कोण म्हणतं फिडेल मेला?
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
राजा कांदळकर
  • फिडेल कॅस्ट्रो (१३ ऑगस्ट १९२६ ते २५ नोव्हेंबर २०१६)
  • Mon , 28 November 2016
  • फिडेल कॅस्ट्रो Fidel Castro चे गव्हेरा Che Guevara क्युबा Cuba

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पच्या येण्यानंतर फिडेल कॅस्टोंचं जाणं हे नवा विचार करणाऱ्या जगभरातल्या लोकांना निराशाजनक वाटणं स्वाभाविक आहे, पण अशी निराशा येण्याचं काही कारण नाही. कारण फिडेल हा एखाद्या झाडासारखा क्रांतिकारक माणूस होता. झाडाचं एक वैशिष्ट्य असतं. बी पोटात पैदा करून झाड मोडून पडतं आणि बी पुन्हा झाड होण्यासाठी धडपडतं. झाडाच्या अनेक बियांपैकी एखादं तरी बी पुन्हा रुजतंच. अगदी निसर्गनियमाप्रमाणे आधी त्याचं ‘रोपटं’ आणि मग ‘झाड’ होतं.

मुळात चे गव्हेरा, भगतसिंग, गांधी ही अशा झाडांसारखी क्रांतिकारक माणसं होती. ती एकदा जन्माला आली की, त्यांना मरण नसतं. निसर्गानेच त्यांना अमरत्व बहाल केलेलं असतं. तेच फिडेलच्याही वाट्याला येणं स्वाभाविक आहे. म्हणून फिडेलना मरण नाहीच. ते सतत जिवंत राहणार!

२००४ साली पहिल्यांदा फिडेलच्या मरणाच्या बातम्या आल्या. नंतर २०११ साली तर त्यांच्या अंत्यविधीची वेळही ठरली होती. नंतर २०१२ साली ‘आता ते खरंच गेले आहेत’, असंही सांगितलं गेलं होतं. अमेरिकाधार्जिण सोशल मीडिया तर या बातम्या अतिशय उत्साहाने पेरण्यात पुढे होता; पण फिडेलनी जिवंत राहून त्या मरण्याच्या बातम्या ही अमेरिकेची लबाडी असल्याचं स्पष्ट केलं.

अमेरिका फिडेलच्या मरणावर एवढी टपून का होती? कारण त्यांचं आयुष्य तसं होतं. ‘क्युबा’ या अमेरिकेच्या पोटाजवळ अस्तित्व असलेल्या छोट्याशा देशात (आज लोकसंख्या ७० लाख) ते जन्मले. सधन उस उत्पादक शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या या मुलाने बापाचं ऊसाचं शेत पेटवून पहिलं बंड बापाविरुद्ध केलं; बंडखोर सवंगडी गोळा केले. चे गव्हेरा, भाऊ राऊल हे या बंडखोर टोळीतले त्यांचे क्रांतिकारक दोस्त! पन्नासेक पोरांच्या या बंडखोर टोळीनं क्युबातल्या सर्व सत्ताधीश हुकूमशहा बाटिस्टा याची सत्ता उलथवण्यासाठी १९५३ला लढा पुकारला. १९५३ ते १९५९ या काळात या टोळीनं अनेक यशापयशी लढे, युद्ध, गनिमी कावे अशा कारवाया करून क्युबातली २५ वर्षांची हुकूमशाही उदध्वस्त केली. ही हुकूमशाही अमेरिकाधार्जिण्या बड्या कंपन्या, बँकर्स यांचं हित जपे. या कंपन्या आणि बँकर्सनी क्युबन जनतेला अक्षरश: नागवल होतं. जनतेच्या या अभूतपूर्व एकजुटीतून क्युबन क्रांतीचं रोपटं बहरलं.

अमेरिकेच्या काखेत समाजवादी रोपटं असलेला क्युबा हा इवलुसा देश. त्याचं समतेचं स्वप्न वास्तवात आलं. ‘जग फक्त पैशेवाल्यांनाच चालवता येतं. ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वानं ते चालतं. सर्व शहाणपण फक्त पैशेवाल्यांनाच असतं. गरिबांनी फक्त त्यांच्या इशाऱ्यावर काबाडकष्ट करायचे; त्यांच्या मेहरबानीवार जगायचं. गरीब, छोट्या देशांनी श्रीमंत देशांची दादागिरी खपवून घ्यायची; लाचारी पत्करायची.’ - हे अमेरिकचं धोरण, अजेंडा.

