‘कन्यादान’ : कालातीत वर्गसंघर्ष, जातसंघर्ष आणि संस्कृतीसंघर्ष
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘कन्यादान’मधील एक प्रसंग
  • Mon , 18 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe विजय तेंडुलकर Vijay Tendulkar कन्यादान Kanyadaan लिलिट दुबे Lillete Dubey

कलाकार मर्त्य असतो, त्याची कला नाही, हे विधान तसे नवे नाही. मात्र श्रेष्ठ कलाकारांचा आविष्कार कालातीत असतो. त्यांच्या कलाकृती पिढ्यानपिढ्यांशी संवाद साधत असतात. विजय तेंडुलकरांचं (१९२८-२००८) यांचं ‘कन्यादान’ हे असं एक नाटक. त्यांच्या ‘घाशीराम कोतवाल किंवा ‘सखाराम बाइंडर’ला जेवढी प्रसिद्धी मिळाली, तेवढी ‘कन्यादान’ला मिळाली नाही. हे जरी खरं असलं तरी त्यामुळे या नाटकाचं महत्त्व कमी होत नाही. तेंडुलकरांच्या इतर नाटकांप्रमाणेच ‘कन्यादान’चे प्रयोग इंग्रजीप्रमाणेच इतर भारतीय भाषांत होत असतात. अलिकडेच या नाटकाचा इंग्रजीतील प्रयोग बघण्याचा योग आला. सुमारे ३० वर्षापूर्वी मंचित झालेलं ‘कन्यादान’ आजही समयोचित वाटतं.

मुंबर्इस्थित ‘द प्रार्इम टार्इम थिएटर कंपनी’ या प्रतिष्ठित नाट्यसंस्थेनं हा प्रयोग सादर केला आहे. ‘कन्यादान’चं इंग्रजी भाषांतर गौरी रामनारायण यांनी केलं आहे. हे नाटक तेंडुलकरांनी १९८३ साली लिहिलं आहे. म्हणजे आजपासून बरोबर ३५ वर्षांपूर्वी. आजही हे नाटक तितकंच विचारप्रवर्तक वाटतं. कारण यात तेंडुलकरांनी भारतीय समाजात खूप खोलवर रूतून बसलेल्या मानसिकतेवर प्रकाश टाकला आहे. हे नाटक येण्याअगोदर मल्लिका अमर शेख यांचं ‘मला उदध्वस्त व्हायचंय’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक चर्चेत होतं. तेव्हा अशी चर्चा होती की, तेंडुलकरांचं ‘कन्यादान’ मल्लिका अमर शेख यांच्या पुस्तकावर आधारित आहे.

ही कथा आहे यदुनाथ देवळालीकर या पुणेस्थित समाजवादी नेत्याची, त्याच्या कुटुंबाची व त्याच्या तरुण मुलीनं केलेल्या आंतरजातीय विवाहाची. देवळालीकर आमदार आहेत. त्यांनी सारी हयात समाजवादी चळवळीत काढली. त्यांनी त्यांच्या काळाच्या प्रथेप्रमाणे एक समविचारी व समाजवादी चळवळीत सक्रिय असलेल्या मुलीशी प्रेमविवाह केला. आता त्यांना पंचवीशीत असलेला व एमएससी करत असलेला मोठा मुलगा व एक सुशिक्षित पण नोकरी करत नसलेली तरुण मुलगी आहे. देवळालीकर कुटुंबावर समाजवादी विचारांचे खोल संस्कार आहेत. त्यानुसार ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ या तत्त्वावर कुटुंबाची जीवनशैली आधारित आहे.

नाटक सुरू होतं, तेव्हा प्रेक्षकांना देवळालीकर कुटुंबाचे आचार-विचार समजतात. या उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय घरातील खेळीमेळीचं वातावरण बिघडतं, जेव्हा त्यांची मुलगी ज्योती (मृण्मयी गोडबोले) घरी सांगते की, ती अरुण आठवले या दलित मुलाच्या प्रेमात असून ते लवकरच लग्न करणार आहेत. देवळालीकर कुटुंबातील तीन व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे यावर प्रतिक्रिया देतात.

तिची आर्इ सेवा देवळालीकर एक समाजसेविका आहे. तिच्या प्रतिक्रिया समाजवादी चळवळीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या व्यक्तीऐवजी एका आर्इच्या असतात. म्हणून ती मुलीवर मुलगा किती शिकला आहे, नोकरी करतो का, घरी कोण कोण असतं, पुण्यात राहतो कोठे वगैरे पारंपरिक प्रश्नांची सरबत्ती करते. यातील निम्म्या प्रश्नांची उत्तरं ज्योतीकडे नसतात. ती सांगते की, मी त्याच्या लेखनावर, कवितांवर भाळले.

