जाते. त्यामुळे ‘पुरोगामी महाराष्ट्र’ हा उच्चारही लाजिरवाणा व हास्यास्पद ठरतो.
या व्यवस्थेतील दोष दाखवून, त्याविरोधात लढण्याचे धाडस दाखवणारे समाजद्रष्टे केवळ या मातीत जन्मले होते म्हणून हा बुरसटलेला, जातीय अस्मितांच्या गुलामीतील महाराष्ट्र पुरोगामी कसा काय म्हणवून घेऊ शकतो? पुरोगामित्वाचा हा बादरायण संबंध लावताना महाराष्ट्रातील दांभिकांनी पुरोगामित्वाची केवढी निर्लज्ज चेष्टा चालवली आहे.
एक समाज म्हणून आपण जी वाटचाल केली आहे तिच्यातील न्यूनत्व शोधण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? ही वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे? त्याचे फलित काय असेल? या प्रश्नांसोबतच खरेच आपण समाज म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहोत का? हे प्रश्न अस्वस्थ करतात. एकाच वेळी सर्व मानवी मूल्ये पायदळी तुडवत बेहिशेबी जगायचे आणि त्याच वेळी त्याच मूल्यांचा उद्घोष करायचा, हा दुटप्पीपणा आणखी किती काळ करणार आहोत आपण? समाजप्रवाहातील एका मोठ्या घटकास समरस करून घेताना कायद्याचे संरक्षण, घटनात्मक तरतुदींचा लंगडा आधार आम्हास कशासाठी लागतो आहे.
माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे सांगण्यासाठी एखादी लिखित घटना ज्या समाजास लागते, तो समूह आदिम टोळक्यांसारखाच नव्हे काय? कुठल्याही दिशादर्शक संहितेशिवाय मानवतावादाची देणगी आपल्याला मिळालेली आहे. जात, पंथविरहित एका पदस्थ वाटचालीची परंपरा सुरू केलेल्या ज्ञानेश्वर या तत्त्ववेत्त्या कवीने विश्वात्मक देवाकडे अखिल मानवजातीचे कल्याण मागितले होते. व्यक्तीसमूहातील खल नाहिसे व्हावे, दुष्प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत परावर्तीत व्हावी आणि याची फलश्रुती म्हणून सकल प्राणिमात्रांमध्ये प्रेमभावना निर्माण व्हावी. हे पसायदान अंगी बाळगण्याचे धाडस आपण किती काळ टाळणार आहोत?
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 19 June 2018
पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोरं पोहली म्हणून त्यांना बडवलं. त्यामुळे 'पुरोगामी महाराष्ट्र’ हा उच्चारही लाजिरवाणा व हास्यास्पद कसाकाय होतो? मुळातून दोहोंचा संबंधच काय? -गामा पैलवान