या धोरणाला फिडेलनी अमेरिकेच्या काखेतच सुरूंग लावला. त्यांनी क्युबा हा समाजवादी देश असल्याचं घोषित करून अमेरिकाधार्जिण्या कंपन्या, उद्योगपती, बँकर्स यांची संपत्ती देशाच्या मालकीची करून टाकली. उद्योगांचं राष्ट्रीयीकरण केलं. या धोरणाने अमेरिका जाम वैतागली. ‘या साल्याचं फारच झालं!’, असं म्हणून त्या वेळेचे अमेरिकेचे अध्यक्ष आयसेन हावर यांनी क्युबाला देश म्हणून परवानगी नाकारली. फिडेल हे समाजवादी बांडगूळ असून त्यांच्यावर आणि त्यांच्या देशावर अमेरिकेने राजकीय, आर्थिक बंदी घातली; बहिष्कार टाकला. अमेरिका जगाचा पाटील! पण क्युबाने, फिडेलनी गावात राहून पाटलाशी ‘पंगा’ घेतला. गेली ६० वर्षं म्हणजे सहा दशकं फिडेलनी अमेरिकेशी वैर घेतलं. त्यासाठी ३२ वर्षं रशियाची मदत घेतली; पण जगभर कम्युनिस्ट देशांचा पाडाव झाल्यानंतरही क्युबाची वेस अभेद्य राहिली. अमेरिकेने जगातले समाजवादी, कम्युनिस्ट देश संपवले, पण काखेतला क्युबा काही तिला संपवता आला नाही.

क्युबा का संपला नाही, याचं उत्तर शोधायचं, तर फिडेलनी क्युबामध्ये काय केलं ते पाहावं लागेल. फिडेलच्या समाजवादी सरकारने क्युबात शिक्षणाच्या हक्काचा सार्वजनिक प्रसार केला. सरकार सर्व मुलांना मोफत शिक्षण देऊ लागलं. आज या देशात ९९ टक्के साक्षरता आहे. आरोग्याच्या सोयी खेडोपाडी, शेता-मळ्यात पोचल्या. शिक्षण, आरोग्य ही सरकारने जनतेला मोफत देण्याची सेवा असल्याने आणि ती सरकारने स्वतःची मूलभूत जबाबदारी मानल्याने इथली माणसं शिकली; सुदृढ झाली.

क्युबन माणसांचं मन शिकलेलं; शरीर निरोगी. सारा देश शिकलेला, निरोगी. ही समाजवादाची देणगी. त्यामुळे क्युबन लोक कल्पक, उद्योगी आणि नवनिर्मितीशील निघाले. अधिक चांगले माणूस बनले. म्हणून या देशात शास्त्रज्ञ खूप; स्त्रिया पुढे; नवनिर्मितीच्या क्षेत्रात या देशातल्या तरुणांच्या भराऱ्या. खनिज ऊर्जेला मानवी, प्राणी आणि सौर ऊर्जेला पर्यायाचे नवीनवी कल्पक मॉडेल या देशात उदयाला आली. पर्यावरणपूरक शेती अधिक उत्पादनशील कशी बनवायची याचे धडे जैविक खतं वापरून या देशाने जगाला दिले.

क्युबा हा शेतकरी, खेड्यांचा देश. या देशात फिडेलने समाजवादी क्रांतीचं स्वप्न सहा दशकं पाहिलं. देशाचा नेता रुबाबदार, आत्मसन्मानी, स्वप्नाळू, पण तितकाच वास्तववादी असेल, तर जनता त्यासाठी जीव द्यायला तयार होते. फिडेलवर क्युबन जनतेनं असा सतत जीव लावला होता.

९० वर्षांचं समृद्ध आयुष्य फिडेल जगले. एक क्रांतिकारी सैनिक म्हणून त्यांचं जीवन सुरू झालं. मुळात ते वकील; समाजशास्त्राचे हुशार विद्यार्थी. विद्यार्थिदशेत त्यांना चे गव्हेरासारखा क्रांतिकारक मित्र भेटला. दोघांनी समाजवादी क्रांतीची स्वप्नं रंगवायला सुरुवात केली; मार्क्सवाद कोळून प्यायले. त्यातले खाचखळगे त्यांनी न्याहाळले. ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे तत्त्व धारण केलं आणि सात-आठ वर्षं हुकूमशाहीशी प्रचंड संघर्ष केला. हा संघर्ष मुळातून अभ्यासण्यासारखा आहे. मराठीमध्ये ‘फिडेल, चे आणि क्रांती’ हे अरुण साधूंनी लिहिलेलं पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. स्वप्न जगताना या बंडखोर पोरांनी कुठली जोखीम घेतली होती, किती हुशारी, शहाणपण दाखवलं होतं हे या पुस्तकातून कळतं. ही बंडखोर पोरं थंडी, गारठ्यात उपाशीपोटी वेडी होऊन देशातल्या साऱ्या गरिबांना चांगलं जीवन मिळावं म्हणून रात्रंदिन संघर्ष करत होती.

स्वप्नाळू माणसं अनेकदा वास्तववादी नसतात. क्रांतिकारक अनेकदा अव्यवहारी आढळतात. सिद्धान्तवादी, वैचारिक माणसं बऱ्याचदा कृतीकडे पाठ फिरवतात; जवळपास निष्क्रिय बनतात. हे मानवी जीवनातले पेच, क्रांतिकार्याच्या प्रक्रियेतले धोके फिडेल-चे यांनी स्वतःच्या जीवनात टाळले. हे लोक बंदुका, बॉम्बगोळ्यांनी शत्रूला नामोहरम करत. त्यानंतर रात्ररात्र मार्क्सवाद, मानवतावाद यांच्या कंगोऱ्यांची चर्चा रंगवत. स्वतःचं जीवन आणि तत्त्वज्ञान सतत नवं राहावं, जिवंत राहावं, खळखळतं राहावं याची काळजी त्यांनी घेतली. पुढे चे बोलेव्हियाच्या क्रांतिसंग्रामात १९६७ साली गोळी लागून मरण पावले. फिडेलचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड गेले, पण त्याहीनंतर दोघांनी एकत्रितपणे पाहिलेलं स्वप्न फिडेलनी क्युबात साकारण्याचे प्रयत्न जारी ठेवले. २००६पर्यंत फिडेल अधिक सक्रिय होते. त्यानंतर त्यांचे भाऊ राऊल क्युबाचा अध्यक्ष झाले.

क्रांतीचा नायक, लोकनेता, राष्ट्राध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी अशा जबाबदाऱ्या फिडेलनी पेलल्या. ते भारतात १९८३साली आले. त्या वेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांची गळाभेट गाजली. दोघांचे भावाबहिणीचे संबंध दृढ झाले. भारताविषयी फिडेलना खूप आकर्षण होतं. प. बंगालमध्ये लोकशाही मार्गाने ज्योती बसू मुख्यमंत्री झाले, तेव्हा लोकशाही मार्गाने कम्युनिस्ट सत्तेत येऊ शकतात, याचं त्यांना खूप अप्रूप वाटलं होतं.

अमेरिकेच्या वर्चस्ववादी धोरणाला विरोध करणाऱ्या फिडेलना सीआयए या अमेरिकन गु्प्तचर संस्थेने अनेकदा मारण्याचे प्रयत्न केले, पण लोकांच्या पाठिंब्यामुळे फिडेल जिवंत राहिले. आता अमेरिकेत पूर्वीपेक्षा वर्चस्ववादाचा पुरस्कार करणारे ट्रम्प आले आहेत. अशा काळात फिडेलची गरज जास्त जाणवेल; पण ते नाहीत म्हणून जग वर्चस्ववाद खपवून घेणार नाही. कारण ‘हर जोर, जुल्म के टक्कर मे संघर्ष हमारा नारा है’ ही फिडेलची घोषणा नव्या बंडखोर पोरांना जन्म देत राहणार… बंड जिवंत राहणार!

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......