ज्योतीची निवड बघून नाथ देवळालीकर मात्र विलक्षण खूश होतात. या लग्नात त्यांना खऱ्या सामाजिक क्रांतीची सुरुवात दिसते. आपल्या पिढीनं जे फक्त बोलून दाखवलं, ती सामाजिक क्रांती माझ्या संस्कारात वाढलेली माझी मुलगी करून दाखवत आहे; म्हणून ते फार आनंदात असतात. त्यामुळे ते या लग्नाला हार्दिक पाठिंबा देतात. आर्इ मात्र ‘तुमच्या प्रयोगासाठी माझ्या मुलीच्या आयुष्याचा बळी का देता?’, असा प्रश्न विचारते.

सर्वांनुमते अरुण आठवलेला घरी निमंत्रित केलं जातं. अरुण येतो, तेव्हा घरी फक्त ज्योतीच असते. या प्रसंगापासून नाटक पकड घ्यायला लागतं. अरुण येतो, तोच प्रचंड मानसिक ताण व निरनिराळे गंड घेऊन. तो देवळालीकरांच्या घरात घालवलेल्या प्रत्येक क्षणी निरनिराळ्या प्रकारे वागतो. कधी एकदम विचारी, तर कधी अविचारी. तो कधी ग्राम्य भाषा वापरतो, तर कधी नागर. देवळालीकरसारख्या ब्राह्मण कुटुंबाला यापैकी कशाचीच सवय नसते. त्यांच्या भावविश्वात होणारा जावर्इ घरी आल्यावर काय घडेल याचं स्पष्ट चित्र असतं. अरुण आठवले या चित्रांतील एकही भाग पूर्ण करत नाही. त्यांची ही पहिली भेट वादळी ठरतं आणि आगामी भेटी कशा प्रकारच्या असतील याचा प्रेक्षकांना अंदाज येतो.

बरीच भवतीनभवती झाल्यानंतर अरुण-ज्योतीचं लग्न होतं. तिथून सुरू होते ज्योती व देवळालीकर कुटुंबाची अभूतपूर्व ससेहोलपट. हे लग्न फक्त आंतरजातीयच नसतं, तर आंतरसंस्कृती असतं. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांच्या पोटात किती परस्परभिन्न संस्कृती नांदत असतात, हे वास्तव बटबटीतपणे समोर येतं.

तसं पाहिलं तर जातीव्यवस्थेचं वास्तव भारतीय समाजात शेकडो वर्षांपासून आहे. मात्र औद्योगीकीकरण, यंत्रसंस्कृती, आधुनिक शिक्षण, नागरीकरण वगैरेंमुळे जातीजातींतील भिंती पडतील अशी जी अपेक्षा होती, ती मात्र पूर्ण झालेली नाही. याचा सर्वांत प्रथम अंदाज ज्योतीला येतो. अरुण तिला अनेकदा अमानुष मारहाण करतो. त्याच्याकडे अनेकदा पैसे नसतात, तो मित्रांकडून हात उसने घेऊन मद्यपान करतो. त्या नशेत स्वत:चं वैफल्य ज्योतीला मारहाण करून काढतो. ज्योती जीवंतपणे नरकयातना भोगत असते. हे सर्व तिचे उदारमतवादी आर्इ-वडील हतबुद्धपणे बघत असतात. त्यांच्या लग्नाला सुरुवातीला पाठिंबा देणारे नाथ देवळालीकरही नंतर अरुणची निर्भर्त्सना करतात.

दुसरा अंक सुरू होता, तेव्हा चित्र बरंच बदललेलं असतं. अरुणचं आत्मचरित्र प्रकाशित झालेलं असतं. त्याचं चांगले स्वागत होत असतं. त्याच्या पुस्तकावर बक्षिसांचा, कौतुकाचा वर्षाव होत असतो. अशा अवस्थेत उग्र आत्मविश्वासाने अरुण नाथ देवळालीकरांना भेटायला येतो. त्याची अपेक्षा असते की, त्याच्या सासऱ्यानं त्याच्या पुस्तकावर भाषण करावं. नाथ देवळालीकरांना अरुणच्या वागण्यातील दुट्टपीपणा सहन होत नाही. पुस्तकात माणुसकीच्या गप्पा करणारा अरुण प्रत्यक्ष जीवनात कसा त्याच्या पत्नीला मारहाण करतो वगैरे माहिती असल्यामुळे नाथ देवळालीकर भाषण करण्यास नकार देतात.

एव्हाना ज्योती गरोदर झालेली असते. अशा अवस्थेतही अरुण तिला जमेल तेव्हा तिला मारहाण करत असतोच. सेवा देवळालीकर आपल्या पतीला विनंती करते की, त्यांनी अरुणच्या पुस्तकावर कौतुक करणारं भाषण करावं. नाही तर तो ज्योतीला अशा अवस्थेतही मारहाण करेल. हतबल झालेले नाथ भाषण देऊन येतात. भाषणातील खोटेपणा ज्योतीला मान्य होत नाही व ती वडिलांना, नाथ देवळालीकरांना याबद्दल दोष देते. नंतर तिच्यात व वडिलांत जो दीर्घ संवाद होतो, तो या नाटकाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. ज्योती वडिलांना सांगते की, तुमच्यामुळे आमच्यापर्यंत खरं जीवन आलंच नाही व आता आलं तेव्हा त्याचा सामना कसा करावा, हे मला नव्यानं शिकावं लागेल. या संवादातून या नाटकाच्या गाभ्यात असलेला संस्कृतीसंघर्ष अधोरेखित होतो. नाटक संपतं, तेव्हा ज्योती वडिलांना सांगते की, ती आता पुन्हा या घरात कधीही येणार नाही आणि त्यांनीसुद्धा तिला भेटण्यासाठी तिच्या घरी येऊ नये.

हे नाटक जेव्हा मंचित झालं होतं, तेव्हा अपेक्षेप्रमाणे या नाटकावर अनुकूल, प्रतिकूल टीका झाली होती. तेव्हा या नाटकाच्या निर्मितीला कदाचित एक तात्कालिक कारण मिळालं असेल, पण यातील वर्गसंघर्ष, जातसंघर्ष आणि संस्कृतीसंघर्ष हे विषय कालातीत आहेत. म्हणून आता २०१८ मध्ये हे नाटक बघताना कालबाह्य वाटत नाही.

या नाटकाचा प्रयोग लिलिट दुबे यांनी फार कसून उभा केला आहे. लिलिट दुबे हे नाव देशातील हिंदी व इंग्रजी रंगभूमीवरील एक आदरणीय नाव आहे. त्या चांगल्या अभिनेत्री आहेत. त्यांच्या नावावर ‘मान्सून वेडिंग’, ‘चलते चलते’ वगैरेसारखे हिंदी व इंग्रजी चित्रपट आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांचा रंगभूमीशी संबंध आला, जो महाविद्यालयीन जीवनात वाढत गेला. त्यांनी १९९१ साली ‘द प्रार्इम टार्इम थिएटर कंपनी’ स्थापन केली. या नाट्यसंस्थेचा रौप्यमहोत्सव २०१६ साली साजरा झाला.

‘कन्यादान’च्या सध्या सादर होत असलेल्या प्रयोगात थोडी काटछाट करण्यात आली आहे. पण त्यामुळे नाटकाच्या गाभ्याला धक्का लागलेला नाही. या नाटकात एकुण पाच मुख्य पात्रं आहेत- नाथ देवळालीकर (राजेंद्र गुप्ता), सेवा देवळालीकर (दीपिका अमीन), ज्योती (मृण्मयी गोडबोले), जयप्रकाश (गंधर्व दिवाण) व अरुण आठवले (जॉय सेनगुप्ता). या पात्रांच्या माध्यमातून तेंडुलकरांनी आपलं नाटक उभं केलं आहे.

या नाटकातील अभिनयाच दर्जा चांगला आहे. त्यातही खास उल्लेख करावा लागतो जॉय सेनगुप्ताचा. या गुणी नटानं अरुण आठवलेच्या भूमिकेत जे रंग भरले आहेत, या भूमिकेबद्दल जी समज दाखवली आहे, ते केवळ अप्रतिम आहे. नाटक सुरू होतं, तेव्हा देवळालीकरांच्या घरी प्रथमच येणारा अरुण मनातून घाबरलेला तर असतोच, पण रागावलेलासुद्धा असतो. हा राग त्याच्या प्रेमात पडणाऱ्या ज्योतीवर जसा असतो, तसाच भारतीय समाजानं दलितांवर केलेल्या अमानुष अत्याचारांबद्दलही असतो. त्याचं मन कसं परस्परविरोधी भावनांच्या तुफानात सतत भरकटत असतं, हे जॉयनं देहबोली व आवाजाच्या चढउतारावरून नेमकं व्यक्त केलं आहे.

दुसऱ्या अंकातील यशस्वी लेखक अरुणची घमेंड वगैरे व्यक्त करणं तसं सोपं नव्हतं. पण जॉयनं ते सहजतेनं करून दाखवलं आहे. राजेंद्र गुप्ता या बुजुर्ग नटाबद्दल वेगळं काय बोलावं? त्यांनी सुरुवातीच्या प्रसंगांत नाथ देवळालीकरांचा दुर्दम्य आशावाद व नंतर चिडलेला, मोडलेला, हताश झालेला नाथ देवळालीकर बारकाव्यांनिशी सादर केला आहे.

या दोघांना इतर पात्रांची योग्य साथ लाभल्यामुळे इंग्रजी ‘कन्यादान’ बघताना आनंद होतो. याचं मोठं श्रेय दिग्दर्शक लिलिट दुबे यांचं आहे. त्यांनी कुठेही नाटकावरील पकड सुटू दिलेली नाही. संगीत (महेश तिनर्इकर), वेशभूषा (तृष्णा पोपट) या नाट्यघटकांनी नाटकाची रंगत वाढवली आहे. आवर्जून बघावा असा हा प्रयोग आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 19 June 2018

चांगलं अभिनिवेशरहित परीक्षण आहे. नाटक वाचायला तरी हवं. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख